नजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका

_Najubai_Gavit_1.jpg

नजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित, पीडित, कष्टकरी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून विविध चळवळींमध्ये अग्रेसर राहिल्या आहेत. लढवय्या कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे आदराने आणि अभिमानाने बघितले जाते.

नजुबाईंचा जन्म 10 जानेवारी 1950 रोजी बोढरीपाडा (तालुका साक्री, जिल्हा नंदुरबार) येथे भूमिहीन मावची आदिवासी कुटुंबात झाला. दळणवळणाची साधने, रस्ते, वीज, शिक्षण अशा भौतिक सुविधा तेथे नाहीत. दुर्गम प्रदेश आणि परिस्थिती दारिद्र्यमय व कष्टमय. तशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांना चौथीपर्यंत शिक्षण घेता आले. लग्नानंतरही त्यांचा दारिद्र्यमय परिस्थितीशी संघर्ष काही सुटला नाही. उलट, त्यांच्यावर पती-मुले यांच्याकडे लक्ष पुरवण्याची जबाबदारी आली. नजुबाई कॉ. शरद पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर मात्र त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले. नजुबाईंचा स्वभाव मूलतः अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा असल्याने शरद पाटील यांच्या साथीने त्यांना नवीन ऊर्जा मिळाली. त्या लढवय्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून परिवर्तनवादी चळवळीमध्ये उपेक्षित, वंचित घटकांच्या न्यायासाठी पाय रोवून उभ्या राहिल्या.

नजुबाईंनी स्वीकारलेले समाज-परिवर्तनाचे कार्य सातत्याने चालू आहे. त्यांनी 1974 साली ‘धुळे जिल्हा श्रमिक महिला संघा’ची स्थापना केली व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यांनी 1978 साली जातीच्या प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष’ व ‘सत्यशोधक कष्टकरी महिला सभा’ यांची स्थापना केली. त्यांनी साक्रीला ‘दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य महासभा’ 1986 साली स्थापन केली. त्यांनी तशा प्रकारची साहित्य संमेलने होण्यासाठी पुढाकार घेतला. त्या उपेक्षित, वंचित, पीडित घटकांच्या संदर्भात अनेक लढ्यांत अग्रेसर राहिल्या व त्यासाठी त्यांना काही वेळा कारावासही भोगावा लागला आहे. देशात आणीबाणी 1975 मध्ये जाहीर झाली, तेव्हा त्या स्थानबद्ध झाल्या. त्या 1978 पासून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्या’त पुढाकार घेऊन शेकडो महिलांसह सहभागी झाल्या. त्यांनी सटाण्याला 1998 साली भरलेल्या पाचव्या दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनात ‘अब्राह्मणी साहित्य व कला महासभा’ स्थापनेची घोषणा केली. नजुबाईंचे चळवळीतील हे कार्य विस्मयकारक असेच आहे.

_Najubai_Gavit_3.jpg‘लढवय्या कार्यकर्ती’ असा नजुबाईंचा पिंड असल्यामुळे त्या राजकीय पक्ष, प्रसिद्धी आणि पदे यांपासून लांबच राहिल्या. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने तेरावे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन 23-24 डिसेंबर 2017 ला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आयोजित केले गेले होते. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी नजुबाईंची निवड करण्यात आली. त्या म्हणाल्या, ‘मी अध्यक्षपद आदिवासी समाजाला मान्यता मिळावी, न्याय मिळावा यासाठी स्वीकारले. आदिवासींमध्ये तुरळक साहित्यिक आहेत. आता अनेक आदिवासी साहित्यिकांनी साहित्यलेखनात उतरले पाहिजे. मोठ्या प्रमाणात ती चळवळ पुढे गेली पाहिजे. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी चळवळीची आवश्यकता आहे.’

नजुबाईंची आदिवासी साहित्य आणि आदिवासी साहित्य संमेलने यांविषयीची भूमिका अशी आहे – ‘आदिवासींचे समग्र जीवन ज्यातून वास्तव स्वरूपात पुढे येईल, ते आदिवासी साहित्य. आदिवासी लेखक तुटकपणाने लिहितो. बोलीभाषेसहित आदिवासी जीवन चितारणे गरजेचे आहे. आदिवासी साहित्य कोणत्या साहित्याला म्हणावे हे ठरवताना आदिवासींवरील साहित्याची पडताळणी पूर्णपणे करणे गरजेचे आहे.’ मराठी साहित्यांतर्गत आदिवासी साहित्याचा विचार करणे योग्य नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या मते, मराठी साहित्य म्हणजे ब्राह्मणी साहित्य होय. आदिवासींचे प्रश्न मराठी साहित्यात विचारात घेतले जाणार नाहीत, त्यांचे ब्राह्मणीकरण केले जाईल अशी परखड भूमिका त्या मांडतात.

नजुबाईंनी सत्यशोधक मार्क्सवादी मासिकातून सुरुवातीला लेखन केले. त्यांच्या काही कथाही तेथे प्रकाशित झाल्या. नजुबाईंच्या नावावर 1995 मध्ये प्रकाशित झालेले ‘आदोर’ हे आत्मकथन, 1995 मध्येच प्रकाशित झालेली ‘तृष्णा’, 2008 मध्ये प्रकाशित झालेली ‘भिवा फरारी’ कादंबरी आणि ‘नवसा भिलणीचा एल्गार’ हा 2013 मध्ये प्रकाशित झालेला कथासंग्रह अशी साहित्यसंपदा आहे. त्यांच्या साहित्यात प्रत्यक्ष जीवनानुभूती आणि कार्यकर्त्याची दृष्टी यांचा संगम झालेला दिसतो. त्यामुळे त्यांच्या साहित्याला खोली प्राप्त झालेली आहे. आदिवासी जीवनातील समृद्ध लोकपरंपरेचा, लोकसाहित्याचा बाज त्यांच्या साहित्याला आहे.

नजुबाई आदिवासी समाजात स्त्रियांना असणारे महत्त्व, मातृसत्ताक पद्धत याकडे लक्ष वेधतात. त्या स्वतः मातृसत्ताक व्यवस्थेच्या वारसदार असल्याचा अभिमान त्यांच्या लेखनात ठायी ठायी जाणवतो. नागर, ग्रामीण जीवनामध्ये स्त्रियांचे असणारे दुय्यम स्थान, स्त्रियांची घुसमट आदिम जीवनामध्ये नाही. स्त्री हे विश्वनिर्मितीचे केंद्र असून सर्जन करण्याची अलौकिक शक्ती तिच्यात असते. आदिवासींमध्ये पुरुषांइतकेच स्त्रीला महत्त्व आहे, किंबहुना, ती काही बाबतींत पुरुषांहूनही श्रेष्ठ आहे असा विश्वास आजही आदिवासी समाजात आहे. गारो, खासी, जयंतिया या आदिवासी जमातीत आजही मातृसत्ताक कुटुंबव्यवस्था दिसते. आदिवासींमध्ये स्त्रियांना त्यांचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. लग्नात मुलीला देज (वधुशुल्क) दिले जाते. तेथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या नाही. पुनर्विवाहाला मान्यता आहे. विधवाविवाह संमत आहे. जमातपंचायतीत सहजपणे होणारा काडीमोड या गोष्टी आदिवासी जीवनात आहेत. त्या बाबी नजुबाई यांच्या साहित्यातून ठळकपणे अधोरेखित होतात. होळीच्या वेळी केल्या जाणाऱ्या दिंडण नृत्यात, डोंगरीदेवाची पूजा करताना पुरुष स्त्रीवेष धारण करतात. स्त्री आणि भूमी यांच्यातील सर्जनशीलतेचे साधर्म्य लक्षात घेता, धरतीची पूजा अशा वेगवेगळ्या रूपांत होताना दिसते. बहुप्रसवा, बहुविविधा अशी धरित्री अनेक जीवांना जगवत असते, तिच्या चमत्कारांनी दीपून जाऊन आणि तिचा गौरव करण्यासाठी पुरुषांनी तिच्याच प्रतीकात्मक स्त्रीरूपात काही पथ्ये पाळून नाचायचे हा त्यामागील उद्देश असतो. ‘भिवा फरारी’ या कादंबरीत ते संदर्भ आलेले आहेत. त्या कादंबरीची अर्पणपत्रिका ‘समाजबांधणीत स्त्री राज्याचा मॉडेल म्हणून उपयोग होणार असल्याने, तिच्या वैराज्याला’ अर्पण केली आहे.

_Najubai_Gavit_4.jpg‘आदोर’ हे आत्मचरित्र 1995 मध्ये प्रसिद्ध झाले. आदिवासी महिलेने लिहिलेले ‘आदोर’ हे आत्मचरित्र भारतीय वाङ्मयात पहिले ठरते. ‘Daughters of Maharashtra’ या ग्रंथात विद्या बाळ यांनी नजुबाईंचा उल्लेख ‘जगातील पहिली आदिवासी लेखिका’ म्हणून केला आहे. त्यांनी ‘तृष्णा’ला आत्मनिवेदनपर कादंबरी म्हटले असले, ‘तृष्णा’ हे नजुबाईंचे आत्मचरित्रच आहे. ‘आदोर’, ‘रोप’, ‘रोपणी’, ‘पोराळी’ असे चार भाग त्यात आहेत. ‘आदोर’ म्हणजे सुरुवातीची रोपवाटिका तयार करण्याची प्रक्रिया, नंतर रोप तयार करणे, रोपाची लागवड करणे आणि त्यातून निर्माण होणारी उत्पत्ती म्हणजे निर्मिती. मानवी जीवनाची प्रक्रियाही त्या चार टप्प्यांतून जाताना दिसते. नजुबाईंनी त्यांचे त्या चार टप्प्यांतील अनुभव मांडले आहेत. ‘तृष्णा’ची अर्पणपत्रिका ‘आई – ‘इसरी’ला’ केली आहे. इसरी आणि तिचे कुटुंब दारिद्र्यमय परिस्थितीशी संघर्ष करत गुजराण करताना दिसते. आत्मचरित्रातील ते सूत्र ‘शिरीच्या फुलाची लोककथा’ यातून नजुबाईंनी सांगितले आहे.

नजुबाईंची ‘भिवा फरारी’ ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे ‘आदिवासींच्या उपेक्षित इतिहासातील सुवर्णपान’ होय. ज्या-ज्या वेळी परकीय राजवटी येथे आल्या, त्या-त्या वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वात आधी आवाज उठवला तो आदिवासींनी. आदिवासी जमातींनी केलेले ते संघर्ष भारतीय इतिहासात उपेक्षित राहिले आहेत. ब्रिटिशांच्या जुलमी, जाचक, शोषक व्यवस्थेविरूद्ध भिवाच्या तीन पिढ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य, स्वाभिमान, अस्तित्व, अस्मिता शाबूत ठेवण्यासाठी दिलेली झुंज हे त्या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.

‘नवसा भिलणीचा एल्गार’ हा सात कथांचा संग्रह. आदिवासींना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा त्या कथांचा विषय आहे. त्यातील नवसा भिलणीचा एल्गार साऱ्या कष्टकरी महिलांना स्त्रीसत्तेचा एल्गार करण्याचे सामर्थ्य देऊन जातो. स्त्री-व्यक्तिरेखांची प्रभावी मांडणी नजुबाईंच्या समग्र साहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मग ‘तृष्णा’मधील इसरी, सुनता, मांगू, जांबू असो, की ‘भिवा फरारी’तील काळघी, तुळसा, सीता असो, की ‘नवसा भिलणीचा एल्गार’मधील जानकी, तानकुबाई, सखू, नवसा असो.

निसर्गाशी एकरूपता, प्राणिप्रेम, समूहनिष्ठा, सहकार्याची भावना, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अल्पसंतुष्ट वृत्ती, माणुसकी ही मानवी मूल्ये आदिवासी जीवनात पाहण्यास मिळतात. ती मूल्ये नजुबाईंच्या साहित्यात अपरिहार्यपणे येतात. त्याचबरोबर आदिवासींमधील चालीरीती, रूढी, परंपरा, दैवते, सणोत्सव, जन्मप्रथा, विवाहप्रथा, मर्तिकप्रथा, आदिवासींमधील अज्ञान, दारिद्र्य, संघर्षमय जीवन, स्त्रियांचे लैंगिक शोषण, कुपोषण, धर्मांतर, शासकीय योजनांचा भ्रष्टाचार, भारतीय इतिहासात आदिवासींची झालेली उपेक्षा, अनेक प्रकल्पांमुळे आदिवासींचे होणारे विस्थापन असे आदिवासी जीवनातील अनेक घटक व समस्या यांचे चित्रण त्यांच्या साहित्यात येते, ते ओघवत्या शैलीत, प्रांजळपणे आणि मावची बोलीत. त्यांचे साहित्य वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडते, चिंतनशील बनवते आणि विचारप्रवृत्त करते.

– डॉ. माहेश्वरी वीरसिंग गावित, maheshwarigavit23@gmail.com
(लेखिका आदिवासी लोकसाहित्य, साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या अभ्यासक आहेत)

(महाराष्ट्र टाइम्स, रविवार, 23 सप्टेंबर 2018 वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleअनिल शाळिग्राम आणि सिटिपिडिया
Next articleनाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच!
डॉ. माहेश्वरी गावित या लोकसाहित्याच्या अभ्यासक अाणि समीक्षक अाहेत. त्या अहमदनगर येथे राहतात. त्या 'पेमराज सारडा' वरिष्ठ महाविद्यालय येथे मराठी विषयाच्या सहयोगी प्राध्यापक पदावर १९९८ सालापासून कार्यरत अाहेत. त्यांची अादिवासी संस्कृती-साहित्य (अाणि इतर विषय) यांवर अाधारीत एकवीस पुस्तके प्रकाशित अाहेत. त्या 'अानंदोत्सव' या अांतरराष्ट्रीय संशोधनपर षण्मासिकाच्या कार्यकारी संपादक अाहेत. माहेश्वरी गावित यांना त्यांच्या कार्यासाठी 'अादिवासी समाजभूषण' या अाणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात अाले अाहे. माहेश्वरी गावित 'दहाव्या अखिल भारतीय अादिवासी साहित्य संमेलना'च्या (2015) अध्यक्ष होत्या. डॉ. माहेश्वरी गावित यांनी एमए, सेट, नेट, पीएचडी अशा पदवी मिळवल्या अाहेत. त्यांनी पीएडीसाठी 'महाराष्ट्रातील अादिवासी साहित्य - एक शोध' या विषयावर प्रबंध लिहिला होता. पुढे तो ग्रंथ रूपात प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथास लक्षवेधी साहित्यग्रंथ म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार' लाभला. तर 'अादिवासी साहित्यविचार' या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ठ वाड्मय निर्मिती पुरस्कारा'ने (2009) गौरवण्यात अाले अाहे. गावित यांनी अनेक राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय परिसंवादातून सहभाग घेतला अाहे. त्यांचे काही कार्यक्रम अाकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात अाले अाहेत. गावित यांनी लिहिलेले काही ग्रंथ विद्यापीठाने संदर्भग्रंथ म्हणून स्वीकारले अाहेत. त्यांनी 'चाळीसगाव-डांगाण परिसरातील अादिवासींच्या दैवतकथा अाणि दैवतगीते : लोकसाहित्यशास्त्रीय अभ्यास' हा अाणि असे इतर दोन संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822414202