‘दि डर्टी पिक्चर’ – एक चांगला चित्रपट

0
23

‘दि डर्टी पिक्चर’ चित्रपट पाहिल्यावर मला ‘बालगंधर्व ’ आणि ‘नटरंग’ची आठवण झाली. तिन्ही चित्रपटांमधे कलाकारांचे दर्शन आहे. ‘दि डर्टी पिक्चर’ आणि ‘बालगंधर्व’ हे चित्रपट खर्‍या, होऊन गेलेल्या कलाकारांवर आधारलेले आहेत. एक नर्तकी जी सिनेअभिनेत्री झाली आणि दुसरा गायक जो नाट्यसंगीतात अजरामर झाला. चित्रपटात या दोन्ही कलाकारांच्या आयुष्यात अचानक संधी आल्या, दोघांनीही त्या त्या काळातल्या जनमानसातील प्रतिमांना, विचारांना, दृष्टिकोनाला आव्‍हान देत नवीन प्रतिमा, विचार आणि दृष्टिकोन निर्माण केले. दोघांच्याही आयुष्यातील यशापयश माणूस म्हणून आहे आणि कलाकार म्हणूनही आहे. या यशापयशाची कारणे देताना चित्रपटकर्त्यांनी दोन्ही चित्रपटांत व्यवस्थेला दोष देणे या नेहमीच्या मार्गाचा अवलंब केलेला नाही. केवळ व्यवस्था कशी होती हे व्यवस्थित चित्रित केले आहे. म्हणजेच उगाचच ‘संपादकीय टिकाटिप्पणी’ केलेली नाही तर बातमी आहे तशी सांगितली आहे.

प्रस्‍तुत चित्रपटांत विद्या बालन हिने ‘सिल्क स्मिता’ची तर, सुबोध भावे याने ‘बालगंधर्वां’ची भूमिका साकारली आहे. दोघांची आठवण त्यांच्या चरित्रांच्या तसेच या संदर्भात येत राहील; त्याचबरोबर त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या संदर्भातही येत राहील. दोन्ही चित्रपटांचे एक वैशिष्ट्य असे, की चित्रपटातील अतीव दु:खी भावना, पात्रांचे लढणे-हरणे हे थेट पोचते. मात्र पात्रांची कीव येत नाही, की उगाचच त्या दु:खाचे ओझे होत नाही. हे करणे कठीण असते. पात्राचा शेवट दु:खद झाला म्हणून प्रेक्षकांना जीव नकोसा का व्हावा? नाहीतर ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ असं चित्रपटभर निक्षून सांगणारा गुरुदत्त स्वत: मात्र वहिदा रेहमानला घेऊन गडद धुक्यात निघून जातो. तसं होणार असेल तर दुनिया मिळाली नाही तरी चालेल की! अशी फसवणूक या दोन चित्रपटांमधून होत नाही. पात्रे आपापली आयुष्ये जगली आणि मेली. बस्स! चित्रपट संपल्यावर प्रेक्षक म्हणून आपण संपत नाही; काहीतरी शिकून बाहेर पडतो किंवा थेट गुणगुणत बाहेर पडतो आणि त्यातच दोन्ही पात्रांचे आपापल्या कलेमागचे तत्त्वज्ञान स्पष्ट होते – हे सगळे मनोरंजन, मनोरंजन, मनोरंजन आहे.

 

मला ‘नटरंग’मधे मर्यादा दिसल्या त्या नेमक्या इथेच. कुठल्या नाच्याचा शेवट, तोही अशा भयंकर परिस्थितीतून गेलेल्या, सुखद होईल? त्यामुळे चित्रपटातील लावण्या गाजल्या, अतुल कुलकर्णीचे काम गाजले, पण प्रमुख पात्राचे तत्त्व त्या चित्रपटातील शेवटामुळे निष्कारण ओढून- ताणून मांडल्यासारखे खोटे झाले. येथे मराठी प्रेक्षकांचे कौतुक करावयास हवे. असलेल्या परिस्थितीला थेट सामोरा जाण्याची एक विलक्षण कुवत मराठी माणसाने आतापर्यंत दाखवली आहे आणि तशी ती चित्रपट, कथा, नाटक यांच्या बाबतीतही दिसते. शेवट वाईट आहे म्हणून नाक मुरडणारा मराठी प्रेक्षक नव्हे. मात्र तो शेवट पटला पाहिजे. कदाचित ही कुवत हा ज्ञानेश्वरादी संतांचा ठेवा आहे.

‘दि डर्टी पिक्चर’ हा प्रौढांसाठीचा चित्रपट आहे असा एक विचार चित्रपट पाहताना मनात डोकावला आणि मला अस्वस्थ करून गेला. मी सेन्‍सॉरच्‍या प्रमाणपत्राबाबत बोलत नाही. मुळात बहुमाध्यम व्यवस्थेत असे प्रमाणीकरण बालिश आहे. मी चित्रपट पाहताना माझ्या मनात डोकावणार्‍या विचाराबाबत बोलत आहे. चित्रपट संपला आणि माझे मलाच हसू आले. चित्रपटकर्त्यांनी मैथुनाला थेट हात घातला आहे. पात्रांच्या संवादांतून चित्रपटकर्त्यांनी आपली त्याबाबतची मते मांडली आहेत. मैथुनाशी थेट भिडल्याशिवाय त्या विषयाला मनोरंजक पद्धतीने आणि प्रामाणिकपणे कसे मांडता येईल? मैथुन हे जर कुमारावस्थेतील प्रधान अंग असेल तर अशा प्रकारे त्या विषयाला हात घालणार्‍या चित्रपटांना केवळ प्रौढांसाठी कसे म्हणता येईल? मैथुनाशी भिडणे हे केवळ प्रौढांसाठी असते असे गृहित धरल्यामुळेच कदाचित आपल्या समाजात चाळीशी ओलांडलेले ‘कुमार’ सतत दिसतात. त्यांची मैथुनाकर्षण व्यक्त करण्याची समज, तर्‍हा, विचार, आचार या गोष्टी नुकत्याच कुमारावस्थेत आलेल्या व्यक्तीच्या पातळीच्या राहतात. बहुमाध्यम व्यवस्थेत असे लोक कमी होतील अशी आशा मला वाटते. ही आशा वाटण्याचे कारण असे, की ‘डर्टी पिक्चर’ पाहताना माझ्या शेजारी बसलेल्या मध्यमवयीन जोडप्यामधील पुरुषाने चित्रपटाच्या पहिल्या दहा मिनिटांत उद्गार काढले, “पिक्चर बहुत ही गंदी है यार” आणि त्या उदगारावर दोघेही हसले! त्यांना संकोचल्यासारखे झाले होते मात्र जे आहे ते समोर आहे हे मान्यही होते. भोवतीच्या तरुण मंडळी ‘सिल्क’च्या ज्या संवादांवर शिट्या वाजवत होती त्याबाबत मात्र काळजी वाटली. चित्रपटात ‘सिल्क’ने अनेक संवादांतून आणि प्रसंगांतून मैथुनाबाबतचा समाजातील दुट्टपीपणा दाखवला आहे. एवढेच नव्हे तर तिने उत्तानपणातील ग्लॅमरही आणि यश दाखवले आहे. त्यामुळे एका प्रकारचे यश संपादन करता येते असेच तत्त्व ‘सिल्क’च्या आयुष्यातील काही घटनांतून दिसते. अशा वेळी ‘सिल्क’ आपल्या संवादांतून आपल्या वागण्याचे समर्थन करते तेव्हा तरुण मंडळींचा उत्साह दिसला. चित्रपटगृहाच्या अंधारात हा उत्साह मर्यादित आहे की बाहेर लख्ख प्रकाशातही हा उत्साह आहे? समाजात मैथुनाबाबतीत असलेल्या आचारविचारांना थेट आव्हान देऊन स्वत:च्या आयुष्यात याबाबतची संकुचित भावना हे तरुण टाकून द्यायला सज्ज आहेत काय? याबाबत या तरुण मंडळींची केवळ घुसमट चित्रपटगृहाच्या अंधारात प्रकट होणार आहे, की प्रत्यक्ष मौलिक आणि तात्त्विक बदल घडणार आहे? येथेही आशा वाटते, कारण प्रौढांसाठीच्या या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी, नवरा-बायको असे एकत्र आले होते. म्हणजे ‘सिल्क’ म्हणते तसे आपल्या समाजात प्रौढांसाठीचे चित्रपट केवळ ‘पुरुष’ प्रौढांसाठी राहिलेले नाहीत तर कुटुंबातील प्रौढांसाठी झालेले आहेत. चित्रपटकर्त्यांनी ज्या प्रकारे मैथुन या विषयाला हाताळले आहे आणि प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे मानसिक आणि भावनिक प्रौढत्वाने त्याला दाद दिली आहे. त्यावरून चित्रपटकर्ते आणि प्रेक्षक मोठे झाले असे म्हणता येईल.

संजय रानडे
9869042957, sanjayvranade@yahoo.com 

Last Updated On – 16th Nov 2016

About Post Author