दोन प्रसंग

0
29

– अविनाश बर्वे

कवी ग्रेस सध्या पुण्याच्या ‘दीनानाथ हॉस्पिटल’मध्ये मृत्युक्षय्येवर आहेत.त्यांना कॅन्सर झाला आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन ‘दीनानाथ’मध्ये झाले आणि दुसर्‍या समारंभात ग्रेस यांनी दिल्लीला साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार स्वीकारला.यातील एक प्रसंग ह्रद्य व दुसरा अत्यंत निरस. या दोन्ही घटनांनिमित्ताने….

ओल्या वेळूची बासरी

पुस्तक प्रकाशन, नव्हे कृतज्ञता प्रकटन! –अविनाश बर्वे

 

कवी ग्रेस हा असा प्रतिभावंत आहे, की जो ‘जनप्रवाहा’पासून सदैव दूर राहिला, पण त्यांच्या कविता व ललितबंधाचे गारुड मात्र जनांवर आहे. रसिकाला आपण एका गूढ प्रदेशात, प्रचंड धबधब्याच्या जवळ उभे आहोत आणि त्यात एक प्रचंड वादळ घोंघावत येत आहे तसा हा कवी वाटतो. त्यांची कविता रसिकांपर्यंत उत्कटतेने पोचली ती ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यामुळे. एरवी ती कविता पुस्तकातून फार लोकांपर्यंत पोचलीच असती असे नव्हे. माडगुळकरांचे गीत रामायण आम जनामनात पोचले, ते बाबुजींमुळे; हे काहीसे तसेच! ग्रेस यांचे व्यक्तिमत्त्व वादळासारखे आहे. त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस फार कमी जण करत असावेत. ते धाडस माझ्याकडून पाच-सहा वर्षांतील पाच-सहा भेटींमुळे झाले. आमच्या परिचयाला, भेटींना ‘मैत्री’चे लेबल लावणे कदाचित योग्य होणार नाही; पण हे नाते जुळले खरे. म्हणजे असे, की मला मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत असणार्‍या ग्रेसना भेटायला जाताना परवानगी घ्यावी लागत नाही. मी तेथे जाऊन उभा राहिलो आणि मृदू पण कणखर आवाजात ‘या बर्वेसर’ असे ऐकले की मनाला वाटतं की त्यांच्या ‘फेसबुका’वर मी आहे!
मी गेल्या पाच-सहा महिन्यांत त्यांना भेटायला सात-आठ वेळा तरी गेलो. ते कॅन्सरच्या उपचारांमुळे काही वेळा मरणयातना सोसत असताना दिसतात. पण हा कवी त्या रोगाला पुरुन उरला आहे असेच जाणवते. ग्रेस यांचे वास्तव्य नागपूरला असते पण हा आजार उद्भवला तेव्हापासून ते ‘दीनानाथ’मध्येच आहेत. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना प्रेमाने पुण्यात आणले व उपचारांसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज केली. त्यांची व्यवस्था आठव्या मजल्यावर ‘सन्मानित कक्षात’ एका खास प्रशस्त दालनात केली आहे.
ग्रेस व ह्रदयनाथ या दोन प्रतिभावंतांतील नाते गहिरे आहे. ग्रेसची कविता जशी वेगळे आकाश व्यापून आहे, तसे पंडितजींचे स्वरसंगीत हा वेगळा गंधर्वप्रदेश आहे. त्या दोघांतील स्नेह तसाच अपूर्व आहे! त्यांच्या जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या, व्यवसाय, छंद व दिनचर्या.नेह तसाच अपूर्व आहे. हे सारे वेगवेगळे. वास्तव्याची ठिकाणेही वेगवेगळी. तेव्हा मैत्रीच्या सर्वसामान्य रीती त्यांच्यासारख्या प्रतिभावंतांमध्ये असणे संभवत नाही. पण दोघे एकमेकांचा आदर करतात.
पंडितजींचे गायन व ग्रेस यांचा संवाद असे पंचवीस एक कार्यक्रम झाले. पंडितजी कोणती गाणी म्हणणार हे ग्रेस यांना माहीत नसते व ग्रेस काय बोलणार हे पंडितजींना ठाऊक नसते. एकमेकांना सार्‍या गोष्टी आधी माहीत नसणे हेच त्यांच्या या अनोख्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे त्यात उत्स्फूर्तता अनुभवास येते. अशा एका कार्यक्रमात विंगेत पंडितजी आल्यावर ग्रेस यांनी त्यांना वाकून अभिवादन केले!  त्याच क्षणी त्यांच्या नात्यातील वेगळा पैलू कळला. नंतर ग्रेस यांच्या एक-दोन वेळा भेटींमध्ये ग्रेस पंडितजींच्या स्नेहाविषयी जे बोलले त्यातून कळले, की ह्रदयनाथ ग्रेस यांची काळजी वात्सल्य भावनेतून घेत आहेत. त्यामुळेच ग्रेस यांच्या बोलण्यात पंडितजींविषयी वेगळा हळवा सूर असतो. ‘या जीवघेण्या आजारातून मी तरलो ते पंडितजींमुळे’ अशी त्यांची भावना आहे.

ग्रेस यांच्या ‘दीनानाथ’ मधील मुक्कामाच्या कालावधीत त्यांचा ‘ओल्या वेळूची बासरी’ हा ललितबंध तयार झाला. ‘पॉप्युलर’ने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. ग्रेसने पुस्तक मंगेशकर हॉस्पिटलला अर्पण केले आहे. त्यामुळे त्याचा प्रकाशन समारंभ तेथे होणे क्रमप्राप्त होते. कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील प्रशस्त नाट्यगृहात झाला.
मी त्या समारंभास उपस्थित होतो.

‘मी व्यासपीठावर बसणार नाही. प्रेक्षकांत बसूनच कार्यक्रम पाहीन’ असे ग्रेस यांनी सांगितले होते. त्यामुळे ते पहिल्या रांगेत बसले होते. भटकळ समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांचे मनोगत शूट करून ठेवले होते. ते इतके छान केले होते, की भटकळ प्रत्यक्ष समोर आहेत व आपण ऐकत आहोत असे वाटले. ग्रेस यांची सर्व पुस्तके ‘पॉप्युलर’नेच प्रकाशित केली आहेत. आपल्या मनोगतात भटकळांनी ग्रेसच्या अर्धशतकाच्या मैत्रीचा मोठा छान आढावा घेतला. त्यांचे मनोगत संपूच नये असे वाटत होते.
एक प्रकारे आपल्या जिवलग मित्रालाच ग्रेसने हे पुस्तक समर्पित केले आहे. पंडितजींनी त्यांच्या पद्धतीने ग्रेस यांच्या पुस्तकाचा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा छान आढावा घेतला. पंडितजींच्या विद्वत्तेचा प्रत्यय त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

आता या लेखाचा जो खरा भाग आहे तो इथून सुरु होतो! डॉ.धनंजय केळकर यांचे मनोगत हे त्या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.‘‘दीनानाथ’ मध्ये
आल्यापासून ग्रेस यांच्यावरील उपचार डॉक्टर केळकर यांनीच केले. ग्रेस यांना त्यांनी अगदी जवळून जाणले. ग्रेस यांच्या साहित्याचा परामर्ष आतापर्यंत अनेक विद्वानांनी समीक्षकांनी घेतला असणार, साहित्यिक कार्यक्रमातही त्यांच्याविषयी अनेकजण बोलले असतील पण डॉ.केळकर यांचे मनोगत हे अशा उंचीवर गेले की सभागृह एखाद्या चित्राप्रमाणे स्तब्ध झाले. लोक कानात प्राण आणून मनोगत ऐकत होते. मुळात डॉ.केळकर एक उत्तम वाचक आहेत. कामाच्या प्रचंड व्यापात वाचणारे अनेक उत्तम डॉक्टर मला माहीत आहेत. प्रथम ग्रेस यांची कविता केव्हा वाचली, त्याचा मनावर काय परिणाम झाला हे तर त्यांनी सांगितलेच, पण या उपचारकाळात ग्रेसने कसे झपाटून टाकले याचे मोठे मनोज्ञ वर्णन त्यांनी केले. आता तीन महिने उलटून गेल्यावर त्यातला तपशील मला आठवणे शक्य नाही. खरं तर कार्यक्रमाचे शूटिंग झालेले आहे. त्यातील डॉ. केळकरांचा भावनांचा भाग ‘झी’ किंवा ‘सह्याद्री’ने दाखवला तर आपण ‘नक्षत्रांचे देणे’ पाहात-ऐकत आहोत असे नक्की वाटेल. ते भाषण साहित्याला वाहिलेल्या साप्ताहिकात-मासिकात छापले तर लक्षावधी मराठी रसिकांना त्याचा आनंद लुटता येईल. एखाद्या मर्मज्ञ रसिकाने कलात्मकतेने, हळुवारपणे चित्र रेखाटावे असे ते भाषण आहे. एखाद्या समारंभात यांचे भाषण संपूच नये असे वाटण्याचे प्रसंग आता दुर्मीळ झाले आहेत. पन्नाशीत पोचलेला, तरतरीत, सडपातळ अन् प्रसन्न मुद्रा असलेल्या या तरुणाने सभागृह जिंकूनच घेतले! त्यांच्या भाषणात असलेली उत्स्फूर्तता ही ग्रेसच्या वृत्तीशी नाते सांगणारी होती. जाता जाता, त्यांनी आपल्या व्यवसायाविषयी केलेली मल्लिनाथी त्यांच्या उमद्या वृत्तीची द्योतकच होती. समोरचा रुग्ण कोणी आपला नातेवाईक आहे असे काही म्हणतात पण मी असा विचार करतो, की ज्याच्यावर शस्त्रक्रिया चालली आहे तो मीच आहे. ‘रुग्ण आणि डॉक्टर यांमध्ये पैसा आला व त्यामुळेच या व्यवसायातील उदात्तता लयास गेली आहे असे त्यांचे प्रतिपादन होते. डॉ.केळकरांचे भाषण एक सुरेल गाणेच होते.’
एका प्रतिभावान संगीतकाराने एका प्रतिभावान कवीच्या आजारपणात आपल्या अपत्त्यासारखी काळजी घ्यावी ही गोष्ट जशी दुर्मीळ तसेच व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीने आपल्याच जीवनकाळात एक दंतकथाच बनून गेलेल्या कवीच्या पुस्तकाचे मनोज्ञ रसग्रहण करावे हे सारेच गूढरम्य आहे. अगदी ग्रेसच्या कवितेसारखे!

– अविनाश बर्वे
106, ‘सुचेता’ सोसायटी, सिध्देश्वर तलाव,
पाटीलवाडी, ठाणे– 400 601
(022) 25337250

 

ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

सोहळ्यात शान होती पण जान नव्हती!

अविनाश बर्वे

साहित्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार! प्रत्येक भाषेतील प्रतिभावान कवी-लेखकाचा शोध घेऊन राष्ट्रीय पातळीवर त्यास मान्यता देण्याची ही स्वायत्त व्यवस्था. साहित्य क्षेत्रातील कर्तृत्त्वामुळे मान्यवर लेखक-कवी यांची निवड अकादमीच्या मंडळावर होते. ही मंडळी निष्पक्षपणे पुरस्कारासाठी लेखक-कवींची निवड करतात व एका शानदार सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करतात.
मी १४ फेब्रुवारी २०१२ रोजी दिल्लीला झालेल्या पुरस्कार सोहळ्यास मुद्दाम गेलो होतो, कारण कविवर्य ग्रेस यांना यावर्षी हा पुरस्कार दिला गेला. खरं तर हा पुरस्कार ग्रेस यांना पंधरा-वीस वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता असं त्यांच्या सार्‍याच चाहत्यांना वाटत होतं पण या विलंबाच्या कारणांचा शोध घेणं हा या लेखनाचा विषय नाही.
या विलंबामुळे कविराज अंतर्यामी दुखावलेले होतेच पण अकादमीच्या निमंत्रणाचा आदर करून ग्रेस समारंभासाठी पोचले. ग्रेस गेली दोन-अडीच वर्षे कर्करोगाशी लढत आहेत. रोगानं दोनदा हल्ला केला तरी ते हिंमत हरले नाहीत. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील सर्वांचे साहाय्य लाभल्यानेच मृत्यूच्या दारातून परतताना ग्रेस म्हणतात, ‘माझे देवाघरचे नियोजित मरण येण्याच्या अगोदर मला उचलू नकोस अशी देवाघरची विनंती मी ह्रदयनाथ मंगेशकर व डॉ. धनजंय केळकर यांना केली.’
उपचारानंतर जीवघेण्या वेदनांनी विकल झालेल्या ग्रेसना पुणे-दिल्ली प्रवास झेपेल का? हाच मोठा प्रश्न होता. अगदी आदल्या दिवसापर्यंत त्यांची प्रकृती काळजी करण्यासारखी होती. कबीरासारख्या या फक्कड कवीने दुखण्याचीही पर्वा केली नाही व ते दिल्लीला आले. अकादमीने त्यांच्या प्रवास व निवासाची व्यवस्था केली होती. व्यवस्था म्हटलं की त्यात यांत्रिकता येत असावी. त्यात वैयक्तिक आपुलकी-आदराचा अभावही येत असावा. ग्रेस यांना सोहळ्यात व्हीलचेअरवरुन व्यासपीठावर आणावं लागलं.
एरवी ग्रेस यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या संपर्कात येणार्‍यांच्या मनात आदरयुक्त धाक निर्माण करणारं आहे पण त्या दिवशी अकादमीच्या व्यासपीठावर त्यांची अवस्था पाहावत नव्हती. त्यांची स्थिती पुरस्कार घेण्यासाठी उठून चार पावलं पुढं येण्यासारखीही नव्हती. मान्यवरांनी त्यांच्या व्हीलचेअरजवळ जाऊन त्यांचा सन्मान केला.
भारतातील सर्व भाषांतील प्रतिभावंतांना एका समारंभात व्यासपीठावर आणण्याची कल्पना, खरं तर चांगलीच आहे. पण ते करताना मर्यादा पडतात. अकादमी या निमित्तानं अतिशय देखणा अंक छापते. सभागृहात प्रत्येकाला तो अंक मिळतो. त्यात एका पानावर हिंदीत व शेजारच्या दुसर्‍या पानावर इंग्रजीत त्या कवी-लेखकाचा व त्याच्या साहित्यातील कर्तृत्त्वाचा परिचय अगदी नेमक्या शब्दांत छापलेला असतो. त्या त्या भाषेतील जाणकार सर्व तपशील पुरवतात, पण छपाई करणार्‍या मंडळींना सर्व भाषांचा परिचय नसतो. अनुवादक जो अनुवाद करून देईल तो छापला जाणार! इतर भाषांचं सांगत नाही पण ग्रेसविषयी जे छापलं होतं ते वाचताना कपाळाला हात लावायचीच वेळ आली. ‘ळ’ हा वर्ण हिंदीत नाही. म्हणून ‘संध्याकालच्या कविता’ ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’चे भाषांतर ‘सांजभयाचे सजनी’ वाचल्यावर हसावं की रडावं ते कळलं नाही. वार्‍याने हलते रान ऐवजी ‘वार्याने’ छापलं आहे कावळे चं कावले होणार यात नवल काही नाही. राजपुत्र आणि डार्लिंग छापताना ‘आणि’चं  ‘ऊनी’ झालं आणि अशा अनेक चुका त्या त्या भाषेचा जाणकार प्रुफरिडिंगला तिथं असण्याची अपेक्षाही करता येत नाही. ते असो. या दोन पृष्ठांवर त्या त्या व्यक्तीच्या जीवनातील काही फोटोही आवर्जून छापले आहेत. हे सारं छानच आहे. हे सर्व मिळवण्यासाठी, जुळवण्यासाठी व त्याचा ‘ले-आऊट’ करण्यासाठी केवढा खटाटोप करावा लागला असेल याची कल्पना येते.
समारंभात झालं काय-स्वागत, प्रास्ताविक, सारं काही छान झालं, नेमकं झालं. सर्वांना नावांच्या अकारविल्हे स्टेजवर बसण्याची व्यवस्था होती व पुरस्कार त्याच क्रमाने दिले गेले. ‘म ’मराठीचा आल्यावर ग्रेसना पुरस्कार मिळाला! पुरस्कार देण्यापूर्वी निवेदक हिंदीत किंवा इंग्रजीत छापलेला परिचय वाचून दाखवणार व मान्यवर त्या त्या व्यक्तीला शाल पांघरून हातात पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व पुरस्काराचा धनादेश देणार. आता यात चूक काही नाही. असं होणं क्रमप्राप्त आहे. पण या कार्यक्रमाची सर्वात मोठी मर्यादा- दोष नको म्हणुयात –अनोळखीपणा! आपण आपल्या शहरात असा गौरवसमारंभ पाहतो तेव्हा आयोजकांना उत्सवमूर्तीचा परिचय असतो;  त्याच्या कर्तृत्वाची माहिती असते. सभागृहात बहुतांश लोक त्या व्यक्तीच्या सन्मानसोहळ्यात उपस्थित राहण्यासाठीच येतात. त्यामुळे एकूणच त्या समारंभात सर्वांच्या मुद्रेवर कौतुकाचा व आदराचा भाव असतो. खरं तर, अनेक वेळा ज्याचा गौरव असतो तो काही फार मोठा कर्तृत्ववान नसतो. ती त्याच्याविषयी वाटणार्‍या  आपुलकीची एक छोटी पावती असते. पण ती सर्वांना आनंददायी असते!
अकादमी पुरस्कार सोहळ्यात तसं होत नाही. ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिलेला असतो ती व्यक्ती त्या लेखकाला व्यक्तिश: ओळखत नसते. त्यामुळे सरकारी निवेदन वाचल्यासारखं तो परिचय असतो. देण्याघेण्याची ही क्रिया यांत्रिकपणे होते. प्रत्यक्षात धनादेशाचा लिफाफा स्मृतिचिन्हाच्या पुढेच येतो. फोटोग्राफरला योग्य ‘पोज’ देण्यासाठी होणारी धावपळही न बघण्यासारखीच होती. सामान्यत: सन्मान झाल्यावर ती व्यक्ती आपले मनोगत व्यक्त करते. कृतज्ञता व्यक्त करते. या समारंभात तसे झाले नाही म्हणजे तसे करणे शक्य नव्हते. बावीसच्या बावीस जणांना बोलण्याची संधी देणे अव्यवहार्यच आहे. त्यांपैकी दोघा-चौघांना बोलायला सांगणे म्हणजे इतरांवर अन्याय व ही निवड तरी कशी करणार? हे सारेच प्रश्न असतात. कोणतेही उत्तर नसलेले!
शब्दांच्या सम्राटांना नि:शब्दपणे आपला सन्मान स्वीकारावा लागला!

ग्रेस यांना हा पुरस्कार खूप उशिरा मिळाला हे शल्य त्यांच्या मनात आहे व ते अगदी थेट व स्पष्ट शब्दांत व्यक्तही करतात.
 

समारंभात सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे समारंभ संपल्यावर व्हीलचेअरवरील कविराजांची कोणी दखलच घेतली नाही! त्यांना व्यासपीठावरून खाली उतरणे कठिण होते. त्यांचे जामात व्हीलचेअरसह गेटपर्यंत गेले व टॅक्सी शोधायला बाहेर पडले. इतक्या विकल अवस्थेतील कवीला त्यांच्या निवासस्थानी सोडण्यासाठी काहीही व्यवस्था नव्हती व त्याची कोणालाही चिंता नव्हती, आस्था नव्हती!
सुसज्ज सभागृह, अल्पोपाहाराची छान व्यवस्था, व्यासपीठाची सजावट, सारं काही छान होतं, शानदार होतं पण त्यात काही जान नव्हती.

एवढा मोठा पुरस्कार घेण्यास हा ग्रेट कवी-ग्रेस गेला पण त्याच्या समवेत कोण होतं? त्यांचे जावई श्री वल्लभ व दुसरा मी-अविनाश बर्वे. कार्यक्रम संपल्यावर कळलं की नागपुराहून श्री व सौ साठेही आले! इतर प्रत्येक भाषेतील लेखक-कवी बरोबर पाचपन्नास लोक होतेच. नातेवाईक, मित्र व त्या त्या भाषांचे अभिमानी ग्रेससाठी कोणीच का आलं नाही? हा कार्यक्रम काही अचानक योजला गेला नव्हता. मराठी साहित्य परिषद, विदर्भ साहित्य मंडळ किंवा नागपुरातील साहित्यविषयक संस्था यांच्या पैकी कोणीच का आलं नाही!
 

ग्रेस म्हणतात ‘मी महाकवी दु:खाचा’, तेही खरं. दखल न घेणारे परिचित भोवती असणं म्हणजे मग ‘भय इथले संपत नाही’ असं कवीला वाटणंही स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. पुणे-मुंबई-महाराष्ट्रातून कवी ग्रेसच्या पुरस्कार सोहळ्यास कोणीच का गेले नाही?  याचा आपणच विचार करायला हवा अशा उद्विग्न मनस्थितीतून ‘ओल्या वेळूवरची बासरी’च्या मनोगतात ते म्हणत असावेत, ‘म्हणूनच तर माझ्या मृत्यूनंतरची माझ्या कवितेची व्यवस्था मी केव्हाच करून ठेवली आहे’!

घरभर सरणाचे पात्र सांडूनि जाई

फिरुनी फिरुनी माझा वंश निर्वंश होई

प्रत्यक्षात ग्रेसना हे लिहिताना काही वेगळेच म्हणायचे असेल पण त्यांची मनस्थिती अशी काहीशी  झाली असावी असे मला वाटते.

अविनाश बर्वे.

कवी ग्रेस यांची पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा……

कवी ग्रेस यांच्‍यावरील माहितीपट – 1

कवी ग्रेस यांच्‍यावरील माहितीपट – 2

ग्रेस यांसंबंधी इतर लेखन

ग्रेस मराठी साहित्यातले खरे ‘माणिक’

‘ग्रेस’ नावाचं गर्द रानात हरवलेलं स्टेशन… .

हे दु:ख कुण्या जन्माचे अकादमीला बिलगुन यावे!

ग्रेस यांच्‍या कविता –

घर थकलेले संन्यासी .

मरण

ग्रेस यांच्‍या कविता

About Post Author