देवगिरीचे यादव साम्राज्य

4
88

यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज समजत. यादव शासक राष्ट्रकूट व चालुक्य यांचे सामंत होते.

त्या वंशाचा संस्थापक दृढप्रहार होता. त्याने व त्याचा पुत्र सेऊणचंद्र (इसवी सन ८८० – ९००) यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व राष्ट्रकूट सत्तेतील अराजकाचा फायदा घेऊन निर्माण केले. पाचवा भिल्लम (११७३ – ११९२) याने स्वतंत्र यादव सत्तेची स्थापना केली. त्याने त्याची राजधानी सोमेश्वर चौथा या चालुक्य शासकाचा पराभव करून देवगिरी (दौलताबाद) येथे स्थापन केली. भिल्लमच्या मृत्यूनंतर पहिला जैतुगी व दुसरा सिंघण (सिंघणदेव इसवी सन १२०० – १२४७) सत्तेवर आले. दुसरा सिंघण याच्या काळात यादव सत्ता परमोत्कर्षास पोचली. सिंघणाने उत्तरेस गुजराथचे चालुक्य व माळव्याचे परमार यांच्या विरूद्ध आक्रमणे केली. संगीततज्ज्ञ ‘सारंगदेव’ त्याच्या दरबारी होता. त्याने ‘संगीतरत्नाकर’ हा ग्रंथ लिहिला. सिंघणदेवने त्याच्या ग्रंथावर टीका लिहिली होती. ज्योतिषी चांगदेव हाही त्याच्या आश्रयास होता.

सिंघणानंतर कृष्ण (१२४७ -१२६१) व महादेव (१२६१ -१२७१) हे राजे होऊन गेले. ते कला-साहित्याचे भोक्ते होते. त्यानंतर रामचंद्र ऊर्फ रामदेवराय (इसवी सन १२७१ -१३१२) सत्ताधीश बनला. त्याचवेळेस अल्लाउद्दिन खिलजी याने गुजराथ व माळवा येथील मोहीम हाती घेतली. त्याने दक्षिण मोहीम काढून होयसळांचाही पराभव केला. त्याने १२९४ मध्ये देवगिरीवर स्वारी करून संपत्ती लटून नेली. खिलजीच्या सैन्याने मलिक कफूरच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर पुन्हा आक्रमण केले. रामदेवराय याच्यानंतर तिसरा सिंघण/शंकर (इसवी सन १३१२) सत्तेत आला. त्याने खिलजींचे आधिपत्य अमान्य केल्याने खिलजींनी पुन्हा त्याच्यावर आक्रमण केले व सिंघणाला ठार केले. त्यानंतर रामचंद्रदेवाचा जावई हरपालदेव गादीवर आला. पण मुबारक खिलजीने त्याचा पराभव करून यादवांची राजवट (१३१८) संपुष्टात आणली.

यादवकालीन राजतंत्रावर राष्ट्रकूट व चालुक्य यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा प्रभाव होता. यादव शासकांनी पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, चक्रवर्ती अशा मोठमोठ्या पदव्या धारण केलेल्या दिसतात.

यादवकाळात कृषी, उद्योग व व्यापार यांचा विकास झाला. पैठण, ब्रह्मपुरी, तेर, चौल, दौलताबाद ही महत्त्वाची व्यापारी व उत्पादन केंद्रे होती. शेतीची मालकी व्यक्तिगत असली तरी तीवर नियंत्रण गावाचे असे. अल्लाउद्दिन खिलजीच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे उत्तरेशी संपर्कात वाढ झाली.

यादव कालात मराठीत लिखित साहित्य निर्माण होऊ लागले. गोरक्षनाथांच्या ‘अमरनाथ संवादा’पासून त्याची सुरुवात झाली. हेमाद्रीचे ‘चुर्वर्ग चिंतामणी’, ज्ञानेश्वरांचे ‘अमृतानुभव’ व महानुभाव वाङ्मय हे यादव काळातील साहित्य. मुकुंदराजने लिहिलेल्या ‘विवेकसिंधू’तून मराठी साहित्याचा प्रवाह सुरू झाला. महानुभाव पंथाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. यादवांनी मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरला. वारकरी व महानुभाव या दोन पंथांबरोबरच जैन, नाथ, लिंगायत हे पंथ त्याकाळी महाराष्ट्रात रुजले. यादव काळात देवगिरी, पैठण, नाशिक ही विद्याकेंद्रे होती. शिक्षणाचे माध्यम संस्कृत असे. समाजात कर्मकांडांचे प्राबल्य वाढले होते.

हेमाडपंथी पद्धतीच्या बांधकामांना यादव काळात सुरुवात झाली. महादेव मंदिर (परळी), जबरेश्वर (फलटण), गोंडेश्वर (सिन्नर), महादेव मंदिर (झोडगे) इत्यादी मंदिरांत हेमाडपंथी तंत्राचा वापर झालेला दिसतो. त्या मंदिरांच्या बांधकामात चुना अथवा माती वापरली गेली नाही.

देवगिरी यादवांच्या राज्यकाळात वैभवाच्या शिखरावर होते. मार्को पोलोने इसवी सनाच्या तेराव्या शतकातील देवगिरीचे व्यापारी वैभव लिहून ठेवले आहे. त्या काळी ते नगर सर्व प्रकारच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. तेथे जवाहराचा व्यापार विशेष चालत असे. हिरे-माणकांना पैलू पाडण्याचे आणि सोन्या-चांदीच्या व इतर कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे काम तेथे चाले. त्या वेळी अन्यत्र न मिळणाऱ्या अपूर्वाईच्या वस्तू मिळवण्यासाठी लोक मुद्दाम देवगिरीला येत असत (गोविंदप्रभू चरित्र २९३). देवगिरीजवळ वेरूळच्या रस्त्यावर कागजपुरा हे हातकागद बनवण्याचे केंद्र आहे. पोथ्या लिहिण्यासाठी गेली तीन-चार शतके वापरला जाणारा दौलताबादी कागद तेथे तयार होतो.

देवगिरी ही यादवांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असली तरी तेथील किल्ला मात्र यादवांच्या उदयापूर्वी राष्ट्रकुट राजा कृष्ण याने बांधलेला आहे.

(आधार – महाराष्ट्र वार्षिकी, भारतीय संस्कृतिकोश)

About Post Author

4 COMMENTS

  1. यादवकाळाची सुंदर माहिती. या…
    यादवकाळाची सुंदर माहिती. या रोजच्या माहितीचे पुस्तकरूपाने प्रकाशन करा.आवश्यक आहे. रोज खूप छान माहिती असते.

  2. यादव साम्राज्य चा इतिहास…
    यादव साम्राज्यचा इतिहास दुर्लक्षीत राहीला तो जगासमोर यावा. यादव साम्राज्य नष्ट झाले. त्या४००वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य निर्माण केले.

  3. यादवांच्या काळात असंख्य…
    यादवांच्या काळात असंख्य मंदिरे निर्माण करण्यात आली ही मंदिरे यादवांच्या आश्रयाने बांधलीगेली

Comments are closed.