न्हावीगड किल्ला

1
57
carasole

न्हावीगड हा चार हजार नऊशे फूट उंच गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. तो नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेत आहे. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सह्याद्री पर्वताच्या उत्तर–दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. सह्याद्रीच्या या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळक्यांच्‍या सोबतीने न्हावीगड किल्‍ला उभा आहे. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे किल्ले आहेत. पश्चिमेकडे गुजरातमधील घनदाट जंगलाचा डांगचा टापू येतो. डांग-बागलाण यांच्या सीमेवर किल्ले वसलेले आहेत.

इसवी सन १४३१ मधे अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी तुंबळ युध्द झाले. दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाल्याने दोन्ही सैन्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन माघार घेतली. शिवाजी महाराजांच्या काळात हा गड स्‍वराज्‍यात आला. शिवकालिन कागदपत्रात न्‍हावीगडचा उल्लेख नाहावागड असा आला आहे.

गडावर जाताना पायऱ्या तर लागतात; पण दरवाज्याचा मागमूसही नाही. न्‍हावीगड किल्ल्याचा माथा निमुळता आहे. गडावर जाण्याच्या वाटेवर पिण्याच्या पाण्याचे तीन टाके आणि मंदिर लागते. घरांचे काही अवशेष सापडतात. गडाचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळका आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. त्‍या सुळक्यात एक नेढे आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावरून मांगी-तुंगी, मुल्हेर, मोरागड, साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो.

गडमाथ्यावर पोचल्यावर समोर दोन वाटा फुटतात. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर वाडा लागतो. तो चांगल्या स्थितीत उभा आहे. वाड्याशिवाय तेथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरूनडावीकडच्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यास कातळात खोदलेली गुहा लागते. गुहेत उतरण्यासाठी शिडी लावलेली आहे.

गुहेच्या वरच्या भागावर घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. तेथून थोडे पुढे गेल्यास आणखी एक गुहा लागते. त्या गुहेसमोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी थांबते. तलावाच्या काठावर गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणाऱ्या वाटेने डोंगरमाथ्यावर पोचता येते. वाटेत भुयारी टाके आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर तलाव आहे. गडमाथ्यावरून मांगी-तुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप असा परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास दोन तास पुरतात.

न्हावीगडावर जाण्यासाठी ताहराबादमार्गे मांगी-तुंगी गाव गाठावे. मांगी-तुंगी गावातून तासाभराच्या चालीने वडाखेल गाव लागते. वडाखेलपर्यंत डांबरी रस्ता नाही. त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडाखेलमधून पाताळवाडीकडे कूच केल्यास त्या पायथ्याच्या गावी पोचता येते. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. पठारावरून दोन वाटा फुटतात. एक वाट समोर नाकाडावरून वर चढते, ती थोडी कठीण आहे. वाटेत सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. दुसरी वाट पठारावरून डावीकडे वळसा घालून पाय-यांपाशी जाते. त्या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात. गडावर जाणा-या पाय-या मात्र जपून चढाव्या लागतात. पाय-यांवर माती साचल्याने घसरण्याची शक्यता असते. पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोचता येते. गडावर जाण्यासाठी पाताळवाडी गावातून दीड तास लागतो. गडावर राहण्याची किंवा जेवणाची सोय नाही. गडावर जाण्‍यासाठी ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत उत्तम कालावधी मानला जातो.

(मूळ लेख – दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.