नाट्यप्रेक्षकांचा अनुनय

0
38

त्याच त्या नाटकांपासून वेगळे काही मिळत नाही, त्याऐवजी अन्य माध्यमांत महाग का होईना पण मिळू शकते. म्हणून प्रेक्षकांनी मराठी नाटकांकडे पाठ फिरवली. सुनील बर्वेचा प्रेक्षकांना नाटकाकडे आणण्याचा हा एक प्रयोग आहे. त्यात ‘प्रमोशन’, ‘मार्केटिंग’ यांची जशी काळजी घेतली आहे तशी नाटकांची सर्वसाधारण चांगल्या दर्ज्याची प्रतही पाहिलेली आहे. त्यामुळे या प्रयोगात थिल्लर नाटक होणार नाही अशी अपेक्षा आहे.

नाट्यप्रेक्षकांचा अनुनय

राजीव जोशी

मराठी नाटकांना प्रेक्षक नाही! ही बाब नवीन नाही. त्याकरता निर्माते सतत नवनवीन क्लृप्त्या करत आले आहेत. नाटकाच्या तिकिटांचे दर कमी करण्याचाही प्रयत्न झाला. गेली दोन वर्षे नाट्यप्रयोगांना सरकारी अनुदान मिळत आहे. फक्त धमाल विनोदी नाटके चालतात या समजामुळे तशा बाजाची नाटकेही लागोपाठ आली, तरीही प्रेक्षकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेलीच! ग्रूपबेसीसवर एकत्रित निर्मितीचे प्रयोग करण्यात आले. (उदाहरणार्थ, तीन निर्मात्यांनी एकत्र येऊन उभे केलेले नाटक – बाजीराव मस्त मी!) प्रशांत दामलेने निर्मिती सुरू केली. सतत रंगभूमीला प्राधान्य देणा-या आणि हाऊसफुल घेणा-या या लोकप्रिय नटाला प्रेक्षक-ओहोटीची झळ जाणवली, तेव्हा त्याने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सवलतीचे दर जाहीर केले. मग ‘वस्त्रहरण’कर्त्यांनी तोच धडा अनुसरला. प्रेक्षकांना खेचण्यासाठी नेमके काय करावे? ह्या बाबत ठोस उपाय वा उत्तरे ना निर्माते-दिग्दर्शकांकडे आहेत; ना नाट्यअभ्यासकांकडे.

सुनील बर्वेसंतोष पवारची नाटके चालतात हा एक निष्कर्ष काढून त्याची नाटके करण्याची प्रवृत्ती वाढली. त्यानेही मागणी तसा पुरवठा केला, पण तोही किती पुरा पडणार? मोठे नट सिनेमा-सिरियल्समध्ये रमतात, त्यांच्या कामे न करण्याने प्रेक्षकांनी रंगभूमीकडे पाठ फिरवली असा एक समज पसरला गेला. पण नामांकित नट नसताना काही नाटके चालली. ती का चालली? प्रेक्षकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करणारी ‘फायनल ड्राफ्ट’, ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ ही नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांना ती का आवडली याचे तार्किक उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला नाही. हिंदी सिनेमा, घरबसल्या होणारी शंभर चॅनेल्सची व्हरायटी पाहणा-या प्रेक्षकांना ओढ वाटेल, ‘मस्ट’ वाटेल असे नाटक किती जणांनी शोधले? नि केले?

ज्याला नाटक म्हणता येणार नाही व तद्दन ऑर्केस्ट्राही म्हणता येणार नाही असा ‘मराठी बाणा’ – महागडी तिकिटे असूनही धो-धो चालतो. कारण निर्मितिमूल्यांचा उच्च दर्जा आणि सर्व थरांच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची ताकद!  मॉल्स व मल्टिप्लेक्सला जाणारा मराठी माणूस नाटकाच्या बाबतीत काटकसरी का बनतो? पैशांचा विचार का करतो? त्याला नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी काय करायला हवे? जाहिरात/चॅनेल्स आणि मूळ नाटकात दम असायला हवा, नवीन नाटके नाहीत, चांगल्या संहिता नाहीत, चांगले नट नाहीत – अशा अनेक समस्यांवर एकेकट्याने किंवा संघिकपणे उत्तरे काढली जातात का? हिंदीत ‘ऑल इज वेल’चा मंत्र देणारा ‘थ्री इडियट्स’ चालतो, मराठीत ‘नटरंग’ हॅमर होतो, ‘शिवाजीराजे’ चालतो… हे सगळे आपल्या अवतीभवती अन्य भाषांत व माध्यमांत घडत असताना मराठी नाटकच मागे का?

‘सूर्याची पिल्ले’ नाटकातील दुश्य..अशा वेळी, आपण रंगभूमीवर पंचवीस वर्षे काम केले, आपण रंगभूमीचे काही देणे लागतो, ह्यासाठी अभिनेता सुनील बर्वेने ‘सुबक’चा उपक्रम सुरू केला आहे. पाच दिग्दर्शक निवडून पाच जुन्या नाटकांचे प्रत्येकी पंचवीस प्रयोग करण्याची ही योजना. तो सांगतो, “मी पंचवीस वर्षे जी नाटके केली, ती मला आवडली म्हणून किंवा व्यवसायाची गरज म्हणून. मी न पटणा-या गोष्टीही केल्या, पण आता स्वत:च्या आवडीने, निवडीने, प्रेक्षकांना काही द्यायचे असेल तर आपल्याला हवे ते चांगले देऊया असा माझा विचार आहे अशी अनवट नाटके जी एकेकाळी गाजली होती, प्रेक्षकपिढीला आवडलेली होती.  पु.ल.देशपांडेंची नाटके होत आहेत. शिवाय, त्यांच्या नाटकांचे हक्क मोकळे केल्याने प्रयोग होऊ शकतील. तीच गोष्ट कै. जयवंत दळवी वगैरे नाटककारांची. तेव्हाची लॅण्डमार्क नाटके – ज्यांची पुस्तके उपलब्ध आहेत, जी लोकांना-विशेषत: पन्नाशीपुढच्या लोकांना नॉस्टॅल्जिया म्हणून पाहवीशी वाटतील. आपल्या आजोबांनी, काकांनी पाहिलेली नाटके पुन्हा करावीत, अर्थात त्याद्वारे धंदाही व्हावा आणि पंचवीस प्रयोगच करावे. अशा पद्धतीने अनवट नाटके सादर करावीत असे मला वाटले. उदा. ‘थॅंक्यु मि ग्लाड’, शन्नांचे ‘सुर राहू दे!…’ आणि त्यातून निवडून पहिले नाटक-‘सूर्याची पिल्ले’ रंगभूमीवर आणले आहे.”

‘सूर्याची पिल्ले’ नाटकातील दुश्य..सुनील बर्वेने आपल्या अपेक्षा व हेतू याबद्दल त्या त्या नाटकाच्या संबंधित दिग्दर्शकांनाही कल्पना दिली आहे.

‘सूर्याची पिल्ले’ हे वसंत कानेटकरांचे नाटक क्लासिक नाही, पण वैशिष्ट्यपूर्ण आहे असे वाटल्याने ते दिग्दर्शक प्रतिमा कुळकर्णीने निवडले असे सुनीलने सांगितले. सुनीलला जरी या नाटकांना प्रौढ-फॅमिलीवाल्या प्रेक्षक-प्रतिसादाची अपेक्षा असली, तरी प्रत्यक्षात, या नाटकास तरुण वर्गाने पहिल्या प्रयोगापासून चांगला प्रतिसाद दिला आहे. हा सुनीलला सुखद अपेक्षाभंग वाटतो.

प्रेक्षकांना हे नाटक का आवडले? हे शोधणे गरजेचे आहे. फार थोडे निर्माते या क्षेत्राकडे ‘व्यवसाय’ म्हणून पाहतात. अनेकांचा हा ‘धंदा’ आहे. गल्लाभरू शौक. पण कै. जयवंत दळवी म्हणायचे, त्याप्रमाणे निर्मात्यांना प्रेक्षकांची आवडनिवड पडताळण्याचा, बदलत्या समाजाचा-इतर माध्यमांचा अभ्यास करण्याची गरज वाटत नाही. ‘नाटक’ एक इंडस्ट्री म्हणून कोणी मानत नाहीत.

खुद्द नाटकक्षेत्रातही सुनील बर्वेच्या ह्या प्रयोगाबद्दल कुतूहल तयार झाले आहे व त्याबद्दल खुसखुशीत टिकाटिप्पणी होत आहे. रत्नाकर मतकरींसारख्या ज्येष्ठ नाटककाराने कमलाकर नाडकर्णींच्या ‘ठेवणीतले नाटक’ या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी ‘क्लासिक’ नाटकांचा संदर्भ देत ‘सुबक’च्या हर्बेरियम प्रकल्पाचा उपरोधिक उल्लेख केला. ते म्हणाले, की या प्रयोगांसाठी निवडलेली नाटके ही पिंपळपाने नाहीत, केवळ पिवळी पडलेली जुनी पाने आहेत. मराठी नाटकांची जाळीदार पिंपळपाने वेगळीच आहेत.

बर्वेचे स्पष्टीकरण वेगळे आहे. तो म्हणतो, की माझा हेतू क्लासिक नाटके सादर करण्याचा नाहीच. प्रेक्षक जे नाटक हौसेने पाहतील ते मला करायचे आहे. सुनील बर्वेने बोलण्याच्या ओघात सांगितले, की ‘खून पाहवा करून!’ हे नाटक केले तर किती जणांनी त्याबाबत ऐकले असेल? कोणाला त्या बाबत माहीत असेल? लोक येतीलच कशावरून? सुनील म्हणतो, की माझे आडाखे किंवा भाकित चुकेलही, पण ‘सूर्याची पिल्ले’ आजच्या जनरेशनला अपील होत आहे. हे यश संहिता, दिग्दर्शन, कलाकार व एकूण विषय आजही रेलेवंट वाटण्यात आहे. ह्याबाबत प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळांची प्रतिक्रिया : मी १९७८ साली ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक पाहिले होते, आज पुन्हा मी आणि माझा मुलगाही ते पाहू शकतो. त्यालाही ते आवडेल!

सुनील बर्वेला तरी दुसरे काय हवे आहे? जे नाटक आजोबांनी पाहिले ते नातवांनी- पुढच्या पिढीने पाहण्याची संधी मिळावी! एखादी लता नार्वेकरसारखी निर्माती सुनील बर्वेला उघडपणे सपोर्ट करते. प्रेक्षकांच्या नाटकाच्या तिकिटाचे पैसे वसूल होतील, अशी नाटके दिली तर प्रेक्षक सढळपणे खर्च करतो हे ‘पिल्ले’मुळे सिद्ध झालेले आहे.

प्रशांत दामलेपाठोपाठ काही निर्मात्यांनी – प्रसाद कांबळी, दिलीप जाधव, जनार्दन लवंगारे ह्यांनी – तिकिटदर खाली आणले. त्यामुळे प्रेक्षकसंख्या निश्चितच वाढलेली आहे. परंतु अंदरकी बात अशी आहे, की त्यामुळे अर्थकारणात विशेष फरक पडलेला नाही. याकरता नाट्यप्रयोगाच्या खर्चातील घटकांवर आणि मूळ नाटकाच्या गुणांवर – निर्मितिमूल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

मराठी नाटकांवर मिडियाच्या परिणामापेक्षा स्वतःच्याच साचेबध्द पॅटर्नचा परिणाम अधिक झाला. पीजेछापाची नाटके काढल्याने चांगल्या नाटकांचा रंगभूमीचा नियमित प्रेक्षक दुरावला गेला. ह्या प्रश्नावर ‘उत्तर’ शोधून वेगळी नाटके, वेगळे प्रयत्न करण्याऐवजी संबंधितांनी मंदी, प्रेक्षकांची आवड व हिंदीचा वरचश्मा ह्यांच्यावर ‘ठपका’ ठेवला. “आवर्जून बघावे असे काही येत नाही!” म्हणून प्रेक्षकांनी पाठ फिरवली. नामांकित नट अन्य माध्यमांत व्यस्त झाले. हे दुष्टचक्र भेदण्याचा व्यावसायिक प्रयत्न झाला नाही. सरकारदरबारी धाव घेऊन अनुदान प्राप्त करणे हाच कॉमन मार्ग चोखाळला गेला. मूळात ‘व्यवसाय’ म्हणून नियम पाळायचे नाहीत, नवीन येणा-याबद्दल साशंकता निर्माण करायची अशी ही प्रवृत्ती. इतर नामवंत नटांनी निर्माता म्हणून किंवा नवीन संकल्पना घेऊन यायला हवे. त्याऐवजी ‘नवा’ न येईल तर बरा अशी प्रवृत्ती आढळते.

त्याच त्या नाटकांपासून वेगळे काही मिळत नाही, त्याऐवजी अन्य माध्यमांत महाग का होईना पण मिळू शकते. म्हणून प्रेक्षकांनी मराठी नाटकांकडे पाठ फिरवली. सुनील बर्वेचा प्रेक्षकांना नाटकाकडे आणण्याचा हा एक प्रयोग आहे. त्यात ‘प्रमोशन’, ‘मार्केटिंग’ यांची जशी काळजी घेतली आहे तशी नाटकांची सर्वसाधारण चांगल्या दर्ज्याची प्रतही पाहिलेली आहे. त्यामुळे या प्रयोगात थिल्लर नाटक होणार नाही अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांनी ‘सूर्यांची पिल्ले’चे पहिले प्रयोग उचलले, ते पुढील प्रयोग व बाकी नाटके यांना कशी साथ देतात ते पाहायचे.

राजीव जोशी

भ्रमणध्वनी : 9322241313

rmjoshi52@yahoo.co.in

About Post Author

Previous articleआनंदाची बातमी
Next articleमुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.