वाचण्याकडे लोकांचा कल कमी होत आहे. ऐकण्या-पाहण्याकडे वाढत आहे. म्हणून आम्ही सोबत लेख आणि त्याचा ऑडियोही देत आहोत.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ हे वेबपोर्टल महाराष्ट्राचे, मराठी भाषासंस्कृतिचे सामर्थ्य प्रकट करावे; आणि त्याच वेळी, बदललेल्या काळात मराठी व जागतिक यांचा सांधा स्पष्ट व्हावा या हेतूने, दहा वर्षांपूर्वी सुरू केले. महाराष्ट्राचे कर्तृत्व ‘वेड्या’ व्यक्ती, उपक्रमशील संस्था आणि संस्कृतिसंचित या तीन अंगांनी व्यक्त करावे असा कार्यक्रम आखला. त्यासाठी तालुका हे केंद्र कल्पून माहिती संकलन सुरू केले; कधी मोहिमा हाती घेतल्या, कधी व्यक्तिगत दौरे केले. तशा प्रयत्नांत शंभरएक नामवंत आणि सर्वसाधारण माणसे स्वेच्छेने व स्वयंसेवेने सहभागी झाली. त्यामधून साडेतीन हजार सचित्र लेखांचे व एकशेबावीस व्हिडिओफितींचे संकलन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वेबपोर्टलवर झाले आहे. वेबपोर्टल वर्षारंभी पुनर्बांधणीसाठी घेतले होते, ती झटापट महिना-दोन महिने करत होतो तोपर्यंत ‘कोरोना काळ’ आला. त्यामुळे पोर्टलवरील ‘डेटा’ अवलोकनार्थ सध्या उपलब्ध नाही, परंतु त्याच नावाने, https://www.thinkmaharashtra.org/ हा ब्लॉग सुरू करून महाराष्ट्र व मराठी भाषासंस्कृती या संबंधात नवनवीन लेखन वाचकांसमोर गेले दोन महिने सादर करत आलो आहोत.
‘थिंक महाराष्ट्र’ची घोषवाक्ये दोन आहेत – १. ‘थिंक महाराष्ट्र लिंक महाराष्ट्र’, २. ‘मराठी माणसाचा चांगुलपणा व त्याची प्रज्ञाप्रतिभा यांचे नेटवर्क’. पोर्टलवर जेमतेम साडेतीन हजार लेख दहा वर्षांत जमा होऊ शकले, त्याचे कारण मर्यादित साधनसंपत्ती हेच आहे. पण त्यामधून एक अंदाज आला, की महाराष्ट्राचे समग्र चित्र सादर करायचे तर पोर्टलवर सुमारे दीड लाख लेख असावे लागतील. त्यानंतर मग सततचे ‘अपडेटिंग’ हे पुढील पिढ्यांचे काम राहील. हा एक मोठा कोशच असणार आहे. आम्ही त्याचे वर्णन महाराष्ट्राचे म्युझियम व कंटेंप्ररी जर्नल असेच करतो.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प गेली दहा वर्षें चालू आहे. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे त्यास मर्यादा खूप आहेत. ते काम महादेवशास्त्री जोशी यांनी करून ठेवलेल्या ‘भारतीय संस्कृतिकोश’ या कामाच्या कितीतरी पुढे जाते! कारण त्यास हजारो हात लागणार आहेत. ती किमया इंटरनेट माध्यमाची (क्राऊड सोअर्सिंग). त्यामुळे बारा कोटी महाराष्ट्रीयन लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकतात व नित्य संपर्कात राहू शकतात.
त्याची काही वैशिष्ट्ये अशी जाणवतात:
– तो गावोगावची अस्मिता जपण्याचा व जागती ठेवण्याचा अभिनव व विधायक मार्ग आहे!
– त्यामधून मल्टिमिडियाच्या अनेक शक्यता तयार होतात. जुनी पिढी वाचन एके वाचन अशी महती सांगत राहिली, त्यापुढे जाणे होते व म्हणून कालानुरूपता साधली जाते.
–‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या प्रयत्नांत मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा होण्याची शक्यता दिसते. मराठी माणूस जात्या संकोची, प्रसिद्धीपराङ्मुख. त्यामुळे त्याची कामगिरी/कर्तबगारी जगापुढे येत नाहीच; परंतु त्याची त्यालाही कळत नाही. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या तालुकावार पाहणीत प्रत्येक तालुक्यात पंधरा ते पंचवीस माणसे विविध क्षेत्रांत असाधारण कामगिरी करतात असे दिसून आले. त्या सगळ्यांचे कर्तृत्व एकत्र प्रकट झाले तर मराठी माणसाचा आत्मविश्वास दुणावणार नाही का?
– ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’सारखा स्थानिक संस्कृतीचे जतन/संवर्धन करता करता जगाशी जोडून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जगात अन्यत्र कोठे नाही. त्या अर्थाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ लोकल व ग्लोबल या ‘ग्लोकल’ पेचावर उत्तम इलाजाचे ‘मॉडेल’ ठरू शकते!
महाराष्ट्राच्या शक्तिसामर्थ्याचा आगळावेगळा प्रत्यय या प्रयत्नातून आला. तो वेळोवेळी नोंदलाही. राज्याच्या तालुक्यातालुक्यांत एक नवे जागरण सुरू आहे. त्यात गुंतलेल्या व्यक्ती प्रत्येक तालुक्यात पंधरा ते पंचवीस आढळतात असे आधी म्हटले. त्यांचे काम जुनी हस्तलिखिते जमा करणे येथपासून ते अभिनव शेतीसाधनांची निर्मिती करणे येथपर्यंत विविध तऱ्हांचे, बुद्धिमत्तेचे-कौशल्याचे व कलेचेही आहे. त्या कार्याचा ठसा समाजावर उमटत आहे, परंतु त्याची नोंद प्रस्थापित सरकार, मीडिया, सामाजिक-सांस्कृतिक संस्था घेत नाहीत. त्या नवजागरणास विचारांचा आधार लाभलेला नाही आणि त्यामुळे स्वाभाविकच, ते कार्य पारंपरिक मूल्यभावात अडकलेले भासते. त्यात प्रागतिकता वा पुरोगामित्व जाणवत नाही.
उलट, प्रस्थापितांच्या अधीन संस्था व व्यक्ती यांच्यामध्ये विचार व मते यांची सरळसरळ दुफळी सध्या पडली आहे. प्रत्येक मुद्दा आला, की दोन गट तयार होतात, त्यामध्ये त्या मुद्द्याचे गुणावगुण बाजूलाच राहतात. ताजे ढळढळीत उदाहरण म्हणजे वारीसंबंधात फडणवीस यांनी घेतलेली भूमिका अतार्किक व आडमुठेपणाने सरकारला कैचीत पकडण्याची आहे! त्यांची तशीच दयनीय अवस्था मराठा मोर्च्यात त्यावेळच्या विरोधकांकडून राजकारण प्रकटले तेव्हा झाली होती हे त्यांना आठवत नाही का? विचारांची विविधता व मतभिन्नता या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण त्यामागे हट्ट, पूर्वग्रहदूषितता नसावी. उलट, भावविचार मने खुली करुन, गेल्या काहीशे व हजारो वर्षांची मानवसमुदायाने जमा केलेली पुंजी समजून घेऊन व्यक्ती-देश-धर्मनिरपेक्ष केलेला असावा.’थिंक महाराष्ट्र’चे व्यासपीठ सत्तेचे राजकारण व गुंडगिरी हे दोन विषय वर्ज्य मानते. तरी तेच उदाहरण येथे नमूद केले, कारण येथील सुबुद्ध, सुसंस्कृत माणसालादेखील सारे काही राजकारणात बघण्याची सवय झाली आहे. सुशिक्षित, सुस्थित, विचारी व संवेदनशील समाजाने तात्कालिक राजकारणाच्या व कालबाह्य विचारसरणींच्या पलीकडे जाऊन समाजासमोर येणाऱ्या मुद्द्यांचा विचार करावा, तो वस्तुनिष्ठ पद्धतीने, निर्भीडपणे मांडावा आणि त्यामधून समाजाची अशी काही सहमती बांधली जावी असे ‘थिंक महाराष्ट्र’चे एक उद्दिष्ट आहे.
यापुढील लॉकडाऊन काळातील नोंदी एकत्रित करताना वाचकांसमोर दोन तऱ्हांचे लेख सादर करण्याचा प्रयत्न आहे. एक म्हणजे उमेदीच्या व्यक्तींचा परिचय करून देत राहूच. त्यामुळे महाराष्ट्रातील नवजागरणाचा प्रत्यय वाचकांना घेता येईल. त्याबरोबर समकालीन प्रश्न, समस्या, मुद्दे वस्तुनिष्ठ रीत्या वाचकांसमोर मांडण्याचा बेत आहे. वाचकांनी उमेदीच्या व्यक्तींना पाठिंबा द्यावा, त्यांचे कौतुक करावे, त्यांच्या कामामागील विचारभावना जाणून घ्याव्या आणि प्रश्न-समस्या-मुद्दे यांची चिकित्सा, ते नीट मनाने व तटस्थ बुद्धीने आकलन करून घेऊन ती मांडावी. धन्यवाद.
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगलहे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
———————————————————————————————-———–