‘दशपदी’चे प्रणेते कवी अनिल (Poet Anil)

4
222
-heading-kavianil

प्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला. शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून झाले. ते 1919 साली पुण्यात आले. वऱ्हाडात पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चढाओढ असे. अनिल यांनी मॅट्रिकची परीक्षा अलाहाबाद येथून उत्तीर्ण केली होती. ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून बी ए (1924) झाले. पुढे, त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. ते एलएल बी 1925 साली झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. त्यातूनच त्यांना होशंगाबाद (मध्यप्रदेश) येथे जज्ज म्हणून नियुक्ती मिळाली. अनिल यांच्या आवडीचे विषय पुरातत्त्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे होते. मध्यंतरीच्या काळात, त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचाही अभ्यास केला.

त्यांचा कुसुम जयवंत या तरुणीशी परिचय फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेचा अभ्यासक्रम करत असताना झाला. त्याचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन, त्याची परिणती विवाहात 6 ऑक्टोबर 1929 ला झाली. कुसुमावती देशपांडे यासुद्धा लेखिका व समीक्षक होत्या. 

अनिल यांच्या काव्यलेखनास 1930 साली प्रारंभ झाला. त्यांचा ‘फुलवात’ हा पहिला कवितासंग्रह 1932 साली प्रसिद्ध झाला. ‘फुलवात’ने मराठी साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा ‘रविकिरण मंडळा’तील कवींचा बोलबाला मराठीत विशेषत्वाने होता. त्यांच्या कवितेमध्ये पांडित्यपूर्ण, संस्कृतप्रचुर शब्दकळा, प्रसंगोपातता, शब्दालंकार, यमकादी बंधने यांवर कठोर कटाक्ष असे. त्या पार्श्वभूमीवर अनिल यांचा ‘फुलवात’ हा संग्रह ‘हृदयी लावियली फुलवात’ अशा हळुवार ओळी घेऊन बाहेर आला. त्या कवितेचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य साधी, सरळ व भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे ठरले. त्यानंतर तीन वर्षांनी अनिल यांची ‘प्रेम आणि जीवन’ ही कविता रसिकांपुढे आली.

अनिल यांनी मालवण येथे झालेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद 1958 साली भूषवले होते. त्यांनी कवितेत रचनेच्या अंगानेही प्रयोग केले. ते ‘दशपदी’ आणि ‘मुक्तछंद’ या काव्यप्रकारांचे प्रवर्तक होत. त्यांनी कविता मुक्तछंदात असली तरी कवितेचे व्याकरण आणि तालाचे भान सोडले नाही. त्यांच्या ‘दशपदी’त दहा चरणांची कविता असे. त्यांना ‘दशपदी’साठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार 1977 साली मिळाला होता. अनिल यांना 1979 ची ‘साहित्य अकादमी’ची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.

-kavianil-kusumavatiअनिल आणि कुसुमावती या सुविद्य दांपत्याच्या पत्रव्यवहाराचा संग्रह (कुसुमानिल) प्रसिद्ध आहे. महाविद्यालयीन तरुणांची प्रेमपत्रे, त्यांच्या तत्कालीन भावना, घरचा विरोध आणि त्याला न जुमानता वर उसळी मारून येणारी भावोत्कट प्रेमवृत्ती यांचे तरल व काव्यपूर्ण शब्दांतील चित्रण म्हणून सामाजिक दस्तऐवज या दृष्टीने ती पत्रे महत्त्वपूर्ण वाटतात. ह.वि. मोटे प्रकाशनाने त्यांच्या व अनिल यांच्या अशा निवडक पत्रांचा संग्रह ‘कुसुमानिल’ शीर्षकाने प्रथम 1972 साली प्रकाशित केला.

ते पुस्तक ‘मराठी अस्मिता’ सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे पुन:प्रकाशित करण्यात आले. नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते त्या पत्रप्रपंचाचे पुनर्प्रकाशन नागपूर येथे 2 जुलै 2017 रोजी झाले. एलकुंचवार यांची त्या संग्रहास प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे – ती पत्रे 1922 ते 1927 या काळातील आहेत. पत्रातून माणूस जितका खरेपणाने कळतो तितका तो आत्मचरित्रातून किंवा चरित्रातूनही कळत नाही. 

कौशल इनामदार म्हणतात, की “कुसुमानिल हे संस्कृतीच्या काठावर फुललेले एक सुंदर झाड आहे. या झाडाची सावली येणाऱ्या पिढ्यांना मिळावी, या झाडावरच्या पक्ष्यांची किलबिल, त्याला लगडलेल्या फुलांचा सुगंध पुढील पिढ्यांच्या मुलांना आणि नातवंडाना मिळावा अशा तीव्र इच्छेतून मी कुसुमानिल पुनःप्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.”

हे ही लेख वाचा-
 केशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’!
निसर्गकवी बालकवी

कविपण मिरवणारे सुधीर मोघे

अनिल एका कार्यक्रमासाठी गेले होते. परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अनिल यांना वाटले त्यांची प्रिया रूसून बसली आहे, पण त्यांची अर्धांगिनी कुसुमावती चिरनिद्रेत गेली होती. तिचा निष्प्राण देह बघून अनिल पूर्णपणे कोसळून गेले होते. तेव्हा मनाच्या उद्विग्न अवस्थेत अनिल यांच्या लेखणीतून ‘अजुनी रूसुनी आहे, खुलता खळी खुले ना’ ही कविता उमटली. कुमार गंधर्व यांनी ती उत्कटपणे गाऊन अमर केली आहे. ती जनमानसात जाऊन बसली आहे. अनिल यांचे कुमार गंधर्व यांच्या देवास येथील घरी येणे-जाणे सातत्याने होते. कुमार गंधर्व यांनी अनिल यांची आणखी एक कविता उत्तम गायली आहे –

कुणी जाल का , सांगाल का , सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

-kusumanil-bookअनिल यांच्या कवितेत ‘फुलवात’ ते ‘पेर्ते व्हा’ आणि ‘सांगाती’ ते ‘दशपदी’ असे दोन ठळक टप्पे दिसून येतात. अनिल यांनी भारत सरकारच्या समाज शिक्षण खात्याचे संचालक म्हणून 1948 ते 1952 व नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन विभागाचे संचालक म्हणून (दिल्ली -1952 व पुढे) जबाबदाऱ्या सांभाळल्या. देशाच्या शैक्षणिक धोरणातील त्यांचे त्या काळातील योगदान महत्त्वाचे आहे. अनिल यांनी युनेस्कोच्या साक्षरता प्रसार तज्ज्ञ समितीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यांची त्या समितीच्या पॅरिस येथील बैठकीच्या (1962) अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती. केंद्र व राज्य सरकार यांच्या अपारंपरिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, सर्व शिक्षा अभियान इत्यादी उपक्रमांची पाळेमुळे त्यांच्या कार्यांमध्ये व उपक्रमशीलतेमध्ये मिळू शकतात.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या काळात विदर्भामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा जोर होता. त्यामुळे मराठी जनमानसात दुभंग निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामील झालेल्या वेगवेगळ्या विभागांतील समग्र मराठी माणसांच्या भावनिक ऐक्याला बळकटी देण्यासाठी विभागीय साहित्य संस्थांना एका छत्रछायेखाली आणण्याचे, त्यासाठी घटना तयार करण्याचे, संस्थात्मक कार्य अनिल यांच्या नेतृत्वाखालीच घडून आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडणीतील अनिल यांचे हे योगदान महत्त्वाचे आहे.

 (संकलित संदर्भ – श्री पु भागवत – कुसुमावती देशपांडे: साहित्याची भूमी: ग्रंथाली प्रकाशन)

नितेश शिंदे
info@thinkmaharashtra.com

About Post Author

4 COMMENTS

  1. अजुनी रूसुनी आहे या गीताची…
    अजुनी रूसुनी आहे या गीताची हृदयद्रावक पार्श्वभूमी इतक्या दिवसांनी समजली. बस्तर मध्ये रहात असल्याने मराठीशी संबंध कमी. पण थिंक महाराष्ट्रमुळे ही अशी माहिती समजते. धन्यवाद.

  2. वा …किती थोर कवी आपल्या…
    वा …किती थोर कवी आपल्या मराठी भाषेला लाभलेत …याचा खूप अभिमान वाटला …कवी अनिल यांची ही खूप छान माहिती झाली तुमच्या लेखातून …!! छान उपक्रम आहे …मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद …??

  3. इतके दिवस अजुनि रूसूनि आहे,…
    इतके दिवस अजुनि रूसूनि आहे, ही लडीवाळ रचना वाटत होती! पण त्या ची पार्श्वभूमी इतकी करुण आहे हे मला आज समजल ंं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here