देशातील आदर्श महापालिका प्रभाग डोंबिवलीत; राजकारणाला छेद!

0
46

माणूस नगरपालिकेत निवडून गेला की राजकारणात रमतो आणि नगरसेवकपदातील
सेवाभाव विसरतो. डोंबिवलीच्या मंगला सुळे यास अपवाद ठरल्या, त्यांनी वेळ आली
तेव्हा पक्ष सोडला, पण आपल्या प्रभागाचा विकास नागरी भावाने साधला..


स्वयंसेवा : व्यक्तिनिष्ठा

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची इच्छाशक्ती प्रत्येक लोकप्रतिनिधीने दाखवली तर सर्व विभागांत नंदनवन फुलेल. मग निवडणुकीत अशा लोकप्रतिनिधीची कदर करत, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत नागरिक त्यांना निवडून देतील आणि निवडणूक काळात उमेदवार निवडण्यापूर्वी आणि त्यांना ‘निवडून’ आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींना, नेत्यांना बाकी सर्व कामे सोडून स्थानिक पातळीवर तळ ठोकून बसण्याची गरज उरणार नाही !

देशातील आदर्श महापालिका प्रभाग डोंबिवलीत;

राजकारणाला छेद!

– ज्योती शेट्ये

मंगला सुळेनगराची अस्वच्छता आणि वाईट रस्ते हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. मेकअपने चेहर्‍यावरचे डाग बुजवावेत तसे बहुतेक रस्ते खडी-डांबर वगैरे टाकून तात्पुरते खड्डेरहित करण्यात आले आहेत. पण डोंबिवलीमध्ये एक प्रभाग (वॉर्ड) असा आहे, की जो ह्या विपरीत नियमाला अपवाद आहे. त्याला स्वच्छता व नेटके व्यवस्थापन यासाठी ISO प्रमाणपत्र प्राप्‍त झाले आहे! टिळकनगर, प्रभाग क्रमांक ९५ हा महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्येही असा दर्जा मिळवणारा एकमेव प्रभाग आहे आणि त्याचे श्रेय इथले नागरिक नि:संकोचपणे नगरसेवक मंगला सुळे ह्यांना देतात ! तथाकथित राजकारणात असूनही ह्या महिला नगरसेवक समाजसेवेला महत्त्व देतात.  

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २००० च्या निवडणुकीत टिळकनगर प्रभाग राखीव मतदारसंघ ठरला आणि जन्माने ओबीसी असलेल्या मंगला सुळे यांना नगरसेवक होण्याची संधी चालून आली! निवडणूक लढवावी ही त्यांच्या पतिराजांची इच्छा होती म्हणे. पण या उपक्रमातून मंगला सुळे यांचे व्यक्तिमत्त्व बदलून गेले. त्या भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आल्या. त्या सर्वसाधारण गृहिणी होत्या, नोकरी करत होत्या. काही प्रमाणात आव्हान म्हणून, त्यांनी ही संधी स्वीकारली. पक्षाकडेही विशिष्ट जातीचा उमेदवार नव्हता. समसमा संयोग झाला निवडून येताच मात्र, त्यांनी टिळकनगर परिसर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या स्वत:च्या घरासमोरच असलेल्या कचराकुंडीच्या उच्चाटनाने ह्या कामाला सुरूवात झाली. त्या वेळेपासून, दिवसातून दोनदा ठरावीक वेळी येणार्‍या घंटागाडीकडून कचरा नेण्याची रीत पडली. सुका कचरा, ओला कचरा असे विघटन होऊ लागले. ह्या प्रकल्पामुळे काहींना रोजगार मिळाला. नागरिक, सफाई कामगार, महानगरपालिकेचे अधिकारी ह्यांच्या समन्वयातून, सहकार्यातून प्रकल्प यशस्वी होत गेला. वॉर्डातील सर्व कचराकुंड्यांचे उच्चाटन झाले. त्यामुळे कुत्र्यांचा त्रास कमी झाला. पिण्याचे पाणी, सांडपाणी, मल:निस्सारण या वाहिन्या एका मागोमाग बदलल्या गेल्या. हे प्रश्न पुढील पन्नासएक वर्षांसाठी तरी उरलेले नाहीत! नियम मोडणार्‍यावर दंडात्मक कारवाई होते. मंगला सुळे यांनी जाणिवपूर्वक आणि खंबीर राहून, जिद्दीने पावले उचलून हे सर्व घडवून आणले.

२००५ च्या निवडणुकांमध्ये हा प्रभाग खुल्या गटात गेला आणि भाजपने पक्षीय राजकारणात मंगला सुळे यांना तिकिट नाकारले, पण एव्हाना मंगला सुळे यांनी लोकांचा विश्वास संपादन केला होता. सुळे यांनी पुन्हा उभे राहवे अशी नागरिकांची इच्छा होती. राजकीय पक्ष आणि लोक यांचे संबंध किती तुटले आहेत, बघा! सुळे ह्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. नागरिकांनी त्यांना त्यांच्या कामाची पावती देत पुन्हा निवडून आणले!

टिळकनगर स्वच्छ आणि सुंदर बनवणे, त्यासाठी आय्.एस्.ओ. प्रमणापत्र मिळवणे हा त्यांच्या कामाचा पुढचा टप्पा ठरला. नऊ मीटर रस्ता, स्वच्छता, भूमिगत सुविधांचे नियोजन, विद्युत- पुरवठा व्यवस्था, फूटपाथ, धुळीचे प्रमाण, तक्रारीची सोडवणूक करण्याचे प्रमाण इत्यादी विविध निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात येते. ‘क्यूएस्एस्’ या संस्थेने सर्वेक्षण केल्यानंतर २००७मध्ये या प्रभागाला ISO ९००१-२००० दर्जा प्रमाणपत्र प्रदान केले गेले. आयएसओ (ISO) ची निरंतरता कायम राखण्यासाठी या संस्थेकडून महापालिका अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांना सहा महिने प्रशिक्षणही देण्यात आले आहे. महापालिकेने आर्थिक भार उचलण्याचे नाकारले, पण नागरिकांनी पुढाकार घेऊन, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्कम उभी केली. हे सर्टिफिकेट मिळवताना त्यांना टिळकनगर उत्कर्ष मंडळाचे संस्थापक रा.पु.दिघे व त्या संस्थेचे कार्यकर्ते, महापालिका आयुक्त आणि अन्य अधिकारी व नागरिक ह्या सर्वांचे सहकार्य लाभले असे मंगला सांगतात.

त्यांनी अन्य कामांतही पुढाकार घेतला. बंद पडलेल्या सार्वजनिक आरोग्य केंद्राचे रूपांतर सुसज्ज वाचनालयात करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, टाटा पॉवर लाईनखालील मोकळ्या आणि वाया जात असलेल्या जागेवर सुंदर बगिचा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सर्वत्र बाके, हौशी छायाचित्रकारांसाठी खुले कलादालन असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांनी गरीब व गरजू महिलांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.  त्यांच्याच संकल्पनेतून येथील इमारतींना ठरावीक क्रमांक देण्यात आले आहेत व त्यामुळे प्रभागातील पत्ता सहज मिळून बिले, पत्रे वगैरेंचे वितरण बिनचूक होते. सुळे ह्यांचा सर्व नागरिकांबरोबर सहज संवाद आणि संपर्क सतत असतो.

टिळकनगर प्रभागाला राज्यशासनाचा पाच लाख रुपयांचा संत गाडगेबाबा पुरस्कार मिळाला आहे आणि महापालिका क्षेत्रातील प्रथम पुरस्कार तीन वेळा प्राप्त झाला आहे. ह्या पुरस्कारांच्या रूपाने गोळा झालेल्या अकरा लाख रुपये निधीचा विनियोग प्रभागाने स्वत:ची घंटागाडी खरेदी करण्यासाठी केला आहे. संधीचे सोने करून दाखवणार्‍या मंगला सुळे ह्यांचा ‘टिळकनगर-प्रभाग क्रमांक ९५’ हा एक रोल मॉडेल ठरला आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची इच्छाशक्ती प्रत्येक लोकप्रतिनिधीने दाखवली तर सर्व विभागांत नंदनवन फुलेल. मग निवडणुकीत अशा लोकप्रतिनिधीची कदर करत, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत नागरिक त्यांना निवडून देतील आणि निवडणूक काळात उमेदवार निवडण्यापूर्वी आणि त्यांना ‘निवडून’ आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींना, नेत्यांना बाकी सर्व कामे सोडून स्थानिक पातळीवर तळ ठोकून बसण्याची गरज उरणार नाही !

– ज्योती शेट्ये
भ्रमणध्वनी : 9820737301
jyotishalaka@gmail.com

About Post Author

Previous articleमराठी अस्मिता !
Next articleनव्वदीच्या तरुणांची ‘टेबल टेनिस’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.