‘तिला काही सांगायचंय’च्या निमित्ताने…

0
49

‘तिला काही सांगायचंय’ (2019) हे हेमंत एदलाबादकर यांचे रंगभूमीवर गाजत असलेले बहुचर्चित असे आजचे स्त्रीप्रधान नाटक. या नाटकाने आधुनिक काळातील स्त्री-पुरुष संबंधावर प्रकाशझोत टाकला आहे. बंडखोर नाटक म्हणून या नाटकाची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली गेली; परंतु ते नाटक पाहिल्यास तशी कोणतीही बंडखोरी यात दिसत नाही. केवळ दोन पात्रांवर मंचित झालेले आणि पतिपत्नींच्या सहजीवनावर भाष्य करणारे ते नाटक प्रारंभीच प्रशांत दळवी यांच्या ‘चाहूल’ या नाटकाची आठवण करून देते. त्या नाटकामध्येही दोनच पात्रे आहेत आणि दुसरे पुरुष पात्र आभासी आहे. त्या नाटकात  प्रथमदर्शनी जे रचनातंत्र दिसते ते ती आठवण सहजी जागी करणारेच आहे. ते नाटक जवळ जवळ तीन दशकांपूर्वीचे आहे. ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकातून मिताली आणि यश या जोडप्याची कथा साकारली आहे. ती कथा जागतिकीकरणाच्या काळातील आधुनिक तरुणीची आहे असे म्हटल्यावर नाटकाकडे लक्ष वेधले जाणे साहजिक होते; परंतु नाटक पाहिल्यावर मात्र तशी प्रचीती येत नाही.

मिताली सहस्रबुद्धे आणि यश पटवर्धन या नवदांपत्याचा एक वर्षाचा सहवास आणि नंतर त्यांच्यातील पतिपत्नी संघर्ष हा नाटकाच्या कथानकातून मांडला गेला आहे. मिताली ही स्त्री-मुक्ती चळवळीत काम करणारी आधुनिक तरुणी, परंतु ती टिपिकल स्त्रीमुक्तीवाली नाही. निदान नाटकातील तिच्या दिसण्यावरून आणि असण्यावरून तरी तसे जाणवत नाही. यश हा कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी. त्याने त्याचे यश स्वतःच्या कर्तबगारीवर संपादन केले आहे. तो त्याच्या बाह्यवेषावरून आधुनिक पुरोगामी विचारांचा दिसतो; परंतु लवकरच भ्रमनिरास होतो; तसेच मितालीबाबतही घडते. स्त्री-मुक्ती चळवळीत कार्य करणाऱ्या आधुनिक स्त्रीच्या अंगी जी वैचारिक प्रगल्भता, परिपक्वता, निर्भीडता दिसायला पाहिजे ती त्या नायिकेच्या स्वभावदर्शनातून दिसत नाही.

यश मितालीच्या कामाने तिच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच प्रभावित होतो आणि नंतर मैत्री, सहवास घडून त्यांचे लग्न होते. त्यांनी एकमेकांना एकमेकांच्या कामाच्या स्वरूपाची कल्पना लग्नाच्या आधी देऊन विवाह समंजसपणे केलेला असतो. समकालीन वास्तवामध्ये कॉर्पोरेट आय.टी.क्षेत्र आणि सामाजिक चळवळीमध्येही स्त्री-पुरुषांचा सहवास-त्यांची मैत्री हे गृहीतकृत्य आहे आणि तरूण पिढीने ते बहुतांशी स्वीकारले आहे. त्याला अपवाद असतात. तोच अपवाद यशच्या रूपाने या नाटकात समोर आला. कारण मिताली चळवळीत काम करत असताना तिचा संपर्क मित्र राजदीप याच्याशी वारंवार येतो. ती गोष्ट यशला लग्नानंतर काही दिवसांतच खटकू लागते. राजदीप हे पात्र आभासी आहे. त्याच्याशी संपर्क फक्त फोनवर होतो. परंतु त्यामुळे यशच्या मनात संशयाची ठिणगी पडते. मिताली वाद नको म्हणून ती यशबरोबर असताना राजदीपला फोन न करण्यासंबंधी बजावते. तेथेच, त्या नाटकाची आणि त्या नायिकेची-तिच्या बंडखोरीची हार आहे. कारण कोणत्याही नात्यातील चोरटेपणा हा संशय निर्माण करणारा आणि तो वाढवणारा असतो.

मिताली संघर्ष नको म्हणून ते करत असली तरी तिच्या व्यक्तिमत्त्वातील समंजस सोशिकता तेथे दिसते. स्त्रीवादी, स्त्रीमुक्तीच्या विचाराचे संस्कार झालेली स्त्री कधीही तसे कृत्य करणार नाही. कारण स्त्री-पुरुष समता आणि लिंगभेद विरहित निकोप दृष्टिकोन हे स्त्रीमुक्तीच्या विचारामध्ये अभिप्रेत आहे. पुरुषी राजकारण आणि त्यांच्या वर्चस्वापासून मुक्ती हे स्त्रीमुक्तीचे विचार आहेत, त्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना आणि चळवळ कार्यरत आहे. त्या विचारालाच मितालीच्या वर्तनातून तिलांजली दिली जाते. म्हणून तिची स्त्रीमुक्ती बेगडी वाटते. स्त्रीमुक्तीचा मुलामा तिच्या व्यक्तिमत्त्वाला दिला नसता तर कदाचित नाटक वेगळ्या उंचीवर गेले असते. पण तसे घडत नाही. ती राजदीपशी बोलणे यशसमोर टाळते, परंतु नेमका राजदीपचा फोन तिला त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी यशसमोरच येतो आणि त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झडतात. त्या संघर्षात मितालीही यशच्या मैत्रिणीवरून त्याच्यावर आरोप करते आणि ते ऐकून अधिक चवताळलेला यश तिच्यावर थेट अनैतिक संबंधांचा आरोप करतो. पुरुषाने स्त्रीवर उगारलेले, तिला निष्प्रभ कारण्यासाठीचे ते अखेरचे नीती-अस्त्र! तेथे त्याचा चेहरा उघडा पडतो. पुरुष वरून आधुनिक कितीही भासला तरी त्याच्या अंतर्मनात पुरुषप्रधान व्यवस्थेतील पुरुषी हुकूमत, वर्चस्व गाजवण्याचा अहंकार सामील असतो. तेथे तो टिपिकल नवऱ्याच्या भूमिकेत दिसतो. त्याने त्याची संकुचित मनोवृत्ती आणि त्याचा स्त्रीकडे बघण्याचा वस्तुवत दृष्टिकोन यांची प्रचीती मितालीवर संशय व्यक्त करून दिली. त्याचा पुरुषी अहंकार तेथे डिवचला जातो आणि संशय जागृत होतो. ती तिच्या चारित्र्यावर झालेल्या निराधार आरोपामुळे तिच्या पोटात वाढणारे बाळ हे राजदीपचेच आहे असे त्राग्याने म्हणते. परंतु यश ते खरे समजून चवताळतो. असा हा कृतक संघर्ष आणि असे हे तकलुपी पती-पत्नी सबंध.

नवऱ्याची संशयी वृत्ती, पुरुषी अहंकार आणि त्यामुळे स्त्रियांच्या जीवनात निर्माण झालेले वादळ हे विषय सत्तर-ऐंशीच्या दशकात आणि त्यानंतरही मराठी नाटकांत-साहित्यात अनेक वेळा येऊन गेले आहेत. ‘तिला काही सांगायचंय’मध्ये त्याच्यापुढील विषय आलेला नाही. ‘तिला काही सांगायचंय’ या शीर्षकातील अध्याहृत आशयही मितालीच्या विचारातून व्यक्त झालेला नाही. अर्थात मितालीच्या स्त्रीमुक्तीची या नाटकातील पार्श्वभूमी तिच्या बंडखोर दर्शनासाठी आणि तिला आजवर जे स्त्रियांच्या ओठावर आले नाही ते सांगण्यासाठी सोयीची होती, पण तसे घडले नाही. ‘अस्वस्थ योनीचे मनोगत’सारख्या नाटकांतून आजवर ज्याबद्दल स्त्रियांनी अवाक्षरही काढले नाही, ब्र उचारला नाही; ते सांगितले गेले आहे. मग या नाटकाने नवे काय सांगितले हा प्रश्न अनुत्तरित राहतो. शेवटी, हे नाटकही परंपरेला शरण गेले आणि अजूनही स्त्रियांना बरेच काही सांगायचे आहे, पण त्यांना सांगता येत नाही हा आशय मात्र प्रभावी ठरला.

स्त्री-प्रधान नाटके अनेक येऊन गेली आहेत, परंतु स्त्रियांचे प्रश्न, त्यांची घुसमट, त्यांची समस्या, त्यांच्यावर होणारे आरोप काही थांबलेले नाहीत. स्त्रियांचे प्रश्न संपलेले नाहीत, अन्याय थांबलेला नाही. जग बदलत आहे, परंतु स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याची निखळ दृष्टी विकसित झालेली नाही. माणसे सुशिक्षित बनली परंतु सुसंस्कृत झाली नाहीत आणि स्त्री कितीही कर्तबगार, मुक्त विचाराची असली तरी तिच्यावरील परंपरागत संस्कार तिला नाकारता आलेले नाहीत. तिने सामंजस्य, शहाणपणा आणि सहनशीलता सोडून बंडखोरी केली नाही. या पूर्वीच्या मराठी नाटकांतून प्रखर बंडखोरी करणाऱ्या नायिकेचे दर्शन घडले. परंतु या नव्या नायिकेची कोणती बंडखोरी नजरेत भरते? हा प्रश्न आहे.

अशोक लिंबेकर 9822104873, ashlimbekar99@gmail.com
 

 

About Post Author