दिवाळी अंक आणि आपण

0
34
_Deewali_Ank_Aani_Aapan_1.jpg

दिवाळी दरवर्षी आली, की मराठी लोकांना तीन गोष्टी हमखास आठवतात – दिवाळी फराळ, फटाके आणि दिवाळी अंक ! फराळाचा अनुस्युत भाग असतो अभ्यंगस्नानाचा. टीव्हीवरील जाहिरातीतून तेच ध्वनित होते. ‘दिवाळी आली मोती स्नानाची (साबणाची) वेळ झाली’ अशी जी जाहिरात गेली दोन-तीन वर्षें दिवाळीआधी सतत दाखवतात, ती पाहताना प्रेक्षक सुखावतो. त्याच्या अभ्यंगस्नानाच्या स्मृती जाग्या होतात. पण ते क्षणिक, परंतु लगेच बुद्धीला प्रश्न पडतो – हा मोती साबण वर्षभर कोठे असतो? पण जुन्या काळचे ते अभ्यंगस्नान हरवले आहे. पहाटे उठणे, अग्नीवर पाणी तापवणे, फळ पायाखाली फोडणे… दुस-या बाजूला उत्तमोत्तम शांपू सध्या रोजच्या स्नानाला असू शकतात.

फटाके विशेषतः मुलांच्या आनंदासाठी असतात- तो आनंदही प्रदूषणामुळे बाद झाला आहे. मुलांच्या आनंदासाठी किती शेकडो साधने आणि खेळ निघाले आहेत. फराळाचे पदार्थ माणसाच्या जिव्हेच्या (जिभेच्या) वेगवेगळ्या चवींना आकृष्ट करतात. तेही बाजारात बारमाही उपलब्ध असतात. त्यामुळे त्यातील ‘चार्म’ संपलेला आहे. राजाच्या घरी रोजची दिवाळी, तशी बहुसंख्य समाजाची अवस्था झाली आहे. तरीसुद्धा दिवाळीच्या वेळी पावसाळा संपलेला असतो. सृष्टीमधील वातावरण प्रसन्न असते. पिके तयार झालेली असतात. अशा वातावरणात येणारी दिवाळी लहानथोरांपासून सर्वांना अजूनही आनंदच देते.

अशा प्रसन्न काळी माणसाच्या हाती नवीन ताजा मजकूर असलेला विशेषांक आला तर माणसे तो उत्साहाने, आनंदाने वाचतील हे पहिल्यांदा ओळखले ते काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी. ते ‘मासिक मनोरंजन’चे संपादक होते. त्यांनी कोकणातून मुंबईला येऊन १८९५ सालच्या सुमारास ‘मासिक मनोरंजन’ चालू केले. त्यामध्ये विद्वतजनांचे वाचनीय लेख, प्रसिद्ध कवींच्या कविता, धर्मशास्त्रावरील; तसेच, इतिहासावरील लेख, प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो असे साहित्य प्रसिद्ध होई. मासिकाच्या उच्च दर्जामुळे बघता बघता ‘मासिक मनोरंजन’ सा-या मराठी मुलखात प्रसिद्ध झाले.

संपादक का.र. मित्र यांचे खरे नाव आजगावकर. ते मालवणजवळील होते. ते मुंबईला पोस्टामध्ये मनिऑर्डर वगैरे लिहिण्याची कामे करत. तेथे त्यांना बंगाली गृहस्थ भेटले. त्यांच्याकडून ते बंगाली शिकले. त्यांनी काही बंगाली कादंब-यांचा मराठी अनुवाद करून ‘मासिक मनोरंजन’मध्ये त्या छापल्या होत्या. त्या मित्राची कृतज्ञता म्हणून त्यांनी बंगाली ‘मित्र’ हे नाव घेतले! का.र. मित्र यांनी मासिकाचा खप वाढवण्यासाठी उत्तम कल्पना राबवल्या. त्यांतील एक म्हणजे वेगवेगळ्या लेखकांकडून पुस्तके लिहवून घेऊन ती मासिकांच्या वर्गणीदारांना सप्रेम भेट देणे. त्यांनी अशी शंभराच्या वर पुस्तके प्रसिद्ध केली. तशा आकर्षक भेटीमुळे मासिकांचे वर्गणीदार बऱ्याच प्रमाणात वाढले.

_Masik_Manoranjan_1_0.jpg‘मनोरंजन मासिका’ला १९०९ साली पंधरा वर्षें पूर्ण झाली. त्या दिवाळीच्या वेळी ‘मनोरंजन’चा विशेषांक काढला तर? असे का.र. मित्र यांच्या मनात आले. बऱ्याच नामवंत लेखकांनी त्यात लेख लिहिले. वेळ थोडा असल्यामुळे अंकाची छपाई त्यावेळच्या चार प्रमुख छापखान्यांत- कर्नाटक प्रेस, मुंबई वैभव प्रेस, इंदूप्रकाश व निर्णयसागर प्रेस – झाली. अंकाची पहिली चोवीस पाने विविध औषधी कंपन्या, ग्रोसरी दुकाने वगैरेंच्या जाहिराती आहेत. तसेच, त्यात शेवटची चौदा पाने विविध ग्रंथांची माहिती आहे. तो मराठीतील पहिला दिवाळी अंक ठरला!

त्या पहिल्या दिवाळी अंकामधील लेखांवर नजर टाकली तर वाचक आश्चर्यचकित होतो. मला दिवाळी अंकाची ही कल्पना विष्णुदास भावे यांच्या नाट्यप्रयोगाइतकी व दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटाच्या पहिल्या खेळाइतकी महत्त्वाची वाटते. त्यांतील पहिलाच लेख आहे बडोद्याच्या महाराणी सौ. मातोश्री चिमणाबाई गायकवाड यांचा. लेखाचे शीर्षक आहे –  ‘प्रयत्न सफल होण्याचे मानसिक साधन’. त्या लेखात कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी मनाची स्थिती उल्हसित व आशायुक्त असणे किती गरजेचे आहे ते प्रतिपादन केले आहे. त्यांनी अमेरिकेतील गुलामांच्या स्थितीचा विचार करून एक प्रकारे देशाला स्वातंत्र्य मिळणे गरजेचे असून श्रमांचा योग्य मोबदला मिळाला तर माणसे स्वतःहून कामे करतील असाही उल्लेख केला आहे. दुसरा लेख आहे विष्णू मोरेश्वर महाजनी यांचा. त्यांनी दिवाळी सणाचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण कसे असून त्या सणामध्ये समाजातील सर्व वर्ग कसे सामील होतात व त्यांतून प्रेम कसे बहरते याचे बहारदार वर्णन केले आहे.

का.र. मित्र यांना स्त्रीमुक्तीचे महत्त्व माहीत असावे. त्यांनी मासिकात अनेक चित्रे घातली आहेत. त्यामध्ये दोन-तीन स्त्रिया खुर्चीवर बसून वाचताना दाखवल्या आहेत. चित्राखाली ओळी आहेत. ‘मनोरंजन आलं का?’ दुसऱ्या पानावर खाली ओळी लिहिल्या आहेत –  ‘स्त्रियांची योग्यता वाढल्याशिवाय राष्ट्रोन्नती अशक्य आहे. स्त्रीवर्गाची उन्नती करण्याचा ‘मनोरंजन’चा प्रयत्न आहे. नेपोलियन म्हणतो – ‘राष्ट्राची उन्नती व्हावी अशी इच्छा असल्यास स्त्रियांना सुशिक्षित करा.’ ‘महाराष्ट्राची उन्नती होण्यास स्त्रियांच्या हाती ‘मनोरंजन’ द्या’. स्त्रियांना पूर्वी बरेच स्वातंत्र्य होते, विवाहासंबंधी अनेक प्रकार होते अशा मजकुराचा ‘पूर्वकालीन भारतीय समाजात स्त्रीवर्गाची योग्यता’ या शीर्षकाचा लेख सौ. क्षमाबाई राव यांनी लिहिला आहे. तसेच, १९०८-१९०९ मध्ये म्हणजे शंभर वर्षांआधी ज्या स्त्रिया समाजकार्य करत होत्या त्यांचे स्वतंत्र फोटो छापलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः सौ. लक्ष्मीबाई चंदावरकर (अध्यक्ष, आर्य महिला समाज), सौ. माणिकताई कोठारे (अध्यक्ष, लेडीज सोशल क्लब मुंबई), सौ. बाबलीबाई पितळे (सेक्रेटरी, लेडीज सोशल क्लब), सौ. सावित्रीबाई भाटवडेकर (मुंबई) यांचे उल्लेख दिसतात. 

दिवाळी अंकामध्ये कवितेला बरीच जागा दिली आहे. प्रसिद्ध कवींच्या कविता छापल्या आहेत, त्यामध्ये शीर्षकाखाली कविता कोणत्या चालीत म्हणावी हेही नमूद केले आहे. बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची प्रसिद्ध ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता त्या अंकात प्रथमच प्रसिद्ध झाली.

‘आनंदी आनंद गडे !
इकडे ति
कडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फिरे’

त्या व्यतिरिक्त कवी गोविंद वासुदेव कानिटकर यांची ‘सुंदर प्रतिध्वनी’ या चालीसकट कवितेमध्ये निसर्गात कसे सुंदर नादमय काव्य भरले गेले आहे ते सूचित केले आहे. गुणग्राही सयाजीराव गायकवाड यांच्यावर ‘महाराष्ट्रजन विज्ञापना’ ही प्रदीर्घ कविता गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी लिहिली आहे. त्याशिवाय काही अर्थपूर्ण पण विनोदी कविता आहेत. या दृष्टीने कवितेचा विभाग मनाला आनंद देणारा व वाचनीय आहे.

त्या काळी मराठी नाटके हे करमणुकीचे साधन होते. बऱ्याच नाटक कंपन्या अनेक शहरांतून विविध नाटके करत असत. या अंकात प्रसिद्ध कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी ‘वधूची अदलाबदल’ हे उत्तम प्रहसन लिहिले आहे. त्यात काव्य व गद्य यांचा सुंदर मिलाप दिसून येतो. वि.सी. गुर्जर कोकणात कशेळीला राहत असत, पण ‘मासिक मनोरंजन’च्या प्रत्येक अंकांमध्ये त्यांच्या कथा, कविता वगैरे साहित्य असे. का.र. मित्र यांनी असे अनेक प्रथितयश लेखक जोडून ठेवले होते. आदर्श संपादक कसा असावा यांचे ते उत्तम उदाहरण!

_Masik_Manoranjan_3_3.jpgत्याशिवाय ‘सामाजिक सुधारणा करणार की होऊ देणार?’ हा विनायक रा. जोशी यांचा लेख डोळ्यांत अंजन घालणारा आहे. ते स्वतः गोपाळ गणेश आगरकरांनंतर ‘सुधारक’चे संपादक होते. ते प्रसिद्ध विनोदी लेखक चि.वि. जोशी यांचे वडील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रकला या विषयावर औंधचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी चित्रकलेपासून शिल्पकलेपर्यंत माणसाला मनापासून आनंद व समाधान मिळते यासंबंधीची अनेक उदाहरणे देत लेख लिहिला आहे. राजे स्वतः चित्रे व शिल्पकला यांविषयी रसिक होते. त्यांनी वस्तुसंग्रहालय व चित्रकलेचे कलादालन औंध संस्थानामध्ये निर्मिले आहे. प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्याकडून अनेक चित्रे काढून घेऊन त्यांचे प्रदर्शन सर्व लोकांना खुले केले आहे. ‘मासिक मनोरंजन’चा पहिलाच दिवाळी अंक वाचताना प्रसिद्ध लेखक गोविंद चिमणाजी भाटे यांनी शंभर वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता, तो त्यावेळी फार गाजला होता. ते सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. त्यांचा ‘विधवा विवाह’ हा विचारप्रवर्तक लेख त्यावेळची सामाजिक परिस्थिती व सुधारणांची आवश्यकता यावर प्रकाश टाकतो. ‘मासिक मनोरंजन’चा अंक दोनशे पानी असून त्याची त्यावेळी एक रुपया एवढी किंमत होती. त्याची वार्षिक वर्गणी तीन रुपये होती. वर्गणीदारांना दर महिना अंक व चार-पाच पुस्तके सप्रेम भेट दिली जात असत. लक्षात घ्या, ही शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे!

महाराष्ट्रात पाचशेपर्यंत अंक सध्या प्रसिद्ध होतात. पण त्यांपैकी मराठी चोखंदळ वाचकांच्या वाचनात तीन-चार महिन्यांत चाळीस-पन्नास अंक येतात. बहुतेक अंकात तीन-चार वाचनीय लेख, एखादा परिसंवाद, एक-दोन मुलाखती, भरपूर कविता असा मजकूर आढळतो. विविध अंक वाचताना प्रत्येक पिढीमध्ये स्थित्यंतर कसे होत गेलेले आहे ते पाहिले, की गंमत वाटते. वि.सी. गुर्जर यांनी ‘मासिक मनोरंजन’ची १८९५ पासून ते १९३० पर्यंतची हकिगत ‘केसरी-सह्याद्री’च्या १९५४ च्या दिवाळी अंकामध्ये दिली आहे. दिवाळी अंकामध्ये १९४० नंतर अत्रे, पु.ल., माडगूळकर, भावे हेच मुख्यत्वे दिसतात. त्यांनी पंचवीस-तीस वर्षें लिहिल्यावर पुढे वि.स. वाळिंबे, दीक्षित, वि.आ. बुवा या पिढीने अंक सजवले आहेत. त्यानंतरच्या पिढीत लक्ष्मण लोंढे, ह.मो. मराठे हे दिवाळी अंकांसाठी म्हणून कसून लिहीत. ती ‘दिवाळी अंकाच्या लेखकांची’ म्हणून शेवटची पिढी म्हणता येईल. दिवाळी अंकांमध्ये विषयाचे कोठलेही बंधन नसल्यामुळे प्रत्येकाला आवडीचे काहीतरी वाचण्यास मिळते. काही अंकांमध्ये तर नुसत्या तीन-चार कादंबऱ्या छापल्या जातात. काही अंक एखाद्या विषयाला वाहिलेले असतात. त्यामध्ये त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांचे लेख असतात. दिवाळी अंकांमुळे अनेक होतकरू लेखकांना लिहिण्याची संधी मिळते. त्या निमित्ताने चित्रकार-प्रिंटर यांना व्यवसायाला संधी मिळते. गेल्या एकशेआठ वर्षांमध्ये दिवाळी अंकात विचारप्रवर्तक लेख, कथा, काव्य, कादंबऱ्या असे प्रचंड साहित्य निर्माण झाले आहे. पूर्वी प्रथितयश लेखक त्यांचे साहित्य वृत्तपत्रे किंवा मासिकांना न देता दिवाळी अंकांसाठी राखून ठेवत. कारण दिवाळी अंक जास्त वाचले जातात. त्याचे एकत्र संकलन केल्यास साहित्य निर्मितीचा आवाका कळेल किंवा कल्पना येईल. त्याचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. मराठी दिवाळी अंकांची शंभर वर्षें उलटली, परंतु मित्र यांनी घालून दिलेली संपादकीय घडी अजून फारशी बदलली गेली नाही. नवे दिवाळी अंकही त्याच चाकोरीत प्रसिद्ध होताना दिसतात. शंभर वर्षांच्या परंपरेत १९४० ते १९८० या काळातील दिवाळी अंकांचे स्वरूप अधिक सघन होते. वाचकांनाही त्या काळात दिवाळी अंक येणार याबद्दल उत्सुकता असे. दिवाळी अंकांतील साहित्याबद्दल नंतरचे तीन-चार महिने चर्चादेखील चाले. त्या ऐन बहराच्या काळात दिवाळी अंकांचे संपादक वेगवेगळ्या लेखकांना गणपतीपासूनच गाठू लागत. लेखकही बैठका मारून बसत. त्यांच्या लेखन यज्ञास ‘घाणा घातला आहे’ असे गंमतीने म्हणत – जणू जिलब्यांची ताटे जशी निघतात तसे त्यांचे साहित्य प्रसवले जात असे! रंगीत छपाई थोडी सोपी झाल्यानंतर १९५०-६०च्या दशकांत दिनानाथ दलाल व रघुवीर मूळगावकर यांची रंगचित्रे हे दिवाळी अंकांचे मोठे आकर्षण असे. तसेच, आकर्षण ‘आवाज’च्या मुखपृष्ठावरील खिडकीचित्रांबद्दल वाटे. ती चावट असत. परंतु अंकाच्या अनुक्रमणिकेतील लेखकांची मालिका वि.स. खांडेकर, पु.भा. भावे. वि.वा. शिरवाडकर यांच्यापासून सुरू होई आणि तो बाज सात्त्विकतेचा असे. मधल्या एका टप्प्यावर एक विषय घेऊन त्यावर खास अंक काढण्याचे वैशिष्ट्य निर्माण झाले. तो आरंभ डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी आरोग्यविषयक ‘शतायुषी’ अंकाने केला. नंतर चित्रपट, पर्यावरण असे वेगवेगळे विषय घेऊन खास अंक निघू लागले. दिवाळी अंकांतील निवडक साहित्याचे खंड १९८० च्या दशकात काही वर्षें प्रसिद्ध होत गेले. तो उपक्रम नंतर बंद पडला.

_Masik_Manoranjan_2_2.jpgपूर्वी मुंबई-पुणे-कोल्हापूर-नागपूर ही अंक निर्मितीची व विक्रीचीदेखील महत्त्वाची केंद्रे होती, परंतु शिक्षणप्रसार झाल्यानंतर जिल्ह्या जिल्ह्यातून अंक प्रसिद्ध होऊ लागले. त्यांना स्थानिक महात्म्यही मिळू लागले. अर्थात, अजूनही ‘मौज’, ‘दीपावली’ यांसारखे जुने अंक महाराष्ट्रभर पोचत असतात. त्यामध्ये ‘ऋतुरंग’, ‘अक्षर’ अशा नव्या चमकदार अंकांची भर पडली आहे. एक वेगळे आकर्षण म्हणजे दैनिकांचे दिवाळी अंक. मटा, लोकसत्ता, लोकमत यांचे अंक दर्जेदार असतात. या वर्षी तर ‘झी मराठी’ वाहिनीनेदेखील स्वत:चा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाला मुद्रित माध्यमाच्या सहकार्याची ओढ वाटावी हे चिन्ह सुखदच म्हणायचे. समर्थ व सार्थ परंपरा काय प्रकारचा चमत्कार घडवू शकते त्याचे मराठी दिवाळी अंक हे उदाहरण उत्तम आहे. ‘ई दिवाळी अंक’ही २०१० सालापासून नित्य प्रसिद्ध होत असतात व जगभर प्रसृत होत असतात. तरीसुद्धा दिवाळी अंकांची म्हणून महाराष्ट्रात जी संस्कृती होती ती संस्कृती आता जाणवत नाही हेही खरेच! फटाके लोपले, फराळ हरवला, तसे दिवाळी अंकही फक्त मनात राहिले व जनात शोभेपुरते मिरवताना दिसतात.

दिवाळी अंकांचा आर्थिक व्यवहारही प्रचंड असतो. तो आता कोटीत पोचला आहे. नवीन काळाप्रमाणे अंकांच्या ‘स्कीम’ जाहीर होतात. ‘दिवा’ नावाची दिवाळी अंक संपादकांची संघटनादेखील आहे. इतर वेळी पुस्तके खरेदी न करणारे लोक दिवाळीच्या वेळी एक-दोन तरी अंक विकत घेतात. का.र. मित्र यांनी दिवाळीच्या निमित्ताने एकशेआठ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या अंकाचे विकसित रूप निश्चितच कौतुकास्पद आहे. दिवाळी अंक ही मराठी जगतातील एक सांस्कृतिक व साहित्यिक घटना होऊन गेली आहे.

– प्रभाकर श. भिडे

About Post Author