धारावीचा काळा किल्ला

0
141

धारावीचा काळा किल्लामुंबई महानगरी ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई अरबी समुद्राच्या किना-यावर वसलेली आहे. तो सात बेटांचा समुह होता. बेटांच्या मधल्या भागात भर घालून जमीन तयार करण्यात आली आणि त्यावर आजची मायानगरी मुंबई उभी राहिली.

पूर्वी असलेल्या बेटांवर सरंक्षणासाठी किल्ले बांधलेले होते. तशा आठ-नऊ किल्यांच्या नोंदी आढळतात. त्यामधील काही किल्ल्यांचे अस्तित्व पूर्ण नाहीसे झाले आहे तर काही कसेबसे तग धरून आहेत. तशा किल्ल्यांपैकी एक म्हणजे धारावीचा किल्ला होय. धारावीच्या  किल्‍ल्‍याचे मूळ नाव रिवा (RIWA). मात्र धारावी परिसरात असल्‍यामुळे तो मुख्‍यत्‍वेकरून धारावीचा किल्‍ला म्‍हणूनच ओळखला जातो. त्‍या किल्‍ल्‍याचे बांधकाम काळ्या दगडात झाले असल्याने त्यास ‘काळा किल्ला’ असेही संबोधले जाते. तिथे त्या नावाचा बसस्टॉपदेखील आहे.

धारावीचा काळा किल्लाधारावीमधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी जगभर झालेली आहे. अठराव्‍या शतकात मराठ्यांनी माहीम खाडीच्या उत्तरेकडील साष्टीचा भाग जिंकून घेतला होता. मराठ्यांची पावले केव्हाही मुंबईत शिरु शकतील म्हणून इंग्रजांनी सावधगिरीचा उपाय म्हणून काळ्या किल्ल्याची बांधणी केली. गेराल्ड ऑन्जीअर या मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरने गाढी नदीच्या तीरावर १७३७ मधे त्याची निर्मिती केली. त्‍या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या ‘सालशेत बेटावर’ आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. माहीमचा किल्ला, काळा किल्ला, सायनचा किल्ला या रांगेत असलेल्या किल्ल्यांमुळे त्या काळी मुंबई बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती. इंग्रजांनी काळा किल्‍ल्‍याचा वापर बहुधा दारुगोळा साठवण्यासाठी केला होता. किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी शेजारून नदी वाहत होती. आतामात्र नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर घालून रस्ता व इतर बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे काळा किल्ला नदीपासून दूर झालेला आहे.

काळा किल्ला अनोखा आहे. तो भुईकोट किल्ला असून त्याचा आकार त्रिकोणी आहे. किल्‍ल्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दरवाजा नाही. शिडीवरून तटबंदीवर चढायचे आणि आत उतरायचे. आत उतरण्यासाठी मात्र पाय-या बांधल्‍या आहेत. किल्ल्याचा आतील भाग कच-याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशद्वार आणि जीना यांचे अवशेष दिसतात. किल्‍ल्‍याच्‍या अस्तित्वात असलेल्या अवशेषांत काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत आणि त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची माहिती देणारा दगडी शिलालेख यांचा समावेश होतो. शिलालेखावर ‘Built By Order of the Honorable Horn Esq. President and Governor of Bombay in 1737’ असा मजकूर कोरण्यात आला आहे. त्याखाली ‘इंजिनीयर’ या नावाने स्वाक्षरी आढळते. शिलालेख किल्‍ल्‍याच्या तटबंदीच्या बाहेरील बाजूस आहे. किल्‍ल्‍यावर एक भुयार आढळते. ते भुयार सायनच्या किल्‍ल्‍यापर्यंत जात असल्याची वदंता आहे.

धारावीचा काळा किल्लाकाळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन-बांद्रा लिंक रोडवरुन साधारण दहा मिनीटे चालल्यावर, ओ.एन.जी.सी. बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळाकिल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला काळा किल्ला आहे. धारावी बस डेपो जवळून किल्ल्याकडे जाणारा मार्ग त्यातल्या त्यात सोयीचा आहे.

धारावीच्या जगप्रसिद्ध झोपडपट्टीचा विस्तार किल्ल्याच्या भोवतीही वाढलेला असल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचणे अवघड झालेले आहे. किल्ल्याच्या अठरा-वीस फूट उंचीच्या तटबंदीवर झाडीही वाढू लागली आहे. त्या झाडांच्या मुळांनी तटबंदीला मोठी हानी पोचत आहे. काळा किल्‍ल्‍याची तटबंदी एकदा का ढासळली तर परिसरातील झोपडपट्टी किल्ल्याचा केव्हा घास घेईल हे कळणारही नाही.

(आधार – प्रमोद मांडे यांनी ‘महान्यूज’मध्ये लिहिलेला लेख.)

About Post Author