त्रिकोणातील वादळ पेलताना – बाईच्या जगण्याची चित्तरकथा

2
44
_TrikonatilVadal_Peltana_1.jpg

लतिका चौधरी यांची ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ ही आत्मकथनात्मक कादंबरी. ती वाचताना संजय चौधरी नाशिकच्या कवीच्या ‘जन्मणारा जीव म्हणाला, दुःख दे, यातना दे. देणा-याने स्त्री जन्म दिला या ओळी आठवत राहिल्या. कादंबरीची नायिका वेलू हिच्या बालविवाहापासूनचे कथन कादंबरीत येते. तेरा-चौदा वर्षांची वेलू नोकरदाराची पत्नी होणार म्हणून खुशीत असते. मात्र सासू तिचे रंगरूप विवाह मंडपातच दाखवते. वेलू सासरच्या जाचाला सामोरी जाऊ लागते, ती नव-याच्या भरवशावर. पण नवरा मातृभक्त आहे. तो आईच्या शब्दाबाहेर जात नाही. विवाह म्हणजे दोन जीवांचे शारीर-मानसिक पातळीवरील मिलन. शंभर वर्षांपूर्वीच्या लग्नपत्रिकांत ‘यांचा शरीरसंबध करण्याचे योजिले आहे’ असा उल्लेख असायचा. वेलू वाट पाहून पाहून थकली, पण नवरा म्हणून पात्रता नसलेल्या त्या नात्याच्या माणसाने पत्नीला न्याय दिला नाही! वेलूला छळाला अखंड सामोरे जावे लागले. ती पहाटेपासून राब-राब राबे. तशीच ती उपाशीपोटी मजुरीला जाऊ लागली. ती मजूर म्हणून हातातून रक्त येईपर्यंत तेथेही राबली. तिची सासू अस्सल मराठी सिनेमातील आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील खलनायिकांनाही मागे टाकणारी आहे. वेलू जनावराचे जीवन जगत होती. बैलासारखे काम आणि शिळेपाके खाणे – तेही त्यांच्या इच्छेनुसार मिळणारे! बस्स, हेच तिचे जगणे होते. वेलू एक स्त्री – जिला माणसाचे काळीज होते, पण नियतीने तिला राक्षसाच्या गुहेत लोटले होते (पृष्ठ ६३). कादंबरीतील वेलू ही सोशिक स्त्री आहे. ती आशावादी आहे हा विशेष! ती जिद्दीही आहे. ती तिचे शिक्षण सुटले याचे शल्य मनाशी बाळगत संसाराच्या वाटा-आडवाटा तुडवताना रक्तबंबाळ होते.

कादंबरीच्या शीर्षकातील त्रिकोणापैकी पहिला कोन माहेर हा आहे. शेंडेफळ असणा-या वेलूचे लग्न करून दिल्याच्या भावनेने भावंडे निर्धास्त झाली. नोकरी करणा-या माणसांना स्वतःचा कोश महत्त्वाचा असतो. विवाह होऊन गुण्यागोविंदाने राहणा-या बहिणींना वेलूच्या संसारातील वैगुण्य समजत नाही. कमी शिक्षण घेतलेला भाऊ पाठराखण करतो तर आई वेलूची पडझड पाहून अस्वस्थ होते, तिच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न करते. आईलाच वेलू पुरती होरपळली आहे हे समजते. आईने स्वत:ही दुःखाच्या राशी तुडवलेल्या असतात. तीही तिच्या नादी-छंदी-फंदी-व्यसनी नव-याचा संसार करून मेटाकुटीला आलेली असते. दुःखाला दुःख भेटते तशी मायलेकींची अवस्था. वेलूला तिची ‘नव-याने टाकलेली स्त्री’ ही अवस्था नको होती. वेलू त्यासाठी दासीपणाची जहागिरी स्वीकारायलाही तयार होते, पण तिला सासर-माहेर या दोन्ही कोनांत उपेक्षेलाच सामोरे जावे लागले.

चाणाक्ष वेलूच्या शिक्षण हा आपल्या दु:स्थितीवर उपाय आहे हे लक्षात आले आणि वेलूने  ‘नव-याने टाकलेली’ हा कलंक मिरवत न बसता अक्षरांशी दोस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती दरवाज्याच्या बाहेर पाऊल टाकते. तिला तेथेही कुटुंबव्यवस्थेतील ताण्याबाण्यांना सामोरे जावे लागते. दोन भावांपैकी हातावर पोट असलेल्या धाकट्या भावाची मूक संमती, तर कनिष्ठ मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असणा-या मोठ्या भावाचा विरोध या कात्रीत सापडलेली वेलू वसतिगृहात अधीक्षक म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेते. वसतिगृहाची सुरुवात तिच्या नेमणुकीने होते आणि ती तेथील समस्यांचा डोंगर पाहून हादरतेच! ती हे अग्निदिव्य करण्यास तयार होते. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे तिच्या लक्षात आलेले असते. ती वसतिगृहाचे रेकॉर्ड रात्र रात्र जागून तयार करते आणि बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षाही देते. तिच्या त्या पुढील प्रवासातही बोरीबाभळीचे काटे असतात. ती पडते, झडते, पायातील काटे दूर करत चालत असते. यश तिला परीक्षेतही हुलकावणी देते की काय असे वाटत राहते. पण वेलूला यश मिळते! ती बारावीची परीक्षा गुणवत्तेने पास होते. तिला तिचा रस्ता सापडतो. वेलू पदवी इंग्रजी विषय घेऊन मिळवते. ती एम.ए. होते. ती अंशवेळ प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागते.

_TrikonatilVadal_Peltana_2.jpgकाही माणसांच्या आयुष्यात संघर्षाला पर्याय नसतो. पहिल्या विवाहात होरपळलेल्या वेलूच्या आयुष्यात, तिसरा कोणी अलगद येतो. मुलगा वकील आहे. त्याचा जमीनजुमला आहे. त्याचे घराणे तालेवार आहे. वेलूचे दुसरे लग्न होते, पण वकीलसाहेब लहरी, संशयी निघतात. वेलूला ते स्थळ त्यांची पहिली पत्नी दीर्घ आजारी असल्याने आलेले असते. वकीलसाहेब सतत घरात आहेत. मानसिक स्वास्थ्य बिघडलेला माणूस वेलूला शरीरसुख देतो, ते पण अघोरी. तिला अधाशी सुख नकोसे होते. मनोरुग्ण नवरा त्याच्या बायकोचे हाल अतोनात करतो. संसाराची मांडामांड, मोडतोड तिला पाहवी लागते. मानसोपचार तज्ज्ञांच्या उपायांना साथ देणारा नवरा पुन:पुन्हा मानसिक द्विधा अवस्थेत वेलूची परीक्षा पाहतो. वेलूचे गर्भारपण, पोटात वाढलेल्या गर्भाचे अधिकचे वजन, गर्भवतीच्या वेदना आणि मानवी पाशवी पिळवणूक यांनी वेलू जर्जर होऊन जाते. फरक एवढाच, की घरात बाळ जन्माला येते आणि स्त्री जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. वेलू कुटुंबवत्सल सासू, सासरे, नणंद, भावोजी या सा-यांना धरून ठेवते, पण मानसिक स्वास्थ्य हरवलेला नवरा तिला स्थिरस्थावर होऊ देत नाही. ती त्या संघर्षातच बी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण करते; नोकरीत स्थिरावण्याचा प्रयत्न करते. तिला राक्षसासारख्या वागणा-या नव-याशी समायोजन करता करता नाकी नऊ येतात. तरी ती तिचे घरकुल उभारते. वेलू पहिल्या विवाहात अपत्यसुखाची प्रतीक्षा करत असते. तिला दुस-या विवाहानंतर गर्भपात दोन-तीन वेळा करावा लागतो. त्यासाठी तिलाच पुढाकार घ्यावा लागतो. मनोरुग्ण पतीपासून होणा-या पुढील अपत्यांना जन्माला घालून तिला रिस्क घ्यायची नसते. वेलूची अशी ही तीन कोनांतील वादळाची कहाणी साता उत्तरी सफळ संपूर्ण तरी कशी म्हणावी?

कादंबरी ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ आत्मकथा म्हणूनच पुढे येते. कादंबरीचे लेखनही सलग झालेले नाही. सुरुवातीचा काही भाग दहा वर्षांपूर्वी लिहिलेला तर नंतरचा भाग बर्‍याच उशिरा लिहिलेला. त्यामुळे तृतीय पुरुषी निवेदन नंतर नकळतपणे प्रथम पुरुषी झाले आहे. लेखिका तिचे तेच ते दुःख पुन:पुन्हा सांगत राहिली आहे. त्यामुळे काही ठिकाणी द्विरुक्तीही झाली आहे. प्रांजळ कथन हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी लेखिकेने अनलंकृत भाषा वापरलेली आहे. स्त्रीच्या वाट्याला येणा-या दुःखभोगाचे कादंबरीतील चित्रण जात, धर्म, पंथ, प्रांत या पलीकडील आहे. कादंबरी खानदेशातील रुढी, परंपरा, विवाहसंस्था, स्त्रीजीवन यांचे अस्पष्ट चित्रणही करते. बाईची अस्वस्थ घुसमट कादंबरीत टोकदार झाली आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम, परित्यक्ता स्त्रीचे माहेरपण, स्त्रीशिक्षणाने येणारे स्वावलंबन, पुनर्विवाहातील जुगार आणि स्त्रीचे सोसत उभे राहणे असे अनेक पदर कादंबरीतून उलगडत जातात. संजय चौधरीनेच अन्य एका कवितेत म्हटले आहे,

पहिला घाव बसला तेव्हा

गांगरलो बावरलो

दुस-या दुख-या घावानंतर

थोडासा सावरलो

घावांमागून घाव बसत गेले

आयुष्यावर घावांचे गाव वसत गेले

या कवितेचे प्रात्यक्षिक म्हणजे लतिका चौधरी यांची ही कादंबरी आहे. दोंडाईचाच्या (ता. शिरपूर) एका धीट शिक्षिकेने ती धाडसाने वाचकांना सादर केली आहे.

‘त्रिकोणातील वादळ पेलताना’

– लतिका चौधरी

दिलीपराज प्रकाशन पुणे, प्रथम आवृत्ती – जुलै २०१६,

पृष्ठे २९०, मूल्य – रु ३५०.००

– शंकर बो-हाडे

About Post Author

Previous articleअध्यात्म
Next articleबहामनी राज्य
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

2 COMMENTS

  1. धन्यवाद सर.ष्य क प्राय
    धन्यवाद सर.ष्य क प्राय

  2. अप्रतिम पुस्तक परीक्षण -…
    अप्रतिम पुस्तक परीक्षण –
    बो-हाडे सरांनी पुस्तकाच्या सर्व अंगाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरले आहे. सरांचे आवलोकन आणि सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या प्रत्येक लेखात ठळकपणे दिसून येते. सरांनी केलेल्या पुस्तक परीक्षणमुळे व रसग्रहणात्मक मुल्यमापनामुळे पुस्तक वाचनाची तीव्र इच्छा झाली आहे. धन्यवाद सर आणि पुढील लेखनासाठी आभाळभर शुभेच्छा!

Comments are closed.