Home वैभव मी आणि माझा छंद नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्‍या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्‍यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्‍यामागची कल्‍पना आहे. अभ्यंगस्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकवाचाटिळा लावण्यात येतो. तिच्या सर्वांगाला तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात. अभ्यंगस्नान झाल्यानंतर ओवाळणी केली जाते. त्यावेळी आरतीच्या ताटात कणकेचे दिवे पेटवले जातात. सोबत कणकेचे मुठीच्या आकाराचे गोळे तयार केले जातात. ते गोळे व्यक्तीला (नजर उतरवावी त्याप्रमाणे) ओवाळून चार दिशांना फेकले जातात.

          नरक चतुर्दशीसंबंधी पौराणिक कथा आहे, ती अशी

प्राग्ज्योतिषपुराचा राजा नरकासूर याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाल्यामुळे तो फार बलाढ्य झाला व देवादिकांना पीडा देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत हत्ती व घोडाही हरण केला. त्याशिवाय त्याने अनेक राजांच्या एकूण सोळा हजार कन्या धरून आणून त्याच्या बंदिखान्यात ठेवल्या. काही राजांनाही कारागृहात डांबले. त्याने अगणित संपत्ती लुटली. सोबत इंद्राचे अमर पर्वतावरील मणिसंज्ञक स्थान, इंद्रमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याच्या त्या अत्याचाराने लोक गांजले. मग इंद्राने कृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने नरकासुराचा अंत करण्‍याचे मान्‍य केले. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर नरकासूराची राजधानी होती. ती राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खंदक, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. कृष्‍णाने गरूडावर स्‍वार होऊन प्राग्‍ज्योतिषपूरावर स्वारी केली. त्‍याने नरकासूराच्‍या देहाचे दोन तुकडे  करत त्याला ठार मारले व बंदिखान्यातील सर्वांना मुक्त केले. नरकासूराच्‍या बंदिवासातील कुमारिकांना त्‍यांचे स्‍वजन स्‍वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्‍णाने त्‍या सोळा हजार कुमारिकांशी विवाह केला. नरकासुर मृत झालेला पाहिल्यावर त्याची आई पृथ्वीमाता भूमिदेवी पुढे आली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. आणि रत्नांनी चमकणारी दोन कुंडले, वैजयन्तीमाला वरुणाचे छत्र, महारत्न या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्या. याच वेळी भूमीमातेने कृष्णाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली, की नरकासुराचा भगदत्तनावाचा मुलगा आहे. त्याला तू संभाळ. श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले. ती गोष्ट आश्विन वद्य चतुर्दशीस घडली. नरकासुराने मृत्‍यूपूर्वी कृष्णाकडे वर मागितला, की आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली. लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान व आनंदोत्सव करू लागले.

          महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर घरातील सर्व केरकचरा ओततात. त्या ढिगावर (पूर्वी एक पैसा) रुपया ठेवतात. जो अंत्यज मनुष्य ते सर्व उचलून नेतो त्याला बक्षिसी देतात. नरकासुरवधाच्या स्मरणार्थ काही ठिकाणी आंघोळीपूर्वी डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीटठेचले जाते. ते नरकासुरास मारण्याचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी त्याचा रस जीभेला लावण्याचीही चाल आहे. कारीट ठेचल्यानंतर अभ्यंगस्नान केले जाते. अमावास्येला नवी केरसुणी विकत घेतात, तिला लक्ष्मी म्हणतात; कारण ती अलक्ष्मीला झाडून टाकण्याचे काम करते.

          नरकचतुर्दशी हे एक काम्यव्रत (धन, पुत्र, सौभाग्य, ऐश्वर्य, सत्ता इत्यादी कामना मनात धरून केली जाणारी व्रते) आहे. त्या दिवशी सूर्योदयापूर्वी यथाविधी स्नान करतात आणि आह्निके झाल्यानंतर नक्तव्रताचा संकल् करतात. दिवसभर उपवास करून रात्री भोजन करणे याला नक्तव्रत म्हणतात. त्याचे दुसरे नाव दिवारात्रीव्रतअसेही आहे. सायंकाळी नरकासूराच्या उद्देशाने चार वातींचा दिवा लावतात आणि पुढील मंत्र म्हटला जातो

अग्निर्ज्योती रविर्ज्योतिश्चन्द्रो ज्योतिस्तथैव च |
सर्वेषां ज्योतिषां श्रेष्ठो दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ||

          अर्थ अग्नी, रवी, चंद्र इत्यादी सर्व दिव्य ज्योतींहून श्रेष्ठ असलेल्या दीपाचा (हे देव हो, तुम्ही) स्वीकार करावा.

          हा मंत्र म्हणून देवालये, वाडा, तट, उद्यान, वापी, रस्ता, घोड्यांची पागा वगैरे ठिकाणी दिवे लावतात. नंतर गवताची किंवा अन्य कशाची चूड पेटवून पुढील मंत्र म्हणतात

अग्निदग्धाश्च ये जीवा येऽप्यदग्धा: कुले मम |
उज्ज्वलज्योतिषा दग्धास्ते यान्तु परमां गतिम् ||

          अर्थ माझ्या कुलात जे अग्नीने अथवा उज्ज्वल ज्योतीने दग्ध होऊन मरण पावले असतील ते आणि जे मेल्यावर दग्ध झाले नसतील तेसुद्धा सर्व (या चुडीच्या प्रकाशाने) परमगतीला जावोत.

          शेवटी शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देऊन, व्रतकर्त्याने स्वत: उडदाच्या पानांच्या भाजीने युक्त असे नक्तभोजन करायचे असते.

नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून, उष्णोदकाने अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने अंगावर प्रोक्षण करणे, स्नानानंतर यमराजाला वंदन करून जलांजली अर्पण करणे; दुपारी ब्राह्मणभोजन व वस्त्रदान करणे; प्रदोषकाळी दीपदान, शिवपूजा, महाशिवरात्रीपूजा करून नक्तभोजन करणे असा त्या व्रताचा विधी आहे. काही लोक त्या दिवशी पितृतर्पणही करतात.

          आश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी असेही म्हणतात. त्या दिवशी लवकर स्नान करून स्त्री-पुरुष विशेष साज-शृंगार करतात. मात्र त्या रात्री भुते-खेते सर्वत्र संचार करतात अशी समजूत असल्यामुळे लोक सामान्यपणे रात्री घराबाहेर जात नाहीत. त्या रात्रीला काळरात्र म्हणतात. बरेच लोक त्या रात्री शेंदूर व तेल लावून हनुमानाची पूजा करतात व नारळ फोडतात. काही धाडसी साधक त्या रात्री स्मशानात जाऊन मंत्रसाधना करतात.

          तामिळनाडूमध्ये काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात.

आशुतोष गोडबोले

(आधार – भारतीय संस्कृतिकोश)

———————————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version