पत्त्यांचा खेळ – मनोरंजक सफर (Card Game – Fun ride)

0
86
_pattyanch_Sangrah

पत्त्यांचा खेळ जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला विश्वव्यापी खेळ आहे. तो आजोबा आणि नातू यांच्या निरागस ‘भिकार-सावकार’ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत फिरतो. ‘पत्त्यांचा बंगला’ सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधण्याचा प्रयत्न अनेकांनी लहानपणी केलेला असतो. पत्त्यांच्या खेळाने मराठी साहित्याला अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे, पत्त्यांची उपमा आध्यात्मिक पातळीवरही पोचते. अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.

पत्त्यांचा सर्वात जुना उल्लेख चीनमध्ये नवव्या शतकात आढळतो. तेव्हा पत्ते बत्तीस होते. नंतर ते तेराव्या शतकात मंगोल आक्रमकांनी ‘सिल्क रोड’मार्गे पर्शियात (इराण) नेले. पर्शियन भाषेत त्याला गंजीफेह म्हणत. पत्ते मोगल मंडळींनी भारतात सोळाव्या शतकात आणले. भारतात ‘गंजिफा’ या पत्त्यांनी गोल आकार धारण केला. पत्त्यांची संख्या ही विष्णूचे दहा अवतार, राशी, नवग्रह यांच्या आधारे एकशेवीसवर पोचली. मुस्लिम राजवटीतील गंजीफांना ‘चंगकंचन’ म्हणत असत. तो शब्द चंग आणि कंचन या पर्शियन व संस्कृत शब्दांमधून बनला असून त्यामध्ये शहाण्णव पत्ते असत. तसा उल्लेख ‘बाबरनामा’ ग्रंथात आहे. तो हिंदू खेळ असल्याचा उल्लेख ‘आयन- ए-अकबरी’ या ग्रंथात आहे. त्यात हा खेळ एकशेचव्वेचाळीस पानांचा आणि बारा जणांमध्ये विभागून खेळण्याचा असा उल्लेख आहे. गंजिफा हे चौकोनी, आयताकृती, षटकोनी आकाराचेही होते. ते हस्तिदंतापासूनही तयार केले जात असत. 

_Sawant_Wadiमहाराष्ट्रात सावंतवाडीच्या राजांनी, त्यांच्या कारागिरांची कला टिकवण्यासाठी त्यांना लाकडी खेळण्यांबरोबर खास प्रकारच्या कागदाचे गंजिफा बनवण्यास उत्तेजन दिले. तेथे राजवाड्यात खास गंजिफा बनवून विकले जात. तेथे प्रत्येक पत्ता हाताने रंगवला जातो. त्यातील बारकाव्याने रंगवलेली चित्रे विदेशात लोकप्रिय आहेत. त्या संचांचे खोकेही आकर्षक चित्रांनी आणि विविध रंगांमध्ये रंगवलेले असतात. त्यांची चेहेरेपट्टी आणि वस्त्रांवरील चित्रे अस्सल मराठी धाटणीची असतात. माझ्याकडे तेथे बनवलेला पत्त्यांचा एक खास संच आहे. त्यांतील राजा, राणी आणि गुलाम हे सर्व मराठी वेशभूषेत आहेत. राजाच्या कमरेला तलवार आणि हातात फूल आहे. कपाळाला गंध आहे. राणीसाहेबांच्या डोईवर पदर आणि नाकात नथ आहे. हातात तलवार घेऊन सज्ज असलेल्या गुलामाच्या पाठीवर ढाल आणि कपाळी गंध आहे. त्या संचाचा लाकडी डबा उत्तम रंगसंगतीतील छान चित्रांनी रंगवलेला आहे. माझ्याकडील ओरिसा येथील गंजिफा संच हा पातळ कागदापासून बनवलेला आहे. अन्य दोन गंजिफा संच हे सावंतवाडीचे असून त्यांचे डबेही आकर्षक आहेत. 

गंजिफा उपलब्ध असले, तरी ते खेळायचे कसे? त्याचे नियम काय? तो खेळ महाराष्ट्र, ओरिसा, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतात खेळला जात असे. प्रत्येक ठिकाणी वापरले जाणारे संच, पत्त्यांची संख्या, नियमांमध्ये असलेला फरक, खेळण्याची पद्धत, खेळाचा प्राचीनपणा, स्थानिक वैशिष्ट्य यांमुळे नियमांमध्ये एकवाक्यता नाही. त्या खेळाची माहिती ‘श्रीतत्त्वनिधी’ आणि ‘कौतुकनिधी’ या ग्रंथांमध्ये आहे. ते ग्रंथ मिळणे दुरापास्त झाले आहे. मी त्या संबंधीच्या तीन पुस्तिका कोल्हापूरच्या राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात पाहिल्या होत्या; पण त्या अभ्यासासाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

विष्णूच्या दहा अवतारांच्या एकशेवीस पत्त्यांच्या संचामध्ये प्रत्येक अवताराचे चित्र असलेला एकेक पत्ता म्हणजे राजा, दुसरा साधारणतः संबंधित चित्र असलेला एकेक पत्ता म्हणजे मीर/प्रधान (वजीर) असतो. नंतर एक्का ते दश्शी असे दहा/ दहा पत्ते असे प्रत्येक अवताराचे बारा पत्ते आणि दहा अवतारांचे एकूण एकशेवीस पत्ते असतात.  मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या पाच अवतारांमधील पत्त्यांची किंमत म्हणजे अवतार पत्ता सर्वात श्रेष्ठ; नंतर वजीर, एक्का, दुर्री असे करत करत दश्शी सर्वात कमी किंमतीची असते. परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी या अवताराच्या पत्त्यांमध्ये अवताराचा पत्ता सर्वात श्रेष्ठ; नंतर वजीर, नंतर दश्शी, नश्शी असे करत करत एक्का सर्वात कमी किंमतीचा असतो. 

_mughal_e_azamपत्ते पिसण्यासाठी ते धोतरासारख्या पातळ वस्त्रामध्ये पसरून हाताने गोल गोल फिरवून मग वाटले जातात. तो खेळ तीन खेळाडू खेळतात. त्यामुळे प्रत्येकाला चाळीस/ चाळीस पाने येतात. खेळ जर दिवसा खेळला जात असेल, तर ज्याच्याकडे रामाचा पत्ता आला असेल त्याने पहिली उतारी करायची आणि रात्री खेळला जात असेल तर ज्याच्याकडे कृष्णाचा पत्ता आला असेल त्याने पहिली उतारी करायची असते. खेळ सुरू करणाऱ्याला ‘सुरू करतो’ म्हणून सुरूक्या किंवा सुरक्या म्हणतात. रामाचा पत्ता खेळल्यावर त्याने रामाच्याच अवतारातील आणखी एक हलका पत्ता खेळायचा आणि इतर दोन खेळाडूंनी दोन/दोन पत्ते खेळायचे. उतरलेले ते सर्व सहा पत्ते सुरक्याचा हात म्हणून त्याच्या मालकीचे होतात. ज्याच्याकडे पत्ते जास्त जमा होतात त्याला दुसऱ्यांचे पत्ते ओढण्याचा हक्क मिळतो. त्या खेळामध्ये पैसे लावणे किंवा जमीन, राज्य असे काही पणाला लावणे वगैरे होत नाही. येथपर्यंत सर्व भाग हा खूप मनोरंजक आहे. त्या खेळासाठी जबरदस्त स्मरणशक्ती लागते, वेळ लागतो. खेळाचे पुढील नियम किचकट आणि गुंतागुंतीचे आहेत.

पुण्याच्या एका संस्थेने, मुलांना धार्मिक सणांचे महत्त्व कळण्यासाठी प्रत्येक पत्त्यावर एकेक सणाची माहिती असलेला वेगळा संच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये बदाम, चौकट, इस्पिक, किलवर ऐवजी कमळ, स्वस्तिक, त्रिशूल आणि बिल्वपत्र आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी, विविध देशांनी त्यांच्या त्यांच्या देशांतील चोपन्न विविध सौंदर्यस्थळे निवडून त्या प्रत्येकाचा एकेक पत्ता असा बावन्न पत्ते आणि दोन जोकरच्या पत्त्यांचे संच वितरित केले आहेत. एका जुन्या संचामध्ये जोकरवर चार्ली चॅप्लिन यांचे चित्र आहे. चॅप्लिन यांच्या विनोदाला कारुण्याची झालर असायची. ते लक्षात घेता चार्ली चॅप्लिन यांचाच जोकर म्हणजे एक ‘करूण विनोद’ वाटतो. 

सद्य स्वरूपातील पत्ते साधारणत: पंधराव्या शतकात अवतरले. तेव्हा सर्वात कमी मूल्याचा पत्ता ‘नेव्ह’ ( KNAVE ) म्हणजे ‘राजपुत्र’ असा होता. पत्त्यांच्या अनेक खेळांमध्ये राजा सर्वात मोठा की एक्का मोठा, असा प्रश्न असतोच. पत्त्यांमध्ये जोकर आणण्याची मूळ कल्पना अमेरिकन लोकांची, पण जोकरांचा धुमाकूळ मात्र हल्ली सगळ्या क्षेत्रांत दिसतो.  

पत्त्यांच्या माझ्या संग्रहात एक इंचापासून ते दीड फूट आकाराचे, गोल, चौकोनी, पारदर्शक, झेड (Z) आकाराचे, बावन्न जातींच्या वेगवेगळ्या मांजरांच्या चित्रांचे, अत्यंत विचित्र आकाराचे, जादूसाठी वापरले जाणारे, विविध सणांची माहिती देणारे,भविष्यकथन करणारे, भोपळ्याच्या बीसारखे लंबगोल आकाराचे अशा विविध प्रकारचे दुर्मीळ पत्ते आणि गंजिफा आहेत. संपूर्ण सुवर्ण रंगात; तसेच, चंदेरी रंगांत छापलेले सोन्याचांदीचे पत्ते हे खासच आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात, चित्रपटाच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच वापरले गेलेले 1960चे  ‘मुघल-ए आझम’चे पत्ते आणि अंधांसाठीचे ब्रेलमधील पत्तेदेखील माझ्याकडे आहेत. त्या _all_product_katप्रत्येकाचा बावन्न+दोन (जोकर) असा पूर्ण संच माझ्याकडे आहे. हिंदीतील ‘मुघल- ए आझम’ चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे दोन कॅट्स, पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. त्या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले आहे. चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली आहेत, तर त्या दोघांचे एक चित्र त्या पत्र्याच्या डब्यावरही आहे. आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राण्यांच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहरे छापले आहेत. कॅटमधील दोन जोकरवर ‘मुघल – ए – आझम’ असे छापले आहे. 

‘इंटर नॅशनल कॅट असोसिएशन’च्या मते, घरगुती मांजरांच्या चोपन्न प्रजाती आहेत. त्या प्रत्येक प्रजातीच्या गोंडस मांजराचे चित्र असलेला एक पत्ता असे चोपन्न प्रजातींच्या चोपन्न वेगवेगळ्या चित्रांच्या पत्त्यांचा सुंदर कॅट माझ्या संग्रहात आहे. ते बावन्न पत्ते आणि दोन जोकर असे चोपन्न पत्ते आहेत. आपल्याला काळे, पांढरे, लाल, राखाडी, सोनेरी एवढ्याच प्रकारची मांजरे माहीत आहेत. पण एवढी विविध मांजरे पाहताना खूप मजा वाटते. त्यातील जोकरांवरील मांजरे इतकी छान आहेत, की त्यांना ‘जोकर’ म्हणणे शोभत नाही. नेहमी सर्वत्र दिसणाऱ्या दोन सोनेरी मांजरांची प्रजाती ‘युरोपियन शॉर्ट हेअर’ आणि ‘इजिप्शीयन माऊ’ अशी आहेत. म्हणजे दिसते आमच्याकडे तिचे नाव माऊ, पण इजिप्शीयन माऊ! ते अतिशय वेगळ्या आकाराचे पत्ते ठेवण्याचा प्लॅस्टिकचा खोका मांजराच्या आकाराचा आहे. त्या पत्त्यांच्या कॅटचे इंग्रजी नाव ‘म्यांव प्लेर्इंग कार्ड्स’ असे आहे. 

टॅरो कार्ड्स हा पत्त्यांचाच प्रकार आहे. पण त्याचे स्वरूप आणि उद्देश वेगळा आहे. नेहमीच्या पत्त्यांच्या साहाय्याने देखील ज्योतिष सांगितले जाते. ते ज्योतिष आणि असंख्य जादू मला माहीत आहेत. पण त्यांची उदाहरणे म्हणून मी फक्त काही संच माझ्या संग्रहात ठेवले आहेत. पोर्नो प्रकारातील असंख्य संच जगभरात अनेक संग्राहकांकडे असतात, पण मी माझा उद्देश वेगळ्या आणि कौटुंबिक छंदाचा असल्याने तसा एकही संच ठेवलेला नाही. 

माझ्याकडे SKAT या एका वेगळ्या जर्मन खेळाच्या पत्त्यांचे संच आहेत. तो बत्तीस पत्त्यांचा खेळ जर्मनीत प्रसिद्ध आहे. त्या खेळाचे विशेष नियामक मंडळ जर्मनीतील अल्टेनबर्ग येथे 1927 पासून कार्यरत आहे. दरवर्षी देशपातळीवर ‘जर्मन चॅम्पियन स्पर्धा’ घेतली जाते. आणखी एका संचामधील प्रत्येक पत्ता 3D किंवा होलोग्राम पद्धतीने छापलेला असल्याने, पटकन दिसतच नाही. पण निरखून पाहिल्यावर उजेडात त्यातील सुंदर छपाई कळते. पारदर्शक पत्ते म्हणून जो संच आहे; त्यात एका पारदर्शक प्लॅस्टिक तुकड्यावर एका बाजूने, निळ्या रंगाची तीन वर्तुळे दिसतात. पण तुकडा उलटल्यावर तो पत्ता असल्याचे लक्षात येते. बियर, सिगारेट्स, विमान कंपन्या, कॅसिनो क्लब यांचे पत्ते उत्तम प्रतीचे आहेत.  

_manjar-patteपत्त्यांचा कॅट फुकट मिळतो म्हणून, लहानपणी आईवडिलांकडे हट्ट धरून JOY आईस्क्रीम अनेकांनी Enjoy केले असेल. त्याची आठवण आपल्याला ‘जॉय आईस्क्रीमचा संच’ नक्कीच करून देईल. त्याचबरोबर नेत्रहिनांसाठी खास तयार केलेला  संचही निरखून पाहवा असा आहे. तो संच सर्वसामान्य पत्त्यांसारखा आहे, पण त्याच्या प्रत्येक पत्त्याच्या उजव्या कोपऱ्यात वर आणि डाव्या कोपऱ्यात खाली, ब्रेल लिपीत पत्त्यांची ओळख कोरलेली आहे. उजव्या हातात पत्ते धरणाऱ्या खेळाडूला, नुसत्या बोटाने चाचपून पत्ता कळतो. शब्दांची स्पेलिंग्ज आणि अंकांशी खेळण्यास Lexicon Cards हा खेळ शिकवतो.

पूर्वी विविध प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी पत्त्यांचे कॅट छापून वाटले जात असत. चहा, ब्लेड्स, दारूचे विविध प्रकार, सिगारेट अशा अनेक उत्पादनांपासून कुटुंब नियोजनापर्यंतच्या प्रचारासाठी; तसेच, गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीसाठी छापलेले कॅटस वाटले जात असत. विदेशातील विविध विमान कंपन्या आणि अगदी ‘एअर इंडिया’सुद्धा प्रवासामध्ये फार छान चित्रांचे पत्ते प्रवाशांना देत असत. ताजमहाल हॉटेलने त्याच्या मान्यवर ग्राहकांना, हॉटेलच्या छान पेंटिंग्जचा दिलेला कॅटही देखणा आहे. तसे सर्व कॅट्सही माझ्याकडे आहेत. पूर्वी एखादे एकटे आजोबा पत्त्यांचा ‘पेशन्स गेम’ एकटेच खेळत बसलेले दिसायचे. लहानपणी आजोबांबरोबर, सुट्टीत मित्रांबरोबर, गावी कार्यक्रमाला जमल्यावर, मुंबईत गाडीमध्ये, क्लबमध्ये असा कोठेही आणि कितीही वेळ रंगणारा पत्त्यांचा खेळ आता कॉम्प्युटर आणि मोबाईलवरही त्याची लोकप्रियता टिकवून आहे.

– मकरंद करंदीकर 9969497742
makarandsk@gmail.com

(लेखातील फोटो मकरंद करंदीकर यांच्या संग्रहातील आहेत.)

About Post Author

Previous articleविशेषांचे मनसोक्त जगणे! – ‘सहवास – अ केअर!’
Next articleकोल्हापूरला बुडवले कोणी? (Who Drowned Kolhapur?)
मकरंद करंदीकर हे बहात्तर वर्षाचे आहेत. त्यांचा 'भारतीय दिव्यांचा' संग्रह हा मुख्य छंद आहे. त्यांच्याकडे हजारहून अधिक भारतीय बनावटीचे दिवे संग्रही आहेत. शिवाय त्यांच्याकडे अडकित्ता, तिकिटे, दौत अशा अनेक साहित्याचे संग्रह आहेत. त्यांनी बीएससी, एल एल बी आणि सी ए पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी चाळीस वर्षे बँकेत नोकरी केली. बँकेत नोकरी करत असताना त्यांनी 'सी ए आय आय बी' चे शिक्षण घेतले. ते आता सेवानिवृत्त आहेत. ते, त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातू असे कुटुंब आहे.