नाशिक जिल्हा संस्कृतिवेध – वेध सिन्नर आणि निफाडचा!

5
71
carasole

‘थिंक महाराष्ट्र डॉट काम’वर सादर केल्या जाणा-या माहितीमध्ये समाजातील सकारात्मकता आणि विधायक घडामोडी यांचा विचार आणि शोध अंतर्भूत आहे. ‘थिंक महाराष्ट्रा’ने समाजातील सकारात्मकतेचा आणि चांगुलपणाचा वेध घेण्याच्या उद्देशाने जिल्हावार मोहिमा सुरू केल्या. त्यातून ‘नाशिक जिल्हा‍ संस्कृतिवेध’ ही मोहिम राबवण्‍यात आली. त्या मोहिमेत गावोगावी भटकणा-या ‘थिंक महाराष्ट्र’च्या कार्यकर्त्यांना तेथे घडलेले समाजाचे दर्शन उत्साहवर्धक आणि चकित करणारे होते.

‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या पहिल्या टप्‍प्‍यात 3 फेब्रुवारी 2016 ते 6 फेब्रुवारी 2016 या चार दिवसांत सिन्नर आणि निफाड या दोन तालुक्यांचे माहिती संकलन करण्यात आले. ‘थिंक महाराष्ट्र’च्या एकूण सोळा कार्यकर्त्यांनी तेथील गावखेड्यांतून स्‍थानिक कर्तबगारीची आणि समाजाभिमुख उपक्रमांची नोंद केली. त्‍यानुसार मोहिमेच्‍या आदल्‍या रात्री कार्यकर्त्‍यांच्‍या दोन टिम नियोजित स्‍थळी पोचल्‍या. दुस-या दिवशी, 3 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी सिन्नर आणि निफाड या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी कामाला सुरूवात झाली. महेश खरे आणि मकरंद कर्णिक सिन्नर आणि निफाड येथील कार्यकर्त्यांच्या टिमचे नेतृत्व करत होते.

पहिल्याच दिवशी निफाडचे प्रल्हाद पाटील कराड यांची भेट झाली. चारशे कोटी रुपयांचा साखर कारखाना उभारणा-या पाटील कराड यांच्या सामाजिक कामाचा आवाका तेवढाच मोठा आहे. वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षीदेखील त्यांनी ‘थिंक’च्या कार्यकर्त्यांसोबत स्वतः फिरून कामाची माहिती करून दिली. त्याचवेळी खडक माळेगाव या निफाडच्या सीमावर्ती भागातील गावात योगेश रायते या तरुणाने राबवलेले ग्रामविकासाचे वेगवेगळे प्रयत्न पाहिले जात होते. तर तिकडे सिन्नर तालुक्याच्या देवपूरचे ग्रामस्थ कार्यकर्त्यांना गावातील राणेखानच्या ऐतिहासिक वाड्याच्या‍ कहाण्या आणि इतिहास ऐकवत होते. माधव खंडेराव मोरे, प्रकाश वाजे, नामकर्ण आवारे अशा व्यक्तींच्या भेटींमधून तेथील शेतकरी-विडी कामगारांचा इतिहासही उलगडत होता. त्या सर्वांच्या‍ भेटींमधून कार्यकर्ते उल्हासित होत होते. त्यांची ती भावना सायंकाळच्या आढावा बैठकांमध्ये व्यक्त होत होती. एका बैठकीत सिन्नरच्या ‘सहारा व्यसनमुक्ती केंद्रा’चे मधुकर गिते यांचे काम पाहून आलेल्या कार्यकर्त्याचे शब्दशः उद्गार होते – ”तो माणूस प्रती बाबा आमटे आहे!”

माध्यमांमधून शेतक-यांची आणि शेतीची बिकट अवस्था चर्चीली जात आहे-असते. त्‍या पार्श्‍वभूमीवर ‘थिंक’चे कार्यकर्ते गावागावांतील प्रयोगशील शेतक-यांना भेटत होते. त्यांची ऊर्जा आणि स्वतःचा उत्कर्ष करण्याची जिद्द स्तिमित करणारी होती. सिन्नरजवळच्या लोणारवाडीतील ‘देवनदी व्हॅली अॅग्रीकल्चरल प्रोड्यूसर कंपनी’ने सुमारे हजार शेतक-यांना एकत्र करून रेड केमिकलचा वापर टाळत एकजुटीने शेती करण्याचा प्रयत्न राबवला आहे. तेथील कारभारी सांगळे, अनिल शिंदे आणि त्यांच्या सहका-यांनी आरंभलेला तो प्रयत्न शेतक-यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवत आहेत. ‘देवनदी’च्या प्रयोगांची माहिती घेण्या‍साठी पंजाबसारख्या दूरवरच्या प्रांतातून अनेक शेतकरी बसने तीन दिवसांचा प्रवास करून येत असतात. ‘थिंक’चे कार्यकर्ते ‘देवनदी’च्या शेतावर त्यांची माहिती घेण्यासाठी पोचले, तेव्हा त्यांना तेथे पंजाबहून आलेले अनेक शेतकरी प्रत्यक्ष भेटले. निफाड तालुक्याच्‍या सिमेलगत असलेल्‍या मोहाडी गावातील विलास शिंदे यांची पासष्ट एकरात पसरलेली ‘सह्याद्री फार्मर्स फूड प्रोसेसर’ ही कंपनी त्याच धर्तीची! तब्बल अडीच हजार शेतक-यांच्या संघटनातून निर्माण झालेल्या त्या कंपनीने शेतमालाचा ‘अमूल’च्या धर्तीवर उद्योग उभारला आहे. सोबत सतराशे मजूरांना रोजगार मिळवून देत वार्षिक उलाढालीचा दोनशे पंचवीस कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. प्रल्हाद खडांगळे यांची ‘विंसुरा’ ही विंचुर गावातील वायनरी म्‍हणजे शेतक-याचे यशस्वी उद्योजकात रुपांतर होण्याचे उत्तम उदाहरण आहे. शेतक-यांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांना मदत करणारी आणि सकारात्म‍क बदल घडवणारी ‘युवामित्र’सारखी संस्था, विद्यार्थ्‍यांना लहान वयापासूनच ‘एमपीएससी-युपीएससी’ यांसारख्या परिक्षांची ओळख करून देण्यासाठी सिन्‍नरच्‍या ‘साहस’ ग्रुपने त्या परिक्षांच्या धर्तीवर सुरू केलेली ‘सिन्नर टॅलेन्टन हंट’सारखी स्पर्धापरिक्षा अशा अनेक वैशिष्‍ट्यपूर्ण प्रयत्नांची नाशिक मोहिमेमध्‍ये नोंद केली गेली. त्या जोडीला लहान-मोठ्या शेतक-यांच्यां भेटीगाठी होत होत्या. रोपवाटीकेतून प्रगती साधणारे मधुकर गवळी असोत, शेतावर छोटीशी वायनरी टाकून शेतीचे बिझनेरमध्‍ये रुपांतर करण्याचा प्रयत्न करणारे संजय कहांडल-अशोक सुरवडे असोत, किंवा राज्या‍त शेवग्याच्या लागवडीची सुरूवात करत शेवग्या‍चे नवे वाण विकसित करणारे बाळासाहेब म-हाळे यांच्यासारखे शेतकरी असोत, शेतीतल्या त्या प्रयोगांची-प्रयत्नांची कहाणी अचंबित करणारी होती. तेथे डोळ्यांसमोर दिसणारा, महिन्याकाठी पन्नासेक हजारांपर्यंत पैसे कमावणारा शेतकरी आणि माध्यमांमधून भेटणारा गांजून-पिचून गेलेला शेतकरी अशा दोन प्रतिमांमधला विरोधाभासही जाणवत होता. आणि त्यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍त्‍वाचे अनेक पैलूही नजरेस पडत होते. वर उल्‍लेखलेल्या व्‍यक्‍तींपैकी अशोक सुरवडे हा शेतकरी एकीकडे शेतीत प्रयोग करत असताना पेंग्वीन पक्ष्यांच्या अभ्यासाचे वेड घेऊन थेट अंटार्क्टिकाला जाऊन पोचला. माणसांनी मनी बाळगलेले असे विविध ध्यास आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचे त्यांचे त-हेत-हेचे प्रयत्न सिन्‍नर आणि निफाड येथे प्रत्ययाला येत होते.

अमित निकम या तरूण शिक्षक-मुख्याध्यापकाने गावक-यांना एकत्र करून त्यांच्याकडून अकरा लाख रुपये एकत्र करावेत आणि त्यातून निफाडच्या रेडगावात ‘डिजिटल स्कूल’चा आरंभ करावा हा चमत्कारच भासत होता. शिक्षण क्षेत्रात तसे प्रयत्न सिन्नरच्या वडांगळी गावी राजेंद्र भावसार यांनी तर ठाणगाव येथे राहुल पगारे यांनी चालवले आहेत. राहुलच्या विद्यार्थ्यांच्या ठायी असलेली असलेली सामाजिक जाणिव, त्या मुलांनी लहान वयात कॅनव्हासवर वॉटर कलर्सच्या माध्यमातून चितारलेल्या कलाकृती आश्चर्यचकित करतात. लोभस डोळ्यांचा राहुल स्वतःच्या प्रयत्नांना विसरून तासनतास विद्यार्थ्यांच्या कलागुणांबाबत बोलत राहतो, तेव्हा ऐकणा-याच्‍या मनी त्याच्या उपक्रमाविषयी आत्मियता उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. डुबेरे गावातील प्रवीण वामने या तरूणाने गावातील इतर तरूणांना संघटीत करून आरंभलेला ग्रामविकासाचा प्रयत्न आणि त्यामागचा त्याचा विचार-धडपड तेवढीच महत्‍त्‍वाची! त्या जोडीला दत्तकाका उगावकरांसारखे पक्षीमित्र, ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमाला चालवणारे विंचुर गावचे शिक्षक दिलीप कोथमिरे, लासलगावचे सामाजिक कार्यात गुंतलेले अनिता आणि शिरीष गंधे हे दांपत्य, सिन्नरचे इतिहास संशोधक माधवराव थोरात, अशा नानाविध मंडळींचे काम जाणून घेताना समाजात दडलेल्या ऊर्जेच्या भांडाराची प्रचिती येत राहिली. ते सर्व चित्र मुंबईपुण्यापासून फक्त पाच तासांच्या अंतरावरचे, मात्र त्या घडामोडींचा त्या शहरांना आणि त्यापलिकडच्‍या महाराष्‍ट्राला सुगावाही लागत नसल्याची जाणिव पदोपदी होत होती.

एकिकउे मोहिमेतील कार्यकर्ते माहितीसंकलन करत असताना ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्‍य संपादक दिनकर गांगल, संचालक प्रविण शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण क्षीरसागर यांनी स्थानिक महाविद्यालये-वाचनालये यांना भेट देत तेथील विद्यार्थी-गावकरी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विद्यार्थ्यांचा माहितीसंकलनात सहभाग आणि महाविद्यालयांमध्‍ये ज्ञानमंडळे निर्माण करणे अशा दोन कल्पना मांडण्यात आल्‍या. त्‍या कल्पना तेथील काही उत्साही प्राध्यापकांनी उचलून धरत आपण ते काम करू असे आश्वासनही दिले.

डिसेंबर 2014 मध्ये राबवलेल्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेत व्यक्ती, संस्था आणि गावागावातल्या सांस्कृतिक वैशिष्ट्याची माहिती घेतली गेली होती. मात्र ‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’मध्ये इतिहासापेक्षा वर्तमानाकडे अधिक लक्ष देण्याचे ठरवले होते. त्यामुळे होळकरांचा वाडा, राणेखानचा वाडा, बाजीरावाचे जन्‍मस्‍थान असलेला बर्वे वाडा अशा तुरळक गोष्टी वगळता प्रामुख्याने दोन तालुक्‍यांत कार्यरत असलेल्‍या व्यक्ती आणि संस्थांच्‍या माहितीची नोंद करण्यात आली. मात्र तो स्थानिक वैशिष्ट्यांचा-इतिहासाचा भाग दुर्लक्षित राहिला नाही. तेथून ‘थिंक महाराष्‍ट्र’सोबत जोडल्या गेलेल्या स्थानिक व्यक्तींनी ‘थिंक महाराष्ट्र’कडे तशी माहिती लिहून पाठवण्याचे मान्य केले आणि माहिती पाठवण्यास सुरूवातही केली. ही मोहिम यशस्वी‍ होण्यासाठी नाशिकचे प्रा. शंकर बो-हाडे, सिन्नरचे किरण भावसार, निफाडचे दत्तकाका उगावकर अशा अनेक स्था‍निक व्यक्तींचा मोलाचा सहभाग आहे. ठिकठिकाणच्या तशा स्थानिकांनी कार्यकर्त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून त्यांच्या प्रवासांपर्यंत अनेक बाबतीत सहकार्य केले. त्यामुळे मोहिमेचा खर्च काही प्रमाणात आटोक्यात आला. अशाच स्वरुपाचा अनुभव ‘सोलापूर मोहिमेत’ही आला होता. स्थानिकांचे तसे सहकार्य मिळू शकले तर महाराष्ट्राच्या इतर जिल्हा-तालुक्यांमध्ये‍ही अशा माहितीसंकलनाच्या मोहिमा राबवणे शक्य होईल.

अखेरच्या‍ दिवशी, 6 फेब्रुवारी 2016 रोजी नाशिक शहरात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, ‘ग्रंथाली’, ‘ज्योती बुक स्टोअर्स’ आणि ‘शंकराचार्य न्यास’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्स‍व माणूसपणाचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यांत आला. तो कार्यक्रम गंगापूर रोड येथील ‘शंकराचार्य न्‍यास सभागृहा’त संपन्‍न झाला. त्यावेळी दिनकर गांगल यांनी उपस्थितांना ‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना विषद केली. त्यानंतर पत्रकार मुक्ता चैतन्य यांनी देवरायांचे अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये‍ आणि थॅलिसिमियाग्रस्त लहान मुलांसाठी काम करणा-या सुजाता रायकर यांच्या‍ मुलाखती घेतल्या. मुलाखतींपूर्वी त्या‍ दोघांच्या कामासंबंधात छोटेखानी फिल्मस् दाखवल्या गेल्या. मुंडल्ये यांनी ‘देवराई’ हा विषय समजावून सांगताना त्यातल्या गंमतीजमतींसोबत त्याचे महत्‍त्व स्पष्ट केले. तर सुजाता रायकर यांनी थॅलिसिमिया या रोगाचे स्वरुप, त्याचा रुग्णासोबत कुटुंबावर होणारा परिणाम, त्याबद्दल घ्‍यायची काळजी याबाबत माहिती पुरवली.

मुलाखतींनंतर डॉ. मुंडल्ये आणि सुजाता रायकर यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’च्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या‍नंतर प्रशांत क-हाडे यांनी ‘ग्रंथाली’च्या‍ ‘अॅपली ग्रंथाली’ या अॅपचे आणि टॅबचे पॉवर पॉइंटच्या सहाय्याने सादरीकरण केले. त्यापाठोपाठ गायक संजीव चिम्मलगी आणि कवी चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलांचा ‘एका उन्हाची कैफियत’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेतून बरीच माहिती गवसली. सिन्‍नर आणि निफाड तालुक्‍यातील गावोगावच्या व्यक्तींचे कर्तृत्व, त्यांच्या प्रगतीच्या कहाण्या आणि समाजाभिमुख कामे जाणून घेता आली. तेथील घडामोडी भारावून टाकणा-या असल्या तरी ते चित्र केवळ दोन तालुक्यांतले होते! उर्वरित नाशिक जिल्हा किंवा संबंध महाराष्ट्राचा विचार करता जागोजागच्या सकारात्मकतेचा, चांगुलपणाचा आवाका केवढा मोठा असेल याचा विचारच मती गोठवून टाकत होता. अशी ठिकठिकाणची माहिती संकलित करून लोकांपुढे सादर करण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र’ आणि ‘थिंक’शी जोडलेले सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. त्यास स्थाानिक सहकार्याची जोड लाभली तरच हे घडवता येईल.

– किरण क्षीरसागर

About Post Author

5 COMMENTS

  1. Aapn ji hi web site open keli
    Aapn ji hi web site open keli aahe ani tyatun amhala dnyan prapt hot aahe. Ya dntanacha amhala bhavishyat nakkich changla upyog hoel. Tumhi aajchy yugasathi chnglach kam krt aahat. Ani eak vinanti hoti, mla wadangalichy sambhal vadan bgaych aahe ya website varil.

  2. रेडगाव डिजिटल शाळा
    रेडगाव डिजिटल शाळा मुख्याध्यापक अमित निकम तसेच thinkmaharashatra great उपक्रम

  3. “वंचितांचा घेतलेला शोध”

    “वंचितांचा घेतलेला शोध”
    अभिनंदनीय !

Comments are closed.