दत्तो वामन पोतदार – सांस्कृतिक पुरुष !

0
208

दत्तो वामन म्हणजे महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहास ! दत्तो वामन हे मोठे सार्वजनिक कार्यकर्ते होते. त्यांचा महाराष्ट्रातील ऐंशी सार्वजनिक संस्थांशी कार्यकर्ता म्हणून विविध प्रकारे संबंध होता. म्हणूनच त्यांना ‘महाराष्ट्र पुरुष‘ असे संबोधले जाई. पोतदार यांनी जन्मभर ज्ञानयज्ञ केला. त्यामुळे त्यांना जन्मशिक्षक असेही म्हणत…

इतिहासकार व मराठी भाषेचे विद्वान दत्तो वामन पोतदार हे पुण्याच्या ‘नूतन मराठी विद्यालया’चे विद्यार्थी. ते मॅट्रिक तेथून 1906 साली झाले आणि पदवीधर फर्ग्युसन कॉलेजमधून झाले. त्यांनी ‘नूमवि’ शाळेत अधीक्षक, प्राचार्य म्हणूनही काही वर्षे सेवा बजावली. त्यांनी प्राध्यापक म्हणून काम न्यू पूना कॉलेज (आताचे एस.पी.) येथे केले.

इतिहास आणि मराठी हे त्यांच्या व्यासंगाचे विषय. त्यांनी त्यांचे उभे आयुष्य त्या साधनेत वेचले. ते पुण्यात शनिवार पेठेत राहत. त्यांचे मूळ उपनाम (आडनाव) ओरपे हे होते. पण त्यांच्या एका पूर्वजाने खजिन्याचे अधिकारी म्हणजेच पोतदार म्हणून काम आदिलशाहीत केले. त्यामुळे ते नाव त्या कुटुंबाला चिकटले.

ते उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात. त्यांचे प्रभुत्व मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर होते. त्यांचे भाषण म्हटले की गर्दी लोटत असे. विषय कोणताही असो ते ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या पठडीतील विद्वान होते. त्यांना चालता बोलता ज्ञानकोश असेच म्हणत. त्यांच्यामुळे व त्यांच्या आधीचे रँग्लर र.पु. परांजपे यांच्यामुळे पुणेरी पगडीला प्रतिष्ठा आली. त्या पगडीला ज्ञानाचे आभूषण लावणारे पोतदार हे पुण्याच्या विद्येच्या प्रांगणातील बिनीचे शिलेदार होत.

इतिहास या विषयात त्यांचा प्रवेश झाला तो वि.का. राजवाडे यांच्या प्रेरणेने. राजवाडे म्हणजे इतिहासाचे परिशीलन कसे करावे याचे एक तगडे ‘स्कूल’(पीठ) ! त्यांनी इतिहासाचा अन्वयार्थ कपोलकल्पित कथा, पुराणकथा आणि इतिहास यांमधील फरक जाणण्याच्या तौलनिक बुद्धीतून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या निष्कर्षांना नाकारणे भल्याभल्यांना शक्य झाले नाही. त्यांना भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आले होते यावरून त्यांच्या विद्वत्तेचा पोत लक्षात येईल. ही घटना 1922 सालची आहे.

पोतदार यांचे सार्वजनिक जीवन हे अनेक अंगांनी बहरलेले होते. त्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (1939- अहमदनगर) ते संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष आणि मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष ते तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष अशा विविध पदांवरून विविध क्षेत्रांत मार्गदर्शकाची भूमिका बजावली. त्यांनी त्यांच्या अस्तित्वाने पुण्यातील सांस्कृतिक वातावरण सशक्त केले. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यांचे कुलगुरू होते. ती त्यांची कारकीर्दही गाजली. ते पुणे मराठी ग्रंथालयाचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी वसंत व्याख्यानमालेचे चिटणीस म्हणूनही काही काळ काम केले.

मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस (1935) ची स्थापना हे त्यांचे अमूल्य योगदान. त्याचेच नाव पुढे इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. इतिहास संशोधकांची दक्षिण आशियातील प्रथितयश संस्था म्हणून तिचे महत्त्व तेवढेच आहे. ते जवळ जवळ तीस वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस होते आणि त्यानंतर, ते कार्याध्यक्ष वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षांपर्यंत होते. इतिहासाचा मागोवा घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीला समाजात जो मान आहे त्याचे बरेचसे श्रेय हे त्या संस्थेची घडी घालून देणाऱ्या पोतदार यांना देण्यास हवे.

त्यांनी मोजकेच पण भरीव असे लेखन केले. ‘प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांच्या सर्व लेखन प्रवासातील महत्त्वाचा घटक म्हणता येईल. त्यांनी त्या विषयावर विविध माध्यमांतून आणि घाटांतून लेखन केले. त्यांनी मराठी गद्य भाषेचा 1810 ते 1874 या इंग्रज कालखंडातील प्रवास आणि भाषेची जडणघडण ग्रंथबद्ध केली आहे. त्याचे शीर्षक आहे ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’. तो उत्कृष्ट नमुना त्यांच्या संशोधन वृत्तीचा आणि तपशीलवार मांडणीचा मानला जातो.

त्यांचे ‘श्रोते हो’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह. शासनाने त्यांना शिवचरित्र लिहिण्याचे काम सन्मानाने देऊ केले होते, पण ते त्यांच्या हयातीत, त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकले नाही. ग्रंथसंग्रह कसा रचावा व ग्रंथांचे रक्षण कसे करावे, ते जुने लेख-कागदपत्रे कशी जतन करावीत यासाठी विकसित झालेल्या दप्तरव्यवहार व दप्तरशास्त्र यासंबंधीच्या अभ्यास दौऱ्यात (1956) इटालीतील अधिवेशनासाठी मुंबई सरकारतर्फे सहभागी झाले होते. त्यांनी फ्लोरेन्स, लंडन, पॅरिस, जिनेव्हा, नेपल्स, वार्सा अशी भ्रमंती करून त्या अनुभवावर आधारित ‘मी युरोपात काय पाहिले?’ हे पुस्तक लिहिले (व्हीनस प्रकाशन).

ते हयातभर लेखक-वक्ता-इतिहास संशोधक-शिक्षणतज्ञ-संस्था चालक अशा अनेक आघाड्यांवर कार्यरत होते. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी 6 ऑक्टोबर 1979 रोजी पुण्यात शेवटचा श्वास घेतला.

केशव साठये 9822108314 keshavsathaye@gmail.com

————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here