दिलीप म्हैसकर – मृत लाकडात संजीवनी!

1
22

कोकणाच्या संगमेश्वर तालुक्यातील तेरीये गावाची बुरंबीवाडीचे दिलीप म्हैसकर लुप्त होत चाललेली काष्ठ शिल्पकला गेली चार दशके जोपासत आहेत. दिलीप म्हैसकर यांनी स्वत:चे म्युझियम मृत झालेल्या झाडांपासून, त्यांच्या मुळांपासून कलाकृती तयार करून उभे केले आहे. त्यांनी पाहण्याची नजर असेल तर टाकाऊ वस्तूतही कला दिसू शकते हे सिद्ध केले आहे.

दिलीप म्हैसकर हे दादासाहेब सरफरे विद्यालयात वरिष्ठ लिपिक होते. त्यांना लाकडाचा एक छोटा तुकडा चाळीस वर्षांपूर्वी मिळाला. त्याचा आकार काहीसा गणपतीसारखा आहे असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्यावर काम सुरू केले. त्या लाकडाचा अनावश्यक भाग काढून टाकल्यावर त्यातून खरोखरीच देखणी गणेशमूर्ती साकार झाली. ते त्यांचे पहिले काष्ठशिल्प. पण तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्या हातातील ते कसब कला म्हणून विकसित करावे असा विचार नसल्यामुळे ते गणेशशिल्प जतन करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे म्हैसकर यांनी त्या मूर्तीवर पुढील कोणतीही प्रक्रिया केली नाही. परिणामी, ते शिल्प काही काळाने वाळवी लागून नष्ट झाले.

पण तेव्हाच त्यांच्या मनी शिल्पकलेची आवड रुजली असावी. त्यामुळे त्यांनी त्या कलेचे रीतसर प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केला नाही, तरी ती अंगभूत कला जोपासणे त्यांच्याकडून घडत गेले. म्हैसकर झाड कोठेही पडलेले आहे असे समजताच तेथे जात आणि त्यातून काय निर्माण होईल ह्याचा विचार करत. अशा एकामागून एक कृती तयार होत गेल्या. त्यांच्या म्युझियममध्ये शंभरहून अधिक काष्ठशिल्पे तयार झाली आहेत. ते त्यांपैकी दोन शिल्पांचा उल्लेख आवर्जून करतात. त्यांना एके ठिकाणी लांबलचक लाकूड दिसले. त्यातून त्यांनी बारा फूट उंच जिराफ कोरून तयार केला. ते त्यांचे सर्वात उंच शिल्प. खरे तर, म्हैसकर मिळालेले ते लाकूड खूप मोठे असल्याने त्याचे दोन तुकडे करण्याच्या विचारात होते. पण तेवढ्यात, त्यांना त्या मोठ्या लाकडात जिराफ दिसला आणि ती मूर्ती तयार झाली. म्हैसकर यांना अर्कचित्रातही रस आहे. त्यांना व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे खूप आवडतात. त्यांना लक्ष्मण यांचा कॉमन मॅन एका लाकडात दिसला आणि तो त्यांच्या म्युझियमचा महत्त्वाचा भाग होऊन राहिला आहे. ‘अर्कशिल्प म्हणजे ज्या शिल्पात त्या व्यक्तीच्या जीवनाचा अर्थ उरला आहे ते’ असे म्हैसकर म्हणतात. त्यांच्या संग्रहातील काही कृती मुद्दाम नमूद कराव्यात अशा आहेत. धनुष्याकृती लाकडापासून तयार केलेली एकलव्याची मूर्ती म्युझियममध्ये दिमाखात उभी आहे. शेवरी हे कोकणातील काटेरी झाड. त्या झाडाचा उपयोग जळणाशिवाय काहीही होत नाही, पण म्हैसकर यांनी त्याच काटेरी शेवरीपासून मगर तयार केली आहे.

म्हैसकर सांगतात, की लाकूड मिळाले, की त्यापासून लगेच मूर्ती तयार होत नाही. मिळालेले लाकूड हे ओबडधोबड असते. त्यातून मूर्ती कोरायची तर ते आधी नीट उभे करणे गरजेचे असते. त्यासाठी तळाला बैठक तयार करून त्यावर ते लाकूड नीट उभे करणे हे आव्हान असते. ते नीट पार पाडले, की मग त्यातून मूर्ती कोरणे सोपे जाते. दहा फूटांच्या वर असलेली मूर्ती कोरण्यासाठी साधारण दोन आठवडे लागतात. तर पाच फूटांपर्यंतची मूर्ती साधारण आठवड्यात कोरून पूर्ण होते.

पायर हे कोकणात आढळणारे झाड काष्ठशिल्प कामासाठी उत्तम असे म्हैसकर अनुभवातून सांगतात. ते म्हणाले, की त्याशिवाय बांडगूळ झाडेही कोरीव कामासाठी चांगली असतात. आंबा आणि फणस ह्या झाडांची लाकडे टिकाऊ असल्याने त्यातून तयार केलेली शिल्पे खूप काळ टिकतात. पण त्या झाडांची लाकडे टणक असल्याने त्यातून मूर्ती कोरून काढणे कठीण असते. झाडांच्या मुळांपासून तयार केलेल्या कलाकृती त्यांच्या म्युझियममध्ये आहेत. शिल्पांच्या संरक्षणासाठी वर्षातून तीन वेळा वाळवीविरोधी पॉलिश करणे; तसेच, बुरशीविरोधी पॉलिश करणे गरजेचे असते असे म्हैसकर यांनी सांगितले.

म्हैसकर यांनी म्युझियमसाठी चाळीस गुणिले पंचवीस फुटांचे दालन घरालगत बांधून घेतले आहे. प्रदर्शन पाहण्यास विशेषत: शाळांच्या सहली येत असतात. त्यांच्या प्रदर्शनाची माहिती रत्नागिरी जिल्ह्यात आहेच, पण सांगली-कोल्हापूरपर्यंतही लौकिक पोचला आहे.

म्हैसकर बुरंबीला आई व पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा पराग, त्याची पत्नी बकुळी व नात छोटी अर्णिमा गुहागरला असतात.

लाकूड निर्जीव असते. त्यात आकार शोधणारी दृष्टी महत्त्वाची असते. शिल्प तयार करणे म्हणजे लाकडातून अनावश्यक भाग काढून टाकणे. त्यासाठी चिकाटी, एकाग्रता आणि संयम महत्त्वाचा असतो असे म्हैसकर म्हणतात. त्यांच्या ह्या कलेची दखल सार्वजनिक क्षेत्रात घेतली जात आहे. त्यांच्या मुझियमला ‘एमटीडीसी’ची मान्यता मिळाली आहे.

दिलीप म्हैसकर, 9403800676, dilip.mhaiskar@gmail.com

– अमित पंडित, 9527108522, ameet293@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.