ध्येयासक्त दांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते

0
21

समाजात काही व्यक्ती अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहतात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींच्या आधारावर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते.

सुधीरला ‘अंकीय प्रतिमा संस्करण’ म्हणजेच डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयात केलेल्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातली पीएच. डी. मिळाली आहे. तो मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून संशोधन करत आहे. तर त्याची अर्धांगी नंदिनी कला शाखेची पदवीधर असून आवड म्हणून गृहिणीपद भूषवित आहे. समाजकार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून समाजकार्यातून त्यांची ओळख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्नगाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचे सहजीवन सुरू झाले.

एखाद्या संशोधनाला जेव्हा नोबेल पारितोषिक देऊन गौरवले जाते तेव्हा त्या संशोधनाविषयीची बातमी लोक वर्तमानपत्रांतून वाचतात. हे संशोधन खूप महान असणार याची त्यांना खात्री असते, पण हे संशोधन नेमके काय आहे या विषयीची माहिती मिळवण्याची त्यांची उत्सुकता पुरी होऊ शकत नाही. नोबेल विजेते संशोधन हे खूपच प्रगत आणि प्रगल्भ असल्यामुळे त्रोटक बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. हे संशोधन मुलांनादेखील कळू शकेल एवढे सोपे करून लिहिले तर नोबेल पारितोषिकाविषयीच्या सर्वसामान्यांच्या मनातली उत्सुकतेचा वापर त्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करता येईल, असे सुधीर आणि नंदिनीला वाटले. यातूनच  ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या पुस्तकाची कल्पना निघाली. नवनव्या विज्ञानसंशोधनाबाबत सतत वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सुधीरची आवड आणि अवघड गोष्टीही अतिशय रंजकपणे सांगून मुलांनाही सहजपणे कळतील अशा रीतीने लिहिण्याची नंदिनीची शैली या दोहोंचा संगम ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’च्या निर्मितीत झाला. या कामासाठी हे दांपत्य म्हणजे जणू ‘मेड फॉर इच अदर’ होते. आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच सुरू झाला नोबेलनगरीतील नवलस्वप्नांचा प्रवास.

‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ मधल्या कथा केवळ वाचकांना भावल्या किंवा विद्यार्थांना आवडल्या असे नव्हे तर ज्यांच्या संशोधनावर या कथांचे बीज अवलंबून आहे त्या खुद्द नोबेल पारितोषिक विजेत्या  संशोधकांनाही या कथा रुचल्या यांतच या पुस्तकाचे यश दडले आहे.

1996 पासून या पुस्तकाचे लेखन प्रकाशन सुरु झाले. दरवर्षी ग्रंथालीच्या वाचकदिनी म्हणजे 25 डिसेंबरला त्या-त्या वर्षीच्या नोबेल विजेत्या संशोधनावर आधारित पुस्तक प्रसिद्ध होते. 25 डिसेंबर 2009 ला या पुस्तक मालिकेतले चौदावे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले. एवढे असामान्य कार्य करीत असलेल्या दांपत्याची ओळख आमच्या वाचकांना करुन द्यावी यासाठी मी नंदिनी-सुधीरच्या घरी गेलो. पूर्वीपासून आमची जान-पहचान तर होतीच, शिवाय त्यांच्याबरोबर ‘कणाद विज्ञान प्रतिष्ठान’च्या कार्यात सहकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने आम्ही एकमेकांचे खास दोस्तही आहोत. साहजिकच, ‘या वेबसाईटसाठी तुमची मुलाखत हवीय,’ म्हटल्यावर ते दोघे अतिशय आनंदाने तयार झाले.

कथारूपातून हे नोबेल विजेते संशोधन कां द्यावेसे वाटले आणि अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचे संशोधन कथा रुपातून सादर कसे करता असे मी विचारले, त्यावेळी दोघांनाही आळीपाळीने जी माहिती सांगितली ती मी शब्दबद्ध करतोय. माहिती सांगतानासुद्धा अगदी स्वच्छ चित्र त्यांनी उभे केले.

दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापर्यंत नोबेल पारितोषिकांची घोषणा होते. त्यानंतर, त्या संशोधनाची सखोल माहिती सुधीर गोळा करतो. विविध संदर्भग्रंथ वाचून त्या माहितीचा अन्वयार्थ तो लावतो. त्या माहितीवर चिंतन-मनन करतो.  मग सोप्या भाषेत ती माहिती तो नंदिनीला सांगतो. त्या संपूर्ण माहितीचे नीट आकलन होईपर्यंत नंदिनी सुधीरला अनेक प्रश्न विचारत राहते. त्या प्रश्नांच्या उत्तरांमधून तिचे समाधान होईपर्यंत तिची प्रश्नांची सरबत्ती चालूच राहते.

नंदिनी म्हणाली, “मी कलाशाखेची विद्यार्थिनी असल्याचा इथे आम्हांला विशेष फायदा होतो. नुसती गणिती सूत्रं किंवा तांत्रिक शब्दप्रयोग वापरून विज्ञान शाखेचे विद्यार्थी आपापसात सहजपणे माहितीची देवाणघेवाण करतात. पण ही सूत्रं किंवा तांत्रिक परिभाषा सामान्य वाचकाला अनाकलनीय वाटते. याउलट, या सगळ्याच्या पलिकडे जाऊन त्या संशोधनाच्या गाभ्याला जर भिडायचं असेल तर त्या संशोधनातल्या विविध गोष्टींचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहायला हवं. त्यातल्या गोष्टींचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनातल्या किंवा परिचित गोष्टींशी जोडता यायला हवा. तरच ते सर्वसामान्य माणसाला कळतं, भावतं आणि आवडतं. त्यामुळे सुधीरच्या सांगण्यातून प्रथम मी माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं करण्याचा सतत प्रयत्न करत राहते.”

“म्हणजे नेमकं कसं?” मी विचारले.

“उदाहरणार्थ, 1999 चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार फेम्टोसेकंदात घडणाऱ्या रासायनिक घटनांच्या अभ्यासाला मिळाला. फेम्टोसेकंद म्हणजे काय, असं मी सुधीरला विचारल्यावर तो पटकन म्हणाला, फेम्टोसेकंद म्हणजे सेकंदाचा 0.000000000000001 (दशांश चिन्हानंतर चौदा शून्ये) एवढा भाग. शून्यांची ही प्रचंड माळ मला स्वतःला अर्थशून्य वाटली. मग सुधीरशी थोडीशी चर्चा केल्यावर मला उलगडलं की एका फेम्टोसेकंदाचं एका सेकंदाशी जे नातं आहे तेच नातं एका सेकंदाचं तीन कोटी वीस लाख वर्षांशी आहे! शास्त्रज्ञांच्या दृष्टीने आकडेवारी महत्त्वाची असली तरी सामान्य माणसाच्या दृष्टीने आकलन महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी त्याच्या डोळ्यासमोर त्या गोष्टीचं चित्र उभं राहणं आवश्यक असतं.” नंदिनीने स्पष्टीकरण दिले.

सुधीरकडून माहितीचा चेंडू नंदिनीच्या कोर्टात गेल्यानंतर सुधीरचे कार्यक्षेत्र संपते. पुढचे कार्य नंदिनीचे. मिळालेली वैज्ञानिक माहिती मग नंदिनी आपल्या कल्पकतेने शब्दगुच्छात गुंफते आणि त्यानंतर त्या शब्दगुच्छांपासून कथारुप हार साकारतो. विशेष म्हणजे प्रत्येक शोध हा नवीन कथारूपाने तिला जन्माला घालायचा असतो. बरे कालावधी किती कमी, तर जेमतेम दोन महिने! या काळात नवीन कथा सुचणे, त्या कथेत ते शोधबीज चपखल बसवणे ही खरे तर तारेवरची कसरत. परंतु नंदिनी त्यांत इतकी तरबेज झालेली आहे की वाचकांना कायम नवनवीन कथा वाचायला मिळतील, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अवघड माहिती सोपी करुन सांगणारा सुधीर आणि त्या वैज्ञानिक माहितीला कथेचे कोंदण देणारी नंदिनी म्हणजे खरोखरच अजब मेंदूंच्या वल्ली म्हणाव्या लागतील.

माहिती गोळा करण्यापासून तिचे वाचनीय मनोरंजक कथेत रुपांतर होईपर्यंतच्या कालखंडाची तुलना सुधीर-नंदिनीने अंड्यापासून मोहक फुलपाखरु निर्माण होण्याच्या प्रक्रियेशी केली. नोबेल पारितोषिक विजेते संशोधन  म्हणजे जणू अंडे. त्याचे वाचन (आणि पाचन) करुन ते सोपे सुटसुटीत करणे म्हणजे जणू अळीची अवस्था. मग ते सामान्य वाचकाच्या डोळ्यांसमोर साकारेल एवढे सोपे करून कथारुपात शब्दबद्ध करण्याचे स्थित्यंतर म्हणजे जणू कोषावस्था आणि सहजसुंदर शब्दात साकारणारी कथा म्हणजे जणू मोहक, रंगीबेरगी फुलपाखरु! कल्पनाच अप्रतिम आहे. म्हणून म्हणतो कधी कधी मला वाटते की त्यांच्या मेंदूतील जीवरसायनाचे विश्लेषण करुन पहावे म्हणजे कळेल की त्यांचा मेंदू एवढा तल्लख कां?

इतक्या संस्कारातून बाहेर पडलेले पुस्तक वाचनीय, मनोरंजक न झाले तरच नवल! ही सारीच पुस्तके इतकी रंजक झाली की समाजातील सर्व घटकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांना तर ते आवडलेच, परंतु शिक्षकांनीही त्या पुस्तकांचे भरपूर कौतुक केले. महाराष्ट्र राज्य शासनाने उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार देऊन या पुस्तक मालिकेला तीन वेळा गौरवले आहे.

ज्यांच्या संशोधनावर या मालिकेतल्या कथा लिहिल्या जातात त्या खुद्द नोबेल विजेत्या संशोधकांनीही नोबेलनगरीतील नवलस्वप्नेचे कौतुक केले आहे. उदा. रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. जॉन वॉकर (एमआरसी लॅबॉरेटरी ऑफ मॉलेक्युलर बॉयॉलॉजी, केंब्रिज, इंग्लंड) यांनी लेखकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे –

“…आमचे संशोधनकार्य आपण अतिशय मनोरंजक रीतीने सादर केलेले आहे. सर्वसामान्य लोकांना आमचे गुंतागुंतीचे विज्ञान सोपे करून समजावून सांगणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे. भारतातील प्रचंड मोठ्या वाचकवर्गासमोर आमचे काम पोचवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुम्ही दिलेल्या कल्पक वर्णनाचा वापर भविष्यकाळात मीही करू शकेन…”

शरीरविज्ञान किंवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. स्टॅन्ले प्रुसिनर (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सान फ्रान्सिस्को, यु. एस. ए.) आपल्या पत्रात म्हणातात –

“…आनंददायी पुस्तक… आपली पुस्तके वाचणे म्हणजे जणू वाचकांना ज्ञानानंदाची पर्वणीच…”

शरीरविज्ञान किंवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लंडमधील इंपेरियल कॅन्सर रिसर्च फंडाच्या सेल सायकल लॅबॉरेटरीजमधील वैज्ञानिक डॉ. पॉल नर्स यांनी तर प्रत्यक्ष भेटीत “माझे संशोधन मराठीत तात्काळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल,”  नंदिनी-सुधीरचे अभिनंदन केले.

मराठीतल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी या कार्याची दखल घेऊन त्यावर लेख प्रसिद्ध केले. तसेच टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, फ्री प्रेस जर्नल यांसारख्या इंग्रजी दैनिकांनीही या उपक्रमावर छायाचित्रांसकट लेख प्रसिद्ध केले. तर आऊटलुक सारख्या महत्त्वाच्या नियतकालिकाने त्यांच्या या कार्यावर विशेष फीचर (http://www.outlookindia.com/article.aspx?226925)लिहून त्याचे कौतुक केले. सह्याद्री आणि स्टार माझा या चित्रवाणी वाहिन्यांनी थत्ते दांपत्याच्या मुलाखती प्रसारित केल्या.

या अभिनव उपक्रमासठी थत्ते दांपत्यावर केवळ देशातील प्रसिद्धी माध्यमांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असे नव्हे तर भारताबाहेरही या उपक्रमाचे कौतुक झाले. ‘स्वेन्स्का डॅगब्लॅडेट’ ह्या स्वीडनमधील स्टॉकहोम येथून स्वीडिश भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधी कॅरीन लुंडबॅक या खास थत्ते दांपत्याच्या भेटीला भारतात आल्या आणि त्यांनी नंदिनी-सुधीरची मुलाखत घेतली. ही मुलाखत त्यांच्या छायाचित्रांसहित, ज्यादिवशी स्टॉकहोममध्ये नोबेल पारितोषिके दिली जातात त्यादिवशी म्हणजे 10 डिसेंबरला प्रसिद्ध केली

नोबेल पारितोषिकांचा उपयोग मुलांमध्ये विज्ञान-संशोधनाची गोडी निर्माण करण्यासाठी होऊ शकतो, या गोष्टीचे अप्रुप, ज्या देशात नोबेल पारितोषिके दिली जातात त्या देशातल्या म्हणजेच स्वीडनमधल्या ‘द ऑफिशियल गेटवे टू स्वीडन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.स्वीडन.एसई’ (http://www.sweden.se/eng/Home/Education/Research/Reading/A-Nobel-pursuit/) या वेबसाईटला वाटले. आणि त्यांनी कॅरी सिमॉन्स यांना नोबेल सप्ताहानिमित्त ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या मराठी पुस्तक मालिकेवर लेख लिहायला सांगितले. हा लेख या वेबसाईटवर झळकल्यावर जगभरातल्या वाचकांनी त्यावर ब्लॉग लिहून थत्ते दांपत्याच्या या विशेष कामाला दाद दिली.

‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’च्या यशामध्ये ग्रंथाली आणि दिनकर गांगल यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. हे पुस्तक मुलांसाठी आहे हे लक्षात घेऊन ते आकर्षक रंगीत चित्रांनी सजवलेले असते. विज्ञानविषयक हे पुस्तक असल्यामुळे त्याची अचूकता खूप महत्त्वाची असते. पुस्तकाचे हस्तलिखित तयार होईपर्यंत डिसेंबर महिना सुरू झालेला असतो. आणि अवघ्या दोन आठवड्यांमध्ये हे पुस्तक त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसहित सुसज्ज होऊन प्रसिद्ध होते. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ग्रंथालीच्या नव्या पिढीतल्या अरुण जोशी यांचा विशेष सहभाग असतो. तसेच हे पुस्तक महाराष्ट्रभरच्या विज्ञानप्रेमी वाचकांपर्यंत पोचवणारा आणि या वाचकांच्या प्रतिक्रिया लेखकांपर्यंत आणणारा महत्त्वाचा दुवा आहेत सुदेश हिंगलासपूरकर. किंबहुना, ग्रंथाली परिवाराच्या मनःपूर्वक पाठिंब्यामुळेच हा उपक्रम एवढा यशस्वी होऊ शकला, असे सुधीर आणि नंदिनी आवर्जून सांगतात.

यंदाच्या 2 आणि 3 जानेवारीला अविनाश बर्वे आणि श्रीधर गांगल यांच्या पुढाकाराने ग्रंथालीच्या ठाणे विभागाने ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’वर आधारित असा एक आगळावेगळा उपक्रम प्रस्तुत केला. ठाण्यातल्या वेगवेगळ्या 17 शाळांनी या उपक्रमात भाग घेतला. ‘नोबेलनगरीतल नवलस्वप्ने’ या मालिकेत गेल्या 14 वर्षांत प्रसिद्ध झालेल्या कथांपैकी एकेक कथा निवडून प्रत्येक शाळेने त्यावर सुमारे 20 मिनिटांचे सादरीकरण केले. या सादरीकरणात पोवाडा, कीर्तन, नाटुकली असे विविध प्रकार मुलांनी सादर केले. आयबीएन लोकमत वाहिनीने कला आणि विज्ञान यांचा मिलाफ घडवून आणणाऱ्या मुलांच्या या सादरीकरणाचे त्यातली दृश्ये दाखवून कौतुकही केले. आरती थत्ते या अॅनिमेशन शिकणाऱ्या विद्यार्थिनीने नोबेलनगरीची भूमिका http://www.youtube.com/watch?v=1A8yRfCB21A आणि अपेक्षा http://www.youtube.com/watch?v=1g50iT9RAc8 व्यक्त करणाऱ्या दोन गोष्टी चेतनाचित्रणाच्या (अॅनिमेशन) स्वरूपात सादर केल्या.  तुमच्या सोयीसाठी त्या दोन्ही क्लिप्स आम्ही इथेही उपलब्ध करून दिल्या आहेत.

नोबेलनगरीच्या पुढच्या प्रवासाबद्दल विचारले असता नंदिनी-सुधीर म्हणाले की भविष्यकाळात छापील माध्यमाबरोबरच संगणकीय खेळ (कॉम्प्युटर गेम), इंटरनेट आणि अॅनिमेशन अशा वेगवेगळ्या नव्या माध्यमांचा वापर करून नोबेलनगरी नवनव्या स्वरूपात सादर करायला आम्हांला निश्चितच आनंद होईल. कारण भविष्यकाळात नवनवे शोध लागत राहतील, त्यांना नोबेल पारितोषिके मिळत राहतील आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन नवे संशोधक निर्माण होण्यासाठी नोबेलनगरीतील नवलस्वप्नांची गरज नेहमीच भासत राहील.

किशोर कुलकर्णी

About Post Author

Previous articleएक झंझावती व्यक्तिमत्त्व – मेधा पाटकर
Next articleसाद वैचारिकता
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.