नेपाळचा प्रवास

0
50
carasole

“निरनिराळ्या देशांत प्रवास करून तेथील सृष्टिसौंदर्य व लोकस्थिती पाहणे, शिकार करणे वगैरे गोष्टींची मला फार आवड असल्यामुळे मी माझ्या आयुष्याचे बरेच दिवस युरोप, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जपान इत्यादी भूभागांचे अवलोकन करण्यात घालवले आहेत.”

”मला नेपाळात १९२५ साली प्रवास करण्याचा योग आला व त्या प्रवासातील माझे अनुभव व्याख्यानरूपाने बडोदे येथील सहविचारिणी सभेचा अध्यक्ष या नात्याने त्या सभेत पूर्वी एकदा सांगितले होते. माझे ते व्याख्यान पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. पुढे, ते व्याख्यान वाढवून वाढवून व त्यात नेपाळसंबंधी अवांतर माहिती समाविष्ट करून लहानसे पुस्तक लिहावे असा विचार माझ्या मनात आला. त्याप्रमाणे अनेक ग्रंथ मिळवून त्याच्या आधारे लिहून हे पुस्तक तयार केले.” लेखक संपतराव गायकवाड यांनी १९२८ साली लिहिलेल्‍या ‘नेपाळचा प्रवास’ या पुस्‍तकाच्‍या प्रस्तावनेतील हा भाग!

बडोद्याच्या गायकवाड संस्थानिकांच्या कुटुंबातील सदस्य संपतराव गायकवाड १९२५ साली नेपाळला गेले होते. त्यांनी त्यावर आधारित व्याख्यान बडोदे येथील सहचारिणी सभेचा अध्यक्ष या नात्याने दिले. त्यांनी ते पुढे पुस्तिकारूपाने प्रसिद्ध केले. काही दिवसांनी इतर पुस्तकांच्या साहाय्याने त्यात अधिक माहिती घालून ‘नेपाळचा प्रवास’ हे पुस्तक तयार झाले. संपतरावांच्या या प्रवासवर्णनाचे (Travelogue) मूळ अशा प्रकारे व्याख्यानात आहे.

‘नेपाळचा प्रवास’ हे पुस्तक सोळा प्रकरणांत विभागले आहे. नेपाळचे भौगोलिक स्थान, नंतर नेपाळचा इतिहास व पुढे नेपाळातील धर्म, हिंदू लोक, भाषा, खाद्यपेये, सण व उत्सव, विवाहपद्धती, शासनपद्धती, पोषाख असे सामाजिक स्थितीचे संपूर्ण तपशील आहेत. त्यानंतर अर्ध्या भागात नेपाळचा प्रवास मार्ग, प्रमुख शहरे व प्रेक्षणीय स्थळे, अर्वाचीन नेपाळ, माझा नेपाळमधील अनुभव आणि सर्वांत शेवटी नेपाळच्या पंतप्रधानांची वंशावळ.

ज्याला रुढार्थाने प्रवासवर्णन म्हणता येईल असा भाग म्हणजे ‘माझा नेपाळातील अनुभव’ हे प्रकरण लेखक १२ फेब्रुवारी १९२५ रोजी लेखक बडोद्याहून निघाले, ते चार दिवसांनी (१६ फेब्रुवारी) बेटिया येथे पोचले. ते बेटियाहून १७ तारखेला निघून दोन दिवसांनी भीमफेडी येथे पोचले. नंतर पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान एवढा काळ काठमांडूत राहिले. त्या सोळा दिवसांची हकिगत या प्रकरणात आहे. त्यात जाणवलेल्या लक्षणीय गोष्टी –

‘बडोद्याच्या राजघराण्याशी आमचा संबंध आहे हे कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून आम्ही इंग्रजी पद्धतीचा पोषाख केला होता व प्रवासाचा बेतही साधाच ठेवला होता. कारण नेपाळ सरकारची अशी चाल आहे, की त्यांच्या राज्यात जर कोणी बाहेरचा मोठा मनुष्य गेला तर ती बातमी टेलिफोनने काठमांडू येथे कळवली जाते व मग संस्थानचा पाहुणा संस्थानच्या खर्चाने त्या मनुष्याची, आगाऊ कळवले असल्यास सरबराई होते.’ (पृष्ठ ५६).

सरकारी अधिकाऱ्यांचा कालहरणाचा अनुभव त्यावेळीही नेपाळातही आला. ‘वैद्यकीय तपासणीपेक्षा इकडचे तिकडचे अनेक प्रश्न विचारून चौकशी करण्यात व त्याला इकडून तिकडे फिरवण्यातच अधिकाऱ्यांनी फार वेळ घालवला’ (पृष्ठ ५६)

प्रधानजींना बघितल्यावर लेखकाला दादाभाई नवरोजींची आठवण झाली. ‘नुसत्या बहिरंगापुरतेच केवळ त्यांच्यात व दादाभार्इंत सादृश्य नसून दादाभार्इंचे गुणही त्यांचे ठिकाणी वसत असल्याची मला थोड्या वेळात साक्ष पटली. कारण मुख्य प्रधानाच्या अंगी दादाभार्इंची अलौकिक बुद्धिमत्ता, मुत्सद्दीपणा, हुशारी, स्वदेशप्रेम, स्वाभिमान, विनयपूर्ण विद्वत्ता वगैरे अनेक गुण असल्याचा अनुभव आला’ (पृष्ठ ५९)

लेखक स्वत: बार-अॅट-लॉ, अनेक विदेश वाऱ्या केलेले, त्यामुळे सुधारक. सोवळे ओवळे न पाळणारे. त्यामुळे त्यांना नेपाळात गेल्यावर, बडोद्याहून तेथे जाऊन स्थायिक झालेल्या मुसलमान बँड मास्तरकडे उतरण्यास अडचण वाटत नव्हती. पण ते नेपाळ नरेशांच्या प्रधानांना समजल्यावर त्यांनी लेखकाला सांगितले, ‘मी महाराजाधिराजांच्या नावाने आपणांस अशी विनंती करतो, की आपण काठमांडू येथे गेल्यावर पशुपतिनाथांच्या मंदिरात दर्शनास जाल तेव्हा मूर्तीस स्पर्श करून पूजा वगैरे करू नये.’ (पृष्ठ ६१). ‘नेपाळच्या सामाजिक जीवनात कठोर आचार निर्बंध किती होते हे यावरून जाणवते. मात्र असे असले तरी नेपाळच्या राजघराण्यात गोषाची किंवा पडद्याची चाल नसल्याचे’ लेखक सांगतात. (पृष्ठ ६२)

संस्थानिक सर्वत्र लवाजम्यासकट जात असत. त्या प्रवासात गायकवाडांनी फार मोठा सरंजाम नेला नव्हता. भवानराव पंत प्रतिनिधी बराच कुटुंबकबिला घेऊन चारधाम यात्रेला गेले होते. पण दोघांच्या प्रवासात एक मोठे साम्य आहे. भवानराव अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या एका धर्मशाळेत उतरले होते. गायकवाडही काठमांडूच्या मुक्कामात एका धर्मशाळेत उतरले होते. ती फार साधी होती. ते वर्णन करतात, ‘इमारत दुमजली पण फार मोठी होती. वरील मजल्यावर तीन खोल्या आमच्या तैनातीस दिल्या होत्या. एका खोलीत पलंग वगैरे निजण्याची सोय असून, बैठकीसाठी जमिनीवरील बिछायतीवर गादी घातलेली होती. दुसऱ्या खोलीत स्वयंपाकाची व्यवस्था असून तिसरी खोली नोकर लोकांसाठी व सामानासाठी दिली होती. फर्निचर वगैरे नव्हते. फक्त एक खुर्ची होती.’ (पृष्ठ ६३)

त्यानंतर नेपाळ नरेशांची ‘सैन्याची परेड’ याचे वर्णन येते. ‘नेपाळच्या प्रधानांना बडोद्याचे प्रशासन व राज्यकारभार यांची बरीच माहिती होती व ती त्यांनी निरनिराळ्या संस्थानांच्या अॅडमिनिस्ट्रेशन रिपोर्टवरून मिळवली होती.’ (पृष्ठ ६६)

‘संस्थानात इंग्रजी शिक्षणाचा फारच अभाव असल्याचे आमचे दृष्टोत्पत्तीस आले. पर्वतांच्या चौफेर अभेद्य तटबंदीतून पाश्चात्य संस्कृतीला व आधुनिक कल्पनांना या पुराण प्रदेशात शिरकाव मिळणे अर्थातच फार कठीण झाले असावे.’ (पृष्ठ ६८)

पशुपतिनाथाच्या यात्रेसाठी सरकारच्या खास हुकूमात जागोजागी दुकाने व उपहारगृहे उघडण्यात येऊन खाण्यापिण्याची/ मुक्काम करण्याची व्यवस्था होत असे. ‘याहीपेक्षा विशेष म्हणजे काठमांडू येथे जितके म्हणून हिंदुस्थानातील यात्रेकरू पशुपतिनाथ दर्शनास येतील तितक्या सर्वांची खाण्यापिण्याची व मुक्कामाची सर्व बडदास्त सरकार दरबारातून ठेवली जाते व त्याप्रीत्यर्थ सरकारास दरवर्षी पुष्कळ खर्च करावा लागतो.’ (पृष्ठ ६८)

‘येथील बँडची सलामीची पद्धती व्यक्तिसूचक आहे. इंग्रजी साम्राज्यात सलामी म्हटली म्हणजे God save the king ही सर्वसाधारण सर्वप्रसंगी आहे. परंतु नेपाळमध्ये निरनिराळ्या मोठ्या व्यक्तींना निरनिराळ्या रागांतील सुरांत सलामी देण्यात येते. सलामीच्या सुरावरून व्यक्तीचा बोध सहज होतो. हे सर्व प्रकार आम्हाला अल्लाउद्दीन (हे मी निघण्यापूर्वी बडोद्याहून एक दिवस अगोदर काठमांडूस आले) यांनी वाजवून दाखवले.’ (पृष्ठ ७०)

ना.गो. चापेकर ‘हिमालयात’ या पुस्तकात टेहरी संस्थानातील अनेक जणांत एकपत्नी पद्धत असल्याचे; तसेच, गढवाल प्रांतात मुली विकत घेण्याची चाल असल्याचे सांगतात. गायकवाड मात्र गुरखे लोकांत बहुपत्नीत्वाची चाल कशी आली, व्यभिचारी स्त्रीला शिक्षा करण्याच्या पद्धती, शासन व्यभिचारी पुरुषाला शिक्षा कशी करत असे, सतीची चाल, नेपाळी लोकांची विवाहपद्धती– एकंदर नेपाळातील जातिव्यवस्था यांचे सविस्तर वर्णन करतात. चापेकरांनी नेपाळी भाषेत इतर भाषांतून खूप शब्द आल्याचे म्हटले आहे. गायकवाड नेपाळात प्रचलित असलेल्या अनेक भाषांची यादी देतात व बाप या अर्थाने वेगवेगळ्या भाषांतील शब्द सादर करतात.

लेखक – संपतराव गायकवाड
प्रकाशक – स्वत: लेखक (श्रीमंत संपतराव गायकवाड)
पहिली आवृत्ती १९२८,
पृष्ठे – बहात्तर, मूल्य आठ आणे (पन्नास पैसे)

– मुकुंद वझे

(हे पुस्तक विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध आहे.)

About Post Author