तीर्थक्षेत्रांनी वेढलेले सटाणा (बागलाण)

2
180

मी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून (1982) सटाण्याला राहतो. सटाणा हे छोटे निमशहरी तालुक्याचे गाव आहे. सटाणा ही माझी कर्मभूमी आहे. माझे मूळ गाव विरगाव हे सटाण्यापासून अवघ्या दहा किलोमीटरवर आहे. सटाणा हे विंचूर – प्रकाशा महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले असून गावाची लोकसंख्या सदतीस हजार सातशे सोळा (जनगणना 2011- 37,716) इतकी आहे. महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील (नाशिकपासून नव्वद किलोमीटर, ईशान्य दिशेला) बागलाण म्हणजेच सटाणा तालुका. सटाणा हेच तालुक्याच्या गावाचे नाव. सटाण्यापासून वायव्य दिशेला गुजराथ राज्यातील डांग भागाची सीमा फक्‍त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून वायव्येकडून आरम नावाची लहान नदी आग्नेय या दिशेने वाहते (म्हणजे पूर्वी ती वाहत होती. परंतु ती आता खूप पाऊस झाला तर पावसाळ्यात तात्पुरती वाहते). आरमचा संगम सटाण्यापासून पाच किलोमीटर पुढे गिरणा नावाच्या नदीशी होतो. गावाच्या आसपासची जमीन काळी कसदार असून शेतीला उपयुक्‍त अशी आहे. बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कपाशी, मका, कांदा, कडधान्य (कठान) ही पारंपरिक खरीप- रब्बी पिके असून, अलिकडे द्राक्षे आणि डाळींबे यांची व्यावसायिक लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

बागलाण हे त्या प्रदेशाचे पारंपरिक नाव. बागूल राजाच्या नावावरून त्या ‘प्रांता’चे नाव बागलाण हे आहे. बागूल हा राठोडवंशीय राजा. त्याची वंशावळ 1300 पासून सापडते. बागूल राजघराण्यातील चौपन्न राजांची नामावलीही उपलब्ध आहे. बागलाण बागूलांकडून पेशव्यांकडे गेले आणि पेशव्यांकडून इंग्रजांकडे. पूर्वीच्या बागलाण ‘प्रांतात’ संपूर्ण खानदेश सामावलेला होता, इतका तो लांबी-रूंदीने विस्तृत होता! बागलाण म्हणजे गिरणा, तापी, नर्मदा या नद्यांचा प्रदेश. दुर्गम आणि डोंगराळ भाग. उत्तरोत्तर त्या प्रांताचे आकुंचन होत गेले आणि तो आता एका तालुक्यापुरता उरला आहे!

वाघांचे रान म्हणजे बाघांचे रान. बाघरानचा अपभ्रंश बागलाण झाला अशीही व्युत्पती सांगितली जाते. राजे बागूल यांनी सहा ठाणे वसवले होते असे म्हटले जाते. तो (सहा ठाणे वसवण्याचा) काळ दंतकथांतून चौदाव्या-पंधराव्या शतकापासून इंग्रजांच्या काळापर्यंत पसरलेला केव्हाही सांगितला जातो. सहा ठाण्यांचा अपभ्रंश म्हणजे सटाणा झाले असावे अशी एक व्युत्पत्ती आहे. सटाण्याच्या जागी शहाचे ठाणे वसले होते. शहा ठाण्याचा अपभ्रंश सटाणा झाले असेही सांगितले जाते. सटाण्याचे पूर्वीचे नाव सत्य नगरी वा सत्यायन होते अशीही सटाणा नावाची दंतकथा रूढ आहे.

सटाणा तालुक्यात एकशेपासष्ट गावे आहेत. म्हणून ते एकशेपासष्ट खेड्यांचे केंद्र समजले जाते. तेथील माणसेही सटाणा शहरातील माणसांपेक्षा फार वेगळी नाहीत. गावात शनिवारी आठवडी बाजार भरतो. खेड्यापाड्यांचे लोक सटाण्याला बाजारासाठी येतात. गावात दोन पोस्ट ऑफिस, दोन प्राथमिक शाळा, दोन माध्यमिक शाळा, महाविद्यालये, इंग्रजी माध्यमाच्या अनेक खाजगी शाळा, दहा बँका, अनेक पत संस्था, सरकारी दवाखाना, शेती उत्पन्न बाजार समिती- मार्केट, शेतकर्‍यांसाठी सोसायटी, ग्राहक सेवा केंद्र, रोटरी क्लब वगैरे आहेत. गावाच्या गल्ल्यांना पारंपरिक जातीय पण जातीयवादी दृष्टिकोन नसलेली नावे आहेत. उदाहरणार्थ, कुणबी गल्ली, माळी गल्ली, पेठ गल्ली, न्हावी गल्ली, सोनार गल्ली वगैरे. त्या व्यतिरिक्‍त गावात चावडी, कुंभारवाडा, भिलाटी आदी वस्त्याही आहेत.

सटाणा हे साध्याभोळ्या माणसांचे, परंपरागत शेती व्यवसायाचे, व्यापारी पेठेचे, कष्टकरी माणसांचे, बारा बलुतेदारांचे असे रूढी पाळत जगणारे छोटसे गाव आहे. सटाणा शहरात कोणतीही ऐतिहासिक वास्तू नाही. तालुक्यात मात्र ऐतिहासिक- पुरातत्त्वीय बाबी बऱ्याच आहेत. सटाणा गावातून अवजड वाहनांचे दळणवळण होत असल्याने वेळोवेळी अपघात होत राहतात. त्यासाठी नागरिकांकडून वळण रस्त्याची मागणी होत आहे. मात्र रस्ता अजून होत नाही. सटाण्यात प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाई असते. गावाला 2018-19 या वर्षात तर वर्षभर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. नगरपालिकेने दिलेल्या घरातील नळ जोडणीला एकेक महिना पाणी येत नाही. पाणी योजनांना तात्त्विक मंजुरी वेळोवेळी शासकीय पातळीवर मिळते. पण धरणांच्या आजुबाजूच्या स्थानिक जनतेच्या विरोधामुळे कोणतीच पाणी योजना पूर्णत्वास जात नाही.

बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर– मुल्हेरचे किल्ले महाराष्ट्राला ज्ञात आहेत. शिवाजी महाराज सुरत लुटीतून परतताना साल्हेर किल्ल्यावर थांबले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक पर्यटक व गिर्यारोहक साल्हेर किल्ल्याला भेट देण्यास येत असतात. कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे उंच शिखर आहे तर साल्हेर किल्ला हा दुसर्‍या क्रमांकाचा उंच किल्ला आहे. साल्हेर- मुल्हेर या किल्ल्यांवर प्रचंड जंगल होते. मात्र आज ते किल्ले पूर्णपणे उघडेबोडके आहेत.

सटाणा आणि परिसर म्हणजेच बागलाण परिसराची संस्कृती ही ग्रामसंस्कृती आहे. ‍भाषिकदृष्ट्या अहिराणी भाषिक संस्कृती आहे आणि शेती ही त्या भागाची मूळ लोकसंस्कृती आहे. सटाण्याला पूर्वी मामलेदार हे पद नव्हते. सटाणा मालेगावच्या अखत्यारीत येत असे. यशवंत भोसेकर यांच्या 1869 च्या नियुक्‍‍तीने बागलाणला पहिले मामलेदार मिळाले. ब्रिटिश सरकारने बागलाण तालुक्यासाठी सटाण्याला मामलेदार कचेरी स्थापन केली. यशवंत भोसेकर हे सटाणा येथे 8 मे 1869 रोजी रूजू झाले. ते 1869 पासून 1873 पर्यंत बागलाणात होते. ते देवध्यानी, धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचे होते. त्या परिसरात ओला दुष्काळ 1872 साली पडला. भोसेकर लोक भुकेने मरत असलेले पाहून अस्वस्थ झाले आणि त्यांनी सरकारी खजिना लोकांना वाटून टाकला. इंग्रज सरकारने त्यांना बरखास्त केले तरी ते लोकांचे देव झाले, म्हणून देवमामलेदार. त्यांच्या मृत्यूनंतर सटाण्यात त्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले. दरवर्षी तेथे भव्य रथ निघतो. पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. देवमामलेदार हे सटाण्याचे लोकदैवत झाले. आजूबाजूच्या खेड्यांवरील लोकसुद्धा गावाजवळच्या आरम नदीकाठी देवमामलेदार यांच्या मंदिरात दर्शन घेण्यास कायम जात असतात. गावात कोणाकडे येणारे पाहुणेलोक गावदेवतेचे दर्शन मुद्दाम घेतात.

मयुरनगरीतील (मुल्हेर) तळ्यात दोन मूर्ती सापडल्या. त्यांपैकी नारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुल्हेर येथील उद्धव महाराजांच्या मंदिराजवळ 1873 साली केली गेली. दुसरी मूर्ती महालक्ष्मीची होती. मामलेदार भोसेकर यांनी नारायण महाराज यांची मूर्ती सटाण्याला आणून तिची प्राणप्रतिष्ठा आरम नदीच्या काठी केली. तेथे छोटेसे मंदिरही बांधण्यात आले. ते दैवतही सटाण्याचे वैभव आहे.   

कानबाईचा उत्सव श्रावणात गावामध्ये मोठ्या थाटामाठात साजरा केला जायचा. कानबाई ही अहिराणी भाषापट्ट्यातील महत्त्वाची स्त्री देवता आहे. मात्र कानबाई बसवण्यात नियमितपणा राहिलेला नाही. महागाईमुळे ते उत्सव कधीमधी होऊ लागले. बागलाणात आणखी काही विभूती, मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन क्षेत्रे आहेत. त्यात उपासनी महाराज, उद्धव स्वामी, पद्‍मनाभ स्वामी, नयन महाराज, दावल मलीक आदी विभूती आणि मांगीतुंगी, आलियाबाद, देवळाणे, कपालेश्वर, दोधेश्वर येथील मंदिरे व साल्हेर-मुल्हेर किल्ले यांचा समावेश करावा लागेल.

उपासनी महाराज म्हणजे सटाण्याचे काशिनाथ गोविंद उपासनी. त्यांचा जन्म 15 जून 1870 ला सटाणा येथे झाला. त्यांनी संसार मध्येच सोडून तीर्थयात्रा सुरू केली. ते साईबाबांचे शिष्य होते. साईबाबांनी त्यांच्याकडून तपश्चर्या स्मशानात करवून घेतली. ते शिर्डीला साईबाबांच्या सान्निध्यात चार वर्षें राहून नंतर साईबाबांच्या उपदेशानुसार शिर्डीजवळच्या साकोरीला मठ करून राहिले. त्यांनी ‘कन्याकुमारी संस्था’ तेथे स्थापन केली. सती गोदावरी मातेने त्या धर्मपीठाची जबाबदारी पार पाडली. उपासनी महाराजांनी स्त्री धर्माला महत्त्व दिले आणि कुमारी पूजनाचा संप्रदाय चालवला. उपासनी बाबा 1928 मध्ये सटाण्याला आले आणि त्यांनी अनेक लोकांना दीक्षा देऊन गोरगरिबांसाठी भंडारा घातला. ते वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी, 24 डिसेंबर 1941 रोजी साकोरी येथे स्वर्गवासी झाले. त्यांच्या भक्‍तांनी सटाण्यात भव्य मंदिर बांधले आहे. ते मंदिर हा स्थापत्य कलेचा उत्तम ठेवा आहे.

उद्धव महाराज हे काशीचे शिवबा नावाचे तपस्वी होते. ते तीर्थक्षेत्रे फिरत असताना मुल्हेरला आले. ते तेथे रमल्याने कायमस्वरूपी मुल्हेरला थांबले. त्यांनी का‍शीराज महाराजांकडून दीक्षा घेतली. त्यांचे मंदिर मृत्यूनंतर बांधण्यात आले. मुल्हेर गावास उद्धव महाराजांच्या समाधीमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. मंदिरात दर कोजागिरी– आश्विन शुद्ध पौर्णिमेला रासक्रीडा खेळली जाते. मंदिरात चौदा हात व्यास असलेले व चौदा आर्‍या असलेले चक्र असून त्याला वेळूंचे अठ्ठावीस बांबू लावून जाळे दोरांनी विणले जाते. चक्र केळींच्या पानांनी झाकून संध्याकाळी चौदा हात उंच खांबावर चढवले जाते. खांब व चक्र फळाफुलांनी सजवले जातात. रात्री सुरू होणारा तो उत्सव सकाळपर्यंत सुरू असतो. त्यावेळी परंपरागत पदे अनेक भाषांमधून म्हटली जातात. लहान मुलांना गोपींचे रूप साज देऊन तेथे फुगड्यांचा खेळही खेळला जातो. लोक रासक्रीडा पाहण्यासाठी दूरवरून येतात.

कमलनयन ऊर्फ नयनमहाराज अंतापूर येथे 1680 ते 1750 या काळात होऊन गेले. ते मुल्हेरचे श्री उद्धव महाराज यांचे पट्टशिष्य होते. त्यांनी बरेच काव्य केले असले तरी ते नामशेष आहे. मात्र त्यांचे ‘अभंगावली’ नावाचे हस्तलिखित काव्य उपलब्ध आहे. त्या पुस्तकात संस्कृत, मराठी यांच्यासोबत बागलाणच्या ‍अहिराणी भाषेतही काव्य आहे. त्यांच्या पंधराशे ओव्या उपलब्ध आहेत. त्यांचे दुसरे शिष्य पद्मनाभस्वामी यांची समाधी दहा किलोमीटर अंतरावरील विरगाव येथे आहे.

मांगीतुंगी नावाचे जैन लोकांचे तीर्थक्षेत्र सटाण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. जैन धार्मिक लोक संपूर्ण भारतातून श्रद्धेने तेथे येतात. मांगीतुंगी मंदिरापासून डोंगराचा पायथा दोन किलोमीटर अंतरावर आहे. तेथील डोंगराला मांगी व तुंगी या नावांची दोन डोंगर शिखरे आहेत. शिखरांच्या नावावरून त्या तीर्थक्षेत्राला व त्या गावालाही मांगीतुंगी असे नाव पडले. डोंगराच्या पायथ्याजवळच्या गावाचे जुने नाव भिलवाड होते, परंतु ते मांगीतुंगी असे या नावानेच आता ओळखले जाते. डोंगरात महावीरांचे भव्य एकशेआठ फूट उंचीचे शिल्प कोरून पूर्ण झाले आहे. मांगीतुंगीलाही दरवर्षी यात्रा भरते.

अंतापूरजवळ दावल मलिक यांचे एक ठिकाण आहे. दावलशा यांचे मंदिर डोंगरावर असून डोंगराच्या पायथ्याला दर्गा आहे. भक्‍त तेथे गावागावांहून कंदोरी नावाचा विधी करण्यासाठी येतात. दर्ग्याला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो तर वर मंदिरात गुळकाल्याचा नैवेद्य दाखवतात. ते स्थान हिंदू व मुस्लिम, दोन्ही धर्मांचे भक्त त्यांचे श्रद्धास्थान मानतात. मुसलमान संत परंपरेत दावल मलिक हे नाव आढळते. दावल मलिक हे गुजराथ-काठेवाड भागातील शाह दावल मलिक आहेत. तरीही त्यांचा दर्गा अंतापूरजवळच्या डोंगरावर आहे. ते हजरत शाह आलम या सूफी पंथीय अवलियाचे शिष्य समजले जातात.

मुल्हेरजवळच्या आलियाबाद गावाला प्राचीन शिवमंदिर आहे. ते मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिर कोरीव पाषाणात असल्याने त्याचे सौष्ठव पाहण्यासारखे आहे. मंदिराचे अस्तित्व पडझडीमुळे धोक्यात आले आहे. शिवाचे शिल्पमंदिर देवळाणे या गावातही एक आहे. मंदिरावर कामशास्त्रातील अनेक शिल्पे कोरलेली आहेत. ते मंदिर म्हणजे खजुराहो येथील मंदिराचे प्रतिरूप असल्याचे समजले जाते. मात्र स्थानिक अज्ञानामुळे अनेक शिल्पांवर दगडांनी प्रहार करून ती फोडली गेल्याचे लक्षात येते.     

सटाण्यापासून पंचवीस किलोमीटर पश्चिमेला कपालेश्वर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. ते हत्ती नदीच्या काठावर असून पूर्वी ती नदी वर्षभर वाहायची. केवड्याचे घनदाट बन मंदिराजवळ नदीच्या काठाला होते. त्यातून आलेले झिळांचे पाणी गायमुखातून एका तलावात पडत असे. त्या तलावात भक्‍त स्नान करत असत. तेथे केवड्याचे बन उरले नाही आणि नदीला पाणीही नाही. म्हणून मंदिराचा परिसर भकास वाटतो.

दोधेश्वर हे तीर्थक्षेत्र सटाण्यापासून नऊ किलोमीटरवर उत्तरेला डोंगरांच्या कुशीत वसलेले आहे. ते तीर्थक्षेत्रही पूर्वी हिरव्यागार निसर्गाने नटलेले असायचे. चहुबाजूंनी डोंगरांवर हिरवेगार जंगल होते. मंदिर परिसरात तलाव, विहीर असले तरी स्नान करण्याचा तलाव कोरडा झाला आहे. एकेकाळचा विशाल बागलाण ‘प्रांत’ आकुंचन होत होत सटाणा तालुक्यात सामावून गेला आहे; तेथे विविधपंथीय व जातीय संस्कृती एकात्मतेने जोपासली गेली आहे. अहिराणी भाषा हा तिचा आधार आहे. इतर अनेक बोली-भाषांप्रमाणे अहिराणीदेखील हळुहळू लोप पावत आहे. एक छोटा ‘प्रांत’ एका व्यापक नव्या मराठी संस्कृतीत कसा समाविष्ट होत गेला त्याचे दर्शन सटाण्याच्या (बागलाणच्या) गावगाथेत घडून जाते.

सुधीर रा. देवरे 7588618857, sudhirdeore29@rediffmail.com
 

 

About Post Author

2 COMMENTS

  1. खूप छान माहिती आहे
    खूप छान माहिती आहे

Comments are closed.