नाते आकाशाचे

0
19

– मंदार दातार

वैदिक संस्कृतीत पंचमहाभूतांचा विचार वेगवेगळ्या स्तरांवर केलेला आढळतो. ह्यांपैकी आकाशतत्त्वाचा वेदांमध्ये आकाश (sky) आणि अंतरिक्ष (space) या दोन अंगांनी विचार करण्यात आला आहे. आरंभीच्या काळात ग्रह-गोलांबाबत वाटणारे आश्चर्य नंतरच्या काळात, त्यांतील विज्ञान लक्षात येऊ लागल्यावर कमी झाले. त्याचबरोबर निसर्गाच्या नित्य घडणार्‍या चमत्कारांचे आणि सुसूत्रतेचे गणितही लक्षात येऊ लागले. निसर्गाच्या जवळ जाणारी जीवनशैली जगणार्‍या वैदिक लोकांनी या गणिताचा उपयोग आपली कालगणना आणि धार्मिक अनुष्ठानांचा कालावधी ठरवण्यासाठी सुरू केला. मानवाच्या बौद्धिक जडणघडणीत हा महत्त्वाचा टप्पा होता.

 

– मंदार दातार

वैदिक संस्कृतीत पंचमहाभूतांचा विचार वेगवेगळ्या स्तरांवर केलेला आढळतो. त्यात आरंभीच्या काळात आश्चर्य, भीती दिसते; त्याचप्रमाणे या शक्ती नियंत्रित करणार्‍या देवतांची स्तुती केलेली पाहायला मिळते. वैदिक लोक देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग करू लागले. यज्ञसंकल्पना निसर्गाच्या प्रतीकांच्या द्योतकच आहे. नंतरच्या उपनिषदकाळात पंचमहाभूतांचा विचार तत्त्वज्ञानाच्या अंगाने केला गेला. आयुर्वेदाने देखील त्याच आधारावर त्रिगुणात्मक, त्रिदोषात्मक चिकित्सा प्रस्थापित केली. एक समज असा आहे, की पाच निसर्गशक्तींचा मानवी जीवनावर परिणाम हा त्यापासून उद्भवणार्‍या उद्रेकांमुळे जास्त आहे. पण ते तितकेसे बरोबर नव्हते. वैदिक काळात उद्रेकांपेक्षा पंचमहाभूतांचा विधायक उपयोगाच्या दृष्टीने विचार करण्यात आला आहे. जसे-

पृथ्वी(जमीन, पीक-पाणी वगैरे), आप (पाणी, जीवनाश्यक), तेज (वनस्पती संवर्धन, मानवी शरीरास पोषक ऊर्जा), वायू (तापमानाशी संबंध, पर्यावरण) आणि आकाश (खगोलीय घटनांची आणि पृथ्वीवरील ऋतू यांची नियमितता व कालगणना)

ह्यांपैकी आकाशतत्त्वाचा वेदांमध्ये आकाश (sky) आणि अंतरिक्ष (space) या दोन अंगांनी विचार करण्यात आला आहे. खगोलात असणारे ग्रह, तारे, उल्का, धूमकेतू यांची निरीक्षणे आणि त्यांबाबत वाटणारे आश्चर्य, भीती इत्यादी वेदवाङमयात वारंवार वाचावयास मिळतात. वेदांची रचना ही एका मोठ्या कालखंडात झालेली आहे. आरंभीच्या काळात ग्रह-गोलांबाबत वाटणारे आश्चर्य नंतरच्या काळात, त्यांतील विज्ञान लक्षात येऊ लागल्यावर कमी झाले. त्याचबरोबर निसर्गाच्या नित्य घडणार्‍या चमत्कारांचे आणि सुसूत्रतेचे गणितही लक्षात येऊ लागले. निसर्गाच्या जवळ जाणारी जीवनशैली जगणार्‍या वैदिक लोकांनी या गणिताचा उपयोग आपली कालगणना आणि धार्मिक अनुष्ठानांचा कालावधी ठरवण्यासाठी सुरू केला. मानवाच्या बौद्धिक जडणघडणीत हा महत्त्वाचा टप्पा होता.
येथे लक्षात घेतले पाहिजे, की धार्मिक व्रते व अनुष्ठाने हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. त्या अनुषंगिक, पूरक पूजा नव्हत्या, तर शेती व पशुपालन हे जीवनाचे मुख्य उत्पादक अंग त्याशी संबंधित असेच हे धर्मविधी मानले गेले. त्यामधून जीवन घडले.

‘वेदाहि यज्ञार्थं अभिप्रवृत्त:||’ असे एक वचन आहे. त्याचा अर्थ वेद हे यज्ञ करण्यासाठी निर्माण झाले आहेत. त्यामुळे यज्ञ करणे आणि विशिष्ट देवतांना प्रसन्न करणे हा वैदिक धर्माचा मुख्य पैलू होता. त्यांतील देवता सभोवताली असणार्‍या निसर्गातून निर्माण झालेल्या होत्या. मग त्यांचे आवाहन करण्यासाठी निसर्गात दिसणारी या देवतांची प्रतिके यज्ञात असणे गरजेचे वाटू लागले. त्याचबरोबर विशिष्ट कालात विशिष्ट देवतांचे यज्ञ होणे स्वाभाविक वाटू लागले. उदाहरणार्थ, वरूण देवतेचे आवाहन हे वसंत किवा ग्रीष्म ऋतूत होणे गरजेचे आहे. म्हणजे त्या देवतेच्या प्रसन्नतेचे फल पुढे येणार्‍या वर्षा ऋतूत मिळेल. निसर्गाचे हे कालचक्र खगोलीय गोलांशी बांधलेले आहे. त्यातही सूर्य आणि चंद्र यांच्याबरोबर त्याचा दृढ संबंध आहे. त्यामुळे वैदिक कालगणना पद्धतीत सूर्य-चंद्र यांच्या गतीचा, स्थितींचा मेळ घालण्यात आला. अशा या वैदिक कालगणनेत उत्तरोत्तर अनेक बदल होत गेले. पण त्याचे मूळ तत्त्व अबाधित राहिले आणि पंचांग त्याच मूलतत्त्वाशी संबंधित आहे. हजारो वर्षे टिकलेल्या या पद्धतीचे यश तिच्या निसर्गनियमांशी प्रामाणिक असण्यात आहे असेच म्हणावे लागेल.
आकाशात दिसणार्‍या वैदिक देवतांच्या प्रतीकांचा वापर कालगणनेबरोबर स्थापत्यशास्त्रातदेखील केला गेला. यज्ञ हे वैदिक आर्यांचे मुख्य धार्मिक स्त्रोत असल्यामुळे यज्ञवेदींच्या रचनेत आकाशतत्त्वाचा वापर आहे. यज्ञवेदींची रचना कशी असावी, त्यासाठी भूमितीची आवश्यक साधने, मोजण्याच्या पद्धती, त्यांचे गणित इत्यादी विषयांचा अभ्यास शुल्ब सूत्रांमधून (Shulba-Sutra) केलेला आढळतो. शुल्बसूत्रांना वेदांच्या पुरवणी भागात (Appendices) महत्त्वाचे स्थान आहे. शुल्बसूत्रामध्ये आपस्तंब, बौधायन, कात्यायन आणि मानव ही चार सूत्रे (ग्रंथ) प्रसिद्ध आहेत. त्यांतील बौधायन शुल्बसूत्र हे भाषाशास्त्रानुसार प्राचीन असल्याचे मानले जाते.
यज्ञ करण्याचा उद्देश आणि यज्ञवेदींची रचना यांचा परस्परसंबंध असे. यज्ञवेदी मोठ्या इमारतींप्रमाणे प्रचंड असत. काही यज्ञांचा कालावधी शंभर वर्षांपेक्षा अधिक असे. यज्ञवेदींच्या उभारणीत पंचमहाभूतांचा प्रतीकात्मक वापर केलेला दिसतो. उदाहरणार्थ पृथ्वी दर्शवणारा भाग गोलाकार असे तर आकाश दर्शवणारा चौरसाकृती. महावेदी, जेथे यज्ञातील मुख्य देवतेचे आवाहन केले जाई; त्या भागांची रचना चौकोनी (Isosceles Trapezoid) असे. वर्षातून चार वेळा होणार्‍या एका यज्ञासाठी महावेदीची रचना सोबतच्या आकृतीत दाखवल्यानुसार करण्यात येई. त्यात पाया २४ आणि ३० तर रुंदी ३६ असे. या संख्यांची बेरीज ९० आहे. वैदिक कालगणना पद्धतीनुसार वर्षाचे एक चतुर्थांश दिवस ९० आहेत. या यज्ञवेदीभोवती तीनशेसाठ दगडांचे कुंपण घालावयास सांगितले गेले आहे. त्याचा संबंध वर्षाच्या एकूण दिवसांशी आहे.
यज्ञवेदींप्रमाणे खगोलीय घटनांचा प्रभाव नगररचना आणि वास्तुरचना यांत दिसून येतो. त्यात प्रामुख्याने राजांचे महाल, देऊळ आणि संपूर्ण नगराची रचना यांचा समावेश आहे. या पद्धतीने बांधलेली उदाहरणे पाहता येतात. जयपूर हे शहर याच तत्त्वांवर रचण्यात आले आहे. शहराची रचना विद्याधर नावाच्या स्थापत्यविशारदाने केली आहे.  या शहराचा आराखडा वेदांमधील पीठपाद मंडलावर आधारित आहे त्यात अंतरिक्ष (space) दर्शवणारी नऊ चौरसांची रचना आहे (हे नऊ चौरस म्हणजे नव ग्रहांची मंडले आहेत). सर्वात मधल्या चौरसात गोलाकार भाग असून त्यात मुख्य इमारतींची (राजमहाल, सरकारी इमारती, वगैरे) रचना सांगितली आहे, तो भाग पृथ्वीतत्त्व दर्शविणारा आहे. असेच आणखी एक उदाहरण म्हणजे कंबोडियातील सुप्रसिध्द अंकोर-वाट  मंदिर. हे मंदिर आजही स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते.निसर्गाच्या सान्निध्यात राहणार्‍या वैदिक आर्यांची संपूर्ण जीवनशैली निसर्गाच्या नानाविध प्रतीकांनी भरलेली होती. त्यामुळे ती प्रतीके प्राचीन वाङमयात पाहावयास मिळतात. धर्म, विज्ञान, संगीत, नृत्य, राजकारण किंवा कोणतेही क्षेत्र असो, निसर्ग आणि त्याची प्रतीके यांचा विचार सर्वप्रथम केलेला आढळतो. त्याचमुळे वैदिक-धर्म शतकानुशतके मानवी जीवनाशी संबंद्ध राहिला. गणित आणि तंत्रविज्ञान यांतून निसर्गरचनेचे कोडे माणसाला जवळजवळ अवगत झाले, त्यासाठी प्रत्यक्ष निसर्गनिरीक्षण महत्त्वाचे राहिले नाही. जीवनोपयोगी उत्पादन व सुखसेवा या गोष्टी मानवासाठी सर्वात मुख्य व महत्त्वाच्या बनल्या. असे असून सुद्धा निसर्गाचे निरीक्षण, अवलोकन आजही महत्वाचे ठरते. दोन उदाहरणे यासंदर्भात देता येतील. अपोलो मिशन मध्ये समाविष्ट असणाऱ्या एका अंतराळवीराने असे सांगितले कि अंतराळात स्थान निश्चिती करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून देखील ते ताऱ्यांच्या निरीक्षणाने निर्णय घेत होते (हि पद्धत प्राचीन काळापासून नौकानयनाकरिता खलाशी वापरीत आहेत). मंगळावर उतरलेल्या ऑपोरच्युनीटी या मानवरहित यंत्राला दिशादर्शन तेथील आकाशाकडे पाहूनच करावे लागते.
या संदर्भात निसर्ग, पर्यावरण या मानवी जीवनातील घटकांकडे पाहिले गेले पाहिजे. मानवी जीवनातील ह्द्यता, सौंदर्य हे भावविचार निसर्गाने शिकवले आहेत. आपण ते जीवनाचे अविभाज्य अंग मानू लागलो आहोत. त्या संदर्भातच निसर्गाकडे ज्ञानाचा मूळ उगमस्त्रोत म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर मानवी जीवनाच्या या टप्प्यावर मानवाची ही मर्यादादेखील मानली गेली पाहिजे, की माणूस प्रतिपृ्थ्वी शोधून काढू शकेल;  निर्माणही करू शकेल, पण मानवाची क्षमता प्रतिविश्व निर्माण करण्याइतकी वाढेल का याबाबत शंका आहे. त्यामुळे प्रकाश व ह्षीकेश या ज्ञानी पितापुत्रांच्या म्हणण्यात तथ्य आहे असेच या टप्प्यावर म्हणता येते.
मंदार दातार

 

 

About Post Author

Previous articleप्रितालीची दौ़ड सायकलवर!
Next articleतिंतल तिंतल लितिल ताल !
मंदार दातार हे भारतीय कालगणना आणि पंचांग यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी गणित या विषयातून एम टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे कालमापनाचे गणित आणि त्याचा विकास हे अभ्यासाचे आणि आवडीचे विषय आहेत. दातार यांचे याच विषयावरील ‘कालाचा महिमा’ हे पुस्तक 'ग्रंथाली'तर्फे प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422615876, (020) 24460914