दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील

0
18
अरूण साधू यांनी लिहीलेल्या विठ्ठलरावांवरील चरित्र ग्रंथाचे मुखपृष्ठ

मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्‍यासाठी तो दिवस अत्‍यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर अरूण साधू यांनी लिहीलेल्‍या ‘दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील’ या दिर्घ इंग्रजी चरित्र ग्रंथाचा प्रकाशनसोहळा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्‍टेकसिंग अहलुवालिया यांच्‍या हस्‍ते दिल्‍लीत पार पडत होता. या पुस्‍तकाचे प्रकाशन ‘रोहन प्रकाशन’ या मराठी संस्‍थेकडून करण्‍यात आले आहे. रोहन प्रकाशनने इंग्रजी प्रकाशन क्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवले असून अरूण साधू लिखित हे पुस्‍तक प्रकाशित होणे हा त्‍यांच्‍यासाठीही तेवढाच महत्‍त्‍वाचा क्षण होता.
‘‘स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भारताचा विकास करणे, हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. अशावेळी प्रवरानगरसारख्या ग्रामीण भागात विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतक-यांना एकत्र आणून सहकाराचा मूलमंत्र दिला. त्यांनी केलेल्या या प्रयोगाचे पुढे देशभर व्यापक अनुकरण झाले व ग्रामीण विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली’’, असे गौरवोद्गार अहलुवालिया यांच्‍याकडून करण्‍यात आले. जागतीक अर्थव्‍यवस्‍थेत मोठे बदल होत असताना साठ वर्षांपूर्वीच्या ज्‍या सहकारी उद्योगाच्या प्रयोगामुळे ग्रामीण महाराष्‍ट्रात मोठी क्रांती घडून आली, त्‍या प्रयोगाची माहिती तरुण मुलांना झाली पाहिजे आणि यासाठी हे पुस्तक पुढील पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करु शकेल असे त्‍यांनी सांगितले. तर ख्यातनाम पत्रकार आणि ‘दिव्‍य मराठी’ या वृत्‍तपत्राचे संपादक कुमार केतकर यांनी गतशतकातील महाराष्ट्राचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सामाजिक व सांस्कृतिक चळवळी समजून घ्यायच्या असतील तर अभ्यासकांना हा ग्रंथ अत्यंत उपयोगी ठरेल, असे म्‍हटले.
दिल्ली येथे एका समारंभात नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ मॉन्टेकसिंग आहलुवालिया यांच्या हस्ते 14 डिसेंबर 2011 रोजी या ग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब सभागृहात आयोजित करण्‍यात आलेला हा कार्यक्रम अनेक जाणकार मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
1997 साली विठ्ठरावांच्‍या जन्‍मशताब्‍दीच्‍या समयी त्‍यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी अरूण साधू यांना विठ्ठलरावांवर ग्रंथ लिहीण्‍याची विनंती केली. साधूंनाही त्‍याचा मोह झाला, मात्र त्‍यानंतर ते दुस-या कामांत व्‍यग्र झाल्‍याने हा ग्रंथ लिहीण्‍याचे काम बाजूला पडले. दरम्‍यान बाळासाहेबांनी साधूंचा पिच्‍छा सोडला नाही. त्‍यांनी अरूण साधूंच्‍या वारंवार भेटी घेऊन विठ्ठरावांवरील माहिती पुरवणारी काही पुस्‍तके त्‍यांना दिली. त्‍यानंतर 2006-07 च्‍या सुमारास अरूण साधू यांनी हा ग्रंथ लिहीण्‍याचे काम हाती घेतले. या पुस्‍तकाबद्दल अरूण साधू आपले विचार मांडताना म्‍हणाले, की हे पुस्‍तक म्‍हणजे महाराष्‍ट्रातील ग्रामीण माणसाच्‍या विकासाचा इतिहास आहे. त्‍यामध्‍ये आर्थिक वाद येतात, त्‍याचप्रमाणे सांस्‍कृतिक, रा‍जकिय आणि सामाजिक वादही घडतात. या सर्वांगीण घुसळणीतून निर्माण झालेला माणूस म्‍हणजे विठ्ठलराव विखे पाटील. त्‍यांनी अत्‍यंत आदर्श अशा सहकारी साखर कारखान्‍याची निर्मिती केली. इतर साखर कारखाने अजूनही त्‍यांचा आदर्श ठेवतात. साखर कारखान्‍यातून केवळ सहका-यांनाच फायदा न होता त्‍याचा लाभ सर्वांना व्‍हावा यावर विठ्ठलरावांनी कटाक्ष ठेवला. दारिद्र्यात पिचलेल्‍या शेतक-यांसाठी साखर कारखान्‍याची निर्मिती करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी नेहमीच ध्‍यानात ठेवले. त्‍यासाठीच त्‍यांनी मोठ्या बागाईतदारांना कारखान्‍यात गुंतवणूक करू दिली नाही. कारखान्‍यातून संपत्‍ती निर्माण होऊ लागली, तर त्‍याचा फायदा सगळ्यांना व्‍हायला पाहिजे याकडेही त्‍यांनी लक्ष पुरवले. अडाणीपणा आणि निरक्षरता या दोन गोष्‍टी शेतक-यांच्‍या दीन अवस्‍थेला कारणीभूत त्‍यांचे आहेत हे त्‍यांना ठाऊक होते. त्‍यासाठी त्‍यांनी शेतक-यांना शेतीसह हिशोबही शिकवले. शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणासहीत अनेक सामाजिक कार्यासाठी फंड तयार केले. मुलांनी इंग्रजीतून शिक्षण घ्‍यावे, याचा उच्‍चार ते 1920 पासून करत असत. पुढे जाऊन त्‍यांनी इंग्रजी शिक्षणासहीत तांत्रिक शिक्षणाचाही प्रसार केला. विठ्ठलरावांच्‍या प्रयत्‍नांमुळे शेतक-यांची शेती‍वरील निष्‍ठा वाढली. त्‍यातून समृद्धी आली. ही समृद्धी आसपासच्‍या गावात पसरली. सोबत शिक्षणाचा प्रसारही वाढला. विठ्ठरावांच्‍या एका कारखान्‍याच्‍या अनुकरणातून अनेक कारखान्‍यांची निर्मिती झाली आणि पश्चिम महाराष्‍ट्राचे स्‍वरूप बदलले.’’
‘दि पायोनियर – लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील’ या 623 पानांच्‍या ग्रंथास ख्यातनाम पत्रकार कुमार केतकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्याशिवाय बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर परखड विचार व्यक्त करणारे प्रदीर्घ मनोगत लिहिले आहे. या ग्रंथाचे लवकरच मराठीतील रुपांतर प्रसिद्ध होणार आहे. ग्रंथ पुणे येथील रोहन प्रकाशन या संस्थेचे प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशित केला आहे.
या पुस्‍तकाबद्दल आपले विचार मांडताना प्रकाश प्रदीप चंपानेरकर म्‍हणाले, की ‘‘सहकारी साखर कारखान्‍यांची चळवळ सुरू करणारे विठ्ठलराव हे भारतातील पहिले व्‍यक्‍ती होते. त्‍यांनी निर्मिलेला साखर कारखानाही देशातील पहिलाच. मात्र विठ्ठरावांबद्दलची समग्र माहिती कुठल्‍याच पुस्‍तकात उपलब्‍ध नाही आणि जी माहिती उपलब्‍ध होती ती फारच थोडक्या स्‍वरूपात होती. त्‍यामुळे अशा कर्तृत्‍ववान व्‍यक्‍तीची माहिती लोकांपर्यंत पोहचवणं आवश्‍यक होतं. त्‍यातूनच हे पुस्‍तक घडलं. लेखक अरूण साधू यांनी विठ्ठलरावांवर दोन ते अडीज वर्षे संशोधन केले. त्‍यामुळे विठ्ठलरावांचे हे सर्वात ऑथोराईज चरित्र म्‍हणता येईल. बाळासाहेब विखे पाटील यांनाही हे पुस्‍तक करायचे होते. त्‍यामुळे ही माहिती गोळा करण्‍याच्‍या दृष्‍टीने एक फॉर्मल स्‍वरूप आले. विठ्ठलरावांचे कार्य पूर्ण देशासमोर येण्‍याच्‍या दृष्‍टीने हे पुस्‍तक इंग्रजीत आणणं गरजेचं होतं. येत्‍या सहा महिन्‍यात हे पुस्‍तक मराठीतही प्रसिद्ध होईल, असे चंपानेरकर यांनी सांगितले.
दिल्‍ली येथे झालेल्‍या या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन सभारंभाला मॉन्‍टेकसिंग आहलुवालिया, यांसह केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रफुल्ल पटेल तसेच चंदीगडचे लेफ्ट्. गव्हर्नर शिवराज पाटील, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण पाटील, दिव्‍य मराठीचे संपादक पत्रकार कुमार केतकर, प्रकाशक प्रदीप चंपानेरकर, लेखक अरूण साधू व बाळासाहेब विखे पाटील स्थानापन्न होते. बाळासाहेब पाटील यांनी पाहुण्यांचे स्‍वागत करत आपल्या वडिलांच्या कामाची महती सांगितली. त्यांच्या कामाचा आदर्श पुढील पिढीला माहित व्हावा म्हणून पुस्तकाचे प्रयोजन केल्याचे स्वागतपर भाषणात सांगितले. त्‍यानंतर पुस्तकाची वेष्टने उघडून ग्रंथ प्रकाशित झाल्याचे आहलुवालिया यांनी जाहीर केले. पुस्तकाच्या पानांवरुन धावती नजर टाकली तरी लेखकाने किती अभ्यास करुन व सखोल चिंतन करुन हे चरित्र लिहिले हे लक्षात येते, असे ते म्हणाले.
व्यासपीठावरील मान्यवरांनी पुस्तकाची प्रशंसा करीत सहकारी चळवळीचा आढावा घेतला. प्रकाशक प्रदीप चंपानेरकर व लेखक अरूण साधू यांनी पुस्तकाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. कुमार केतकर यांनी आपल्‍या बोलण्‍यातून या ग्रंथाचे महत्‍त्‍व विषद केले. मात्र शहरी महाराष्ट्राने या कर्तृत्ववान शेतकरी माणसाची नीटशी दखल घेतली नाही म्हणून खंतही व्यक्त केली. आजच्या सहकारी चळवळीत अपप्रवृत्ती शिरल्या असल्या तरी सहकाराचे शुद्ध तत्व आजच्या अस्वस्थ जगात साम्यवाद व भांडवलशाही या पलीकडचा तिसरा आर्थिक मार्ग दाखवू शकते असे विचार बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केले. शिवराज पाटील व प्रफुल्ल पटेल यांनी विठ्ठलराव हे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र असून सा-या भारताचे आदर्श आहेत असे सांगितले. शेती हा व्यवसाय म्हणून कसा करायचा व दारिद्रय कसे दूर करायचे हे गरीब शेतक-यांना विठ्ठलराव यांनी शिकविले असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.
यावेळी सभागृहात अनेक खासदारांसह कै. विठ्ठलराव यांच्या सहकारी चळवळीचा आदर्श मानणारे अनेक कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. दिल्लीचे पत्रकार, कार्यकर्ते व विद्वान प्राध्यापक देखील या समारंभास हजर होते.

About Post Author