पराभवानंतरच्या चाली-हालचाली

0
17

नेहरूंनी घटना परिषदेपुढे  27 नोव्हेंबर 1947 रोजी जे भाषण केले, त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेतल्या प्रतिनिधींना आपला पराभव झाल्यासारखे वाटले. त्यानंतर प्रतिनिधींनी परिषदेचे चिटणीस यांना आपल्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात कळवल्या आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कोणत्या मार्गाने न्यायची त्या नव्या दिशेचा शोध सुरू झाला.

अध्यक्ष शंकरराव देव यांनी पं. नेहरूंचे मत आपल्याला पटले असल्याचे पत्र लिहून कळवले.
हरिभाऊ पाटसकर, केशवराव जेधे, रंगराव दिवाकर यांनी एक पत्रक काढून आपले  नेहरूंशी मतभेद असल्याचे जाहीर केले. ‘केवळ आंध्र प्रदेश प्रांत हा वेगळा करण्यास पात्र ठरवून नेहरूंनी अन्य प्रांतांवर अन्याय केल्याचे सांगून, नुसता आंध्र प्रांत निर्माण करायचा असेल तरी त्याच्या सीमा निश्चित करण्यासाठी आयोग नेमावा लागेल आणि मद्रास प्रांतात समाविष्ट केलेला बल्लारी जिल्हा कर्नाटकाला जोडण्याचा प्रश्न त्या आयोगाला सोडवावा लागेल, याचीही जाणीव पाटसकर, जेधे आदि मंडळींनी नेहरूंना पत्रकाद्वारे करून दिली.

विदर्भातले नेते रामराव देशमुख यांनी डॉ.ना.भा.खरे, बापुजी अणे आणि पंजाबराव देशमुख यांच्याशी चर्चा करून माडखोलकरांना लिहिले, ”आपल्या सर्वांना माहीत असलेले मुंबईतील हितसंबंधी गट आणि इतर लोकांनी वेगळ्या प्रांतासाठी केलेल्या मागण्या यांच्यामुळे आपण पराभूत झालो आहोत. महाराष्ट्राचा स्वतंत्र प्रांत करण्याबाबत काँग्रेस श्रेष्ठींना कधीच उत्साह वाटला नाही, म्हणून ते वेगळ्या प्रांतासाठी फार गडबड करत होते, त्यांची स्वतंत्र आंध्राची मागणी, अन्य मागण्यांमधून बाजूला काढून काँग्रेस श्रेष्ठींनी ती मान्य केली आणि त्यांनी आपल्याला, वाटत होते तसेच, अनिश्चित भवितव्याच्या तोंडी दिले आहे. आपण त्यांना पुरेसा उपद्रव दिला नाही हेच आपले चुकले.”

” या पराभवामुळे आपल्याला स्वतंत्र महाविदर्भाची मागणी करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या मागण्यांमध्ये मला फारसा फरक दिसत नाही. फरक असेल तर एवढाच की आंध्रातील लोक आपल्या मागणीसाठी इतरांना आक्षेपार्ह वाटावेत असे मार्ग अवलंबण्यास तयार आहेत, तर आपण आपले ध्येय सामोपचाराने साध्य करण्याचा प्रयत्नात आहोत.  आंध्रची तळी उचलण्यास तयार असलेले काही काँग्रेसश्रेष्ठी आहेत. आम्हा गरीब महाराष्ट्रीयनांना मात्र कोणी वाली नाही. काँग्रेसश्रेष्ठींना कोणती भाषा कळते ते आपल्याला चांगले समजले आहे. तुम्ही त्यांच्या आज्ञा मुकाट्याने पाळल्यात तर तुम्हाला ते दडपून टाकतात. तुम्ही जर त्यांच्या मार्गात अडथळे आणून त्यांना उपद्रव दिलात तर तुम्हाला जे हवे ते मिळते असे दिसते.”

रामराम देशमुखांच्या पत्रात मांडलेले मुद्दे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने पुढे जे उग्र स्वरूप घेतले त्याची भविष्यवाणीच होती! महाराष्ट्रीयांची तेव्हा जी अवस्था होती त्यात आजसुध्दा फरक पडलेला नाही. महाराष्ट्रीयांना दिल्लीत कोणीही वाली नाही. महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदारांत ‘मौनीं’ची संख्या अधिक असते हे नोंदले गेलेले आहे. पंजाबराव देशमुखांनी माडखोलकरांना 17 डिसेंबर 1947 रोजी पत्र पाठवून आपणही रामराव देशमुखांच्या या विचाराशी सहमत आहोत असे कळवले.

रामराव आणि पंजाबराव या दोन्ही देशमुखांच्या पत्रांमागील मनोवृत्ती आपल्याला पसंत पडली नाही आणि आपण तसे सभेत बोलूनही दाखवल्याचे शंकरराव देवांनी माडखोलकरांना कळवले. ”संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच्या मार्गातील ज्या अनेक अडचणी आहेत त्या सर्वांनी मिळून दूर करायच्या ही निष्ठा व तज्जन्य निश्चय यांचा पूर्ण अभाव दोन्ही देशमुखांच्या पत्रात दिसल्याचे सांगून शंकरराव देवांनी भाष्य केले महान कार्ये अशा अश्रध्दाळू व अधीर मनोवृत्तीने पार पडत नाहीत.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन शंकरराव देवांच्या मार्गाने न जाता अखेर, रामराव देशमुखांनी व्यक्त केलेल्या विचारानुसार गेले म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला.

About Post Author

Previous articleथट्टा अंगाशी आली..
Next articleचांगल्या चित्रपटांना फिल्म सोसायटी चळवळीचे अधिष्ठान…
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.