नेत्रहीन अनुजाचे नेत्रदिपक यश

‘आम्हाला दृष्टी नाही पण दृष्टिकोन आहे’ -अनुजा संखेने काढलेल्या पहिल्यावहिल्या ‘अक्षरतेज’ ह्या नियतकालिकाचे हे घोषवाक्य आहे असे म्हणता येईल. अंधांचे व अंधांविषयीचे साहित्य असलेले हे नियतकालिक आहे. वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गमावलेली अनुजा संखे हिच्या जिद्दीची, आत्मविश्वासाची ही कहाणी! 

मी रुईया कॉलेजमध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी, अंध विद्यार्थ्यांमध्ये जाऊन काम करते. माझी आणि अनुजा संखे ह्या अंध विद्यार्थिनीची ओळख तीन वर्षांपूर्वी झाली. मी तिला तिच्या टी.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमातला काही भाग वाचून दाखवत असे. तिच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात आली, की ती इतर दृष्टिहीन विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी आहे. तिची भरारी मोठी आहे!

अनुजा जन्मापासून थोडी तिरळी बघायची, अनुजा ज्युनियर के.जी. व सिनियर के.जी. पार करून पहिलीत गेली, तोपर्यंत तिच्या एका डोळ्यात मोतिबिंदू तर दुसर्‍या डोळ्यात काचबिंदूचे निदान झाले होते. तिचे शाळेतून नाव काढावे लागले. तिच्या आई-वडिलांची नंतरची दोन-तीन वर्षे मुंबईतील सर्व इस्पितळे पालथी घालून झाली, पण दृष्टी गेली ती गेलीच. अनुजा पहिली ते सातवी ‘कमला मेहता अंधशाळे’मध्ये व नंतर दहावीपर्यंत ‘सरस्वती हायस्कूल’मध्ये शिकली. ती एकोणऐंशी टक्के मार्क मिळवून शाळेत दुसरी आली, तेव्हा पहिल्या आलेल्या डोळस मुलीला ऐंशी टक्के मार्क होते!

अनुजा क्रिकेटवीर राहुल द्रविडची चाहती आहे. तिने बारावीला असताना राहुल द्रविडला पत्र लिहिले. अनुजा राहुल द्रविडला भेटली. तेथे ती क्रिकेटजगतातले बडे बडे तारे- म्हणजे नरी काँट्रॅक्टर, सलीम दुराणी, पॉली उम्रीगर, बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, ग्रेग चॅपेल अशा अनेक जणांना भेटली. तेव्हा पत्रकार व्हावे म्हणजे ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेता येतील असे अनुजाच्या मनाने घेतले. त्यावेळी ती रुईया कॉलेजमध्ये शिकत होती.

अनुजाने मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकारितेचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणी मिळवून उत्तम गुणवत्तेने पूर्ण केला. त्यावेळी ती बीएच्या तिसर्‍या वर्षात शिकत होती. म्हणून तिने मुंबई विद्यापीठाच्या जर्नालिझमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. अनुजा ही पत्रकारितेचा अभ्यासक्रम घेणारी पहिली अंध विद्यार्थिनी आहे.

अनुजाने पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात अनेक मुलाखती घेतल्या. स्वत: अभ्यास करून वर्गाला शिकवणे, जाहिराती तयार करणे अशी क्रिएटिव्ह प्रॉजेक्ट केली. तिने स्वत:च्या दृष्टिहीनतेचा बाऊ न करता नॉर्मल विद्यार्थ्यांच्या सर्व असाइनमेंण्टस व्यवस्थित केल्या. अनुजा आत्मविश्वासाने डोळस विद्यार्थ्यांत वावरू लागली. तिथेच तिला निखळ मैत्रीचा पहिला अनुभव मिळाला. अनुजाने स्वत:चा लॅपटॉप घेऊन त्यावर मराठीमध्ये टायपिंग करायला सुरूवात केली. रोटरी क्लब, माहीम यांच्या साहाय्याने तिने इंटरनेट घेतले, सर्च इंजीनवर जाऊन ती वेगवेगळ्या साईट्स शोधते. तिचा स्वत:चा ई मेल अॅड्रेसही आहे. ती त्यावरून मेल पाठवते, फेसबुकवर स्वत:चे विचारही मांडते.

अनुजाची जिद्द, तिचा स्वत:ला कामात झोकून देण्याचा स्वभाव यांच्या आधारे ती सतत पुढे झेपावत असते. अनुजाने पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच स्वत:चा पहिला अंक प्रसिध्द करण्याचे ठरवले. अंधांचे साहित्य व अंधांविषयीचे साहित्य यांची जमवाजमव सुरू केली.

रुईया कॉलेजच्या सेल्फ व्हिजन सेंटरमध्ये तिची आणि माझी तासनतास बैठक जमू लागली. अनुजा घरून सगळ्यांना फोन करून साहित्य गोळा करत असे. ते कधी ब्रेल लिपीत, तर कधी प्राथमिक नोट्सच्या स्वरूपात असे. मी ते अनुजाला छपाईला देण्यायोग्य चांगल्या अक्षरांत लिहून देत असे. कधी काही मुलाखती ध्वनिफितींवर असायच्या. त्या कागदावर उतरवत असताना माझे भावविश्व समृद्ध झाल्यासारखे वाटायचे. अनुजाला साहित्याची आवड असलेली माझ्यासारखी ‘ताई’ मदतीला मिळाल्यामुळे, तिचाही हुरूप वाढत होता. कधी कधी, ती ई मेलवरून, स्वत:च्या लॅपटॉपवरून टाइप केलेला एखादा लेख पाठवत असे. मी तो सुधारून छापण्यासाठी पाठवत असे. मीही एक लेख लिहिला. असे करता करता अंकाला रंगरूप येऊ लागले. अनुजाने स्वत:च्या गोड, आर्जवो आणि आग्रही स्वभावाने अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, छपाई, प्रकाशन हे सारे करण्यासाठी अनेक हितचिंतक जमवले. तिला असेच प्रायोजक मिळाले आणि निखिल वागळे ह्यांच्या हस्ते ‘अक्षरतेज’ ह्या आगळ्यावेगळ्या अंकाचे प्रकाशन शानदार सोहळ्यात मार्चमध्ये पार पडले. त्या प्रसंगी अनुजा ज्या आत्मविश्वासाने आणि तडफदारपणे वावरली आणि तिने विचार ठामपणे बोलून दाखवले त्याला तोड नाही. माझ्या डोळ्यांत पाणी जमा झाले.

‘अक्षरतेज’चा उद्देश हा आपल्या समाजात दृष्टिहीनांचे साहित्य, त्यातून व्यक्त होणारे त्यांचे विविध लेख, त्यातून मांडलेल्या समस्या, अनुभव लोकांपर्यत पोचवणे हा आहे. अनुजाने संपादक या नात्याने हे काम चोखपणे आणि आणि उत्कटतेने केलेले आढळते.

अनुजा संखे – 9892878028
anujasankhe@gmail.com 

उमा सहस्त्रबुध्दे –
022 24146187, 9820256942

About Post Author