नाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच!

1
61
_Nadan_1.jpg

नाडण हे माझे गाव देवगड तालुक्यातील वाडा-पडेल या गावाच्या शेजारी आहे. नाडण गाव तळेरे- विजयदुर्गला जाताना मधेच लागते. रस्त्याच्या दुतर्फा टुमदार घरे, डोंगरदरी व हापूसच्या कलमबागा दृष्टीस पडतात. गाव तेरा वाड्यांचे आहे – सड्यावरील धनगरवाडी, पुजारेवाडी, वारीकवाडी, वेलणकरवाडी, मिराशीवाडी, घाडीवाडी, बौद्धवाडी – त्यातीलच एक आमची ‘वीरवाडी’. ती मोंड खाडीकिनारी आहे. वीरवाडी दोन डोंगरांच्या कुशीत माडांच्या बनात वसली आहे. तिचे अस्तित्व वाडातर येथील पुलावरूनही दृष्टीस पडत नाही! नाडण हापूस आंब्यासाठी तर वीरवाडी कालवांसाठी प्रसिद्ध आहे. वाडीत सुमारे शंभर घरे आहेत.

माझे बालपण वीरवाडीतील बंदरावर, मळ्यात व सड्यावर गेले. आमचे घर मळ्याच्या कडेला, खाडीकिनारी आहे. परंतु गृहकलहामुळे, नंतर, आम्ही त्याच्याच काहीसे वरील जागेवर स्वतंत्र घर बांधले. पुढे, आमच्या पिढीने सिमेंटचे घर बांधले आहे.

गावात श्रीदेव महादेश्वर हे ग्रामदैवत तर गांगेश्वर व पावणाई आदी देवतांचीही मंदिरे आहेत. मंदिरात सर्व सण व उत्सव यांचे आयोजन केले जाते. महादेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला जत्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. त्याला ‘टिपर’ असे म्हटले जाते. मंदिर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालेले असते. दीपमाळ दिव्यांनी सजवले जातात. मूर्तीची विधिवत पूजाअर्चा, भजन, कीर्तन, पालखीची मिरवणूक, तरंग नाचवणे आदी कार्यक्रम ढोल-ताश्यांच्या गजरात पार पाडले जातात. जत्रेत मालवणी खाजा, लाडू, खेळणी व कपड्यांसह विविध स्टॉल लागल्याने भक्तगणांच्या खरेदीला आणि आनंदाला उधाण आलेले असते. गावातील ढोलपथक जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने त्याला मागणीही बऱ्यापैकी असते.

गावात भजनी परंपरा जोपासली गेल्याने पुजारे, मोंडे, अनभवणे व आनंद जोशी हे बुवा त्यांच्या भजनांसाठी तालुक्यात प्रसिद्ध आहेत. गावातील भिडे, वेलणकर व जोशी ही मंडळी गावची भूषण आहेत. त्यामध्ये व्यावसायिक कै. दत्तोपंत भिडे (माजी सरपंच), सुलेखनकार व रंगकर्मी कै. अनंत वेलणकर, कृषितज्ज्ञ पांडुरंग भिडे, कै. डॉ. विजय वेलणकर आदींचा समावेश होतो. गावात गणेश मूर्तिकारही आहेत. ग्रामपंचायत, टपाल कार्यालय, दोन प्राथमिक शाळा, रास्त दराचे धान्य दुकान आहे. वीरवाडीत गेली माणगावकरांचे किराणा मालाचे दुकान 1964 सालापासून चालवले जाते. वीरवाडीत मराठा व कुणबी समाजापेक्षा आमची गाबित मच्छिमारांची घरे बहुसंख्येने आहेत. तेथे भाबल व कोयंडे मंडळींचे मांड आहेत. एके काळी गावात गलबते होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाल्यावर बहुतेकांकडे होड्या आल्या. पूर्वापार मत्स्यव्यवसायामुळे मासळीची विपुलता होती. सर्वत्र माशांची दुर्गंधी पसरलेली असे, परंतु तेच उपजीविकेचे मुख्य साधन होते.

_Nadan_2.jpgमाझे आजोबा होडी चालवत, त्यावर सहा खलाशी होते. ते सर्व जण मच्छिमारीसाठी देवगड बंदराच्या बाहेर रोज सायंकाळी जात व दुसऱ्या दिवशी दुपारी मासे घेऊन परतत. मी आजोबांचा लाडका व घरातील मोठा नातू असल्याने होडीवरील चुलीत भाजलेले मासे घेऊन बंदरावरून मळ्यातून धूम ठोकायचो, ते चित्र माझ्या डोळ्यांसमोर आले, की मी सुखावून जातो! रम्य ते बालपण काय असते, याची प्रचीती तेव्हाच येते.

आम्ही आमच्या घरात श्रीमंती नसली तरी कष्टप्रद, पण समाधानाचे जीवन जगत होतो. होडी आली, की घरातील माझी आजी, आत्या व काकी यांची उडणारी एकच धावपळ पाहण्यासारखी होती. आजी दोन्ही आत्यांना फर्मान सोडायची, ‘अगो, बंदरावर जावाऽऽ होडी येता हा.’ मग आत्या-काकी बंदावर जायच्या, माशाच्या पाट्या घरी आणायच्या व त्यापुढील प्रक्रिया करीपर्यंत आजोबाही होडी किनाऱ्यावर वर घेऊन मग घरी अंघोळीला यायचे. एव्हाना, दुसरे खलाशी त्यांच्या वाट्याची मासळी घेऊन त्यांच्या त्यांच्या घरी जात. संपूर्ण वाडीत आनंदी माहोल निर्माण होई. घरची सर्व माणसे मग कामाला जुंपून घ्यायची. माझी आई घरातील जेवणाचे काम करायची, तर आजी तिला मदत करणे, मासे त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोचवणे या गोष्टींत गुंतून जायची. आत्या व काकी मासे विकण्यास अन्य गावांत घेऊन जात. शिल्लक मासे सड्यावरील कातळावर वाळवले जायचे. त्यावेळी मासे वाळवण्यासाठी ना जेटी ना ते टिकवण्यासाठी बर्फ. केवळ मीठ वापरून ते टिकवले जात. त्यामुळे मी व माझी बहीण सड्यावर मासेराखणीचे काम करत असू.

दरम्यान, माझे प्राथमिक शिक्षणही वीरवाडीतील सागरी किनाऱ्यालगतच्या शाळेत झाले. मी माझ्यावर कडक स्वभावाचे गणपत सारंग ऊर्फ जीजी यांनीच संस्कार केल्याने घडलो. आमच्याही घरी गोसावी नावाचे शिक्षक राहत असत. त्यांची पत्नी माझी शिकवणी घ्यायची. अन्य शिक्षकांमध्ये राजम, लोके, मणचेकर, भाबल व खवणेकर आदींचा भरणा होता. मी शाळेला दांडी मारली, की माळ्यावर लपून बसत असे. त्या काळी आम्हा दांडीबहाद्दरांना शाळेत नेण्यासाठी वरील वर्गातील तगडी मुले घरी येत. त्यांना लपलेली अशी मुले सापडली, की मुले शाळेत जाताना जोरजोराने रडत असत. तशाच प्रकारे, लस टोचणारे आरोग्य खात्याचे कर्मचारी आले, की तेव्हाही मुले माळ्यावर लपायची. पण ते एक दिवस डाव्या दंडावर लस (तोटके) द्यायचेच, त्याचा ताप दोन दिवस यायचा. तो व्रण अनेकांच्या दंडावर स्पष्ट दिसतो.

_Nadan_4.jpgगावची शाळा दोन सत्रांत भरायची- सकाळी सात ते साडेदहा व दुपारी दोन ते साडेपाच. मधील वेळेत अभ्यास आटोपून समुद्रात पोहणे, मासे राखणे, सड्यावर पतंग उडवणे आदी सोपस्कार पार पाडून, पुन्हा दुपारी शाळेत जाणे असा नित्यक्रम असे. सायंकाळी फुले जमवण्यासाठी फिरावे लागे. ती आणून हार बनवायचा व खुंटीला टांगून ठेवायचा. मग, सकाळी तो हार शाळेत घेऊन जात असू. शाळेतील विद्यार्थ्यांची मिरवणूक प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन या दिवशी गावात-वाडीत निघायची. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दसऱ्याला सरस्वती पूजनानिमित्त आयोजन व्हायचे. प्राथमिक शाळेचे पहिले दोन पदवीधर म्हणजे मी व माझा चुलत भाऊ रमेश भाबल. पुढे, आमची जुनी शाळा मोडकळीस आल्याने ती पाडून नवीन शाळा माळरानावर बांधली आहे. सध्या ती डिजिटल करण्यात आली आहे.

आमच्या वाडीत कधी एस.टी. येईल असे कोणालाही वाटत नव्हते, पण सध्या दिवसभरात पाच एस.टी. गाड्या येतात. एसटीची वाडीत सोय झाल्याने पाच-सहा किलोमीटर पायपीट वाचली. शाळा व महाविद्यालय यांतील अंतरही कमी झाले, पण गावची शैक्षणिक प्रगती फारशी झालेली नाही. आमच्या नंतर फक्त दोन पदवीधर गावातून निर्माण झाले, परंतु मुंबईत वास्तव्याला असलेल्या कुटुंबीयांनी शैक्षणिक स्तर वाढवून साधारणतः दहा ते पंधरा मुलांनी इंजिनियर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक म्हणून त्यांचे भविष्य घडवले आहे. दोघेजण वैद्यकीय क्षेत्रात असून, माझा मुलगा जेजे रुग्णालयाच्या कॉलेजात एम.डी.चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ज्यांना मुंबई-पुण्यात जाणे शक्य झाले नाही ते तरुण स्थानिक रोजगार मिळवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

वाडीत मर्फीचा एकमेव रेडिओ फक्त सावंत मास्तरांच्या घरी असल्याने त्याचा आवाज संपूर्ण वाडीत घुमत असे. सावंतांच्या प्रत्येक घरासमोर त्यांची स्वत:ची विहीर व बागबगीचा कायम आहे. तेथे ‘लाठी’ मारून दोणीत पाणी भरावे लागायचे. ‘रहाट’ काहींच्या विहिरींवर असायचा. गावातील सावंत मंडळी सर्व क्षेत्रात सधन असल्याने त्यांचा दोस्ताना आमच्याशी फक्त माशांसाठी असे.

_Nadan_3.jpgकोयंडे यांच्या मांडावर त्यांच्या कुलभवानीचा गोंधळ असतो, तेव्हा सर्व तालुक्यातील कोयंडे बंधू आमच्या वीरवाडीत मुक्कामाला येतात. कोयंडे यांच्या महागणपतीला एकशेबारा वर्षें झाली आहेत. वाडीत व्हॉलिबॉल, क्रिकेट हे खेळ मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत. क्रिकेटची स्पर्धा तीन दिवस भरवली जाते. विजेत्यांचा बक्षिसे व चषक देऊन गौरव केला जातो. भजनांप्रमाणे नाट्यकलाही जोपासली गेली होती, पण ती लुप्त झालेली दिसते. – मी विठ्ठलाची भूमिका केलेले ‘पंढरपूर’ हे 1973 मधील नाटक हे माझे अखेरचे नाटक ठरले. मी नंतर नाटकात कधीच काम केले नाही. पण आमच्या नंतर ‘जन्मदाता’, ‘साक्षात्कार’ व ‘मातीत मिसळले मोती’ अशी तीन नाटके वाडीत सादर झाल्याचे कळते. – माझे नाव पांडुरंग, नाटकात वठवली ती भूमिका विठ्ठलाची, नोकरीला लागलो तो भाग्याचा दिवस म्हणजे 1 जुलै 1982, अर्थात ‘आषाढी एकादशी’ व राहायला होतो त्या बिल्डिंगचे नाव होते, ‘पांडुरंग सदन!’ या सर्वांचा संबंध आहे, तो तांबळडेग (मीठबाव) येथील विठ्ठल मंदिराशी! म्हणूनच मी गावी गेलो, की त्या मंदिराला भेट देऊनच येतो.

पूर्वी, महिलांचा फार वेळ विहिरीवर पाणी भरण्यात वाया जायचा, त्यांना कपडे धुण्यासाठी ओहोळावर जावे लागे. ओहोळ म्हटला, की माझ्या मृत बहिणीची आठवण आवर्जून येते, कारण तिला मधमाशांनी हल्ला करून 1965 मध्ये भर दीपावलीच्या दिवशी बेशुद्ध केले व रात्री तिचे निधन झाले. आजोबाही दोन महिन्यांनी निर्वतले. कालपरत्वे गावात सुधारणांचे वारे वाहिल्याने रस्ता, वीज व पाणी यांमुळे गावातील जीवनमानात आमूलाग्र बदल झाल्याचे प्रकर्षाने आढळते. सध्या, वाडीत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वाडीच्या विकासासाठी ‘सार्वजनिक विकास मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक मासेमारी विविध कारणांनी संपुष्टात आली अाहे. वृक्ष तोडण्यास बंदी अाहे. त्यामुळे लाकडी होड्यांची निर्मिती पूर्णत: बंद झाली. परिणामी आधुनिक फायबरच्या होड्या आल्या. त्यामुळे आमच्याही वाडीत तीन होड्या होत्या त्या मत्स्यदुष्काळामुळे विकल्या गेल्या. अर्थात काही प्रमाणात त्या कुटुंबांचे आर्थिक सुबत्तेमुळे जीवनमान नक्कीच सुधारले आहे. त्यातील एक होडी ‘फयान’ वादळात बुडाली होती. खलाशी वाचले व मालकाला शासनातर्फे नुकसान भरपाईसुद्धा मिळाली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत आलेले बहुतांश जण मुंबई बंदर व माझगाव गोदी येथे नोकरी करतात, त्यांची फक्त कौटुंबिक स्थिती मध्यमवर्गीयांची आढळते. वाडीतून सध्या एक महिला मुंबई मनपात नगरसेविका असून एक जण माजी सरपंच व एक जण मुंबईत बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. गावात गेल्यावर बालपणीच्या हृद्य आठवणींचे पारायण बंदरावर करण्याशिवाय गत्यंतर नसते.

– पांडुरंग भाबल, psbhabal@gmail.com

(दैनिक प्रहार १२ जानेवारी २०१४ वरून उद्धृत, संस्कारित, संपादित व विस्तारित)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.