देवीदेवतांपासून भ्रष्टाचार

0
29

–  गंगाधर मुटे

  निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडवला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी एक शारीरिक विशेष गुण किंवा अवयव दिला आहे. मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही. त्याऐवजी त्‍याला बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा देऊन टाकले आहे! आणि इथेच खरी मेख आहे. हे व्यक्तीनिहाय स्वातंत्र्य हेच मानवजातीच्या सबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे, आणि या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे.


–  गंगाधर मुटे

     भ्रष्टाचार पूर्वीच्या काळी अस्तित्वात नव्हता असे समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते असे जर कोणी सांगत असेल तर ती लबाडी आहे. कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्यजातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्यजातीच्या जन्माच्या आधीपासून अस्तित्वात होता! देवदेवता ही लाचखोरीची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वत:ची नैतिक मूल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो, असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मीळ नाही. मात्र बिनाधूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.

     काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यांसारख्या प्राण्यांचा बळी द्यावा लागतो. त्यांपैकी काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. त्यांना नरबळीखेरीज दुसरे काहीच चालत नसे. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पूजाअर्चना न केल्यास प्रसन्न होत नाहीत, पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाहीत. अशा तर्‍हेच्या, ‘प्रसन्न देवता’ या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते – ‘आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा.’ मात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे ‘ओंगळ देवता’ या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. त्यांच्या लेखी याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. त्यांची पूजा ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा करावीच लागते. दहीभात, मलिदा, कोंबडी, बकरी यांपैकी काही ना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो.

     निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडवला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काही ना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गुण किंवा अवयव दिला आहे, की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघ-सिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्ष्यांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडून स्वत:चे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरज भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणिहत्या मानली जात नाही आणि त्यांना निसर्गाने तशी मुभा दिलेली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही.

     मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही, की तो त्याच्या साहाय्याने स्वत:ची शिकार स्वत: मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यांपैकी जरी काहीही दिलेले नसले तरी त्याऐवजी बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा देऊन टाकले आहे! आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहाय स्वातंत्र्य हेच मानवजातीच्या सबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे. बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करण्याची गरज भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरज भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीत राहिले असते.

     अनेक मानवी जिवांच्या समुच्चयातून समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जिवाने व्यक्तिगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोचेल अशी हालचाल करणे म्हणजे अनैतिकता, अशी ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या.

     एखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजाला पीडादायक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायिभाव असल्याने आणि मनुष्यप्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे-जेथे संधी मिळेल तेथे-तेथे लपतछपत चौर्यकर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृती काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्य़ा मार्गाने व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

     विविधता हा निसर्गाचा मुख्य गुण असल्याने जन्माला येणारी माणसेही जन्मत: नानाविध प्रवृत्तीची असतात. काही माणसे निष्कलंक चरित्र्याची असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषय़ी सन्मान असतो. काही माणसे समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत, पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात. काही माणसांच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते, पण ती कायद्याला अत्यंत घाबरणारी असतात. मात्र माणसांचा एक वर्ग असाही असतो, की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो.

     मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचारधार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तिनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे हे सहज समजून येईल.

गंगाधर मुटे- पत्ता : अर्वी छोटी, तहसील हिंगणघाट, जि. वर्धा

संबंधित लेख –
गणेशभक्ती आली कोठून?
देवाचे गौडबंगाल

About Post Author

Previous article‘इशान्य वार्ता’
Next articleओवळेकरांची फुलपाखरांची बाग !
डॉ. गंगाधर बुवा हे सावंतवाडीचे राहणारे. ते 1997 सालापासून 'यशवंतराव चव्‍हाण महाराष्‍ट्र मुक्‍त विद्यापीठ' नाशिक, येथे केंद्र संयोजक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी आजपर्यंत भाषा, साहित्‍य, इतिहास, सांस्‍कृतिक संरचना, पर्यावरण, ग्रंथालय चळवळ या विषयांवर विविध नियतकालिकांमधून तीनशेहून अधिक लिहिले आहेत. त्‍यांचे 'सावंतवाडी संस्‍थान', 'राजमाता', 'राजेसाहेब', 'मॉंसाहेब', 'कोकणातील देवदेवस्‍कीची देवस्‍थाने' अशी अनेक पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यासोबत त्‍यांनी काही दिवाळी अंक आणि स्‍मरणीका यांचे संपादनही केले आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सार्वजनिक ग्रंथालय उभारण्‍यात त्‍यांचा सहभाग होता. त्‍यांच्‍या कामाबद्दल त्‍यांना 'आदर्श ग्रंथपाल', अखिल भारतीय मराठी वाङ्मय मंडळाचा 'उत्‍कृष्‍ठ वाङ्मय पुरस्‍कार', 'राजमाता ग्रंथमित्र पुरस्‍कार' अशा अनेक पुरस्‍कारांनी गौरवण्‍यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422054978 / 02363 273478

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here