थोरो, दुर्गा भागवत आणि प्रल्हाद (Thoreau, Durga Bhagwat And Pralhad Jadhav)

21
66

दोनशे वर्षांपूर्वीचा अमेरिकन हेन्री डेव्हिड थोरो, शंभर वर्षांपूर्वीच्या दुर्गा भागवत आणि आजचा प्रल्हाद जाधव यांच्यात नाते काय आहे? थोरो हा जगद्विख्यात विचारवंत व ललित लेखक आहे. त्याने जगभर अनेक थोरामोठ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, टॉलस्टॉय इत्यादींचा समावेश होतो. त्याने सविनय कायदेभंगाचे तत्त्व प्रथम मांडले. अशी अनेक ज्ञानसूत्रे त्याच्या गाठी आहेत. थोरो यांचे विचारधन आणि त्यानुसार कृतिकार्यक्रम यासाठी त्यांच्या नावाने देशोदेशी संस्था स्थापन झाल्या आहेत. दुर्गा भागवत या महाराष्ट्राच्या विदुषी. त्यांनीही समाजशोध घेतला, ललित गद्य व इतर अनेक प्रकारचे साहित्य लिहिले. त्यांचा तेजस्वी बाणा आणीबाणीत उजळून उठला. त्यांचेही व्यक्तिमत्त्व प्रेरक ठरले आहे. त्यांच्यासंबंधी प्रतिभा रानडे, अंजली किर्तने, मीना वैशंपायन अशा अनेक लेखिकांनी अभ्यासपूर्ण व आत्मीयतेने लिहिले आहे. त्यांच्यापासून मुख्यतः विचारस्वातंत्र्याची प्रेरणा घेतलेला लेखकवर्ग तर फार मोठा आहे. थोरो 1817 साली जन्मले आणि 1862 मध्ये मरण पावले. दुर्गाबाईंचा कालखंड 1910 ते 2002 आहे.

          प्रल्हाद जाधव हा वर्तमानकाळातील ललित लेखक. त्याने ललित गद्य व नाट्यकृती असे बरेच लेखन केले आहे. त्याला कमी-जास्त यश मिळत गेलेले आहे. त्याची लेखणी अतिशय हळुवार, तरल अशी आहे. त्याच्या लेखणीत जरूर तेव्हा नाट्यात्मक्ता येते. त्याचे विषयवैविध्य विस्तृत आहे. मला महत्त्वाची जाणवते ती त्याची चिंतनशीलता आणि कल्पनेची झेप. त्याचे मूड्स लेखकाला साजेसे बदलत असतात आणि ते त्याच्या छोट्या छोट्या व्हॉट्सअॅप मेसेजमधून व्यक्त होत असतात; त्यातून त्याची संवेदनशीलताही प्रकट होऊन जाते. असाच वर्षापूर्वी केव्हा तरी त्याचा मेसेज आला. त्याने म्हटले होते, ‘मला थोरो आणि दुर्गा भागवत यांनी पछाडले आहे. काय करू?’ मला दुर्गाबाईंनी थोरोची तीन पुस्तके भाषांतर केल्याचे ठाऊक होते. त्यापैकी ‘वल्डनकाठी विचारविहार’ हे फार प्रसिद्ध आहे. ते थोरोचे मूळ पुस्तकही गाजलेले आहे.
दुर्गाबाई भागवत
     प्रल्हादची प्रतिभा मूळ नाटकाच्या अंगाने व्यक्त होऊ पाहते. त्याचे थोरो-दुर्गाबाईंबाबत तसेच झाले. त्याला चक्क दोन वेगवेगळ्या शतकांत जगलेल्या त्या दोघांची भेट नाट्यरूपात दिसू लागली. मला तत्क्षणी त्या दोघांची तत्त्वनिष्ठा जाणवली. प्रल्हादला त्याचे दृष्यरूपही दिसत होते. सुळसुळीत झग्यामधील दुर्गाबाई आणि धोतर-मुंडाशातील थोरो असे दोघे ‘वॉल्डनच्या तळ्याकाठी’ भेटतात. थोरोला भारतीय तत्त्वज्ञानाचे आकर्षण होते. त्याला कृष्णकल्पनेचा मोह पडलेला होता. दुर्गाबाई त्याच्या असहकारादी तत्त्वप्रियतेने भारलेल्या होत्या. दोघांना पक्षीप्राण्यांचे वेड, परंतु दोघे वेगवेगळ्या भूमींतील असल्यामुळे संदर्भ वेगवेगळे. थोरो एकटा राहिला, एकटा जगला. इमर्सन वगैरे त्याचे मित्र होते. दुर्गाबाईदेखील एकट्या राहिल्या, एकट्या जगल्या. त्यांचेही ऑपेरा हाऊसच्या कॉफी हाऊसचे एक आणि एशियाटिक लायब्ररीमधील एक अशी दोन घट्ट मित्रमंडळे होती.      
हेन्री डेव्हिड थोरो

प्रल्हादला थोरो व दुर्गाबाई यांचा शोध घेता घेता त्यांच्यातील अनेक साम्ये व भेद आढळू लागले. दोघांची स्वभाववैशिष्ट्ये त्याला कळू लागली. तो ती माझ्याशी ‘शेअर’ करताना खुलून जाई. थोरो मला पुस्तकांतून थोडा परिचित आणि दुर्गाबाईंना तर मी अगणित वेळा भेटलो आहे, त्यांचे बोलणे तासन् तास श्रवण केले आहे. त्यामुळे मी प्रल्हादच्या एकेक शोधाने व त्यातून त्याला स्फुरणार्‍या कल्पनांनी मोहून जातो. त्याच्या त्या कथनाला तात्त्त्विक अधिष्ठान असते, कारण ज्या दोन व्यक्तिमत्त्वांनी तो भारला गेला आहे. त्या थोरो आणि दुर्गाबाई या दोघांचा माणसाचे स्वातंत्र्य व स्वावलंबित्व यावर विश्वास आहे. 

          त्याने त्याची थोरो-दुर्गाबाई भेटीची कल्पना मला सांगितली तेव्हा मला एकदम आठवले, ते ‘कोपनहेगन’ हे नाटक. मायकेल फ्रायन यांचे ते मूळ नाटक शरद नावरे यांनी मराठीत आणले आणि शरद भुताडिया यांनी दिग्दर्शित केले. डॅनिश नील्स बोर आणि जर्मन वर्नर हायझेनबर्ग या वैज्ञानिकांची दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना जी भेट झाली त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात, त्याबाबतचा कल्पनाविलास म्हणजे ते नाटक होय. ते दोन वर्षांपूर्वीच रंगभूमीवर आले. प्रल्हादचे थोरो-दुर्गा नाटक जेव्हा कधी येईल तेव्हा त्याला दोन शतकांची, दोन देशांची पार्श्वभूमी असेल आणि त्यात विविध विषयांचे संदर्भ येतील. विचार करू तेवढी त्या नाटकातील दृश्ये मनोरम होत जातात बघा.

   मी एकदा प्रल्हादला विचारले, की तुला थोरो भेटला कसा आणि कोठे? तर तो म्हणाला, कित्येक वर्षांपूर्वी माझा प्रसिद्ध झालेला लेख वाचून रवींद्र पिंगे हे मोठे लेखक मला म्हणाले, की तू थोरो वाच. मी थोरोची एकदोन पुस्तके वाचली, पिंगे यांच्याशी नंतर तसे बोलणे झाले. दुर्गाबाईंनी अनुवादित केलेले ‘वॉल्डनकाठी’ दोन वर्षांपूर्वी पुन्हा वाचनात आले आणि मग मात्र थोरोचे वेड लागले. वामन जनार्दन कुंटे यांनी ‘थोरोचे श्रमजीवन’ हे पुस्तक 1951साली लिहिले आहे. त्यास विनोबा भावे यांची प्रस्तावना आहे. त्यानंतर गमतीचा भाग म्हणजे जयंत कुलकर्णी यांनी अलीकडे पुन्हा ‘वॉल्डनकाठी’ अनुवादिले आहे, कारण त्यांचे म्हणणे असे, की दुर्गाबाईंचे भाषांतर क्लिष्ट आहे! थोरो असा अनेक पातळ्यांवर अनेक लोकांना पुनःपुन्हा गुंतवून टाकतो. दुर्गाबाईदेखील कमी नाहीत. मीना वैशंपायन यांनी त्यांचे अप्रसिद्ध साहित्य त्यांच्या मृत्यूनंतर संकलित-संशोधित केले. दुर्गाबाईंचे अंजली किर्तने यांनी लिहिलेले चरित्र गेल्या वर्षभरातच प्रसिद्ध झाले आहे.       

          प्रल्हाद राज्य सरकारच्या माहितीखात्यातील संचालकपदावरून सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाला. मी तेव्हापासून त्याला पाहत आहे, की तो बुद्धिप्रतिभेची निवडक कामे करत सुखाने आणि आनंदाने जगत आहे. त्यात मुख्यतः लेखन-संशोधन-संपादन अशा कार्याचा समावेश होतो. तो राहतो माहीमला, पण मनाने बऱ्याच वेळा असतो महाडजवळ पोलादपूरला. ते त्याचे गाव. तेथे त्याचे घर आहे. तेथे काही लिहायच्या निमित्ताने मस्त मोकळ्या हवेत राहायचे. कधी लेखन पूर्ण करून, कधी अर्धवट ठेवून परत यायचे हा त्याचा नेहमीचा परिपाठ. मी आता वाट पाहत आहे, की प्रल्हाद थोरो आणि दुर्गाबाई यांना घेऊन पोलादपूरला कधी जातोय? मी तसे त्याला विचारले, तर तो म्हणाला, की ‘माहीत नाही, मी ते नाटक लिहीन की नाही? पण मला त्या कल्पनेत रमायला, त्यातील वेगवेगळे प्रवेश पाहायला खूप आवडत आहे’. प्रल्हादला शुभेच्छा.
प्रल्हाद जाधव 9920077626 pralhadjadhav.one@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

——————————————————————————————————————-

           नाटके– 1.शेक्सपिअर गेला उडत, 2. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या 3. हिरण्यगर्भ 4. शेवंता जित्ती हाय, (गेली तीस वर्षे सातत्याने विविध स्पर्धांत सादर होणारे नाटक) 5. एक कप चहासाठी 6. राजदंड, 7. या भुतांनो या ! 8. यमक, 9. भूमिका, 10. चेटूक 11. लेडीज सायकल 12. या चिमण्यांनो परत फिरा रे …13. ठिणगी उडाली आकाशी !                         
          एकांकिका कुलकर्णी व्हर्सेस देशपांडे, कृष्णाजी केशव, पाचूचं बेट, चिमूटभर अंधाराचा स्वामी, आचार्य देवो भव, गेला मोहन कुणीकडे ? ऑपरेशन दगड, पक्षी जाय दिगंतराहरवले ते गवसले का?

पुस्तके रानभूल, तांबट, आनंद नक्षत्र, आनंदाची मुळाक्षरे(ग्रंथाली),गॅलरीतली रातराणी, प्रसिद्धी आणि प्रतिमा (अनुभव-अक्षरधन प्रकाशन), शेवंता जित्ती हाय! (साकेत प्रकाशन) यमक, भूमिका (चेतश्री प्रकाशन), पाण्यातले दिवस(राजहंस), (आगामी: सुंदर मी बोलणार, ग्रंथाली)

प्रल्हाद जाधव यांची काही पुस्तके

 

 

 

About Post Author

Previous articleकोरोना – किती काळ? (Corona – How Long?)
Next articleअपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

21 COMMENTS

 1. ह्या सदरामुळे खूप वेगवेगळे विषय माहित होत जातात.नविन नविन वाचनीय पूस्तके पण समजतात . सौ .आंजली आपटे

 2. वाट बघावी असे नाटक दिसते आहे. कल्पना झकास पण अवघड आहे. प्रल्हाद जाधव यांना शुभेच्छा आणि तुम्हाला धन्यवाद. सुनंदा भोसेकर

 3. फारच उत्कृष्ठ लेख.उत्तम कल्पना विलास.हा लेख मनाला वरचच्या पातळीवर नेऊन ठेवतो.

 4. वाॅव निसर्गा तील निरीक्षणे आणी तत्कालीन सामाजिक परिस्थिती थोरो तो थोरोच.

 5. थोरो या अमेरिकन विचारवंताला ” सरोवरांचा सोयरा” असे संबोधन प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी दिले आहे. लॉक डाऊन च्या आजच्या परिस्थितीमध्ये थोरांचे विचार अंतर्मुख करतात. दुर्गाबाई भागवतांनी प्रमाणेच निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी आणि तिचे तत्वज्ञान थोरोची बहीण म्हणून शोभेल असं प्राध्यापक भोसले म्हणतात.”माणसा,माणसा,कधी होशील माणूस” हा तिचा प्रश्न आणि थोरोचे चिंतन एका पातळीवरच येते. संध्या जोशी

 6. प्रल्हाद जाधव,काही दिवसांपूर्वी खोपोली तमाझ्या खोपटात विसावला होता…”जे वाटते ते का वाटते,जे करायचे ते का करावे “??या अचंबित सवालानंमैफल रंगवून गेला..” त्याचं कुठलंही साहित्य मीवाचलेलं नाही… पण् वाचणार आहे.. एका नाटकाच्या लिखाणावर मात्रमी त्याचा चाहता बनलोय..”प्रतिभा” या संकल्पनेचा फज्जा ऊडवणारा हा एक अवलिया त्याच्या साहित्यिक सावली त माझ्या सारख्याकलाप्रेमी स् अचंबित केल्याशिवाय राहत नाही,आणि,”थोरो-भागवत”हा शामियाना उभारण्यात तोपारंगत ठरेल ही,का कुणास ठाऊक…अतीखात्री वाटते..प्रल्हाद तूम्ही लिहिते व्हा..सदिच्छा.. दिल से..!!अय्यूब खान..खोपोली..(तेविस एप्रिल दोन शून्य दोन शून्य)….

 7. प्रल्हादला लेखनासाठी शुभेच्छा,लवकर लेखन करावे.- मुकुंद आंधळकर

 8. व्वा!!सुंदर लेख”काही नातेसंबंध अतूट नि सनातन असतात.त्यांना देश,काल,भाषा यांचे बंधन नसते.हे संबंध चिरंतन असतात….माझे हेन्री डेव्हिड थोरोशी जुळलेले नाते असेच आहे..केवळ डोळ्यांनीच नव्हे तर स्पर्शानेही सृष्टी कशी हाताळायची याचे त्याचे कसब अपूर्व होते.हे स्पर्शज्ञान हाच त्याच्या व माझ्यातला अतूट भावबंध”, असं दुर्गाबाईंनी म्हटलंय.लेख वाचला नि हे आठवलं.प्रल्हाद जाधव यांनी नक्कीच नाट्यकृतीतून या दोन महान व्यक्तींना एकत्र आणावं.😊👍- डॉ.प्रिया निघोजकर.

 9. गांगल सर .या .थिंक महा.मध्ये प्रल्हाद जाधव यांच्या तरल संवेदना या थोरो व दुर्गा बाई यांच्या .लेखन प्रेरणाशी संस्कार.शी जुळतात त्या बांधील आहेत हे आपले निरीक्षण खूप महत्वाचे वाटले थो रो. च सर्व तत्वज्ञान हे मानवी जगणं हे निसर्ग एकरूपता स्वीकारा अस सांगणार आहे ती प्रयोग शिलत आहे पुन्हा आदिम त.अनुभव असा ही तो प्रवास आहे दुर्गा बाई संस्कृती तून अनुबंध शोधतात खूप मोठा पट आहे त्या दोघांच्या तरल व कलंदर जीवननिष्ठा चां आकर्षण िवाटते जाधव यांच्या व्यक्तिमत्व या स भिडणार आहे. त्यांच्या दृष्य प्रतिभा वर अर्थतच नाट्य.सहिता वर खूप समीक्षा व्हायला हवी .जाधव.यांच्या या लेखन प्रवासाला व थिंक महाराष्ट्राने ने लिहल त्या बद्दल शुभेच्छा शिवाजी राऊत सातारा

 10. आशयगघन लिखाणासाठी प्रल्हादजींचे नेहमीच नाव अग्रेसर असते. थोरो आणि दुर्गा भागवत यांच्यातील संवादाचा नाट्य मय दुवा प्रल्हादजीनी जरुर सांधून या दोघांमधील संवादक म्हणून त्यांनी स्वतः राहून वाचक-प्रेषकांना आगळी वेगळी अनुभूती द्यावी. गांगल तुम्ही हा लेख लिहून आमच्या सारख्याना पण थोरो, दुर्गाबाई आणि प्रल्हादजी यांच्यातील साम्यस्थळे शोधायला अप्रत्यक्षपणे भाग पाडले आहे. मनापासून धन्यवाद. विनायक कुळकर्णी

 11. नमस्कार सर. तीन वेगवेगळ्या काळातील तीन व्यक्तिमत्त्व. विचारसुत्र एकच. सुंदर मांडणी केली आहे. मनःपूर्वक शुभेच्छा.

 12. थोरो , दुर्गा भागवत आणि प्रल्हाद जाधव यांच्यातील नातेसंबंध उलगडून सांगण्याच्या ओघात वर्तमानकाळातील चिंतनशील लेखक प्रल्हाद जाधव याच्या साहित्यावर आणि व्यासंगांवर प्रकाश टाकणारा लेख श्री. दिनकर गांगल यांनी अगदी नेमक्या शब्दांत लिहीलाय . प्रल्हाद ने साहित्यातल्या सर्वच प्रांतात मुक्तपणे आणि आत्मविश्वासाने चौफेर लेखन केलं असलं तरी त्याच्या मधली भन्नाट प्रतिभा नाट्य लेखनाच्या चौकटीत आणि मर्यादांमध्ये जास्त मोकळेपणाने खुलते असं मला वाटते . सर्व संवेदनांना खडबडून जागं करणारं आणि मेंदूला झिणझिण्या आणणारं ' लेडीज सायकल ' नाटक लिहिणारा हा लेखक ' या भूतांनो या ' हे गमतीशीर , विनोदी नाटकही तेव्हढ्याच समर्थपणे लिहितो . विविध संस्थांमार्फत राज्य नाट्य स्पर्धेत सातत्याने सादर केलं जाणारं ' शेवंता जित्ती हाय ' हे नाटक ३० वर्षांनंतरही प्रेक्षकांना खिळवून ठेवते यातच प्रल्हादच्या लेखणीच्या ताकतीचा अंदाज येतो . व्यावसायिक यश प्रल्हादला मिळायला हवं तितकं मिळालं नाही , हे खरं तर वाचकांचं आणि प्रेक्षकांचं दुर्दैव ! थोरो आणि दुर्गा भागवत या पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतल्या आणि कालखंडातल्या दोन दिग्गज विचारवंतांची नाट्यरूपाने भेट घडवून आणण्याची कल्पना अवास्तव वाटत असली तरी प्रल्हादसाठी अवघड नाही . हे तो करू शकेल ; किंबहुना तोच हे करू शकेल . थोरो आणि दुर्गा भागवत एकमेकांना भेटलेच तर गळाभेटीपेक्षा वैचारीक संघर्ष पेटण्याची आणि तो विकोपाला जाण्याची शक्यता मला जास्त वाटते . आणि मग प्रल्हादच्या प्रतिभेतून रंगमंचावर साकारलेली ही शाब्दिक युद्ध सदृश परिस्थिती अनुभवणे ही प्रेक्षकांसाठी फार मोठी पर्वणी ठरेल

 13. पत्रकारितेच्या सुरूवातीच्या दिवसात दोन जाधवांशी जवळून मैत्री झाली, त्यातला पहिला राजा जाधव आणि दुसरा प्रल्हाद जाधव. दोघंही सरकारी नोकरीत राहिले, दोघंही मूल्यांशी प्रामाणिक राहिले, प्रल्हादला तक पत्रकारितेत पहिलं पाऊल टाकण्यापासून पहात आलो. त्याची लेखनप्रतिभा आणि विचारझेप अचंबित करणारी आहे. राजा बिचारा लवकर गेला, पण त्याही वयात साहित्यातल्या समरसतेच्या मूल्यांचा झेंडा खांद्यावर घेत जगला. प्रल्हादनं स्वत:भोवती घालून घेतलेल्या संशोधनाच्या मर्यादांतून लवकर बाहेर पडावं, महाराष्ट्राचं साहित्यविश्व त्याच्या प्रकट चिंतनाची मोठ्या अपेक्षेनं वाट पहात आहे..

 14. या लेखाने श्री जाधव साहेबांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. त्यांची रानभूल, शेवंता जित्ती हाय, पाण्यातले दिवस ही पुस्तके माझ्या संग्रहात आहे. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली आहे. अगदी सुरुवातीला त्यांनी मला त्यांचे निर्णय अचूक असतात का असे विचारले तेव्हा मी गोंधळून गेलो होतो. त्यांच्या बैठकीमागे नेहमी ते स्व:अक्षरात नेहमी सुविचार लिहायचे. त्यांच्या टेबलावरील काचेखाली 'आज, काल आणि परवा' या शीर्षकाखाली स्वतःला बजवायच्या सूचना नेहमी असायच्या. त्यांच्या दालनात सतत कोणाचानकोणाचा राबता एकसारखा असायचा. शुद्धलेखन हे त्यांच्या कामातील प्रमुख सूत्र असायचे. खूप आठवणी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here