नगारा वाद्य

carasole

नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्‍द मूळ अरबी शब्द ‘नकारा’ पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्‍या काळचे युद्धवाद्य होते. एक मोठ्या अर्धगोलाकार धातूच्या (तांबे, पितळ वा लोखंड) भांड्यावर म्‍हशीचे कातडे ताणून चढवले जाते. तोच नगारा! त्‍याची दोन भांडी असतात. मोठ्या भांड्याला नर तर लहान भांड्याला जील असे म्‍हटले जाते. ती भांडी तांबे, पितळ अथवा लोखंड या धातूच्‍या पत्र्यांची असत. वर्तमानात तयार केल्‍या जाणा-या त्‍या वाद्यात स्‍टील धातूचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे नगा-याच्‍या तोंडाचा व्‍यास दोन ते तीन फूट असतो. मोठ्या आकाराच्‍या नगा-याचा व्‍यास पाच फूटांपर्यंतदेखील असतो.

नगारा दोन बाकदार काठ्यांच्‍या सहाय्याने वाजवतात. नगारा वाजवणा-या व्‍यक्‍तीला नगारची असे नाव आहे. घोड्यावर बांधून वाजवण्याच्या लहान नगाऱ्यासारख्या दोन वाद्यांच्या जोडवाद्याला ‘डंका’ म्हणतात.

नगारा वाद्य देवालयांत वा उत्सव प्रसंगी वाजवले जाण्‍याची पद्धत चालत आली आहे. दिवसाच्या ठराविक वेळेस काल दर्शवण्यासाठीही याचा उपयोग केला जाई. आजही धार्मिक कार्यांमध्‍ये नगा-याचा वापर केला जातो.

नगारा हे मुख्‍यतः रणवाद्य आहे. लढाईत नगारा वाजवण्याची प्रथा बहुतांश संस्‍कृतींमध्‍ये आढळून येते. सैनिकांना स्‍फूरण यावे किंवा लढाईत विजय मिळवल्यानंतर तयाचा आनंद साजरा करावा यासाठी नगारा वाजवण्‍यात येई. कौरव-पांडव यांच्‍या युद्धाच्‍या आरंभी अशी वाद्ये वाजवल्‍याचे उल्‍लेख महाभारतात आढळतात. प्राचीन काळी या वाद्यास दुदुंभी असे नाव होते. इतिहासकाळतही युद्धाच्‍या तयारीत नगारा वाद्य अग्रस्‍थानी असे. तो हत्‍ती अथवा उंट अशा प्राण्‍यांवर लादून वाजवला जाई. सेनापतीचे निरनिराळे हुकूम सैन्यास समजण्यासाठी निरनिराळे आवाज काढून नगारा वाजवला जाई. शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी, शत्रूवर हल्‍ला करायचा असल्‍यास किंवा शत्रूच्‍या दिशेने चालून जाण्‍यासाठी त्‍या-त्‍या संकेताप्रमाणे नगारा वाजवला जाई. युद्धप्रसंगी वाजवल्‍या जाणा-या तशा नगा-यास नौबत असे म्‍हणतात.

महाराष्‍ट्रात किंवा सबंध भारतात नगारे ठेवण्‍याकरता किल्‍ल्‍यांमध्‍ये खास जागा असत. त्‍यास नगारखाना असे म्‍हणतात. नगारखान्‍याचे स्‍थान किल्‍ल्याच्‍या, देवळाच्‍या किंवा राजवाड्याच्‍या प्रवेशद्वाराशी किंवा दिंडी दरवाजाजवळ असे.

मोगलांच्‍या राजवाड्यापुढे एक नगारा ठेवलेला असे. बादशाहकडे दाद मागण्‍यासाठी येणारा मनुष्‍य तो नगारा वाजवून तो आला असल्‍याची वर्दी देई. सूर्योदय आणि सूर्यास्‍त या वेळांना शाही फर्मान ऐकवण्‍यासाठी नगारा वाजवला जात असे.सकाळच्‍या नगा-याला ‘नौबत-ए-आदन’ असे म्‍हणत. तर सायंकाळच्‍या नगा-याला ‘नौबत-मुराद’ असे नाव असे.

लढाईत वाजवला जाणारा नगारा हत्तीच्‍या पाठीवर ठेवला जात असे. मुख्य सेनापतीला छत्रपतींकडून खास जरीपटका व साहेबी नौबत देऊन मोहिमेवर पाठवले जाई. तो एक प्रकारचा मान असे. नौबतीसाठी सरकारी खजिन्‍यातून स्‍वतंत्र निधी पुरवला जाई.

सातारचे छत्रपति प्रतापसिंह यांच्या वेळी नगारखान्‍याचे कामकाज कसे चाले याची सविस्तर माहिती जाबत्यावरून समजते. त्‍यातील उल्‍लेखांवरून असे समजते की, नगारा देवळाच्या किंवा राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर असे. नगारखान्यांतील कामगार नगारा, सनई, तुरई व झांजवाला व नौबत वाजवत असत. चौघडा अस्तमानी, मध्यरात्री व प्रातःकाळी दोन घटका रात्र उरली असताना वाजवला जात असे. त्‍याचप्रमाणे सायंकाळी दोन घटका दिवस उरलेला असताना दुघडीच्‍या इशारतीचा चौघडा वाजवला जाई. नगारखान्‍यातील कामगारांना सरकारस्वारी येता-जाता न चुकता नगारा वाजवण्‍याचे आदेश होते.

महाराष्‍ट्रातील अनेक मंदिरांमधून परंपरा म्‍हणून आजही सनई-चौघडा वाजवला जातो. कोल्‍हापुर येथे महालक्ष्‍मीच्‍या मंदिरासमोर वरच्‍या बाजूस छोटा नगारखाना आहे. तेथे दोन व्‍यक्‍ती सनई आणि चौघडा वाजवताना दिसतात.

(संदर्भ – केतकर ज्ञानकोश  आणि भारतीय संस्‍कृतिकोश)

– किरण क्षीरसागर

(चित्रात दिसणारा नगारा सोलापूर जिल्‍ह्याच्‍या माळशिरस तालुक्‍यातील म्‍हाळुंग गावच्‍या यमाईच्‍या मंदिरातील आहे.)

Last Updated On – 13th Sep 2017

About Post Author

Previous articleतटबंदी
Next articleहळदुगे येथील फुलपाखरांची शाळा
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

1 COMMENT

  1. नगारा वाजवण्याऱ्या व्यक्तीला…
    नगारा वाजवण्याऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, विशिष्ठ अशी संज्ञा आहे ka?

Comments are closed.