दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार

1
261
gazalkar1

गझलकार दिलीप पांढरपट्टेमराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात.

सुरेश भट पुण्यात काही काळ वास्तव्यास होते. तेथे राहून ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असत. त्यांच्या दिवाळी अंकासाठी दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांची गझल पाठवली. ती अंकात निवडली गेली नाही. परंतु सुरेश भट यांनी त्यांना पत्र लिहून ‘आपण मला भेटावे, मला आपणाशी गझल तंत्राविषयी काही बोलायचे आहे’ असे कळवले. त्या संधीचा फायदा घेऊन पांढरपट्टे भट यांना भेटले. त्या प्रथम भेटीतून त्यांची मैत्री अतूट बनली. त्यांच्या भेटी वाढल्या. कधी शनिवारवाड्यात तर कधी सदाशिव पेठेतील कार्यालयात. भट व पांढरपट्टे यांचे गुरू-शिष्याचे नाते बनले. भट यांच्या गझलांचा प्रभाव पांढरपट्टे यांच्या गझलांवर आहे. “आज मी गझल लिहितो याचे सर्व श्रेय सुरेश भट यांना आहे” असे पांढरपट्टे सांगतात. कारण “गझलचे तंत्र हे त्यांनी मला ज्ञात करून दिले.”

दिलीप पांढरपट्टे हे सरकारी नोकरीत उच्‍चाधिकारी आहेत. त्‍यांच्‍याकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी असा पदाभार आहे. ते बढती मिळवत या पदावर येऊन पोहोचले आहेत. पांढरपट्टे  हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. ते साहित्य, संगीत, कला यांचे जाणकार आहेत. ते उत्तम वक्ते म्हणून आहेत. ते परिसंवाद, चर्चासत्र आणि व्याख्यानमालांत होत असतात.

दिलीप पांढरपट्टे यांचा आणि माझा परिचय वीस वर्षांपूर्वीपासूनचा आहे. ते प्रांताधिकारी म्हणून दापोलीस रुजू झाले होते. आम्ही (सुखदेव काळे, अविनाश ओक, श्रीरंग रोडगे व मी) तेथे वाङ्मयीन चळवळ चालवत असू. आमच्या ग्रूपबरोबर दिलीप पांढपपट्‍टे जोडले गेले. त्यांच्या बरोबर आमच्या गझलच्‍या मैफली दापोलीच्या निसर्गरम्य वातावरणात कधी चांदण्या रात्री तर कधी माडा-पोफळींच्या बागांमध्ये रंगू लागल्या. गीतकार मुरलीधर गोडे यांच्या समवेत तर कधी कवी नारायण सुर्वे यांच्याबरोबर कविता म्हणण्याचा कार्यक्रम चाले. आपापसात, पहाटेपर्यंत. सुर्वे यांनीदेखील पांढरपट्टे यांच्या गझला ऐकून कौतुक केले. नारायण सुर्वे मुंबईला दादरच्या पुलावर मला त्‍यानंतर एकदा अचानक भेटले. तेव्हा दापोलीचा विषय निघाला असता ते मला आवर्जून म्हणाले, “अहो, ते प्रांताधिकारी काय म्हणतात? तो ताकदीचा गझलकार आहे”

‘शब्द झाले सप्तरंगी’ हा दिलीप पांढरपट्टे यांचा पहिला गझल काव्यसंग्रह गाजला. समीक्षक सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी म्हटले आहे, “दिलीप पांढरपट्टे हे प्रतिभा असलेले गझलकार आहेत. त्यांना परमेश्वरी वरदान लाभले आहे. त्यांची गझल अधिकाधिक रसिकाभिमुख होत जाईल”. संगीतकार यशवंत देव म्हणतात, “त्यांनी लिहिलेल्या काही गझलांना स्वरबद्ध करताना मला मनस्वी आनंद झालेला आहे. त्यांचा प्रत्येक शेर हा वाचकाच्या ह्दयालाच हात घालतो.”

कळेना कसा हा जगावेगळा मी

किती भेटणारे! तरी एकटा मी

अशी स्वत:ची वेगळी ओळख करून देणारे पांढरपट्टे यांची गझल सकस व समृद्ध वाटते.

ते राजमार्ग सारे लखलाभ हो तुम्हाला

गेलो जिथे जिथे मी रस्ता तयार झाला

ही दिलीप पांढरपट्टे यांची उत्तम गझल आहे. तीमध्ये त्यांची संवेदनशीलता दिसून येते. एक नवी वाट शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

गायिका वैशाली माडे, संगीतकार सुधाकर कदम यांच्यासह दिलीप पांढरपट्टेदिलीप पांढरपट्टे यांच्या अनेक रचना स्वरबद्ध झाल्या आहेत. त्यांचे अल्बम निघाले आहेत. भीमराव पांचाळे, यशवंत देव व अशोक पत्की या संगीतकारांनी त्यांच्या रचना स्वरबद्ध करून त्यांना उत्तम चाली दिल्या आहेत. त्यांच्या रचनांमध्ये छंददोष आढळून येत नाही, हे त्यांचे मोठे यश आहे.

त्यांना गझलचे वेड गुलाम अली व मेहदी हसन यांच्या गझला ऐकून लागले. पांढरपट्टे यांचे ते आवडते गझल गायक आहेत. एकदा पुण्याला गुलाम अलींचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा पांढरपट्टे बारामतीहून कार्यक्रमासाठी आले व त्या ठिकाणी एका गझलकाराने एक शेर गुलाम अलींकडे पाठवला व तो त्यांनी गाऊन टाकला. ते पाहून ते प्रभावित झाले व तेव्हापासून ते गझल लिहू लागले.

गझल हा प्रकार आणखी प्रभावीपणे लिहिण्यासाठी आपण उर्दू भाषा शिकली पाहिजे, त्याशिवाय उर्दू शायरी कळणार नाही ही खंत त्यांना वाटे. तेव्हा ते मुंबईला उस्ताद इब्राहीम दरवेश यांच्याकडून उर्दू शिकले. त्यामुळे त्यांना उर्दूतील कैफी आजमी पासून जावेद अख्तर पर्यंत सर्व शायर अभ्यासता आले. उर्दू भाषेच्या अभ्यासामुळे त्यांच्या गझलांना वेगळे परिमाण मिळाले आहे. ती रसिकाच्या मनाला थेट भिडू लागली आहे असे त्यांना वाटते.

गझलविषयी दिलीप पांढरपट्टे सांगतात की…

‘’गझल मला नेमकी कधी आणि कुठे सापडली हे सांगणे कठीण आहे, पण एक नक्की की गद्य वाचताना कविता सापडली आणि कविता वाचताना मी गझलच्या चकव्यात सापडलो. कवितेचा सगळा अर्क दोन ओळींत उतरवला म्हणजे गझलचा शेर होतो. कविता हा एक झोका असतो. वर-खाली होणारा, पण आपली आशयाची कक्षा न सोडणारा. गझल ही बांधून ठेवणारी कक्षा नाही. गझलमध्ये वेगवेगळ्या आशयांचे, विषयांचे पक्षी अर्थाच्या आणि अन्वयाच्या अनंत आकाशात एकाच वेळी भरार्‍या मारताना दिसतात. प्रत्येक गझलवेड्याने मनापासून गझल ऐकत रहावे, गझल लिहीत राहावे, गझलवर प्रेम करत जावे असे मला वाटते. कधी कधी मी महिन्यातून दहा-दहा गझला लिहीतो, तर कधी कधी दहा-दहा महिने गझल लिहिली जात नाही. पण तरीही माझ्या आणि गझलच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाही. मी काहीही न मागताच तिने मला खूप काही दिले आहे. यापुढेही माझ्या निमंत्रणाची वाट न बघता प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी ती माझ्याबरोबर चालणार आहे. एखाद्या देखण्या बागेत फिरताना कुठल्या तरी मोरपंखी आठवणींनी माझे मन मोहरून येईल तेव्हा वार्‍याबरोबर येणार्‍या निशिगंधाच्या सुगंधातून गझल मला वेड लावणारच आहे.’’

पांढरपट्टे उत्तम ललित लेखक व कथाकारही आहेत. त्यांच्या ‘घर वा-याचे पाय पा-याचे’ या पुस्तकास पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांची ‘बच्चे लोग टाली बजाओ’ व ‘कथा नसलेल्या कथा’ ही पुस्तकेदेखील वाचकप्रिय आहेत. ‘शायरी नुसतीच नाही’ आणि ‘शब्द झाले सप्तरंगी’ हे त्यांचे गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत. ते बोधकथांवर ‘सकाळ’ मधून स्तंभ लिहीत असत. त्यांचे ‘बोधकथा’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ ने प्रकाशित केले.

पांढरपट्टे यांनी गझला लिहिण्‍याव्‍यतिरिक्‍त प्रवास करणे हा छंद जोपासला आहे. त्‍या छंदापायी त्‍यांनी श्रीलंका, नेपाळ, फ्रान्‍स, इटली, इंग्‍लंड अशा काही देशांची भ्रमंती केली. गझलांच्‍या सीडी प्रकाशित करताना त्‍यांनी स्‍वतःची संगीताची आवड जपलेली दिसते. कलांसोबत त्‍यांना विशेष आवड आहे ती खेळांची. त्‍यांचे क्रिकेट, बॅटमिंटन आणि जलतरण हे आवडते खेळ. ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा बॅटमिंटनचा सराव करतात. तर जलतरण हा त्‍यांचा दिनक्रमाचा भाग बनून गेला आहे. त्‍याशिवाय ते वेळ मिळेल तेव्‍हा वाचन करतात. उत्‍तमोत्‍तम चित्रपट पाहण्‍याचाही त्‍यांना नाद आहे.

दिलीप पांढरपट्टे यांचे वडील ज्ञानेश्‍वर बाळकृष्‍ण पांढरपट्टे हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. दिलीप त्‍यांना दादा म्‍हणत. दादा हयात असताना घरात साप्‍ताहिके, दिवाळी अंक घेऊन येत असत. त्‍यांच्‍यामुळेच दिलीप यांना वाचनाची गोडी लागली. पांढरपट्टे यांचा मोठा मुलगा हर्षद कॉम्‍प्‍युटर इंजिनीयर आहे. त्‍याचे वय सव्‍वीस वर्षे. त्‍याच्‍यापेक्षा लहान असलेल्‍या तेवीस वर्षीय अलंकारने हॉटेल मॅनेजमेण्‍टमध्‍ये पदवी मिळवली असून तो लंडनमध्‍ये पदव्‍युत्‍तर शिक्षण घेत आहे. तर सर्वात लहान मुलगा, आकाश कॉम्‍प्‍युटर इंजिनीयरिंगच्‍या तिस-या वर्षाला आहे. पांढरपट्टे यांच्‍या पत्‍नी प्रिया गृहिणी आहेत.

दिलीप पांढरपट्टे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या २०१२ सालच्‍या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

परिचय –
नाव – दिलीप ज्ञानेश्‍वर पांढरपट्टे
जन्‍म– ७ फेब्रुवारी १९६३
जन्‍मस्‍थळ– अतीत, ता. जिल्‍हा सातारा (महाराष्‍ट्र)
पत्‍ता– फ्लॅट क्रमांक आठ, दुसरा मजला, श्री बालाजी पायोनिअर सोसायटीजवळ,
पनवेल, जिल्‍हा रायगड, पिन कोड – ४१०२०६
संपर्क– मोबाईल – ९८२१०७५५४२, ईमेल – dilip.pandharpatte@gmail.com
शैक्षणिक अर्हता– बी.एस्सी., बी.एड्., एल.एल. एम.,
व्‍यवसाय– शासकीय नोकरी, अपर जिल्‍हाधिकारी या संवर्गात कार्यरत

शासकीय सेवा तपशील

 • महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्‍हाधिकारी म्‍हणून निवड
 • १९८७मध्‍ये उपजिल्‍हाधिकारी म्‍हणून शासनसेवेत प्रवेश
 • प्रांताधिकारी – सावंतवाडी, दापोली, माणगाव; निवासी उपजिल्‍हाधिकारी – रायगड; उपायुक्‍त – ठाणे महानगरपालिका; उपसचिव (सांस्‍कृतिक कार्य) – महाराष्‍ट्र शासन; अपर जिल्‍हाधिकारी – सिंधुदूर्ग या पदांवर काम केले.
 • अध्‍यक्ष – जात पडताळणी या पदावर कार्यरत

साहित्‍यक्षेत्रातील वाटचाल –

 • ‘शब्‍द झाले सप्‍तरंगी’ या मराठी गझलांच्‍या पुस्‍तकाच्‍या दोन आवृत्‍ती प्रसिद्ध
 • डॉ. राम पंडित संपादित –‘’मराठी गझलः दिलीप पांढरपट्टे’ हे पुस्‍तक प्रकाशित
 • कूळकायद्यातील घरठाण हक्‍काबाबत ‘राहील त्‍याचे घर’ हे पुस्‍तक प्रकाशित
 • उर्दूतून काव्‍यलेखन
 • गझलांचे, तसेच गझल व अन्‍य विषयांवरील व्‍याख्‍यानांचे महाराष्‍ट्रभर अनेक कार्यक्रम
 • गझल/गीतांच्‍या सीडी प्रकाशित
 • ‘दैनिक सकाळ’ (मुंबई)मध्‍ये ‘बोधकथा’ या सदरातून पाचशे बोधकथा प्रसिद्ध
 • आकाशवाणी व दूरदर्शनवरून कविता व गद्यलेखन सादर
 • ‘घर वा-याचे पाय वा-याचे’ (ललित लेखसंग्रह), ‘कथा नसलेल्‍या कथा’ (कथासंग्रह), ‘बच्‍चालोग ताली बजाव’ (विनोदी लेखसंग्रह), ‘शायरी नुसतीच नाही’ (उर्दू शायर आणि शायरीचा परिचय), ‘सव्‍वाशे बोधकथा’ (बोधकथासंग्रह) ही गद्य पुस्‍तके प्रकाशित

प्रा. प्रमोद गंधे,
केअर ऑफ उषा पळशीकर,
अक्षय हौसिंग सोसायटी,
प्‍लॉट क्र. ४०/३,ब्‍लॉक क्र. ९,
इंदिरा हाईटस् सोसायटीजवळ,
एरंडवणे,पुणे – ३८
९४२२०५२०७१,
mvk2411@gmail.com

Last Updated on 28th Aug 2023

About Post Author

1 COMMENT

 1. Far chchan gandhe sir shri
  Far chchan gandhe sir shri pandharpatte sahebanvar lihilet tya baddal dhanyavad.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here