नशा ढोल आणि ताशाची

3
43

शिवदूर्ग प्रतिष्ठानचे ढोलपथकमिरवणूक म्हटली की ‘डीजे’चे प्रस्थ… मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ‘ढिंचॅक’चे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी… गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा उच्छाद वाटू लागतो. त्यामध्ये मराठी मावळ वाद्य पुढे आणावे हा विचार घेऊन कल्याणच्या काही तरुणांनी ‘शिवदुर्ग प्रतिष्ठान’ नावाचे ढोल-पथक तयार केले आहे आणि कल्याणात; गणपती असो किंवा आणखी कुठला सण, ‘शिवदुर्ग’ला मागणी जोरदार आहे. प्रतिष्ठानचा अध्यक्ष सुशांत दीक्षित हा स्वत: वयाच्या बाराव्या वर्षापासून मावळबरोबर ढोल वाजवतो. ढोलताशाचा आवाज तरुण-तरुणींना आकर्षित करील असा असतो. सुशांत तसाच त्याकडे ओढला गेला. गणपतीत मिरवणुकीसाठी मावळ यायचे त्यांच्याबरोबर तो वाजवायला जात असे. त्यानंतर त्याने स्वत:ची व त्याच्या सहकाऱ्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांच्या पाठिंब्यावर पथक सुरू करण्याचे ठरवले. ढोल-ताशाच का? सुशांतचे उत्तर: मुळात ढोल-ताशा-ध्वज हे आपल्या संस्कृतीतच आहे. शंभर ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज हा ‘डीजे’च्या डेसिबलपर्यंत पोचतो. तेव्हा ध्वनिप्रदूषण किती प्रमाणात होते ते पाहा! आमच्या पथकाच्या  आवाजाचा नाद हा समाधान देणारा आहे. तो विशिष्ट तालात वाजवला नाहीतर एकसुरी, कर्कश्श वाटणार. त्यामुळे आमच्या पथकाचा त्रास आजारी माणसांनाही होत नाही व ध्वनिप्रदूषणही होत नाही.

सुशांत दीक्षितशिवाजी महाराज हे आमचे सर्वांचे स्फूर्तिस्थान. त्यामुळे पथकाला त्यांच्या नावावरूनच नाव दिले जावे असे ‘शिवदुर्ग’मधील सभासदांना वाटले. त्यात कल्याणला महाराजांचा दुर्गाडी किल्ला आहे. तेव्हा सर्वांनी मिळून ‘शिवदुर्ग’ हे नाव पथकाला ठरवले’ असे सुशांतने सांगितले.
ढोलताशे वाजवणे आणि तो वाजवण्यास शिकवणे हे अवघड काम. पण प्रशांतला त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती आहे. पण तरी सभासदांना शिकवण्यासाठी तो खास पुण्याला जाऊन नवीन काही गोष्टी शिकून आला. त्यानंतर पथकाचा श्री गणेशा झाला.

‘शिवदुर्ग’ स्थापन होऊन एकच वर्ष झाले आहे, पण त्यांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. गणपतीसाठी त्यांना ब-याच ठिकाणाहून विचारणा झाल्या आहेत. त्यातुन आलेले पैसे समाजकार्यासाठीच वापरण्याचे ‘शिवदुर्ग’वाल्यांनी ठरवले आहे. ‘शिवदुर्ग’चे सभासद स्वतः जाऊन वस्तूंच्या किंवा पैशांच्या रूपाने गरजूंना मदत करतात. सुशांत सांगतो, की “कारण पथक हे पैसे मिळवण्यासाठी उभे केलेले नाही तर आपली संस्कृती जपण्यासाठी सुरू झालेली चळवळ आहे. त्यायोगे सत्कार्य व्हावे ही भावना पथकातील सभासदांची आहे.”

‘मावळ म्हणून वाजवणारी मुले- माणसे ही गरीब घरांतून आलेली असतात. त्यांच्या पोटापाण्यावर अशा प्रकारच्या चळवळींनी आपण पाय देत आहोत, असे नाही वाटत का?’ ह्या प्रश्नावर सुशांत त्याचे मत प्रामाणिकपणे मांडतो: “आमचं पथक धंदा म्हणून नाही. जे मिळतं त्यात आम्ही समाधानी असतो. दुसरं म्हणजे मावळ म्हणून जे येतात, त्यांचा अनेक धंद्यांपैकी हा एक धंदा आहे. त्यांचा मूळ धंदा हा दुधाचा असतो. त्यामुळे त्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रश्नच येत नाही.”

‘शिवदुर्ग’ पथकात एकूण एकशेवीसजण आहेत. मुले मुलुंड, ठाणे, कळवा इकडूनही येतात. शाळकरी मुला-मुलींपासून ते कॉलेजला जाणारे, नोकरी करणारे, महिला अशा वेगवेगळ्या वयांचे सभासद पथकात आहेत. त्यांपैकी बरेच जण चांगले शिकलेले आहेत. पेशाने इंजिनीयर, डॉक्टर, सीए असणारे. एक छंद म्हणून ढोल-ताशा वाजवायला म्हणून आपणहून पथकात सामील होतात. सुशांत सांगतो, की “पाडव्यापर्यंत पथकात जवळ जवळ सत्तर जण होते. पण पाडव्याच्या शोभायात्रेत आम्ही आमचं ढोल-पथकाचं सादरीकरण केलं आणि त्यानंतर सभासद वाढले.”

पथकात अनेक मुलींचा समावेश आहेमुळात तरुण आनंद घेण्यासाठी म्हणून पथकात येतात. ‘शिवदुर्ग’मध्ये ढोल वाजवण्यासाठी मुलीही तितक्याच आहेत. अगदी शाळकरी मुलींपासून ते महिलांपर्यंत सगळ्याजणी हिरिरीने ढोल वाजवण्यासाठी भाग घेतात. सुशांत सांगतो, की ‘ढोल वाजवण्यासाठी म्हणावी तशी शक्ती लागतेच. त्यात तो जडसुद्धा असतो. पण तरी मुली स्वतःहून शिकतात. ‘शिवदुर्ग’ला त्याचा अभिमान वाटतो.

‘शिवदुर्ग प्रतिष्ठान’मधील सभासदांनी स्वत:हून पैसे काढून वाद्ये आणली. पण तालमींसाठी मात्र त्यांना ब-याच दिव्यातून जावे लागले. ‘ढोल-पथकाची तालीम म्हणजे मोठा आवाज असणारच. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा. आमच्यामुळे कोणाला त्रास व्हावा, हे आम्हाला पटत नव्हते. शेवटी शहराबाहेर असणा-या गणेश घाटावर प्रॅक्टिस करायची असे ठरले.’ पण त्यांना फक्त तेवढ्यावर थांबायचे नाही. पुढे जाऊन ढाल-तलवार आणि दांडपट्टाही पथकात समाविष्ट करण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. जेणेकरून त्यांची प्रात्यक्षिकेही मिरवणुकीमध्ये दाखवता येतील.

शिवदूर्ग प्रतिष्ठानसाठी संपर्कः
सुशांत दिक्षित, अध्यक्षः ९८३३८९७०९३

मधुरा आपटे,
५०२, रॉयल पॅलेस,
टिळक चौक, कल्याण पश्चिम,
९८२०२२५९५४
इमेल – madhuraapte92@gmail.com

फोटोः गंधार मुजुमदार

About Post Author

3 COMMENTS

  1. Khoopach Chan aahe he karya.
    Khoopach Chan aahe he karya. mala aapnas vicharayache hote ki aamhala suddha asach ek Dhol-Tasha Pathak Suru karnyachi Iccha aahe aapan aamhas Sahkarya Karnar Ka…….

  2. खूप छान माहिती मिळते तुमचा
    खूप छान माहिती मिळते तुमच्याकडून

Comments are closed.