नाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’

1
155
nav-nashik-navhe-nasik

नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव ‘नासिक’ असे आहे. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदी’चा उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर होतो. ‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते.

प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.

लक्ष्मणाने रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, तेथेच तलवारीने छाटून टाकले. म्हणून त्या स्थानाला ‘नासिक’ म्हणू लागले, अशी एक उपपत्ती आहे. दुसरी उपपत्ती अशी आहे, की ते गाव गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर वसले, म्हणून ते ‘नवशिख’. पुढे, त्याचा अपभ्रंश ‘नाशिक’ असा झाला. त्या नऊ टेकड्या नासिक शहरात पाहण्यास मिळतात – 1. जुनी गढी, 2. नवी गढी, 3. जोगवाडा टेक, 4. पठाणपुरा टेक, 5. म्हसरूळ टेक, 6. डिंगरआळी टेक, 7. सोनार अळी टेक, 8. गणपती डोंगर, 9. चित्रघंटा टेक.
 
कृतेत पद्मनगरं त्रेतयांतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंपंचदीपा इमे भुवि |
 

हे ही लेख वाचा – 
आगाशी – इतिहास-भूगोलाचे वरदान! (Aagashi)
दुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा! (Durshet)

हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील ‘नासिक’च्या नावाची माहिती त्यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्या पूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.

‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनां’ची सत्ता उदयास आली. त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहीत होते. नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा इसवी सनपूर्व पाचव्या-चौथ्या शतकात निर्माण झालेल्या वाङ्मयातून आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिक’चा उल्लेख हा ‘नासिक्य’ असाच केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तिकांत’ या ग्रंथात इसवी सनपूर्व 250 मध्ये ‘नासिक्य’ हाच उल्लेख येतो.

नासिक आणि बौद्ध धर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष(सुंदर तरुण देवता) असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच कालखंडामध्ये ‘नासिक’ येथे संपूर्ण नासिकमध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ कोरली गेली. तिला लोक ‘पांडव लेणी’ संबोधतात. प्रसिद्ध खगोलतत्त्ववेत्ता टॉलेमी याने इसवी सन 150 मध्ये ‘नासिक’ शहराची नोंद ही ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे.

पतंजली याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात ‘नासिक’चा उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर ‘चंद्रप्रभ’ यांनी ‘नासिक’ येथे कुंतिविहार नावाचे मंदिर बांधले. ती नोंद इसवी सन चौदाव्या शतकातील जीन प्रभुसूरींच्या ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथामध्ये मिळते.

महानुभाव पंथाचे संस्थापक ‘चक्रधर स्वामी’ नासिकमध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे त्यांच्या ‘स्थानपोथी’ या ग्रंथात मिळतात. चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर या ठिकाणी त्या काळात भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत ‘नासिक’ येथे आले आणि ते ‘नासिक’मधून बीड येथे निघाले.

‘नासिक’ 1347 पर्यंत यादवांच्या अधिपत्याखाली होते. ‘बहामनी’ सत्तेने तेथे 1490 सालापर्यंत वर्चस्व राखले. गावाचा उल्लेख तेव्हादेखील ‘नासिक’ असाच सापडतो. बहामनी सत्तेची शकले 1490 सालानंतर उडाली त्यानंतर ‘नासिक’ हे शहर अहमदनगरचे निजामशहा याच्या ताब्यात1636 पर्यंत होते. समर्थ रामदास स्वामी पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये (1644) नासिकचा उल्लेख हा ‘जनस्थान’ असा करतात. तो श्लोक पुढीलप्रमाणे:-

जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी ||  येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची || 

‘नासिक’ शिवाजी महाराजांच्या काळातदेखील दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या ‘नासिक’ शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने ‘गुलशनाबाद’ असे केले. ‘नासिक’ हाच मूळ उल्लेख तेथे मराठ्यांच्या राज्यात 1760  ते 1818 पर्यंत मिळतो. इंग्रजांचा अंमल ‘नासिक’ शहरावर 1818 नंतर सुरू झाला तेव्हा देखील ‘नासिक’ हाच उल्लेख मिळतो. इंग्रजांनी ‘नासिक’ शहराला 1870 साली जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅझेटीयर काढले त्याचे नावदेखील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रिक्ट गॅझेटीयर’ असे आहे. 

– अनुराग वैद्य 8308810194
vaidyanurag@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. Nashik madhe shurpanaka ch…
    Nashik madhe shurpanaka ch naak kaple hote… Tyavarun nashik ch naav nasik ase padle. Sanskrit madhe naak la nasika boltata tya varun nasik ase naav padle.

Comments are closed.