‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे…

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांनी देशाच्या दैन्यावस्थेचे मुख्य कारण ब्रिटिश राजवट हेच आहे आणि सनदशीर राजकारण व धर्मसुधारणा यांना प्रोत्साहन देणे हा ब्रिटिशांचा कावा आहे’ अशी मांडणी करून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार केला. त्यांचे निबंधमाला हे नियतकालिक फार गाजले. त्यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे सर्व आयुष्य पुणे या ठिकाणी गेले. मात्र त्यांचे शिक्षण आणि एक-दोन वर्षे नोकरी रत्नागिरीत झाली. चिपळूणकर कुटुंब रत्नागिरी सोडून नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सतराव्या शतकात स्थायिक झाले होते. विष्णुशास्त्री यांचे आजोबा हरिपंत चिपळूणकर नाईक’ या पदावर कार्यरत होते. तसेचत्यांनी श्रीहर्ष किल्ल्याच्या फडणीसपदाची सर्व जबाबदारी सांभाळली होती. पेशव्यांनी विठोजी होळकर यांचा वध केल्यानंतर यशवंतराव होळकर यांनी त्याचा बदला म्हणून स्वारी करून नाशिक व श्रीहर्ष किल्ला काबीज केले. त्यामुळे हरिपंततात्या चिमाजीआप्पा यांच्याकडे शागीर्द म्हणून पुणे या ठिकाणी काम करू लागले. पेशवाईचा अस्त 1818 साली झाल्यानंतर चिपळूणकर कुटुंबाची होरफळ आणि वाताहत झाली होती.

विष्णुशास्त्री यांचे वडील कृष्णशास्त्री हे पुण्यातील नावाजलेले विद्वान पंडित होते. त्यांच्या कुशाग्र आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेचे वर्णन करताना संस्कृत विद्वान मोरशास्त्री साठे म्हणतात, “कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे पुणे पाठशाळेतील संस्कृतीचे बृहस्पती आहेत!” ते महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी स्थापन केलेल्या भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेतील व्यवस्थापक सभासद होते. कृष्णशास्त्री यांनी मराठी साहित्यामध्ये विविध ग्रंथांचे अनुवाद केलेले आहेत. त्यांनी कालिदासाचे मेघदूतसॉक्रेटिसचे चरित्रअर्थशास्त्राची परिभाषाअनेक विद्या मूलभूत संग्रह आणि अरबी भाषेतील सरस आणि चमत्कारिक गोष्टी अशा अनेक दर्जेदार साहित्यकृती मराठी रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी शालापत्रक’ हे मासिक सुरू केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांच्यानंतर त्याचे संपादक म्हणून काम सांभाळले होते.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना लक्ष्मणराव हा धाकटा भाऊ आणि दुर्गा ही लहान बहीण होती. विष्णुशास्त्री यांनी त्यांच्या भावंडांची शिकवणी घरी घेतली होती. विष्णुशास्त्री यांचे बालपण सर्वाधिक काळ आईवडिलांपेक्षा आजी भागीरथीबाई आणि आजोबा हरिपंत यांच्या सहवासात गेले. विष्णुशास्त्री यांना आजोबा वयाच्या सात वर्षापासून उजळणीवाचन आणि लिहिण्यासाठी शिकवत असत. तसेच, ते पेशवाईतील व्यक्तींच्या पराक्रमाच्या धाडसी व साहसी कथा आणि मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मनोरंजक पद्धतीने सांगत. त्यामुळे देशप्रेमस्वधर्म आणि संस्कृती यांचे योग्य व अनेकांगी संस्कार त्यांच्यावर झाले. विष्णुशास्त्री यांचे शालेय शिक्षण इन्फंट स्कूल आणि पूना हायस्कूल या शाळांमध्ये झाले. ते नागनाथ अण्णांच्या वाड्यात भरणार्‍या शाळेत मोडी अक्षर लेखन व वाचन आणि तोंडी हिशोब शिकले होते. विष्णुशास्त्री यांना पूना हायस्कूलमध्ये चिमणाजी महादेवनारायण कृष्ण गोखले आणि वामन आबाजी मोडक यांच्यासारखे चांगले शिक्षक मिळाले. ते पूना हायस्कूलमध्ये कृष्णशास्त्री वैजापूरकर या शास्त्रींकडून संस्कृत विषय उत्तम प्रकारे शिकले. विष्णुशास्त्री यांनी शाळेत असताना ऑलिव्हर गोल्डस्मिथचे The Deserted Village हे दीर्घकाव्य बिनचूक पाठ करून चिमणाजी महादेव या शिक्षकांकडून हातरुमाल बक्षीस म्हणून मिळवला होता. विष्णुशास्त्री हे भटमामा या विद्वान गृहस्थांकडून वेदाध्ययन शिकलेले होते. ते मॅट्रिक1865 साली झाले.

त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी नारायण भिकाजी गोगटे यांच्या कन्येशी म्हणजे काशीबाई यांच्याशी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातील बी ए ची पदवी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयातून मिळवली. त्यांना तेथे अनेक व्यासंगी अध्यापकांचा सहवास लाभला. अनंतशास्त्री पेंढारकर यांच्यासारखे संस्कृत व्याकरण शिकवणारे आणि प्रा. केरूनाना छत्रे यांच्यासारखे गणितातील विद्वान विष्णुशास्त्री यांना महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात लाभले. विष्णुशास्त्री यांना त्यांनी त्यांच्या शिक्षकी पेशामध्ये त्यांच्या शिक्षकांकडून मिळवलेल्या अनुभवाचा वापर करता आला. त्यामुळे विष्णुशास्त्री यांची ओळख विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी झालेली होती. विष्णुशास्त्री यांना वाचनाचे व्यसन जडलेले होते. त्यांनी वडिलांकडे असलेली सर्व पुस्तके वाचून काढली. पुढेविष्णुशास्त्री पुण्यात रविवारी भरणाऱ्या बाजारातील जुनी पुस्तके विकत घेऊन वाचनाची भूक भागवत. विष्णुशास्त्री यांना वर्तमानपत्र वाचण्याची आवड मात्र नव्हती. ते वर्तमानपत्र वाचनाविषयी म्हणतातवर्तमानपत्र वाचणे म्हणजे ब्रिटिश लोक काळा चहा घेतातत्याच्यासारखे पुष्कळ अंशी आहे. म्हणजे अर्धे पोषणअर्धे करमणूक असाच दोन्हींचा प्रकार आहे.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांवर मात करून सामाजिक कार्याची धुरा संभाळली. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना देशाविषयी सतत ओढ आणि तळमळ होती.

विष्णुशास्त्री यांनी दीर्घ निबंध वाचन’ या विषयावर निबंधमालेच्या अकराव्या अंकात लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी वाचनाची सवय कशी लावावी याविषयी विचार मांडलेला आहे. वाचनामुळे केवळ मनोरंजन होते असे नाहीतर सखोल ज्ञानसुद्धा मिळते. मुलांना खेळण्याची जशी हौस असते तशा प्रकारची प्रबळ जिज्ञासा असते. म्हणून लहान वयात वाचण्याची सवय मुलांमध्ये वाढवली तर ती त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तशीच टिकून राहते. जगामध्ये जे जे मोठे ग्रंथकार आणि विद्वान होऊन गेले ते जबर वाचणारे होते. वाचनामुळे योगाने चित्ताचे रंजन होऊन इतर करमणुकीच्या साधनांची गरज लागत नाही. कोणतेही दोष नसलेले शुद्ध आणि प्रतिष्ठादायक असे करमणुकीचे साधन म्हणजे वाचन होय.’ त्यामुळे विचारपूर्वक आणि संशोधक बुद्धीने मोठमोठे ग्रंथ सावकाशपणे आणि हेतुपूर्वकपणे वाचणे आवश्यक आहे. अन्न जसे शरीरास तसे वाचन हे श्रवणमनन यासाठी खूप गरजेचे आहे. एकाने शरीराचे पोषण होते तसे दुसऱ्याने मनाचे पोषण होते. पुस्तकाचीही चव लोणच्यासारखी चाखता येते. वाचकांनी पुस्तक हातात घेताक्षणी त्याला त्यामधील गर्भित अर्थ सहज कळला पाहिजे. विष्णुशास्त्री स्वतः पूर्ण पुस्तक कधीही वाचत नसत. ते पुस्तकातील अर्थ वर वर समजावून घेत पुस्तक वाचण्याचा हेतू साध्य करत असत. प्रस्तुतच्या काळात लहानसहान ग्रंथच आवश्यक आहेत. कारण जशी लहान मुलांना पंचपक्वाने काही कामाची नाहीतत्यांना दूध पाहिजे. त्याचप्रमाणे नुकतीच अक्षरओळख होण्यासाठी सुलभसोपी, थोड्या पैशाने मिळणारी पुस्तकेच पाहिजेत.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखणीवर आणि विचारांवर पाश्चिमात्य लेखकांचे ग्रंथ व साहित्य मोठ्या प्रमाणात वाचल्यामुळे त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो. विष्णुशास्त्री वर्डस्वर्थ या त्यांच्या प्रोफेसरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे प्रभावित झाले होते. डेक्कन कॉलेजात प्रोफेसर म्हणून आलेले वर्डस्वर्थ हे इंग्रजी कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे नातू. प्राध्यापक वर्डस्वर्थ यांच्यामुळे विष्णुशास्त्री यांनी हिरोडोटसझेनोप्लेनप्लुटार्क हे ग्रीक व रोमन इतिहासकार आणि गिबनमेकॉले हे इंग्रजी इतिहासकार यांचे ग्रंथ वाचून काढले.

डॉ.जॅक्सन, मेकॉले, ॲसिडन यांच्या साहित्यातील विचारांचा प्रभाव विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर पडलेला दिसून येतो. सॅम्युअल जॉन्सन यांच्या रासेलस’ या कादंबरीचा व Vanity Of Human Wishes या ग्रंथाचा प्रभाव विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेतील अनेक लेखांवरील भाषेमध्ये आढळून येतो. डॉ. किलहॉर्नसारख्या जर्मनीतील संस्कृत प्राध्यापकांनी त्यांना संस्कृत भाषा आणि साहित्य यांबद्दलची खूप गोडी निर्माण केली होती. जर्मनीतील लष्करी वृत्तीच्या हिंडेनबर्ग यांच्या विचारांचा प्रभाव डॉ. किलहॉर्न यांच्यावर होता. तशा प्रकारचा प्रभाव विष्णुशास्त्री यांच्यावरही झालेला दिसून येतो. त्यांची धारणा कोणत्याही प्रकारचा केलेला अभ्यास आणि मिळवलेले ज्ञान कधीही वाया जात नाही. त्याचा उपयोग स्वत:ला नाही झाला तरी दुसऱ्याला कदाचित होईल ही होती. त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब सॅम्युएल जॉन्सन यांच्या साहित्यामध्ये पाहिले होते. मेकॉलेसारखा कडवा राष्ट्रवाद त्यांच्या लेखणीतून दिसून येतो. विष्णुशास्त्री यांच्या लेखणीवर जोसेफ ॲडिसन यांच्यासारख्या पाश्चिमात्य लेखकाचा प्रभाव इतका पडला होताकी समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेतील ॲडिसन म्हणून उपमा दिलेली आहे. विष्णुशास्त्री यांनी ॲडिसनप्रमाणे वक्रोक्तीउपहासात्मक भाषाशैली यांचा उपयोग करून लोकांमध्ये राष्ट्रवादाविषयी जागरूकता निर्माण केली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी स्वतःला मराठी भाषेतील शिवाजी’ अशी उपमा दिलेली आहे. त्यांनी त्यांची मातृभाषेला म्हणजे मराठी भाषेला रूपकउपमादृष्टांत आणि विरोधाभास इत्यादी अलंकाराच्या साहाय्याने साजशृंगार चढवला. विष्णुशास्त्री यांनी मराठी साहित्यात विनोद आणि विचार या अंगांनी बरेच लेखन केलेले दिसून येते. त्यांच्या साहित्यकृतीतील विनोद हा केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने किंवा सात्त्विक स्वरूपात नव्हतातर करवतीच्या धारेप्रमाणे प्रतिपक्षाला कापून काढणारा असे.

विष्णुशास्त्री यांनी निबंधमालेतील पहिला लेख मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’  हा 25 जानेवारी 1874 रोजी ज्ञानप्रकाश’ या छापखान्यातून प्रसिद्ध केला. त्या निबंधात मराठी भाषा बुडू द्यायची नसेल तर काय करावे हे सुचवले आहे. मातृभाषेची अभिवृद्धी हे देशाच्या उत्कर्षाचे मोठे साधन असते. त्यांनी स्वभाषेविषयी उपेक्षाबुद्धी जोपर्यंत लोकांच्या मनात असते तोपर्यंत इतर उपायांना यश येणार नाही असे परखड मत त्या लेखात नोंदवले आहे. विष्णुशास्त्री यांनी भविष्यकाळाचा वेध ओळखून 1874 मध्ये इंग्रजी भाषेचा मराठी भाषिकांवर असलेला पगडा आणि त्याचे दुष्परिणाम याचे भाकित लिहून ठेवलेले होते. विष्णुशास्त्री यांनी इंग्रजी भाषेचा द्वेष केला नाही, परंतु इंग्रजी भाषेतील ज्ञानभंडाराचा उपयोग मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी करावातसे करताना मात्र स्वभाषेचे सत्त्व म्हणजे निराळेपणा कायम राहिला पाहिजेइंग्रजी भाषेचे गुलाम होता कामा नये अशी शिकवण निबंधमालेतील पहिल्या लेखातून दिलेली आहे. मातृभाषा ही मातेसारखी असते. मातेप्रमाणे असलेल्या मातृभाषेचे प्राणरक्षण करण्यास जो करंटा धावणार नाही तो मराठी भाषेचा सुपुत्र नव्हे. मराठीची योग्यता सिद्ध करणे हा निबंधमालेतील त्या लेखाचा प्रमुख उद्देश होता. विष्णुशास्त्री म्हणतातकाही लोकांना वाटते, की मनातील अभिप्राय खुबीदार पद्धतीने स्पष्ट करण्यास मराठी भाषा अप्रयोजक आहे. तिच्यात जीव नाही. ती भिकार आहे. परंतु अशा प्रकारे मराठी भाषेची अवहेलना करण्याचे कारण नाही. कारण मराठी भाषा बोलणाऱ्यांनी त्यांच्या विजयाच्या पताका दिल्लीपेशावरकाबूलकंदाहार अशा अटकेपार लावलेल्या आहेत. ज्येष्ठ कवी मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर यांनी त्यांचे विचार सांगण्यात मराठी भाषा कशी सामर्थ्यवान ठरली आहे हे पटवून दिलेले आहे. मुक्तेश्वरवामन पंडित आणि मोरोपंत इत्यादी रसाळ काव्यश्रेष्ठींनी मराठी भाषेला संस्कृतसारखी प्रौढी आणलेली आहे. आवेशविचार आणि सरसता या गोष्टींसाठी मराठी भाषेला अन्य भाषेकडे बघण्याची गरज नाही.” त्यांनी मराठी भाषेचा गौरव अशा प्रकारच्या खणखणीत शब्दांत 1874 मध्ये केलेला होता.

विष्णुशास्त्री मराठी भाषा संवर्धनासाठी असे उपाय सुचवतातकी लोकांनी स्वभाषेची उपेक्षा थांबवावी. शाळेत मराठी भाषा विषय अनिवार्य करावा आणि विद्यापीठात मराठी भाषा विषय सक्तीचा करावा. तसेचप्रत्येक मराठी व्यक्तीने त्याचे विचार स्वत:च्या मराठी भाषेतूनच दुसऱ्या कोणत्याही भाषेतील व्यक्तीसमोर व्यक्त करावेत. तशी चळवळ प्रत्येक व्यक्तीने सुरू केली तर मराठी भाषा सामर्थ्यवान होण्यास वेळ लागणार नाही. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी व्यक्त केलेली मते मराठी मातृभाषा असणाऱ्या त्या नंतरच्या सर्व पिढ्यांना तंतोतंत लागू पडतात. विष्णुशास्त्री यांनी केवळ मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन याविषयी लिखाण केलेले नाहीतर मराठी साहित्याला मोठे योगदान दिलेले आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी विपुल साहित्यसंपदा लिहिलेली आहे. ‌त्यांनी अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टीआमच्या देशाची स्थितीविष्णुपदीसुभाषितेहरगोविंद अशा विषयांवर लिखाण केलेले आहे. त्यांनी बाणभट्ट यांच्या कादंबरीचा आणि सॅम्युअल जॉन्सन यांच्या रासेलस या कादंबरीचा मराठी भाषेत अनुवाद केलेला आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी इतिहासअर्थशास्त्रतर्कशास्त्रनीतिशास्त्र या विषयांवरील ग्रंथांचा इंग्रजी, संस्कृत आणि मराठी अशा तिन्ही भाषांतून अभ्यास केला व मगच लेखन केले.

त्यांनी ‘किताबखाना’ नावाचे पुस्तकांचे दुकान पुणे या ठिकाणी 1875 मध्ये सुरू केले. मराठी भाषिकांना प्रेरित करण्यासाठी आणि वाचनसमृद्धी वाढवण्यासाठी विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध व्हावे हा हेतू त्यामागे होता. त्यांनी उमलत्या नवोदित पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने 1880 साली लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. त्यांनी पुणे येथे ‘चित्रशाळा’ 1878 मध्ये सुरू केली. पराक्रमी आणि मुत्सद्दी लोकांच्या तसबिरी लोकांपुढे आल्या तर लोकांमध्ये स्वइतिहास, स्वदेश यांविषयी अभिमान निर्माण होईल ही दृष्टी त्यामागे होती. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रसिद्ध असणारे ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ सुरू केले. विविध पुस्तकांची छपाई करता यावी म्हणून आर्यभूषण छापखान्याची स्थापना केली. लोकमान्य टिळक यांच्या सहकार्याने ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वर्तमानपत्रे छापण्यास सुरुवात केली. राष्ट्रवाद वाढवणारे विविध लेख त्यांनी त्या वर्तमानपत्रांतून लिहिले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा त्यांच्या अनेकविध समाजोपयोगी कार्यामुळे योग्य वाटते. ते राष्ट्रवादाची उभारणी करणारे सच्चे समाजसुधारक आणि इंग्रजांवर परखड शब्दात टीका करणारे भाष्यकार होते.

– महादेव दिनकर इरकर 7387194364 mahadeoirkar@gmail.com

————————————————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here