त्रिवेंद्रमची सफर – कमला फडके

2
79
carasole

कमला फडके आणि प्रसिद्ध मराठी लेखक ना.सी. फडके यांनी त्रिवेंद्रम येथे भरलेल्या एका ‘फिलॉसॉफी’ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने डिसेंबर १९४५ मध्ये प्रवास केला. परिषदेत ना.सी. फडके हे ‘फिलॉसॉफी ऑफ जॉग्रफी’ या विषयावर स्वत: लिहिलेला एक प्रबंधही वाचणार होते. (पृष्ठ २) “प्रथम लॉजिकची विद्यार्थिनी व नंतर एका फिलॉसॉफरची सहधर्मचारिणी यामुळे फिलॉसॉफी या गहन विषयासंबंधी माझ्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली होती; परंतु मी त्रिवेंद्रमला जायचे ठरवले ते केवळ त्या जिज्ञासेमुळे नव्हे; तर एकदा त्रावणकोरचं सौंदर्य पाहण्याची इच्छा होती म्हणून.” (पृष्ठ २)

सुरुवात अशी झाल्यामुळे त्या लेखनात निसर्गसौंदर्याची बरीच वर्णने असतील असे वाटले. पण प्रत्यक्ष लेखनात निसर्गवर्णन कमी व इतर अनेक गोष्टी येतात.

कमलाबार्इंचे वय प्रवासाच्या वेळेस एकोणतीस वर्षें होते. त्यांचा ना.सी. फडके यांच्याशी बहुचर्चित विवाह झाल्यावर त्यांना एक मुलगीही झालेली होती आणि तरीही लग्नाची नव्हाळी टिकून असलेले त्यांचे ते दिवस होते असे म्हणता येईल. कमलाबार्इंच्या नावावर काही पुस्तके आहेत – ‘जेथे ना उमलती शब्दफुले’, ‘तेरी चूप मेरी चूप’,  ना.सी. फडके यांच्याबरोबर संयुक्त लेखक म्हणून ‘बाजुबंद’ आणि ‘अत्तर गुलाब’. प्रस्तुतचे पुस्तक १९४७ च्या सुमारास प्रसिद्ध झाले असावे. मला ते विलेपार्ल्याच्या ‘लोकमान्य सेवा संघा’च्या वाचनालयात वाचण्यास मिळाले.

कमलाबाई त्रिवेंद्रमला गेल्या ते अनेक टप्पे करत. त्या वेळी कोल्हापूर-त्रिवेंद्रम अशी थेट गाडी नव्हती. इतकेच नव्हे तर अगदी ठळक ठिकाणी जाण्यासाठीसुद्धा गाड्या बदलणे वगैरे प्रकार करावे लागत. कोल्हापूर-मिरज, मिरज-बेळगाव, बेळगाव-हुबळी, हुबळी-गुंटकल, गुंटकल-मद्रास, मद्रास-त्रिवेंद्रम असे त्यांच्या प्रवासाचे टप्पे होते.

असे अनेक टप्पे केल्यामुळे लेखनात त्या स्टेशनांची वर्णने, गाडीतील गर्दी, सहप्रवासी, गाडी पकडताना झालेली धावपळ, वेगवेगळ्या स्टेशन्सवर घेतलेले चहा-फराळ, जेवण असे विस्तृत तपशील येतात. त्यांतील एक जेवण-वर्णन खास नमुद करण्यासारखे आहे –

आम्ही आमची भूक ‘बेळगाव सोडल्यापासून ब्रेडबटर ऑम्लेटवर भागवली होती. कुडाप्पा स्टेशनवर चांगलं ब्राम्हणी पद्धतीचं जेवण मिळतं असं कळल्यावरून त्या स्टेशनवर दोन थाळ्यांची ऑर्डर आम्ही तारेनं दिली होती. गाडी थांबताच जेवणाचे दोन डबे घेऊन हॉटेलचा मनुष्य आला. कमरेइतके उंच जेवणाचे ते दोन डबे पाहून मला आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही. मी भीत भीतच एक डबा उघडला, तो आत जेवणाचा अपूर्व थाट होता. शेरभर ताक, चार कडिलिंबाची पानं, वर तरंगत असलेलं साराचं शेरभर तांबडंलाल पाणी, कच्च्या केळ्यांची सुकी भाजी आणि दहा माणसांना पुरेल एवढा भाताचा ढीग! कोणत्याही परिस्थितीत डगमगायचं नाही या वचनाची आठवण केली, इतर पदार्थ वाईट असले तरी ताक मात्र किती मधुर असं म्हणत आम्ही जेवणाची भूक ताकावर भागवली.’ (पृष्ठ १२)

कमलाबाई प्रत्यक्ष कॉन्फरन्समध्ये काय काय घडले, भाषणे कशी झाली याची विस्तृत हकिगत सांगतात. त्यांनी परिषदेच्या निमित्ताने जी स्थळे बघितली – त्या मीनाक्षी मंदिर, राजवाडा, त्रावणकोर म्युझियम, कन्याकुमारीचा तीन समुद्रांचा संगम, उदय शंकरांच्या ‘कल्पना’ या चित्रपटाची तालीम पाहण्याचा प्रसंग अशा विविध हकिगती मोकळेपणाने सांगतात; त्या त्या स्थळांबद्दल प्रचलित असलेल्या दंतकथाही सांगतात. त्यात त्यांचे निरीक्षण जाणवते. रंगविलास राजवाड्यात दोनशे वर्षांतील राजघराण्यांतील स्त्रियांची पोर्ट्रेट्स पाहून त्यांच्या पोषाखात बदल कसे कसे झाले हे टिपून त्या म्हणतात –

‘दरबारी पोषाखात कालमानाप्रमाणे होत गेलेला बदल मला मोठा गंमतीदार वाटला. विशेषत: पूर्वींच्या महाराणींचा पोषाख व केशरचना आणि सध्याच्या महाराणी – म्हणजे राजमाता सेतु पार्वतीबाई – यांचा पोषाख व भूषा यांत कमालीचं अंतर दिसलं. जुन्या काळी राजस्त्रिया चोळ्या वापरत नसत. त्यांच्या वक्षस्थळावर भरजरी पैठणीवस्त्राचा पदर असे. केस नारदमुनीप्रमाणे डोक्यावर बांधून त्याभोवती फुलं गुंफण्याची चाल होती. दंड, मनगटं, कान व गळा दागिन्यांनी खचलेला असे. त्याच गादीवरील सध्याच्या राजमातेचा दरबारी पोषाख मुंबईतील पाठारे प्रभू ज्ञातीतील फॅशनेबल बाईसारखा मला वाटला.’ (पृष्ठ ५३)

महत्त्वाचे हे, की बाई सर्व वर्णन उघडपणे लिहितात. ‘कमरेभोवती लपटलेल्या लुंगीमुळे त्या स्त्री-पुरुषांची चाल किती सरळ, तोकडी व ऐटबाज बनली होती. मी अप्पांना म्हटलं, “लोकांच्या पोषाखाची रीत व चालण्याची पद्धत यांच्या अन्योन्य संबंधावर तुलनात्मक निबंध कोणीच कसा लिहिला नाही?”’(पृष्ठ ५५)

बाई स्वत: पोषाखाच्या बाबतीत अतिशय दक्ष होत्या. त्यांनी स्वत:चा पोषाख परिषदेला जाण्यासाठी तर काळजीपूर्वक केलाच, ‘पण माझी सर्व तयारी झाल्यावर मी अप्पांचा ब्ल्यू ग्रे सूट, रेघांचा शर्ट, त्याला साजेसा टाय, मोजे, बूट असा सर्व पोषाख बाहेर काढून ठेवला. स्वत:च्या पोषाखाबाबतीत मात्र निष्काळजी असणाऱ्या अप्पांवर हा जुलूमच होता… ’

‘आज साऱ्याच मंडळींनी थाटबाज पोषाख केले होते. होस्टेलच्या पायरीवर प्रो. दामले उभे राहून होते. अप्पांच्या सुटाकडे पाहत ते म्हणाले, “वा: अप्पासाहेब आहे बुवा!” यावर अप्पाही हसून म्हणाले, “अहो मग दाखवायचा केव्हा?”’– (पृष्ठ ५७)

बार्इंच्या संवेदनशीलतेसंबंधीचा उल्लेखही सांगायला हवा. त्यावेळी दक्षिणेत माणसाने रिक्षा ओढण्याची प्रथा होती. (आजही – निदान काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी तशी ती मसुरीला होती) माणसाने माणसाला वाहून न्यायचे हे बाईंना पटेना. ‘अप्पा रिक्षा ठरवू लागले तेव्हा मी अप्पांना म्हटले, “मी रिक्षात बसणार नाही. त्यापेक्षा आपण चालत जाऊ.” अप्पांना माझा हट्ट विचित्र वाटला… “येथे सगळे लोक बसतात. मी सुद्धा सकाळी रिक्षातूनच स्टेशनवर जाऊन आलो. चल, उगीच भलतं वेड घेऊ नको” अशी अप्पा माझी समजूत घालू लागले. परंतु रिक्षात बसण्याला माझं मन तयार होईना. उलट, अप्पांनी रिक्षात बसावं ही गोष्ट माझ्या मनाला लागली व मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं, “खरंच, तुम्ही रिक्षात बसलात? आपण रिक्षात बसावं आणि आपल्याच एका बांधवानं गुरासारखी रिक्षा ओढावी याचा तुम्हाला काहीच संकोच वाटत नाही?”’ (पृष्ठ ४७- ४८)

परतीच्या प्रवासात बार्इंना युद्धातून परतलेले काही मराठी जवान भेटले. ते इटालीतून परत हिंदुस्थानात आले होते. त्यांना कमलाबाई व ना.सी. या दोघांनी बोलते केले. मराठा सैनिकांनी त्यांना इटालीचे अनुभव भरभरून सांगितले. ‘युरोपमधील स्त्रीपुरुष एकमेकांशी किती मोकळेपणानं, खेळीमेळीनं वागतात. तेथील स्त्रिया पाकशास्त्राइतक्याच सौंदर्यशास्त्रात किती निष्णात आहेत. तेथील लोकांची घरं किती स्वच्छ व सुशोभित राखलेली असतात. तेथील स्त्रीपुरुषांना निसर्गसौंदर्याची केवढी भूक आहे. त्यांच्यामध्ये साध्या शेतकरी वर्गालाही संगीत नृत्य वगैरे कला कशा अवगत आहेत वगैरे वर्णन करून तो पुन: पुन्हा म्हणे “साहेब, कसं जगावं हे आम्ही त्या लोकांपासून शिकावं.”’ (पृष्ठ १३१) ‘इतकेच नव्हे तर त्या जवानाचे एका सुरेख इटालियन मुलीबरोबर प्रेमही जमले होते. तिचा बाप लग्न लावून द्यायला तयारही होता. पण, “मी तिला नकार दिला. इकडे देशावर सगळी मंडळी मला काय म्हणतील या विचारानं मी तो मोह टाळला.”’ (पृष्ठ १३२)

रूढ अर्थाने प्रवासवर्णनाचे जे घटक येतात – प्रवास, प्रदेश, प्रवासी ते सारे येतात. कमलाबार्इंचे निरीक्षण दिसते, तारुण्यातील उत्साह जाणवतो. प्रदेशाची माहिती येते – काही अंशी माहितीपत्रकातील वाटावी अशी. पण बार्इंचे ते पहिलेच लेखन (बहुधा) आहे हे लक्षात घेता ते स्वाभाविक वाटते. बार्इंचे व्यक्तिमत्त्व जाणवते आणि भाषा साधी तरी कोठेही कंटाळा येत नाही. रंजक प्रवासवर्णनाचा नमुना असे निश्चितपणे या लेखनाला म्हणता येईल.

त्रिवेंद्रमची सफर
लेखिका – कमला फडके
पृष्ठे १३६ + छायाचित्रे मूल्ये दोन रुपये

– मुकुंद वझे

Last Updated On – 24th Dec 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. हे माझ्या आईचे पुस्तक आहे.
    हे माझ्या आईचे पुस्तक आहे. ह्या पुस्तकावर इतका सुंदर आणि तपशीलवार अभिप्राय लिहिल्या बद्दल लेखकाचे धन्यवाद.

Comments are closed.