निकेत पावसकर – हस्‍ताक्षर संग्राहक

2
28
_NIKET_PAVASKAR_1.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर हा तरुण हस्ताक्षरे व स्‍वाक्ष-या गोळा करण्‍याच्‍या छंदाने वेडावला आहे. तो गेल्या बारा वर्षांपासून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश गोळा करत आहे. त्याच्याकडे सहाशेपेक्षा जास्त व्यक्तींची हस्ताक्षरे व स्वाक्षर्‍या जमा आहेत. तो त्या संग्रहामुळे अनेक मान्यवर व्यक्तींशी जवळचा स्नेही बनून गेला आहे. त्याचा छंद सुरू झाला २००६ साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या पत्रापासून.

निकेत सांगतो, ”कवी विंदांना ज्ञानपीठ पुरस्कार २००६ साली जाहीर झाला. मीही त्यांचे अभिनंदन करणारे पत्र आणि विंदांच्या अभिप्रायाकरता एक कविताही पाठवली. विशेष म्हणजे विंदांनी स्वहस्ताक्षरात आभारपत्र पाठवले. तेच पत्र माझ्या हस्ताक्षर संग्रहाला कारणीभूत ठरले. मी विंदांचे ते पत्र अनेकांना दाखवायचो. त्यांच्याकडून मिळणाऱ्या अभिप्रायामुळे नाविन्यपूर्ण आणि वेगळे काहीतरी करावे अशी कल्पना पुढे आली. दरम्यान मी अनेक वृत्तपत्रांमधून पत्रलेखन करत होतोच. पत्रलेखन व पत्रकारिता यांमुळे अनेक ठिकाणच्या लोकांशी मैत्री जमली होती. त्यामुळे विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश गोळा करण्याची कल्पना पुढे आली आणि तो छंद वृद्धिंगत होत गेला.”

निकेत म्हणाला की मी आरंभी परिचित व अपरिचित व्यक्तींना वेगवेगळ्या निमित्ताने शुभेच्छा व अभिनंदन करणारी पत्रे पाठवायचो. परंतु, कोणाकडूनही शेकडो पत्रे पाठवून उत्तर आले नाही! त्यानंतर विविध क्षेत्रांतील व्यक्तींना तशी पत्रे पाठवू लागलो तेव्हा त्या व्यक्तींची पत्रे येऊ लागली. त्यातून त्यांच्याशी पत्रमैत्री जमली. अभिनेते, दिग्दर्शक आत्माराम भेंडे, गणपत पाटील, ललित लेखक रवींद्र पिंगे, गीतकार प्रवीण दवणे, अभिनेते, छांदिष्ट शशिकांत खानविलकर यांच्यासह अनेकांशी पत्रमैत्री सुरू झाली. त्यातून आपलेपणा वाढू लागला.

मोठ्या व्यक्तींना पत्रे पाठवण्यासाठी पत्ते मिळवणे, त्यांच्याशी दूरध्वनी क्रमांकांवरून संपर्क साधणे, त्यांना पहिल्या पत्रानंतर पुन्हा संपर्क साधून स्मरण करून देणे, पुन्हा पत्र पाठवणे, दूरध्वनीवरून संपर्क साधणे, सतत त्याचा पाठपुरावा करणे, पहिले पत्र….. दुसरे….. तिसरे….. पाचवे….. दहावे….. पंधरावे….. विसावे पत्र….. अशी अनेक पत्रे पाठवून पुन्हा पुन्हा संपर्क साधणे हे काम सतत सुरू आहे. निकेतच्‍या संग्रहामध्ये विविध साहित्यिक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, शास्त्रज्ञ, संगीतकार, छांदिष्ट, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, क्रीडापटू, विचारवंत अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींची हस्ताक्षरे एकत्रित झाली आहेत. त्‍याला अनेक व्यक्तींना जवळून अनुभवता आले. त्‍याचा या छंदामुळे विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी परिचय झाला. नवीन नाते निर्माण होतानाच त्या नात्यामधील आपलेपणा वाढत गेला.

निकेत म्हणतो, “हा छंद अजून प्राथमिक अवस्थेत आहे, याची मला जाणीव आहेच; भविष्यात खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. या छंदाच्या माध्यमातून मी माझा वेळ चांगल्या कामासाठी देत आहे याची जाणीव आनंद देणारी असते. छंद जोपासताना त्यातून नवनवीन अनुभव मिळतात. आपण इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करतो याचा आनंद तर असतोच, परंतु जे मानसिक समाधान मिळते ते हे सर्व करण्याला अधिकाधिक बळ देत असते. छंदातून नवीन ओळखी होतात. ओळखीतूनच खूप चांगल्या गोष्टी शिकता येतात. हे सर्व करताना माझ्या ज्ञानात, विचारांमध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये, बोलण्या-वागण्यात चांगला बदल होतो. एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर मिळवण्यासाठी अनेकदा पत्र पाठवावे लागते. अनेकदा दूरध्वनीवरून विनंती करावी लागते. अनेकवेळा पत्र पाठवूनही खूपदा वाट पहावी लागते. त्यामुळे संयम वाढतो. तर अनेकदा एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर काहीही करून मिळवायचेच यामुळे जिद्द आणि निश्चय हा गुण आपोआप येत जातो.

_NIKET_PAVASKAR_2.jpgइमेल, इंटरनेट, फॅक्स व भ्रमणध्वनी अशा अत्याधुनिक तंत्रसाधनांबरोबरच माणसामाणसांमधील माणुसकी, त्यांच्यातील नाती यांमध्येसुद्धा प्रचंड प्रमाणात आधुनिकता आली. ‘पत्रलेखन’ कमी झाले. परंतु त्यामुळेच पत्ररूपी त्या कागदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. अनेकजण सांगतातही, की मी तुम्हाला मेल करू का?, व्हाटसअपवर पाठवू का? तशांना मी विनम्रपणे सांगतो, की या संग्रहासाठी पत्र हवे आहे. थोड्या उशिरा पाठवलेत तरी चालेल, परंतु मला पोस्टानेच पत्र पाठवावे.

या हस्ताक्षर संग्रहाची विशेष आठवण काय सांगाल? असे विचारले असता निकेत म्हणाला, हस्ताक्षर संग्रहाची फाईल नाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व ‘९६ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलना’चे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी पाहिली आणि मला अस्सल मालवणी भाषेत म्हणाले, ‘‘तू ह्या सगळ्यांपर्यंत पोचलेलो हस, नाय तू लय पोचलेलो माणूस हस’’

संगीतकार श्रीनिवास खळे यांना भेटण्यास गेलो असता, ते दिल्लीवरून पद्मभूषण पुरस्कार घेऊन नुकते आले होते. त्यांनी माझा संग्रह आपुलकीने आणि आपलेपणाने पाहिला. माझ्या कविता स्वत: आग्रह करून म्हणून घेतल्या आणि म्हणाले, ‘‘तू खूप मोठा होणारच आहेस, खूप खूप मोठा हो…’’

साहित्यिक व पत्रकार ह. मो. मराठे म्हणाले, की ‘‘आणखी पंचवीस वर्षांनी हा हस्ताक्षर संग्रह ऐतिहासिक महत्त्वाचा ठरेल. कारण तोपर्यंत सगळेच कंप्युटरवर वळणदार हस्ताक्षरात लिहिण्यास लागलेले असतील!’’

लेखक व पत्रकार शिरीष कणेकर – ‘‘टाईप केल्यासारखे तुमचे हस्ताक्षर पाहून आनंद झाला व माझे हस्ताक्षर असे नाही याचे नैराश्य वाटले.’’

अशोक समेळ (लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते) – ‘‘येणार येणार म्हणून येणारे तुझे पत्र आत्ताच मिळाले. अतिशय सुंदर, स्वच्छ, नितळ असे तुझे हस्ताक्षर पाहून तुझ्या अथांग, प्रामाणिक मनाची आणि छंदाची कल्पना आली, तुझ्यासारखीच माणसे इतिहास घडवतात, तू घडवशील यात शंका नाही. माझे तुला आशीर्वाद आहेत आणि तुझ्यासारखा गुणी मुलगा ज्या आईवडिलांच्या पोटी आला त्यांना माझे दंडवत. तुझ्या सगळ्या आशाआकांक्षा, महत्त्वाकांक्षा पूर्ण होवोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.’’

निकेत पावसकर, (हस्ताक्षर संग्राहक)

९७०, स्वप्नपूर्ती, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ४१६ ८०१

९८६०९२७१९९ / ९४०३१२१५६. niketpavaskar@gmail.com

– आशुतोष गोडबोले

About Post Author

2 COMMENTS

  1. .बी.डी.गायकवाड(पत्रकार।कवी) १०१,मुनलाईट,मॉडेल टाऊन कॉम्र

    निकेत पावसकर ,नमस्कार!आपल्या…
    निकेत पावसकर ,नमस्कार!आपल्या कडे असलेला हस्ताक्षर संग्रह हा आपला आवडता छंद विषय आपणास आनंद देणारा असून निश्चितच आपल्याला मोठे बनविणारा आहे.हा सुंदर छंद अधिक जोमाने वाढवा.आपले हार्दिक अभिनंदन!आपल्या वाटचाळीस खुप-खुप शुभेच्छा!कळावे,धन्यवाद! माझा चलभाष–०९४२३३५५२८५,०९२२६३३७६७६

Comments are closed.