नसीमा हुरझूक यांची अपंगत्वावर मात (Nasima Wins Over Paraplegia)

1
33

 

त्यांचे नाव आहे नसीमा हुरझूक! नसीमा यांनी स्वत: अपंग असून, असंख्य अपंगांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे, सक्षम बनवले आहे – शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्याही. नसीमा या हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्डया कोल्हापूरच्या संस्थेच्या संस्थापक आहेत. ती संस्था त्यांनीच निर्माण केली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व शांत, सोज्वळ आहे. त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी पाठीच्या मणक्याचे दुखणे सुरू झाले. त्यांचे कमरेखालचे शरीर सोळाव्या वर्षी पंगू झाले (पॅराप्लेजिक). त्यांना तेव्हापासून सतत चाकाच्या खुर्चीवर बसून फिरावे लागते. दुखणे येण्याआधी त्या नृत्य, नाटक, खेळ यांमध्ये हिरीरीने भाग घेतअसत. त्या शिवणकामही करत. त्यांना आलेल्या त्या आजारपणामुळे स्वत:चे नैसर्गिक विधी करण्यासही इतरांची मदत घ्यावी लागत असे. मात्र त्यांना तसे दुसर्‍यांवर अवलंबून राहणे नको वाटे. त्यांना वाटायचे, की परावलंबी राहून जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी! पण आत्महत्या करण्यासाठीही शरीराची हालचाल होणे गरजेचे असते. अशा वेळी, त्या दिव्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कुटुंबातील आईवडील, भावंडे, नातेवाईक यांची मदत झाली.
नसीमा यांना अपंगत्वाच्या वेदनांपेक्षा त्या आता काही कामाच्या राहिल्या नाहीत, त्यांचे ओझे दुसर्‍यांवर आहे ही भावना जास्त दु:ख देई. त्यामुळे त्यांना सतत रडूही येई. एकदा आजारपणाला त्रासून तशाच रडत असताना, त्यांचे वडील त्राग्याने म्हणाले, की तूच अशी रडून सर्व घराला रडवत आहेस. त्यामुळे संकट टळणार नसून वाढेल. तू हसून आनंदी राहिलीस तर घर हसेल व आपण या संकटावर मत करू शकू’. वडिलांच्या त्या बोलण्याने नसीमा यांच्यावर खूपच परिणाम झाला. कारण आई-बाबा, दोघांचेही वजन खूपच कमी झाल्याचे त्यांना आढळून आले. त्या दिवसानंतर त्यांनी कधीही डोळ्यांत स्वतःसाठी अश्रू येऊ दिले नाहीत. पण नसीमा यांच्या आजारपणाच्या सहा महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी घर सावरले ते नसीमा यांची मोठी बह, रेहाना (एतीबर शाह खान) यांनी. त्यांनी नोकरी करून घराचा आणि नसीमा यांचाही भार उचलला.
नसीमा म्हणतात, ‘माझ्या आयुष्यात दोन टर्निंग पॉइंट आले. एक-1970 साली बाबुकाका दिवाण यांची भेट! कै. बाबुकाका बंगलोरला राहत. ते अपंग असूनही, मला भेटण्यासाठी स्वत: कार चालवत आले होते. त्यांचा हसतमुख स्वभाव माझ्यावर प्रभाव पाडून गेला. माझी-त्यांची पहिलीच भेट माझ्यात जगण्याची उर्मी भरून गेला. ते सांगत, दूसरों के दु:खदर्द के लिए जिने से अपना दर्द कम होता है!बाबुकाका बंगलोरला अपंग बांधवांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्य करत होते. त्यांनी स्थापन केलेल्या अपंगासाठीच्या स्वयंसेवी संस्थेच्या केंद्रात टेलिफोनचे पार्टस बनवले जात होते. चारशे अपंगाना तेथे रोजगार मिळाला होता. बाबुकाकांचा सहवास नसीमा यांना सहा वर्षें मिळाला. ते मूत्राशयाच्या कन्सरने 1976 साली देवाघरी गेले. नसीमा यांना महाराष्ट्र राज्यभरात पंचेचाळीस लाख व्यक्ती अपंग आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना अस्वस्थ करत असे. त्या म्हणाल्या, मी फक्त स्वत:चा विचार करायची. पण बाबुकाकांच्या भेटीनंतर इतर हजारो-लाखो अपंगांसाठी, जे माझ्यापेक्षा हलाखीच्या स्थितीत अपमानित जीवन जगत होते त्यांच्यासाठी काय करता येईल या विचाराने मला झोप लागत नाही.
नसीमा बंगलोर येथे झालेल्या अपंग क्रीडास्पर्धेमध्ये 1973 साली चँपियन ठरल्या. त्यामुळे त्यांना आत्मविश्‍वास आला. त्याच टप्प्यावर नसीमा यांची इंग्लंडला स्टॉक मेंडव्हिले गेम्ससाठी निवड झाली. तेथे त्यांच्या खुर्चीचे चाकच निखळले, त्यामुळे त्या क्षणभर खूप नाराज झाल्या; पण त्यांनी तेथे आलेल्या अठ्ठेचाळीस देशांतील चैतन्याने सळसळत असलेले अपंग बघून भारतातील अपंगांमध्ये ते चैतन्य आणण्चा निर्धार केला. त्या गेम्सचे आयोजन करणार्‍या संस्थेच्या सेक्रेटरींनी नसीमा यांना उत्तम प्रतीची, वजनाने हलकी चाकाची खुर्ची गिफ्ट म्हणून दिली आणि नसीमा यांच्या स्वप्नांना पंखच फुटले! नसीमा म्हणतात, ती खुर्ची माझ्या आयुष्यातील दुसरा टर्निंग पॉइंट ठरली. त्या खुर्चीवर बसून मी सहजपणे वावरू लागले. स्वत:ची कामे स्वत: करू लागले. जेणेकरून मला इतरांवर फारसे अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. मी स्वयंपाकही करू लागले. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास दुणावला.
लंडनमधील स्पर्धेत त्यांच्या असे लक्षात आले, की तेथे येणार्‍या प्रत्येक अपंगाच्या चेहर्‍यावर दुःखाचा लवलेश नाही. त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज आहे. तसेच तेज  भारतात असलेल्या लाखो अपंगांच्या चेहर्‍यावर फुलवायचे हा ध्यास घेऊन त्यांनी 1973 मध्ये, एन.डी. दिवाण यांच्या प्रेरणेने, समविचारी मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने अपंग पुनर्वसन या पहिल्या संस्थेची स्थापना केली. कालांतराने अपंग बालकापासून पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी 1984 साली हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’ (हेल्पर्स) ही संस्था कोल्हापुरात उभी केली. त्या संस्थेला जागा मिळवण्यासाठी त्यांना दहा वर्षें पाठपुरावा करून सरकारकडून दोन एकर जमीन मिळवण्यात यश आले. हेल्पर्सने 31 मार्च 2018 पर्यंत तेरा हजारांपेक्षा अधिक अपंग व्यक्तींना सुमारे एकोणीस कोटी रुपयांचे पुनर्वसन सहाय्य केले आहे व सुमारेचौदा कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा (अपंगत्वाशी मैत्री करणार्‍या) निर्माण  केल्या आहेत.
हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्डसंस्थेमार्फत वसतिगृह, शाळा, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी, कोकणातील स्वप्ननगरीकाजू प्रकल्प अशा प्रकल्पांमधून अपंगांना स्वावलंबी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य चालू आहे. हेल्पर्सने प्रक्रिया केलेले काजू लाजवाबया नावाने जगात ओळखले जातात. त्या काजूंना देश-विदेशातून मागणी आहे.
नसीमा यांच्या ध्यानी आले, की सिंधुदुर्गजिल्ह्यात अपंगांची संख्या सर्वाधिक आहे. ही गोष्ट 2000 सालच्या आसपासची. पाठोपाठ, नसीमा यांच्या हाती तेथील साडेतीन हजार अपंगांच्या नावांची यादी आली. तेव्हा त्यांनी सिंधुदुर्गातअपंगांसाठी स्वप्ननगरीउभारली. कुडाळ तालुक्यातील दुर्गम खेड्यात माणगावकर कुटुंबीयांनी दिलेल्या साडेबारा एकर जागेत ती स्वप्ननगरीसाकारली आहे. नसीमा यांनी अपंग मुलांच्या पालकांच्या मनी विश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांना कोल्हापूर येथील वसतिगृहात नेले. तेथील अपंग मुलांचे खेळणे-बागडणे-मस्ती करणे पाहून पालकांचा विश्वास बसला. स्वप्ननगरीत सुमारे शंभर अपंग राहत आहेत. त्यांपैकी एकोणीस कुटुंबे आहेत. त्यांची लग्नेही स्वप्ननगरीतच झाली आहेत. सर्वाना सुदृढ अपत्ये झाली असून त्यांचे भवितव्य सुरक्षित आहे. अपंगांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने तेथे अनेक प्रयोग होतात. त्यातील महत्त्वाचा म्हणजे लाजवाब काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र’. त्याची स्थापना मार्च 2005 मध्ये झाली. सध्या तेथे काम करण्यासाठी अपंग स्त्री आणि पुरुष यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येऊन रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला आहे. काजू प्रक्रिया प्रकल्पातून मिळालेल्या नफ्यातून लाभांश देण्यात आला. त्यातून काही अपंगांनी स्वत:च्या मालकीचे अपंगत्वाशी मैत्री करणारे घर बांधण्यासाठी जमीन खरेदी केली आहे.
नसीमा यांचा ऐंशीच्यावर पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. त्या म्हणतात, ‘मी दिग्गज लोकांच्या हस्ते पुरस्कार घेतले, परंतु मला मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा माझ्या वसतिगृहातील एखाद्या अपंग विद्यार्थ्याने स्वकर्तृत्वाने काही केले आणि त्याला पुरस्कार मिळतो; तेव्हा मला जास्त आनंद होतो.नसीमा म्हणतात, “मी स्त्री-पुरुष असा भेद मानत नाही. दोघेही समान आहेत, तेव्हा मी स्त्री म्हणून वेगळे असे काही केले आहे असे मला वाटत नाही. मी आशावादी आहे, माझा देवावर खूप विश्‍वास आहे; तसाच, माणसांवरही! मी भान ठेवून स्वप्ने बघावीत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बेभानपणे कामे करावीत असे बाबा आमटे म्हणत, तेच वचन अनुसरते.
नसीमा यांच्या चाकाची खुर्चीया पुस्तकाने देशभरातील अनेक अपंगांना उभारी दिली आहे. त्या पुस्तकाचे इंग्रजी, गुजराथी, तेलगू, हिंदी, कन्नड, उर्दू  आणि ब्रेल (अंधांसाठी वापरण्यात येणारी लिपी) या भाषांत अनुवाद झाले आहेत. त्या पुस्तकाचे talking book आहे.
अपंगांच्या वेदना या फक्त शरीराच्या नाहीत, मनाच्याही आहेत. अपंगत्व हे शरीराला आलेले असते, पण शा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना आधार दिला, तर अपंगत्वावर मात करून तेही सर्वसामान्यांप्रमाणे समाजाचा हिस्सा होऊन मानाने जगू शकतात. चांगला समाज घडवण्यासाठी सहकार्य करू शकतात! साच प्रत्यय नसीमा हुरजूक यांना भेटल्यावर येतो.
नसीमा म्हणतात, दुसर्‍यांकडून मदत घेताना, अजिबात कमीपणा बाळगू नये. शक्य होईल तेव्हा आपण इतर अपंगांना मदत करून त्याची परतफेड केली म्हणजे झाले!ही त्यांची अपंग पुनर्वसन कार्यामागील प्रेरणा आहे.
नसीमा हुरझूक 98220 90898 Patilsataram@gmail.com
मंगला घरडे 9763568430
mangalagharade@gmail.com
लेखक परिचय
मंगला भगवान घरडे या पुण्‍यात कात्रज परिसरात राहतात. त्‍यांनी पुणे विद्यापीठातून मराठी भाषेतून एम.ए.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांनी यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठातून डिप्‍लोमा इन जर्नालिझमचा पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. मंगला घरडे एका खासगी कंपनीत काम करतात. त्‍यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे.
————————————————————————————————————————

 

—————————————————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here