निराधार कोरडी ‘वाट’

0
21

– नीलेश मोडक

     शहरीकरणमुळे बेघरांची संख्‍या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्‍येक शहरात असे असंख्‍य निराधार जगताहेत आणि निराधार म्‍हणूनच मरताहेत. त्‍यांच्‍यासाठी काही प्रयत्‍न होत असले तरी या बेघरांना अजूनही बराच मोठा प्रवास ह्या कोरड्या वाटेवरूनच करावा लागणार आहे.


– नीलेश मोडक

     रस्त्यानं पायी चालण्याची मजा काही वेगळीच असते! बाईकवरून सुसाट जाताना किंवा बस-कारमधून प्रवास करताना अनेक गोष्टी बघणं शक्य होत नाही. पायी चालताना मात्र हे सगळं दिसतं, जसं की रेल्वे स्टेशन-बस स्टँडच्या बाहेर, फूटपाथच्या कडेला बरीच गर्दी दिसून येते. त्यांतल्या अनेकांनी तिथं आपला संसारच थाटलेला असतो! रात्री थोडी वर्दळ कमी झाली, की चूल पेटवून स्वयंपाक करायचा-पोट भरलं की तिथंच अंथरूण टाकून निजायचं. रस्त्यावरची गर्दी-गोंधळ, वाहनांचा आवाज, थंडी-वारा…कशाकशाचा त्यांच्या झोपेवर असर होत नाही, पण दिवस उगवता-उगवता हे लोक हळुहळू शहरी गर्दीत हरवून जातात. कुणी फणी-बांगड्या विकतं, कुणी मजुरी करतं, कुणी नुसतं कामाच्या-अन्नाच्या शोधात हिंडत असतं, कुणी त्यासाठी चोर्‍यामार्‍या करायलाही तयार असतं. शहरभर विखुरलेल्या ह्या लोकांना रात्र होईपर्यंत शोधणं अशक्यच. हे लोक म्हणजे बेघर…निराधार-शहरी गरीब.

    निराधार आजी-आजोबांचं असंच एक जोडपं रस्त्यानं पायी चालताना दिसलं. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यानं मॉडेल कॉलनीकडे निघालो होतो, ही श्रीमंत आणि तथाकथित उच्चभ्रू वस्ती. मोठमोठ्या इमारती, बंगले, महागड्या गाड्या अगदी सहज दृष्टीस पडत होत्या. बराच वेळ झाला, मी चालत होतो. अजून बरंच अंतर कापायचं होतं. उनही वाढू लागलं होतं. इथून पुढे बसनंच जाऊया, थकलोय आता…तहानही लागलीय, कुठे पाणी मिळेल का? ते शोधलं, नाही मिळालं. मग जवळच्या एका बसस्टॉपला जाऊन शांत सावलीत बसलो. तिथं सात-आठ लोक आणखी होते. ते सगळे बसस्टॉपच्या थोडं पुढे उन्हात उभे होते. मी रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसलो. तिथं आणखी चार खुर्च्या रिकाम्या होत्या. माझ्या पायाजवळ एक आजोबा तोंडावर सुती कापड घेऊन शांत झोपले होते. त्यांच्या पायाजवळ आजी बसलेली होती. ती कोरड्या डोळ्यांनी काहीतरी बघत होती, की मनातल्या मनात काही विचार करत होती, ते कळत नव्हतं.

     मी म्युझिक प्लेयरचे इयर फोन कानांत घालून गाणी ऐकू लागलो. त्यात तल्लीन झालो. डोळेही मिटून घेतले. रस्त्यावर काम सुरू आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता. अर्धा तास तरी झाला असेल, बस आलीच नाही. त्यामुळे मी गाण्यांच्या जगातच भटकत होतो. अचानक, कुणीतरी मला जोरात धरून उठवलं आणि धक्का देऊन दूर केलं. काही कळायच्या आत मी रस्त्यावर जाऊन पडलो. गुढघ्याला खरचटलं थोडं. इतका राग आला…तळपायातली आग मस्तकात गेली म्हणतात ना, तसंच काहीतरी, पण कुणी धक्का मारून मला असं का ढेकलून द्यावं? मी तर अगदी शांतपणे तिथं बसलो होतो, कुणालाही माझा कसलाही त्रास नव्हता. असता तर नीट सांगायला हवं ना? ही काय पध्दत झाली? असा प्रकार करण्याचा हक्क कुणालाही असू शकत नाही…अयोग्य आहे हे, शतश: अयोग्य, निंद्य… असे काहीतरी विचार मनात सुरू असतील. मी उठलो आणि बसस्टॉपकडे बघू लागलो. तिथं (बघ्यांची) बरीच गर्दी झाली होती. पोलिसांची व्हॅनसुध्दा आली होती. मग मला कळलं, की मला धक्का देणारी व्यक्ती पोलिसच होती! पण का? काही कळेना.

     मीही गर्दीत शिरून बघू लागलो. त्या आजी-आजोबांभोवतीच गर्दी जमली होती. आजोबा अजूनही झोपलेले होते, आजीचे डोळे तितकेच कोरडे, नजर हरवलेली. एका बघ्याकडून सगळी हकीकत कळली: “काल रातीपासून हिथंच हायेत म्हातारा-म्हातारी…म्हातारी लय रडत व्हती, वरडत व्हती. मी दुकानच बंद करत व्हतो तवा. रातभर वरडली म्हने म्हातारी, अन मंग यकदम गपगुमान, आता बसली हाये तशीच. म्हातारा मेला रातीच. तिनं लयी कोशीश केली, उचलून दवाखान्यात न्यायची. पन म्हातारी आधीच बिमार, उपाशी. म्हातारा हाललाबी न्हायी. मेला बिचारा…”

     तोवर पोलिसांनी आजोबांचा मृतदेह गाडीत टाकला. आजीलाही सोबत घेतलं अन निघून गेले. गर्दी हळुहळू पांगली. मी तसाच चालू लागलो…ऊन बरंच वाढलं होतं. तहानही खूप लागली होती. डोळ्यांसमोर आजीच दिसत होती. तिचं ते मदतीसाठी ओरडणं…कृश शरीरानं नवर्‍याचा जीव वाचवण्याची तिची धडपड…सगळं काही निष्फळ ठरल्यावर काय आलं असेल तिच्या मनात…? रात्रभर रडून तिचे डोळे कोरडे झाले असतील, की रडलीच नसेल ती? डोळ्यांदेखत आपल्या नवर्‍याला मरू देणं म्हणजे टोकाची निराधारता असेल, नाही का? असे असंख्य निराधार प्रत्येक शहरात आहेत, जगताहेत आणि मग निराधार होऊन मरताहेत…!

     असंख्य ह्यासाठी की अशा बेघरांची मोजणी करणे कठीण आहे आणि शहरीकरणामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्या देशापुढील ही गंभीर समस्या आहे. जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निमाण योजनेत अशा निराधारांसाठी आर्थिक तरतूद करता येईल का, अशी उच्च-स्तरावरील अधिकारीवर्गात चर्चा होत आहे.

     पण या बेघरांना अजूनही बराच मोठा प्रवास ह्या निराधार, कोरड्या वाटेवरूनच करावा लागणार आहे.

नीलेश मोडक
संपर्क – 9503968158

neeleshdmodak@gmail.com
{jcomments on}

About Post Author

Previous articleसाने गुरुजी आणि वटपौर्णिमा
Next articleकठोराणी वज्रादपि
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.