नवेगाव साधू – श्रमाचा सुगंध ल्यालेलं गाव

0
27

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा, दलित वस्ती सुधार प्रकल्प, केंद्र शासन पुरस्कृत निर्मलग्राम योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव स्पर्धा यांसारख्या, ग्रामसमृध्दीस चालना देणा-या स्पर्धा गेल्या दशकापासून महाराष्ट्रात शासनस्तरावर सुरू आहेत. अनेक गावांनी या स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुरस्कार पटकावले आहेत. काही गावांचा उत्साह केवळ पुरस्कारांपर्यंत मर्यादित राहिला. परंतु काही गावांनी ‘स्वच्छतेतून समृध्दीकडे’ या मंत्राच्या सातत्यपूर्ण काटेकोर पालनातून गावाचं गोकूळ केलं आहे. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू हे असंच स्वत:च्या श्रमाचा सुगंध ल्यालेलं गाव आहे. या गावाने सा-या योजना राबवल्या आणि नियोजनबध्दपणे यशस्वी केल्या.

कोळसाखाणींसाठी प्रसिध्द असलेल्या उमरेड शहरास वळसा घालून नागपूर-गडचिरोली राज्यमार्गाने आपण भिवापूरकडे निघालो, की पाच किलोमीटर अंतरावर छोटा डांबरी रस्ता नवेगाव साधूकडे वळतो. तेथे गावातील दूध संकलन केंद्राची छोटी इमारत दिसते. दुतर्फा झाडांची दाटी असलेला हा छोटा डांबरी रस्ता आपणास नवेगाव साधू गावात अलगद नेऊन पोचवतो.

राष्ट्रसंत तुकडोजी आणि संत गाडगेबाबा या ग्रामोन्नतीच्या बिनीच्या शिलेदारांना उभय बाजूंस घेऊन असणारं उंच लाकडी प्रवेशद्वार नवेगाव साधू गावात आपलं स्वागत करतं. गावात प्रवेशताना एकरंगाच्या, सारख्या बांधणीच्या आकर्षक आवारभिंती आपलं लक्ष वेधून घेतात. त्यावरील चित्रं, सुविचार, संतवचनं, घोषणा गावानं घेतलेला स्वच्छतेचा व ग्रामसमृध्दीचा वसा आपणास सांगतात. छानशी हिरवळ जोपासलेलं भव्य आवार, त्या आवारात उभ्या ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडीच्या देखण्या, आकर्षक, चित्रालंकारांनी नटलेल्या इमारती आपणास खुणावतात आणि आपण नकळत तिकडे ओढले जातो. गावास भेट देणा-या पैपाहुण्यांची वर्दळ नेहमीची. कुणीतरी आस्थेनं येतं, विचारणा होते; तसंच काही महत्त्वाचं वाटल्यास भराभर फोनाफानी होते आणि गावास विकासोन्मुख करण्यासाठी धडपडणारे तरुण पंचायत समिती सदस्य संजय वाघमारे आणि त्यांचे खंदे कार्यकर्ते प्रकट होतात. त्यांच्याशी संवाद साधताना गावाच्या विकासाची एका तपाची गाथा उलगडत जाते.

वयाच्या ऐन पंचविशीत संजय वाघमारे यांना नवेगाव साधू गावाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली. ते  1996-97 साली ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. त्यांच्या कुटुंबात राजकारणाचा वारसा परंपरागत आहे. त्यांचे काका आ.ला.वाघमारे यांनी ऐंशीच्या दशकात उमरेड विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. जुन्याजाणत्या लोकांच्या बोलण्यात आमदार आ.ला.वाघमारेंचं गाव असा नवेगाव साधूचा संदर्भ येतो. सुमारे शंभर वर्षांपूर्वी गोविंदबाबा नामक सत्पुरुषानं वसवलेलं हे गाव. त्यामुळे गावाच्या नावालाही साधुत्वाचा स्पर्श झाला. ते नाव सार्थ करण्याचा वसाच जणू वाघमारे यांनी घेतला आहे.

त्यांनी समन्वयक समविचारी मित्र, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांच्या सहकार्यानं कामास सुरुवात केली. गावात नळयोजना आणली. स्वच्छतेशिवाय आरोग्य नाही, त्याशिवाय समृध्दीही नाही, हे सूत्र त्यांनी जाणलं व गावास स्वच्छता अभियानाकरता सक्रिय केलं. गावक-यांच्या परिश्रमांस यश येऊन गावास 1996-97 साली संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक प्राप्त झाला व पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक मिळालं.

त्यानंतरच्या सत्रात सरपंचपद आरक्षित झाल्यामुळे वाघमारे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी वैशाली वाघमारे यांनी ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलं. पण एव्हाना नवेगाव साधूच्या ग्रामस्थांना विकासाची जणू चटक लागली होती. त्यांनी विविध शासकीय योजना गावात राबवण्याचा सपाटा लावला. त्याची सुफळं लगेच दिसू लागली. नवेगाव साधू हे गाव त्यामुळे पंचक्रोशीतील गावक-यांसाठी रोल मॉडेल होऊन बसलं.

नवेगाव साधू या गावाबरोबरच ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या टेकाडी व ठाणा या गावांतसुध्दा विकासाच्या योजना राबवल्या जात होत्या. पंचक्रोशीतील गावकरीसुध्दा नवेगाव साधू गावाकडे मोठया आशेनं पाहात होते. त्यानंतर नवेगाव साधू गावात निवडणूक झालीच नाही. गावक-यांनी संजय वाघमारे यांना अविरोध निवडून दिलं!

केंद्र सरकरच्या वर्ल्ड बँकेद्वारे अनुदान प्राप्त होणा-या जलस्वराज्य प्रकल्पाकरता गावानं अर्ज केला होता. तो मंजूर होऊन जलस्वराज्य प्रकल्पाचं काम 2006-07 साली गावात सुरू झालं आणि गावाचा चेहरामोहराच बदलून गेला. रूफवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग गावात सुरू झाला. छतावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी गावकरी प्रयत्न करू लागले. आजुबाजूच्या घरांतील छतांचं पाणी विहिरीत साठवलं जाऊ लागलं. सांडपाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्यांसोबतच स्वतंत्र सांडपाणी व्यवस्थापन तंत्र अवलंबण्यात आलं. गावपरिसरात शेततळी खणली गेली. गावाची पाण्याची समस्या कायमची संपली! शेतशिवारंही हिरवीगार होऊ लागली. गांडूळखत निर्मितीचा व कंपोस्टखत निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प शाळा व ग्रामपंचायतीनं राबवला होता. त्याचा अवलंब गावकरी करू लागले. गोबरगॅस प्रकल्प गावात सुरू झाले. स्वत: निर्मिलेली वीज घराघरात खेळू लागली. प्रत्येक घरी संडास उभा राहिला. त्याचा उपयोगही होऊ लागला. ग्रामपंचायतीनं काही सार्वजनिक शौचालयंही बांधली. गाव निर्मळ झालं नि गावानं निर्मलग्राम पुरस्कार पटकावला. पूर्वी गावासभोवतालच्या जागेत गावकरी शौचास जात. ती जागा गावक-यांनी नैसर्गिक सभागृह म्हणून विकसित केली. विशाल वटवृक्ष पूर्वी होताच, इतर मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आलं. त्यास लागूनच प्रस्तावित समाजभवनाचं बांधकाम सुरू आहे.

रस्त्यालगत असलेल्या मोक्याच्या जागा सुंदर करण्यात आल्या. तुकडोजी महाराज व गाडगेबाबा हे ग्रामसमृध्दीचे आदर्श, त्यांच्या प्रतिमा गावात उभ्या राहिल्या. त्यांच्या विचारांनी गावाच्या भिंती बोलक्या झाल्या. सारख्या आवारभिंतींच्या बांधकामामुळे गावास रेखीवपणा प्राप्त झाला. विटांची जोडणी ग्रामपंचायतीनं करायची, आणि त्यास प्लॅस्टर व रंगरंगोटी घरमालकानं स्वत: करायची, हे सूत्र अवलंबल्यामुळे सगळ्यांनी प्रतिसाद दिला. धर्मभेद विसरून सर्व गावक-यांनी ठरावीक रंगातच आवारभिंती व घराच्या दर्शनी भागांची रंगरंगोटी केली. साधेपणातील आगळं सौंदर्य गावास प्राप्त झालं. स्वत:च्या घरासमोरील सांडपाण्याच्या नाल्या स्वत: साफ करण्यात कमीपणा वाटेनासा झाला. ते सांडपाणी परसबागेसाठी वापरलं जाऊ लागलं. घरोघरी परसबागा उभ्या राहिल्या. हिरवा भाजीपाला घरच्या घरी उपलब्ध होऊ लागला. झाडांवर उमलणारी फुलं झाडांवरच राहू लागली. ती तोडून घ्यावी असं मुलांनाही वाटत नाही. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती कार्यरत आहे, पण तिची गरज गावक-यांना भासत नाही.

गावात सिमेंट रस्ते आहेत पण ग्रामीण योजनेअंतर्गत शेतरस्तेही बांधले गेले. रोजगार हमी योजनेद्वारे गावपरिसरात बंधारे बांधून जलसंवर्धन केलं गेलं. गावानं जेथून मिळेल तेथून पैसा उभा केला. पुरस्काराची रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च केली. यासारख्या योजना राबवताना लोकसहभागाचं भक्कम पाठबळ त्यामागे होतंच. ‘आमच्या गावात आमचं सरकार! आम्हीच करू आमचा उध्दार’ हा नारा गावानं प्रत्यक्षात उतरवला.

गावात फिरताना आपण जणू आनंदवनात विहरतोय असा भास होतो. गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडी सर्व सुविधांनी युक्त होऊन अध्ययन-अध्यापन करताहेत. गावातील अंगणवाडी बघण्यासारखी आहे.

गावात जवळ जवळ पाच कोटींची कामं उभी राहिलीत. पण केवळ बांधकामं करणं म्हणजे परिवर्तन किंवा विकास नव्हे याची डोळस जाणीव संजय वाघमारे व त्यांच्या चमूला आहे. खेड्यातून शहराकडे होणारं स्थलांतर थांबवायचं असेल तर विकासाच्या सर्व संधी सर्वांना खेड्यातही उपलब्ध झाल्या पाहिजेत असं त्यांना वाटतं. शहरातल्या इंटरनॅशनल स्कूलशी स्पर्धा करणा-या शाळा खेड्यातही असल्या पाहिजेतं असा त्यांचा आग्रह आहे. ते शिक्षण चार वर्गात बंदिस्त झाल्याचं सांगतात. सरकारी शाळा, खाजगी मान्यताप्राप्त शाळा, पब्लिक स्कूल, इंटरनॅशनल स्कूल हे ते चार वर्ग. इंटरनॅशनल स्कूलमधून मिळणारं शिक्षण जेव्हा सरकारी शाळांमधून शिकणा-या मुलांनाही मिळेल तेव्हा खेड्याच्या विकासासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. जो तो आपला विकास स्वत: साध्य करेल. सर्व शैक्षणिक संस्थांचं राष्ट्रीयीकरण व्हायला पाहिजे असा विचारही ते व्यक्त करतात.

मनोहर नरांजे: सरस्वतीनगर,बहादुरा, उमरेड रोड,नागपूर, भ्रमणध्वनी:- 9922199553, 9767219296

Last Updated On – 20th May 2016
 

About Post Author