पक्षीमित्र अनिल महाजन आणि त्यांची चातकसंस्था

_Anil_Mahajan_Chatak_1.jpg

अनिल महाजन यांना शाळेमध्ये अभ्यासात रस फारसा नव्हता, परंतु त्यांना पक्ष्यांचे निरीक्षण करण्यास आवडत असे आणि त्यातूनच पक्षी-अभ्यासात त्यांचे स्थान तयार झाले व ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखलपात्र ठरले आहेत! अनिल महाजन पक्ष्यांचे निरीक्षण १९९७ सालापासून करत आहेत.

त्यांना पक्षीनिरीक्षण करून पक्ष्यांची माहिती जमा करणे, त्यांचा सखोल अभ्यास करणे व गरज असल्यास त्यांची काळजी घेणे हा ध्यास लागला. त्यांनी गो.नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर यांची पुस्तके त्याकरता वाचली-अभ्यासली. त्यांनी स्वत: पक्ष्यांच्या माहितीचे लेख वृत्तपत्रे, मासिक, साप्ताहिके यांना दिले. त्या माध्यमातून, ते अन्य पक्षीनिरीक्षकांशी व व्यक्तींशी जोडले गेले. त्यांनी संयुक्त रीत्या कॅम्प करून पक्षीनिरीक्षणाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. पक्षी, सस्तन वन्यप्राणी, फुलपाखरे, कीटक यांच्याविषयीचे देश-विदेशांतील संदर्भ ग्रंथ त्यांच्याकडे आहेत; तसेच, ‘बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ने प्रकाशित केलेली पुस्तकेसुद्धा आहेत. महाजन यांचे पक्ष्यांवरील प्रेम त्यांच्या घरातील विशिष्ट प्रकारची पक्ष्यांची छायाचित्रे आणि पक्ष्यांचे घड्याळ पाहून दिसून येते.

महाजन यांनी ‘नूतन मराठा महाविद्यालय (वरणगाव)’ येथून बी एस्सी पदवी प्राप्त केली. अनिल महाजन यांनी ‘चातक’ (चातक नेचर काँझर्वेशन सोसायटी) संस्थेची स्थापना २०११ साली केली. संस्थेचे मूळ व व्यापक उद्दिष्ट आहे – निसर्गाविषयी आवड निर्माण करणे, वनस्पती आणि प्राणी यांच्या जैवविविधतेची माहिती करून, पर्यावरणाविषयी रूची शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, वृक्षारोपण करणे, वृक्षतोड थांबवणे.

अनिल महाजन ‘चातक’ संस्थेच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलन करणे, चिमणी दिनाच्या दिवशी चिमण्यांसाठी घरट्यांची निर्मिती करणे, उन्हाळा सुरू झाल्यास मातीची भांडी बनवून पक्ष्यांसाठी ती पाण्याने भरून ठेवणे – त्या भांड्यांचे मोफत वाटप करणे, हतनूर धरण-तलाव-सरोवरे अशा ठिकाणी पक्ष्यांचे निरीक्षण कार्यक्रम घेणे असे वेगवेगळे उपक्रम करत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र वरणगाव, भुसावळ, मुक्ताईनगर या परिसरात आहे. ते परदेशातील पर्यटकांना हतनूर धरणावर पक्षीनिरीक्षणास घेऊन जातात. अनिल महाजन स्वत: वर्षाला पंचवीस ते तीस हजार पक्ष्यांचे निरीक्षण करतात. महाजन यांनी पक्ष्यांच्या काळजीविषयी वनप्रशिक्षण संस्था (पाल) येथे व्याख्यानही दिले आहे.

_Anil_Mahajan_Chatak_4.jpgअनिल महाजन यांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या संस्थेला ‘वसुंधरा मित्र पुरस्कार’ नाशिक येथे २०१७ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात मिळाला. त्यांना ‘भुसावळ भूषण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांनी काही लघुचित्रपटदेखील तयार केले आहेत. त्यात तांबट पक्ष्यावर मराठीत प्रथमच लघुपटाची निर्मिती झाली. त्यांच्या ‘तांबट’ चित्रपटाला पंचविसाव्या महाराष्ट्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले, तर ‘चमत्कारिक पक्षीविश्व’ या चित्रपटाला नागपूरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये तिसरे पारितोषिक मिळाले. त्यांच्या काही चित्रपटांचा संच युट्युबवरदेखील आहे. महाजन यांनी ‘तांबटाची वीण’ हा माहितीपट आयुध निर्माणी (वरणगाव) येथे चित्रित केलेला आहे. त्यात तांबट पक्षी कशा प्रकारे घरटे कोरून तयार करतो, त्याला घरटे कोरण्यास किती दिवस लागतात, पिल्लांचे संगोपन तो कशा पद्धतीने करतो, त्यांना खाऊ काय घालतो, त्याची पिल्ले मोठी होण्यास किती दिवस लागतात, ती घरट्यात किती वाजता येतात व बाहेर केव्हा पडतात आदी गोष्टींच्या नोंदी बारकाईने घेतल्या गेल्या आहेत. माहितीपटास उत्स्फूर्त दाद संमेलनात मिळाली व प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित झाले. दोन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

दक्षिणेकडून युरोपमध्ये जाणारे पाणपक्षी हतनूर जलाशयाकडे आकर्षित होत आहेत. ‘रेड फ्यालोरफ’ या दुर्मीळ पक्ष्याने २०१७ साली प्रथमच तेथे हजेरी लावली. तो दक्षिणेतून युरोपात स्थलांतर करत असतो. मार्गात कोठे चांगले खाद्य मिळाल्यास तेथे काही दिवस मुक्काम करतो. हा स्थलांतरित व अतिदुर्मीळ पक्षी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, धुळे, जळगाव येथून लोक येतात.

हतनूर परिसरात जलाशयाच्या दलदलीमुळे उन्हाळ्यातसुद्धा पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असते. त्यामुळे काही विदेशी पक्ष्यांचा मुक्काम तेथे वाढलेला आहे. जलाशयाला पाणथळ, झुडपी, जंगल, दलदल, गवताळ प्रदेश, शेती अशा संमिश्र अधिवासामुळे ‘पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्रा’चा दर्जासुद्धा प्राप्त झाला आहे. त्या जलाशयावर तीनशेच्यावर पक्षी प्रजातींची हजारोंच्या संख्येने नोंद करण्यात आली आहे. पक्ष्यांची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जावी म्हणून राज्य सरकारने मदत करावी अशी अनिल महाजन यांची अपेक्षा आहे.

_Anil_Mahajan_Chatak_2.jpg‘चातक निसर्ग संवर्धन संस्था’ दरवर्षी वृक्ष बीजांचे वाटप, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य करत असते. संस्था जखमी अवस्थेतील प्राणी, पक्षांवर उपचार व त्यांची देखभाल करते. दरवर्षी कृत्रिम घरटी आणि जलपात्रांचे वितरण करून पक्ष्यांसाठी अन्न, पाणी आणि अधिवासाची सोय व्हावी यासाठी लोकांना उद्युक्त करते. प्राणी-पक्ष्यांची होणारी शिकार, अवैध तस्करी; तसेच, वृक्षतोड व लाकडांची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी वनविभागाच्या मदतीने प्रयत्न करत असतात. संस्था दरवर्षी विविध ठिकाणी होणाऱ्या पशुपक्षी गणनेत सहभागी होत असते. पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेतर्फे दरवर्षी ‘सृष्टीमित्र’ पुरस्कार देऊन गौरव केला जातो. सृष्टी रक्षति रक्षित: हे ब्रीद घेऊन संस्था कार्यरत आहे.

अनिल महाजन यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी सुरेखा (गृहिणी) व दोन मुले – एक सौरभ (Bsc) आणि दुसरा पियुष (दहावी), शिवाय अनिल यांच्यापेक्षा थोरले एक भाऊ व एक बहीण आहेत. महाजन वरणगाव फॅक्टरीत नॉन गॅझेंटेड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

चातक संस्था, वरणगाव, जळगाव
अनिल महाजन 8806198040
anil.birds@gmail.com

– प्रियंका वाणी pwani2262@gmail.com

(हा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ अाणि ‘डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय’, जळगाव या उभय संस्थांमध्ये राबवण्यात अालेल्या माहितीसंकलन इंटर्नशीप योजनेमधून निर्माण करण्यात अाला.)

About Post Author

3 COMMENTS

  1. Sir chan work ahe apl mla…
    Sir chan work ahe apl mla sudha birdobservationcha chand ahe.
    aplyla bhetyla awdel mla

Comments are closed.