थोरले माधवराव पेशवे (Madhavrao Peshawe)

-madhavrav-peshave

थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपत युद्धोत्तर मराठी साम्राज्याचा जणू जीर्णोद्धारच केला! ते श्रीमंत पहिले माधवराव पेशवे, ते पंतप्रधान माधवराव बल्लाळ पेशवे किंवा थोरले माधवराव पेशवे अशा अनेक नामाभिधानांनी विख्यात आहेत. पेशवाईतील मराठी साम्राज्याचे ते चौथे पेशवा होत. पानिपत युद्धातील अपरिमित मनुष्य-वित्त- सैन्यहानीच्या धक्क्यातून महाराष्ट्राला सावरणारे; तसेच, मराठी साम्राज्याला पुन्हा मानसिक-आर्थिक दृष्टीने उभारी देणारे पेशवे म्हणून ते इतिहासाला परिचित आहेत. ते तिसरा पेशवा नानासाहेब यांचे चिरंजीव. ते १४ फेब्रुवारी १७४५ रोजी सावनूर येथे जन्माला आले. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रमाबाईंबरोबर पुण्यात झाला (9 डिसेंबर 1753).

पानिपतावर मराठी साम्राज्याची अपरिमित हानी तसेच पिछेहाट 14 जानेवारी 1761 रोजी संक्रांतीच्या दिवशी झाली व खजिनाही पुरता रिकामा झाला. सर्वात मोठा धक्का होता नानासाहेब पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव व थोरले बंधू सदाशिवरावभाऊ यांच्या धारातीर्थी पतनाचा. त्या दु:खावेगाने खचलेल्या नानासाहेब पेशवे यांनी त्यांचा देह अखेरीस पर्वती येथे ठेवला.

थोरले माधवराव यांनी तशा निर्नायकी परिस्थितीत, वयाच्या सतराव्या वर्षी, 23 जून 1761 रोजी विकल मराठी साम्राज्याचे चौथे पेशवे म्हणून महाराष्ट्राची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली. नानासाहेबांचे बंधू रघुनाथराव त्या घटनेने दुखावले गेले.

हे ही लेख वाचा –
बाजीरावाच्या समाधीवर
राघोबादादा यांचे कोपरगावांतील वास्तव्य
कोपरगावचा पेशवेवाडा ऊर्फ विटाळशीचा वाडा

 

थोरले माधवराव यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वात प्रथम प्रशासन, आर्थिक हिशोब; तसेच, खजिन्याकडे वैयक्तिक लक्ष पुरवले. अनावश्यक खर्चाला कात्री लावली. त्यांनी शनिवारवाड्यावर तोपर्यंत चालत आलेल्या खर्चिक धार्मिक कर्मकांडांवर सुद्धा गदा आणली. थोरले माधवराव यांनी व्यक्तिगत लक्ष पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या रणवीरांच्या परिवारजनांकडेही पुरवले व सर्वांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था सरकारी खजिन्यातून केली. त्यामुळे त्यांनी मराठीजनांची व विशेषकरून सैन्याची मने जिंकली. त्याचा परिणाम असा झाला, की मराठी सैन्य रघुनाथरावांच्या अनेकविध कारस्थानांनंतरही बहुतांशी थोरल्या माधवराव पेशव्यांशी एकनिष्ठ राहिले.

थोरल्या माधवराव पेशव्यांचा एक विलक्षण स्वभावविशेष असा, की त्यांनी रघुनाथरावांची कारस्थाने पूर्णपणे जाणून असतानाही त्यांचे काका म्हणून; तसेच, एक पराक्रमी वीर म्हणून राघोबादादांना नेहमीच आवश्यक तो मान-सन्मान देण्यात कधीच कुचराई केली नाही. आणखी एक उदाहरण त्यांच्या मातोश्री गोपिकाबाईंचे बंधू व पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते यांचे. रास्तेमामांनी निजामाच्या सैन्याला पुण्यावर हल्ला करून शहराची लूट करण्यासाठी आतून मदत केली, हे ध्यानी आल्यानंतर माधवरावांनी त्यांनाही दंडाची जबरदस्त सजा सुनावली. त्या प्रसंगी गोपिकाबार्इंनी शनिवारवाडा सोडून जाण्याची धमकी खरी करून दाखवल्यावरही पेशवे म्हणून त्यांचा रास्तेमामांविषयीचा निर्णय बदलला गेला नाही. परंतु मातोश्री रागावून नाशिकशेजारील गंगापूर येथे राहू लागल्यानंतरही आई-मुलाचे व्यक्तिगत संबंध हे सौहार्दपूर्ण राहिले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी राजकारण व व्यक्तिगत नातेसंबंध यांचा योग्य तो समन्वय साधतानाही त्यात गल्लत होऊ न देणे, हे कसब सांभाळले.

-madhavpeshve-थोरले माधवराव पेशवे यांचे सेनाधिकारी; तसेच, सर्वसाधारण सैनिक यांच्याबरोबर संबंध सौहार्दाचे होते. ते राजकारणधुरंधर असले, तरी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय सैन्य व सैनिक हाच होता. त्याचबरोबर, पेशव्यांचे संबंध पेशवाईतील सर्वसामान्य प्रजेशीही जिव्हाळ्याचे होते. कोणाही सर्वसामान्य नागरिकाला त्याचे म्हणणे शनिवारवाड्यावर येऊन पेशव्यांसमोर मांडण्याची मुभा होती. थोरले माधवराव पेशवे स्वत: व्यक्तिगत लक्ष घालून त्यांच्या अडचणींचे निवारण करत.

थोरले माधवराव पेशवे यांनी मराठी समशेर पुन्हा एकदा साम्राज्यविस्तारासाठी व रिता खजिना भरण्यासाठी परजली. त्या कामी त्यांना नाना फडणवीस, त्र्यंबकराव पेठे, गोपाळराव पटवर्धन इत्यादी राजकारणपटू/रणधुरंधरांची साथ मोलाची लाभली. त्यांच्या काळातील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे हे तर नि:पक्षपाती न्यायदानासाठी विख्यात होते. त्यांनी साक्षात रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित सुनावले.

थोरल्या माधवरावांनी पुनश्च उभारी आणलेले मराठी सैन्य निजामाच्या सैन्यावर 10 ऑगस्ट 1763 रोजी औरंगाबादजवळ राक्षसभुवन येथे तुटून पडले! त्या समरात निजामाच्या सैन्याची ससेहोलपट झाली खरी, पण निजाम मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्या लढाईने मराठी सैन्य व पेशवाई यांच्या पराक्रमाचा दरारा पुन्हा सर्वत्र पसरला. त्याचा परिणाम असा झाला, की मराठी राज्यावर पानिपत युद्धानंतर निकराचा घाव घालण्याचा मनसुबा मनात रंगवणारे इतर अनेक शत्रू एकदम थंड पडले!

थोरले माधवराव पेशवे यांना क्षयरोगाने म्हैसूरच्या हैदर अलीविरुद्धच्या युद्धमोहिमेदरम्यान जून 1770 मध्ये गाठले. त्यांना मिरजेहून माघारी परतावे लागले. श्रीमंतांची प्रकृती रोगामुळे खालावत गेली. त्या दरम्यान, त्यांनी त्यांचा मुक्काम थेऊर येथे हलवला होता. त्यांनी अखेर थेऊर येथे 18 नोव्हेंबर 1772 रोजी सकाळी आठच्या सुमारास देह ठेवला.

(‘ज्ञानेश्वरी स्वर्णिमा’वरून उद्धृत)

About Post Author