पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या

0
85
-pakshinirikshan-uttamsadakal

करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग… त्या महामार्गाला लागून, करंजाळे गावची छोटीशी शाळा आहे. शाळा दिसण्यास एकदम मनमोहक आहे. कौलारू इमारतीसमोर छोटेसे मैदान आहे. इमारतीच्या भोवताली सुरेख ‘वॉल कंपाऊड’ आहे. त्याला खेटून गुलमोहर, सुबाभळ आणि अशोक यांची झाडे आहेत.

मी बदली होऊन तेथे आल्यावर तर मला शाळा खूपच आवडली, कारण तेथील मुले चुणचुणीत होती- अभ्यासात हुशार होती- उपक्रमात हिरिरीने सहभाग घेणारी होती. मला अध्यापनासाठी सातवीचा वर्ग मिळाला. मग मी माझ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये हस्ताक्षरसुधार, शुद्धलेखन, तारखेनुसार पाढे-पाठांतर, रोज पाच इंग्रजी शब्द पाठांतर, छोट्या वाक्यांद्वारे इंग्रजी संभाषण, औषधी वनस्पतींची माहिती, दिलेल्या शब्दांद्वारे कथालेखन, उत्स्फूर्त कविता-लेखन अशा प्रकारच्या उपक्रमांचा समावेश होता. मला त्या उपक्रमांचे यशही लगेच दिसून आले. मुलांच्या बदलत्या अभिरुचीला योग्य वळण मिळावे यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबर अवांतर उपक्रम किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित झाले.

त्या सर्वांपेक्षा वेगळा, सरस एक उपक्रम केला. त्यामुळे तो माझ्या लक्षात राहिला. त्यामुळे मलाही नवे ज्ञान मिळाले, नवी आवड निर्माण झाली. तो उपक्रम म्हणजे ‘पक्षी निरीक्षण’. त्याचे झाले असे, की शिक्षण विस्तारअधिकारी अशोक लांडे यांनी एकदा आमच्या शाळेला भेट दिली. सोबत केंद्रप्रमुख यश मस्करे हेसुद्धा होते. विस्तारअधिकारी शाळेची तपासणी झाल्यावर खूश होऊन गेले. त्यांना शाळेची एकंदर गुणवत्ता आणि शाळेचे सुंदर वातावरण आवडले. त्यांनी सर्व मुलांशी हितगुज करावे, म्हणून आम्ही छोटीशी सभा शाळेच्या मैदानात घेतली. साहेबांनी मुलांशी गप्पागोष्टी छानपैकी केल्या. साहेबांनी मुलांशी बोलता बोलता त्यांना सहजच एक प्रश्न विचारला. ‘मुलांनो, तुमच्या शाळेभोवती सुंदर निसर्ग आहे, वेगवेगळी झाडे आहेत. समोर मोठे धरण आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात वेगवेगळे पक्षीही असतील. मग मला सांगा, तुमच्या अवतीभवती असणाऱ्या पक्ष्यांची नावे तुम्हाला माहीत आहेत का? असतील तर मला त्या पक्ष्यांची नावे सांगा.’ साहेबांनी प्रश्न विचारला आणि मुले विचारात पडली. मुलांनी त्यांना आठवतील त्या पक्ष्यांची नावे सांगितली. पण ती नावे चिमणी, -pakshinirikshan-arakhadaकावळा, मोर, बगळा यांच्या पलीकडे गेली नाहीत. खरे तर, मी सुद्धा त्या प्रश्नाने भांबावून गेलो आणि उत्तर जुळवू लागलो. मलाही पक्ष्यांची नावे फार माहीत नव्हती. पण मला साहेबांच्या प्रश्नाने विचार करण्यास भाग पाडले अन् माझ्या मनात ‘पक्षी निरीक्षण’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय पक्का झाला. मी पक्ष्यांच्या माहितीची बरीच पुस्तके मिळवली. डॉ.सलीम अली, किरण पुरंपरे, मारूती चितमपल्ली, सचिन मेन, बिक्रम गरेवाल, गरीमा भाटिया, किशोर पवार, श्रीकांत तापकीर, नलिनी पवार अशा नामवंत पक्षीतज्ञ व पक्षीनिरीक्षक लेखकांची पुस्तके अभ्यासली. पक्ष्यांविषयीची बरीचशी माहिती ‘इंटरनेट’वरून उपलब्ध करून घेतली, पक्ष्यांची जेवढी माहिती मिळेल तेवढी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मग पक्षी निरीक्षण उपक्रमाचा आराखडा माझ्या मनात तयार झाला तो असा – 

मी मुलांना तशा प्रकारचा आराखडा तयार करून, त्याद्वारे पक्ष्यांचे निरीक्षण करून माहिती मिळवण्याचे काम दिले. त्यांना त्यासाठी छोट्या नोंदवह्या दिल्या. त्यांनी त्यांना जे पक्षी आजूबाजूला दिसतील त्यांची माहिती वह्यांमधील आराखड्यांत नोंदवण्यास सांगितले. फोटो उपलब्ध झालाच, तर वहीत चिकटवा अशा सूचना देऊन उपक्रम सुरू केला. मुलांचा उत्साह एवढा दांडगा होता, की त्यांनी आठवडाभरात बऱ्याच पक्ष्यांची माहिती मिळवली. काही पक्ष्यांची चित्रे उपलब्ध झाली नाहीत, ती मी पुरवली. अशा प्रकारे, मुले पक्षी निरीक्षण उपक्रमात रंगून गेली. 

शाळेतील बऱ्याच मुलांनी तो उपक्रम छंद म्हणूनही मोकळ्या वेळेत जोपासला. त्याचा फायदा असा झाला, की मुलांना पाणकावळा, ढोकरी, काळा शराटी, बहिरी ससाणा, लावा, टिटवी, हरियाळ, भारद्वाज, कोकीळ, शिपाई बुलबुल, धीवर, मैना, गप्पीदास, कोतवाल, तांबट असे नवनवीन पक्षी आढळले. स्वर्गीय नर्तक, वेडा राघू, हुदहूद खाटीक, पिवळा धोबी, पांढरा धोबी, वटवट्या, शिंपी, चिरक, नाचरा, सातभाई, युवराज, चष्मेवाला, सुगरण अशा काही पक्ष्यांची नवीन माहिती मिळाली. त्यांना त्यांच्या सभोवती चाळीसपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आहेत हे ज्ञात झाले. त्यांना निसर्गाकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळाली. पक्षी निरीक्षणामुळे निसर्गातील सजीवांना विनाकारण त्रास आमच्याकडून दिला जाण्याचे प्रमाण कमी झाले. मुलांच्या मनात पशुपक्ष्यांविषयी आदर निर्माण झाला. त्यांच्या अंगी निसर्गाचे जतन करण्याचे मूल्य बाणले गेले. 

-pakshi-photosउपक्रमाने मुलांची ज्ञानकक्षा जशी रूंदावली तसे माझेही पक्ष्यांविषयीचे ज्ञान वाढले. परिसरात आढळणाऱ्या या पक्ष्यांबद्दल मलाही फारशी माहिती नव्हती. पण हा उपक्रम सुरू केल्यापासून मीसुद्धा पक्षी निरीक्षण करू लागलो. पक्ष्यांच्या  हालचाली, त्यांचे घरटे, त्यांचे पिलांचे संगोपन, त्यांना लागणारे खाद्य, त्यांचा आढळ असणारा प्रदेश अशा विविध गोष्टींचा अभ्यास करता करता माझ्याही ज्ञानकक्षा रुंदावल्या. मला उपक्रमामुळे असा दुहेरी फायदा मिळाला. आता मुले सहलीला किंवा क्षेत्रभेटीला गेल्यावर शोधक नजरेने आजुबाजूचा परिसर बघतात. नवीन पक्षी दिसतोय का, ते शोधताना मुलांमध्ये झालेला बदल ही उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. उपक्रमाने मुलांमध्ये नाविन्याचा ध्यास निर्माण केला- त्यांच्यात दडलेला संशोधक, निरीक्षक, निसर्गप्रेमी जागा केला म्हणून ‘पक्षी निरीक्षण’ हा उपक्रम माझ्यासाठी उपयुक्त आणि अविस्मरणीय ठरला. 

– उत्तम सदाकाळ uttamsadakal@gmail.com
7767977379/9011016655

About Post Author