नाट्यरूप महाराष्ट्र : भाग एक (१५७५-१७०७) – इतिहास विषयाची मानवी बाजू

2
34
carasole

पुस्तकाच्या सुरुवातीस प्राचार्य हॅमले यांचा पुरस्कार व लेखकाने करून दिलेला ग्रंथ परिचय येतो. प्राचार्य हॅमले यांनी त्या पुरस्कारात म्हटले आहे, ‘नव्या शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विषय आणि विषयातील वर्ण्य मजकूर यांच्या मानवी पैलूची जाणीव. आता, आपल्याकडे मानवी भूगोल, मानवी विज्ञान एवढेच नव्हे तर मानवी गणितही आहे. इतिहास विषयाची मानवी बाजू अधोरेखित करण्याची गरज नाही असे जणू लोक धरून चालले आहेत. पण इतिहास म्हणजे मानवी प्रगती आणि जीवनक्रम यांचा अभ्यास नव्हे काय? परंतु इतिहास वाचणाऱ्या फार थोड्या मुलांना हे उमगते, जाणवते, की इतिहासाच्या पुस्तकात ज्या लोकांबद्दल ते वाचतात ती सारी माणसे खरी होती. आपण जसे बोलतो आणि वागतो तसेच ती माणसेही बोलत-चालत असत.’

वि.द.घाटे यांनी हे तत्त्व स्वीकारून मुलांना इतिहास रंजकपणे शिकवावा व तो वाचताना, अभ्यास करताना त्यांना रुक्षपणा अनुभवास येऊ नये यासाठी ‘नाट्यपद्धतीत हेच शिवाजी-संभाजी मुलांना इतर माणसांसारखे चालताबिलताना आढळतील. ते भावशून्य शब्द नसून हाडा-मांसाची माणसे होती हे त्यांना पटेल… मुले मौजेने शिवाजी-संभाजी झाली, हातात भाले आणि डोकीस मुंडासे चढवून ती जुनी भाषा बोलू लागली व अभिनय करू लागली म्हणजे रंगून जाऊन मराठ्यांच्या इतिहासाशी तादात्म्य पावतील. … माझे पुस्तक वाचून मुलांना जुनी साधने वाचाविशी वाटली तर मी कृतार्थ होईन.’

घाटे या पद्धतीचे लेखन करताना आपण कोणाचीही बाजू घेतली नाही – दोषांवर पांघरूण घातले नाही किंवा जाती-धर्माची नालस्ती केली नाही असाही दावा करतात.

घाटे यांनी पुस्तकात १५७५ ते १७०७ म्हणजे मालोजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे आजोबा) यांनी शेती सोडून शस्त्रे हाती घेतल्यापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या दोनशेपंचवीस वर्षांतील महत्त्वाचे प्रसंग नाट्यरूपाने दाखवले आहेत. एकंदर त्रेचाळीस प्रवेश आहेत. काही प्रवेश फार छोटे – संभाषणांच्या चार-पाच तुकड्यांचे तर काही वीस-पंचवीस तुकड्यांचे. त्यातील सर्वांत मोठा – जास्त लांबीचा – प्रवेश छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा आहे. तो पंधरा पानांचा आहे. राज्याभिषेकाची प्रत्यक्ष कृती वेगवेगळ्या कलशांची स्थापना, गागाभटांनी विविध मंत्रांचे उच्चारण करणे, अष्टप्रधानांनी महाराजांवर विविध जलांचा, द्रव्यांचा अभिषेक करणे अशी संपूर्ण तपशीलवार कृती त्या प्रवेशात घडते. एवढेच नाही तर छत्रपतींनी सिंहासनावर आरुढ झाल्यावर अष्टप्रधानांना वेगवेगळे किताब, त्यांचे पद, वेतन व इतर मानमरातब यांची घोषणा करणे, छत्रपतींना विविध परदेशी वकिलांनी नजराणे देणे आदी बऱ्याच घटना घडतात. घाटे तो प्रसंग वाचकप्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहील अशा शब्दांत रंगवतात. औरंगजेबाचा मृत्यू हा शेवटचा प्रवेशही तेवढाच प्रत्ययकारी आहे. इतर अनेक प्रवेशांत ताराबाई, संभाजीराजे, रामदास-शिवाजी भेट, राजारामास राज्याभिषेक अशा व्यक्ती आणि प्रसंग येतात. संताजी-धनाजी यांच्यातील बेबनाव व संभाजीच्या काळात माजलेली फितुरी यांचेही दर्शन घडते.

हे नाट्यप्रवेश लिहिताना साऱ्या कालखंडातील घटना मांडायच्या व त्याही लांबण न लावता, हे तसे आव्हान होते, पण घाटे यांनी ते खूपच चांगले पेलले आहे आणि नाट्यप्रवेशाचा घाट स्वीकारला तरी मनोरंजनासाठी ते हे लिहीत नसून इतिहास कंटाळवाणा होणार नाही हे बघणे हा त्यांचा हेतू असल्याचा इरादा त्यांच्या मनाशी पक्का होता. मात्र, घाटे इतिहास रंजक करताना आवश्यक ते संदर्भ देणे व खुलासा करणे, अर्थ समजावणे हे नियम पाळतात. त्यामुळे ते संवादात आलेल्या अनेक शब्दांचा तळटीपा देऊन अर्थ स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, कौल घेणे – शरण येणे, अगोटी – पावसाळ्याचा आरंभ, फिसादी – फितूर, आम दरपत्ती – येणे-जाणे, शहाजणे – मंगल वाद्ये, धमधमे – मोर्च्यांसाठी केलेले उंचवटे.

घाटे इतिहासातील घटनांचे कागदोपत्री पुरावे म्हणजे, ती घटना कोणत्या ग्रंथात सांगितली आहे त्याचे संदर्भ कित्येक ठिकाणी देतात. लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे, की या नाट्यसंवादातील व्यक्ती त्या काळच्या बोलीभाषेत बोलतात. ती बोलीभाषा प्राकृत तर होतीच, पण शिवकालीन परिस्थितीत मराठीत काही उर्दू शब्दही रुळले होते. त्यामुळे ती बोली मिश्र होती. त्याचा प्रत्ययही अनेक ठिकाणी येतो.

शहाजी – वेळवखत आला तर केशरी करून लढू. (प्रवेश नऊ)
शिवाजी – जे वडिली मिळवले ते खाऊन राहणे योग्य नाही. नवे संपादू. पंत, धर्म-उच्छेद झाला, क्षेत्रे मोडली, ब्राम्हणांच्या स्नानसंध्येस तोशीस पोचला. (संभाजीराजे उत्तम तऱ्हेने संस्कृत भाषा जाणत असल्याने त्यांच्या तोंडी ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ असे वचन सहज येते.)
संताजी – पातशहाच्या छावणीच्या…
संभाजी –  आमचा खासा जिलबीचा घोडा खंडबाला बसायला द्या (पृष्ठ 100) (जिलबीचा घोडा म्हणजे स्वारीत पुढे चालणारा घोडा.)
शिवाजी – जंजिऱ्यास आमच्या लोकांनी शह दिला आहे त्यांना उपराळा (मदत) करा. (पृष्ठ 75)

म्हणजे घाटे यांनी खऱ्या शिक्षकाच्या भूमिकेतून इतिहासच लिहिला असे नव्हे, तर चालीरीती, त्यावेळचे प्रशासन, सामाजिक मूल्ये, बोलीभाषा या साऱ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यावा यासाठी योजनापूर्वक लिखाण केल्याचे जाणवते.

प्रकाशक – स्वत: वि.द.घाटे
प्रकाशन – नोव्हेंबर १९२६
पुरस्कार/प्रस्तावना – एच.आर. हॅमले, प्रिंसिपॉल -सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई.
पृष्ठे – १४२
किंमत – एक रुपया

– मुकुंद वझे

About Post Author

2 COMMENTS

  1. i want to buy this book. can…
    i want to buy this book. can you help in purchasing as i do not know where it is available

  2. Please contact the writer of…

    Please contact the writer of this article. He might help you. Mukund Vaze -9820946547

Comments are closed.