ती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले, नागपुरातील सर्वात जुने ‘बुटी संगीत महाविद्यालय’! गाण्याच्या वर्गात जागा नव्हती, पण सतारीच्या वर्गात होती. म्हणून तिने सतार शिकण्यास सुरुवात केली. तेथे तिला प्रसिद्ध दिलरुबावादक शुभदा पेंढारकर गुरू म्हणून लाभल्या… ती गृहिणी म्हणजे नंदिनी सहस्रबुद्धे. त्यांनी स्वतःसाठी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेला तो प्रवास अनेक स्त्रियांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहासारखा विस्तारला आहे.
नंदिनी यांनी सतारवादनात ‘अलंकार’पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ‘एसएनडीटी (मुंबई)’, येथून एमएची पदवी मिळवली. त्यांना त्यांच्या माहेरून कलेचा वारसा लाभला आहे. नंदिनी या पूर्वाश्रमीच्या सुनीता बापट. त्यांचे श्रीकृष्ण (बाळ) बापट हे वडील जुन्या काळातील छायालेखक. त्यांनी ‘ऊनपाऊस’, ‘अवघाची संसार’, ‘जगाच्या पाठीवर’ या आणि त्या वेळी गाजलेल्या बऱ्याच मराठी चित्रपटांचे छायालेखन केले आहे. नंदिनी यांनी शाळेत असताना दोन वर्षे गाणे शिकून नंतर खेळांवर जास्त लक्ष दिले.
त्यांच्या गुरू शुभदा पेंढारकर वर्षातून एकदा वाद्यवृंदाचा कार्यक्रम बसवत असत. त्या धर्तीवर नंदिनी एक पाऊल पुढे गेल्या. त्यांनी समविचाराच्या स्त्रियांना एकत्र करून महिला वादकांचा ‘स्वराली’ हा अनोखा आणि एकमेव वाद्यवृंद 8 ऑगस्ट 1993 रोजी गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर स्थापन केला. त्याला पंचवीस वर्षे झाली आहेत. ‘स्वराली’ने ‘संगीत सरिता’ हा पहिला जाहीर कार्यक्रम 1996 मध्ये केला. त्यांनी वर्षातून चार जाहीर कार्यक्रम रसिकांपुढे सादर करण्याचा परिपाठ ठेवला आहे. ‘स्वराली’ने छोटेमोठे दीडशे कार्यक्रम नागपुरात सादर केले आहेत. ‘स्वराली’’चा दर वर्षाचा पहिला कार्यक्रम गुढीपाडव्याला होतो.
संसारात अडकलेल्या किंवा रमलेल्या कलावतींच्या गुणांना वाव मिळावा, त्यांच्यासाठी व्यावसायिक मंच असावा हा मूळ उद्देश; त्यामुळे ‘स्वराली’त फक्त संसारी स्त्रियांना स्थान आहे. त्या घरसंसारातील जबाबदाऱ्या सांभाळून रोज दुपारी रियाज करतात. त्यांनी कार्यक्रमांना सुरुवात आठ सतारवादक व दोन तबलावादक घेऊन केली. ‘स्वराली’त एकूण पंचवीस महिलावादक आहेत. त्यात पंधरा सतारवादक, पाच व्हायोलिनवादक, दोन तबलावादक, दोन संवादिनीवादक व एक (मायनर साईड) ऱ्हिदमवादक आहेत. नंदिनी यांच्या जाऊबाई पद्मा सहस्रबुद्धे व हेमा यांची बहीण रेखा साने यांनी ‘स्वराली’त प्रवेश केल्यावर कार्यक्रमांमध्ये वाद्यवृंदाबरोबर गाण्यांचाही समावेश होऊ लागला.
सुरुवातीपासून, त्यांच्या सोबतीला आहेत हेमा पंडित, नंदा सोमण आणि दीपाली खिरवडकर. दीपाली या त्यांच्या सगळ्यात पहिल्या विद्यार्थिनी. त्यांनी ‘अलंकार’ पदवी परीक्षेपर्यंतची मजल गाठली आहे. नंदिनी ‘स्वराली’च्या स्थापनेबद्दल बोलताना ‘सतार शिकण्यास सुरुवात केली तेव्हा डोक्यात असे काही नव्हते’ हे मोकळेपणाने सांगतात. ‘स्वराली’च्या स्थापनेच्या वेळी नंदिनी आणि त्यांच्या शिष्य व मैत्रिणी यांनी काही बंधने व नियम आखून घेतले. सर्वजणी त्यांचे पालन कटाक्षाने करतात. हेमा व दीपाली यांनी ‘आमचा ग्रूप हेल्दी आहे’ असे अभिमानाने सांगितले. हेमा पंडित पासष्ट वर्षांच्या आहेत. त्या ‘स्वराली’च्या सर्वात ज्येष्ठ सदस्य. हेमा यांना सतारीची आवड होतीच. त्यांनी नोकरी चोवीस वर्षे केली. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यावर नंदिनी यांच्याकडे सतारवादनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. ‘स्वराली’त काही सदस्य नोकरी करणाऱ्याही आहेत. आम्ही रोज दोन-तीन तास रियाज करतो. नोकरी करणाऱ्या स्त्रिया लंच अवरमध्ये येऊन रियाज करतात. काही डॉक्टरही येतात. संस्था फक्त गृहिणींसाठी कार्यरत असल्याने सदस्यांचे कुटुंबीय निर्धास्त असतात.
‘स्वराली’च्या वाद्यवृंदात सतार, व्हायोलिन, हार्मोनियम, बासरी, तबला व मायनर ही सर्व वाद्ये महिला आत्मविश्वासाने वाजवतात. कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यापासून ते कार्यक्रम सादर करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या नंदिनी व त्यांच्या सहकारी सांभाळतात. व्यावहारिक बाबींमध्ये नंदिनी यांचे पती विद्याधर सहस्त्रबुद्धे यांचे सहकार्य लाभते. तसेच, ‘शेवाळकर संगीत विद्यालया’तील वाशीमकर मदतीस असतात. नंदिनी स्वतःच्या शागिर्दगिरीच्या काळाबद्दल म्हणाल्या, “मी रोज रियाजाची शिस्त ठेवली आहे. मी घरातील काम अकरा वाजेपर्यंत आटोपून रियाजाला बसते. मी रोजचा रियाज झाल्याशिवाय जेवायचे नाही हे कटाक्षाने पाळते. घरातील काही काम राहिले आणि अकरा वाजले तर सासुबाई स्वतः ते करून मला रियाजाला बसवतात. आम्हा सर्वांनाच आमच्या आमच्या कुटुंबाचा पाठिंबा असल्याने आम्ही रोज कलेसाठी वेळ देऊ शकतो.” त्या सांगतात, “रोज प्रॅक्टिससाठी येण्याची इतकी ओढ असते आणि सराव करताना सकाळपासूनची दगदग, इतर सर्व विसरण्यास होते. तो अनुभव रिफ्रेशिंग असतो.” मृदुला सुदाम गणिताचे क्लास घेतात. त्या संसार, क्लास यांच्या वेळांचा मेळ घालून रोज नव्या उत्साहाने क्लाससाठी येतात. “या सगळ्या धडपडीचे श्रेय मॅडमना. त्यांनी आम्हाला इतके एकत्र धरून ठेवले आहे, की येथे यावेसेच वाटते. चुकले तर त्या रागावतातही, पण ते आमच्या चांगल्यासाठीच.” मृदुलाने सांगितले.
‘स्वराली’ने लहानमोठे दोनशेच्या आसपास कार्यक्रम सादर केले आहेत. ‘स्वराली’ने दरवर्षी तीन ते पाच कार्यक्रम प्रस्तुत केले आहेत. ‘लावण्यमयी लावणी’ (एप्रिल 2018) ‘स्वराली’ने सादर केला. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांमध्ये ‘स्वराली’ची प्रस्तुती असतेच. कधी कधी दोनसुद्धा. त्यांनी कार्यक्रम अनेक ‘थिम्स’वर सादर केले आहेत. त्यांपैकी ‘संतवाणी’ (1997), ‘एक होते गदिमा’ (1998), ‘केशरी चांदणे’ (2003) – प्रात:कालीन पाच रागांवर आधारित, ‘बहरला परिजात दारी’ (2006), ‘तीन पिढ्यांची लता’ (2008) हे काही गाजलेले कार्यक्रम. ‘स्वराली’ने ‘ऋतू हिरवा’ हा शांता शेळके यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम दोनदा नागपूरात व एकदा पुण्यात सादर केला. ‘स्वराली’ सदस्य ‘नॉनस्टॉप नाट्यसंगीत’ (2009) या कार्यक्रमात त्या त्या पात्राची वेशभूषा करून नाट्यगीते सादर करत होते. चंद्रलेखा पुनसे व सुरुची अंधारे यांनी ‘स्वराली’च्या स्वरलहरींवर चित्रांकनाचा अनोखा अनुभव नागपूरकर रसिकांना दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत दिला. ‘सुवर्णपर्व’ या शांता शेळके, राम फाटक, सुधीर फडके, सुरेश भट यांना श्रद्धांजली म्हणून केलेल्या कार्यक्रमाची आठवण सांगताना, नंदिनी, हेमा व दीपाली, मृदुला यांना भरून आले. “कार्यक्रमापूर्वीच हॉल खचाखच भरला होता. लोक येत होते; जेथे जागा मिळेल तेथे पायऱ्यांवर बसले. लोक स्टेजवरसुद्धा बसले.”
‘स्वराली’ने कार्यक्रम वर्धा, अमरावती, चंद्रपूर, बिलासपूर, मुरादाबाद येथेही सादर करून रसिकांना जिंकले आहे. ‘स्वराली’च्या बावीस सतारवादकांनी श्री श्री रविशंकर यांच्या नॉयडा (नोव्हेंबर 2008) येथील ‘नादब्रह्म’ कार्यक्रमात भाग घेतला होता. मुरादाबादमध्ये तर लोकांना इतक्या महिला एकत्र येऊन, घराघरांतून बाहेर एवढ्या दूर येऊन कार्यक्रम करतात याचे फार नवल वाटले! ‘स्वराली’ कलर्स वाहिनीवरील ‘इंडिया गॉट टॅलेंट’च्या स्पर्धेमध्ये सेमिफायनल राऊंडमध्ये पोचल्या होत्या. सर्वजणी घर सोडून तेथे जवळपास महिनाभर भाग घेत होत्या. नंदिनी यांनी एकटीने न्यू यॉर्क व लुईव्हीला (केंटकी स्टेट) या ठिकाणी अमेरिकेत कार्यक्रम सादर केले आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेले ‘आनंदमठ’ या चित्रपटातील ‘वंदे मातरम्’ ‘स्वराली’च्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी सादर केले जाते.
‘स्वराली’चे काही कार्यक्रम संस्मरणीय केले. त्यातील एक हा अक्कलकोट येथील ‘श्री स्वामी समर्थ संस्थान’ने योजलेला. अक्कलकोटचे आमंत्रण हा अविस्मरणीय अनुभव आहे हे सांगताना नंदिनी ते क्षण जागवतात. (मार्च 2012, अक्कलकोट) जगविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 15 जानेवारी 2013 मध्ये वाद्यवृंदाचा कार्यक्रम ‘स्वराली’ने नागपूर येथे सादर केला. त्यांनी ‘अवघे गरजे पंढरपुर’ हा अभंगांचा व वाद्यवृंदाचा कार्यक्रम (सप्टेंबर 2013) सरकत्या रंगमंचावर सादर करून वेगळा अनुभव रसिकांना दिला. त्या कार्यक्रमाची पुन:प्रस्तुती नोव्हेंबर 2013 साली झाली. तसाच एक अनोखा व रसिकांनी नावाजलेला कार्यक्रम म्हणजे ऋतुचक्रावर आधारित संगीताचा व वाद्यवृंदाचा, शास्त्रीय संगीताचा ‘ऋतुरंग’ हा कार्यक्रम (सप्टेंबर 2014). ‘हिट्स ऑफ रहमान’ (एप्रिल 2016) हा संगीतकार ए आर रहमान यांच्या अजरामर चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम ‘स्वराली’ने सादर केला. संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ ते चित्रपट यावर आधारित ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून ‘स्वराली’ने नाट्यगीते ते चित्रपटगीते हा सांगीतिक प्रवास रसिकांसमोर सादर केला (ऑगस्ट 2016). प्रसिद्ध गायिका कै. वीणा सहस्त्रबुद्धे यांना त्या कार्यक्रमातून ‘स्वराली’ने स्वरांजली अर्पण केली.
‘स्वराली’चे ऑगस्ट 2017-18 हे रौप्य महोत्सवी वर्ष! त्यावेळी नादब्रह्म ही स्मरणिका ‘स्वराली’तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात ‘स्वराली’च्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा व ‘स्वराली’मधील कलाकारांची मनोगते आहेत. लग्न झाल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मुलींच्या पदव्या फाईलमध्ये बंद होतात. एक प्रकारे त्यांच्या कलागुणांवर गंज चढतो. काही काळानंतर महिलांमध्ये पोकळी निर्माण होते. ती भरून काढणे व त्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा ‘स्वराली’चा मुख्य हेतू. स्त्री कलावंतांनी त्यांची कला स्वतःच्या आनंदापुरती मर्यादित न ठेवता इतरांनाही आनंद मिळावा व संगीतातील अभिरुची जोपासली जावी हा उद्देशही ‘स्वराली’च्या निर्मितीत होता. नंदिनी सहस्त्रबुद्धे सांगतात, ‘स्वरालीतील आमच्या प्रत्येक कलाकाराच्या मागे एक पुरूष ठामपणे उभा आहे!’ नंदिनी व त्या संस्थेचे सर्व कलाकार यांच्यासाठी ती केवळ संस्था नाही. तो त्यांचा ध्यास आहे.
नंदिनी सहस्रबुद्धे यांची तबलावादक कन्या आईच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्ताने म्हणाली, “एवढं मात्र खरं असतं, गाणं तुम्हाला जगवतं आणि जगणं गायला लावत असतं हे आईच्या जगण्यावरून कळतं!”
नंदिनी सहस्त्रबुद्धे, नागपूर 9405906014
– संध्या दंडे narvada46@gmail.com
(लोकसत्ता, चतुरंग - शनिवार, 10 मार्च 2012 वरून उद्धृत, संपादित आणि संस्कारित, अपडेटेड – 11 डिसेंबर 2018)
Very nice coverage.thanks
Very nice coverage.thanks
Comments are closed.