द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)

_d._b_kulkarani

द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो. मालिकांमधील प्रेमप्रकरण ज्या भूमिकेमधून पाहायचे त्याच भूमिकेतून मुंबईवरील हल्ल्याची दृश्ये पाहणे ही संवेदनहीनतेची वृत्तीच होय.

टीव्ही माध्यमाने सर्वसामान्य माणसाला करमणूकवादी, संवेदनाशून्य, विचारशून्य आणि भावनाशून्य केलेले आहे. ती प्रक्रिया फार पद्धतशीरपणे सुरू आहे. प्रसारमाध्यमे सर्वसामान्यांना मनोरंजनाच्या अफूची गोळी देत आहेत. या सर्वसामान्य माणसाची केवळ भाषा व्यवहारात येऊन चालणार नाही, तर त्या माणसाचे वर्चस्व सगळ्या जीवनव्यवहारात आले पाहिजे.”

द.भि.सरांचा जन्म नागपुरातील, 25 जुलै 1934, गुरुपौर्णिमेचा. त्यांचे शालेय शिक्षण अजनीची ‘हम्पयार्ड रेल्वे प्राथमिक शाळा’ आणि सीताबर्डीच्या ‘कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल’ येथे झाले. त्यांनी धनतोलीचे धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूरचे मॉरिस कॉलेज आणि नागपूर विद्यापीठ विदेश भाषा विभाग येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वाचन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. त्यांना तो ठेवा शालेय जीवनापासून लाभला. द.भि.सरांनी लिहिले आहे. “दादाने एक दिवस ‘अभिरुची’-‘सत्यकथे’चे जुने-नवे अंक आणले. मी चाट! अरे, भोवतीच्या जगाच्या आणि आपल्या आतल्या मनाच्या इतके जवळ साहित्य असते? त्या नवसाहित्याने माझे मन क्षुब्ध झाले, लुब्ध झाले, विश्रब्धही झाले. ते साहित्य माझेच आतले आणि बाहेरचे आत्मचरित्र होते. तेव्हा आणि केव्हाही भावे-गाडगीळ, मकर-मुक्तिबोध यांचे साहित्य दुर्बोध, अश्लील, परभृत, प्रयोगधार्जिणे वाटले नाही – आपले ‘आत्मचरित्र’ आपल्याला असे कधी वाटेल काय?”     

द.भि.सरांना घरातील वाचनप्रिय वातावरणाचा फायदा झाला. त्यांना धार्मिक ग्रंथांपासून विविध भाषांमधील कथा-कादंबऱ्यांपर्यंत अनेक प्रकारची पुस्तके घरातच वाचण्यास मिळाली. त्यांनी रशियन भाषेचा अभ्यास केला. वाचनाचे खोल परिणाम त्यांच्या विचारावर आणि लेखनावर झाले. त्यांना वाचनाबरोबर लेखनाचा लळाही लहान वयातच लागला. त्यांनी मराठी साहित्यात साहित्यसमीक्षाक्षेत्राच्या विकासात मोलाची भर घातली _sahitya_sanmelan_dabhi_kulkarniआहे. त्यांचे सदतीस ग्रंथ आहेत. द.भि.सर समीक्षेला सृजन मानत. त्यांनी लेखकाची, कवीची समीक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनाकडे बोट दाखवून केली नाही. मग ते जी.ए. कुलकर्णी असोत किंवा बा.सी. मर्ढेकर! त्यांनी त्या त्या व्यक्तीचे साहित्य हाच समीक्षेचा मुख्य आधारभूत घटक मानला. त्यांनी अनेक शब्दांची ओळख नव्या पिढीला समीक्षेच्या माध्यमातून करून दिली. त्यांनी काही वेळा नवीन शब्दही निर्माण केले. म.द. हातकणंगलेकर यांनी लिहिले आहे, “द.भिं.नी मराठी साहित्यप्रवाहाची, प्रकारांची, परंपरेची फेरमांडणी करण्याच्या हेतूने लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या टीकालेखनावर त्यांची स्वत:ची अशी मुद्रा होती. ‘आद्य मराठी कथाकार चक्रधरस्वामी’, ‘मर्ढेकर आणि अभिनवगुप्त’, ‘तिसऱ्यांदा रणांगण’, ‘तुकारामाची अभंगकला’ अशा शीर्षकांवरून द.भिं.ची समीक्षादृष्टी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न कशी करत होती याची कल्पना येते.”

हे ही लेख वाचा – 
अनंत भालेराव – लोकनेता संपादक
यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय

द.भि.सरांना साहित्याइतकीच (किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच) संगीतकलेची ओढ होती. त्यांच्या लहानपणी घरातील एच.एम.व्ही.च्या अगडबंब ग्रामोफोनवर ऐकलेल्या दिग्गज गायकांच्या रेकॉर्ड त्यांच्या मनात घर करून राहिल्या होत्या. अब्दुल करीम खाँ, हिराबाई बडोदेकर, पंडित नारायणराव व्यास, गंगुबाई हनगल अशी एक ना अनेक नावे. त्यांच्या ताना, मुरक्या, हरकती आणि त्यांना साथ देणारे तबला अन् सारंगी हे सारे द.भि.सरांसाठी सतत ताजे असे. त्यांचे पणजोबा म्हणजे आईचे आजोबा बाळकृष्णनाथ राजुरकर हे ग्वाल्हेरच्या राजदरबाराचे गायक, संगीताचा तो वारसा आईच्या माहेराकडून द.भि.सरांना मिळाला. त्यांना संगीताने लहान वयातच झपाटून टाकले होते. इतके, की एखादा कार्यक्रम ऐकून आल्यानंतर पुढील तीन-चार दिवस कुलकर्णी यांच्या घरातील लहानगा दत्तात्रय घरात असून नसल्यासारखाच वाटायचा. संगीताने असे पछाडणे हळुहळू द.भि.सरांच्याही लक्षात येऊ लागले आणि त्यांना जाणीव झाली, की या क्षेत्राच्या वाटेला गेलो तर बाकी सगळेच सोडून द्यावे लागणार! नव्हे, ते आपोआप सुटणार! त्यांचा निर्णय संगीतकलेपासून चार पावले दूर राहण्याचा झाला. मात्र द.भि.सरांच्या मनात संगीतकलेबद्दल तितकाच आदर आणि प्रेम शेवटपर्यंत राहिले. ते म्हणतात, ‘मी ग्रंथातून जन्माला आलो!’ द.भि.सरांना ग्रंथांची बहुमोल सोबत आयुष्यभर लाभली. 
d_b_patiमंगेशकर वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान सोहळा नागपुरात 1997 साली झाला. द.भि.सरांचाही सन्मान त्या पुरस्काराने गानसविता गंगुबाई हनगल, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आणि पहिल्या महिला आयपीएस अधिकारी – किरण बेदी यांच्याबरोबर करण्यात आला. त्या पुरस्काराच्या निमित्ताने गंगुबाई हनगल यांच्याबरोबर काही काळ गप्पागोष्टी करता आल्या याचा आनंद पुरस्काराइतकाच मोठा द.भि.सरांना झालेला वाटला.

संगीत आणि साहित्य यांबरोबरच ज्योतिषशास्त्र हा द.भि.सरांचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय होता. त्यांचे आवडते कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या साहित्यात खोलखोल शिरणारे द.भि.सर आणि अनेक व्यक्ती यांच्या जन्मपत्रिकांचा रात्र रात्र अभ्यास करणारे द.भि.सर पाहिले, की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळ्या रसायनाची जाणीव होत असे. द.भि.सरांना एक वाचक म्हणून समीक्षा हा प्रकार फारसा आवडत नसायचा. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक पुस्तके त्यांच्या वाचनात आली. त्यांनी मराठीच नाही तर हिंदी-इंग्रजी साहित्याचाही व्यासंग ठेवला आणि त्या साऱ्यातून एक समीक्षक जन्माला आला. त्यांना दुसऱ्यांचे न पटणारे लेखन स्वस्थ बसू देत नसे. “प्रेमभंग झाल्याने एखादी व्यक्ती कविता लिहू लागते तसे, ‘अभिरुचीभंग झाल्यामुळे मी समीक्षा करायला लागलो” असे ते सांगायचे. 

“समीक्षा हे एक प्रकारचे सृजन असते. समीक्षा ही स्वतः कलाकृती होत नाही, पण तिच्या खतपाण्यातून एखाद्या कलाकृतीला नवीन धुमारे निश्चित फुटतात. कलाकृतीचे हनन किंवा जनन करणे हेच समीक्षेचे कार्य असते” अशी समीक्षेची स्पष्ट व्याख्या त्यांची होती. त्यामुळे एक रसिक समीक्षक अशी त्यांची ओळख होणे स्वाभाविकच आहे.  

_sahitya_d_bत्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम चाळीस वर्षें केल्यानंतर, ते निवृत्त आयुष्य न जगता त्यांनी त्यांना आनंद देणाऱ्या लेखन-वाचनात स्वत:ला झोकून दिले. आज स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य तर आहेच; पण मानवाला लाभलेले ते एक खास वैशिष्ट्य आहे, हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र होता. मात्र ‘एक समीक्षक म्हणून आपण आजही असमाधानी आहोत. कारण दिशाभूल झालेल्या मराठी साहित्याला योग्य वाट दाखवण्यात आपण यशस्वी झालो नाही’ अशी खंत द.भि.सरांनी व्यक्त केली. त्यांच्या पत्नी शिवरंजनी गेल्यानंतर त्यांना काहीसा एकटेपणा आला, आई सरस्वती आणि थोरली बहीण शरूताई या दोन स्त्रियांच्या संस्कारांनी, पुस्तकांच्या सहवासाने आणि संगीतकलेच्या प्रचीतीने त्यांचा हा जन्म सुखकर आणि आनंददायी तर झाला; पण या सगळ्यासाठी एक जन्म पुरेसा ठरणारा नाही म्हणून वाचक, लेखक, शिक्षक आणि रसिक म्हणून आणखी बरीच जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढचे सात जन्म मिळावेत, ही द.भि.सरांची इच्छा होती! त्यांनी 27 जानेवारी 2016 रोजी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

– ममता क्षेमकल्याणी 9881736078
mamatakshem@gmail.com 

About Post Author