तानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman Editor)

तानुबाई बिर्जे यांनी दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते ! महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या सत्यशोधकी साहित्याचा इतिहासया ग्रंथात म्हणतात, “त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल !” तानुबार्इंनी त्यांचे पती वासुदेवराव यांच्या अकाली निधनानंतर दीनबंधूचालवण्याची जबाबदारी चार वर्षे सांभाळली. त्यांना त्यांचा भाऊ लक्ष्मण ठोसर व मेहुणे बापुराव आवटे यांनी काही काळ सहकार्य केले. भगवंतराव पाळेकर हेही त्यांच्या पाठीशी होते. पण लेखनविषयक काही मतभेद झाल्याने दीनबंधूची सर्व जबाबदारी तानुबार्इंवर आली. त्यांनीही ती पूर्णपणे उचलली (1908-1912). ते पत्र आर्थिक संकटात बंद पडण्याची वेळ आली असता तानुबार्इंनी त्यांचे दागिने विकले व मोठ्या कष्टाने पत्र चालू ठेवले. ज्या काळात स्त्री शिक्षणास समाजमान्यता नव्हती त्या काळात धाडसाने पद सांभाळून, विचारप्रवर्तक अग्रलेख लिहून समाजाला विचारमंथन करण्यास भाग पाडणे ही गोष्ट अशक्य होती, त्या काळातील एका स्त्रीने त्या कामी पुढाकार घेऊन ती कृतीत आणली याचे श्रेय तानुबार्इंकडे जाते. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी म्हटले आहे, की त्या भारतातील पहिल्या महिला संपादक होत. त्यांच्या माध्यमातील ती या पुस्तकात तत्संबंधी संजय भालेराव यांचा लेख आहे.

            तानुबार्इंचा जन्म 1876 मध्ये, नाशिक जिल्ह्यातीलगंगापूरच्या खानदानी मराठा कुटुंबात झाला. देवराव कृष्णराव ठोसर यांची ती कन्या. देवराव स्वतः मराठी व इंग्रजी माध्यमातून पुणे येथे शिकले होते व त्यांनी काही काळ पोलिस खात्यात नोकरी केली होती. ते जोतिबा फुले यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींची लग्ने सत्यशोधकी पद्धतीने लावली आणि त्यांना जावईसुद्धा सत्यशोधकी विचारांचे मिळाले. तानुबार्इंचे शिक्षण वेताळ पेठेत असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत झाले. त्यांचा विवाह पुणे येथे वासुदेवराव बिंगोजी बिर्जे यांच्याबरोबर 26 जानेवारी 1893 रोजी झाला.

वासुदेवराव बिर्जे हेही समाजसुधारक विचारांचे होते. त्यांचा जन्म बेळगावचा. ते बुद्धिमान व त्या काळात मॅट्रिक झालेले, संस्कृत-इंग्रजी-गुजराती व हिंदी या भाषांत पारंगत होते. त्यांनी बडोदा येथे लक्ष्मी विलासग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काम केले (1894-1905). त्यांची निवड स्वतः सयाजीराव यांनी केली होती. वासुदेवराव बिर्जे यांचा क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्वहा ग्रंथ 1903 मध्ये प्रकाशित झाला. त्याचे परीक्षण भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांनी 1905 मध्ये विविध ज्ञान विस्तारमध्ये केले. त्यामुळे तो ग्रंथ महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरला. वासुदेवरावांचे दुसरे पुस्तक हू वेअर द मराठाजहे होते ! येथेच तानुबार्इंचा विशेष नमूद केला पाहिजे. त्यांनी वासुदेवरावांच्या ग्रंथाची पहिली आवृत्ती दुर्मीळ झाली, तेव्हा त्यांच्या पश्चात मुंबईच्या इंदुप्रकाश छापखानायेथे तो 1912 मध्ये पुनःप्रकाशित केला.

वासुदेवराव बिर्जे यांनी नारायण मेघाजी लोखंडे, गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामैय्या आय्यावारू यांच्यासमवेत सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. ते चळवळींतही सामील झाले होते. त्यांनी मुंबईतील दीनबंधूशेतकऱ्यांचा कैवारीया पत्रकांमधून अभ्यासपूर्ण लेखन केले होते. त्यांना विल्सन कॉलेजमधून शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तेव्हा त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या समवेत दीनबंधूच्या उपसंपादकपदाची जबाबदारी घेतली. ते काही काळ रामजी संतुजी आवटे व दामोदर सावळाराम यंदे यांनी सुरू केलेल्या शेतकऱ्यांचा कैवारीया इंग्रजी व मराठी साप्ताहिकातून इंग्रजी मजकूर लिहित असत. वासुदेवराव यांनी सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधूचालवण्यास (1903) घेतले. त्यापूर्वी ते पत्र कृष्णराव भालेकर व लोखंडे यांनी 1 जानेवारी 1877 रोजी बुधवार पेठ (पुणे) येथून व 1880 च्या एप्रिलपासून मुंबईहून सुरू ठेवले होते. वासुदेवरावांनी संपादक या नात्याने जिद्दीने काम केले व खपही वाढवला. त्यांनी नाशिक येथे दुसरी मराठा शिक्षण परिषद 1908 मध्ये आयोजित केली होती. परंतु ते त्या बेतास मृत्यू पावले.

तानुबार्इंनी संपादक म्हणून, त्यांच्यानंतर दीनबंधूचा लौकिक वाढवला. त्यांनी त्या पत्रात विविध विषय हाताळले. त्या त्यांच्या अग्रलेखाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने करत. त्यांचा भर कृषी, शिक्षण, राजकारण, समारंभ, मराठा व इतर जातींच्या परिषदा आणि विशेष करून सत्यशोधक चळवळीचे वृत्तांत यांवर असे. त्यांनी त्यासंबंधी स्फूट लेख व बातम्या छापण्यास सुरुवात केली. त्यात महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू, त्यांच्या कार्याची माहिती, अपघात ह्यांचाही उल्लेख असे. विशेष म्हणजे काही नोंदी परदेशांतील असत. उदाहरणार्थ, टायटॅनिकच्या अपघाताची बातमी दीनबंधूमध्ये आली होती ! त्याशिवाय महत्त्वाच्या ग्रंथांवर, नाटकांवर परीक्षणात्मक लिखाणही प्रसिद्ध केले जाई. तानुबार्इंनी संपादक म्हणून विविध विषय हाताळले. त्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांचे संमेलन, ‘सत्यशोधक समाजाचे अधिवेशन, शिक्षण परिषदेतील ठराव व सूचना, बहुमतावर आधारित राज्य पद्धत, मुस्लिमांचे शिक्षण असे बहुविध विषय आणि त्यावरील चौफेर लेखन आढळते.

दीनबंधूमध्ये 1912 पासून एक नावीन्यपूर्ण लेखमाला चालू करण्यात आली होती. भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासनप्रणाली का लागू करू शकत नाही? त्यासाठी भारत देश लायक नाही का?’ या विषयावर सखोल चिंतन, लेखन व चर्चा सादर करण्यात आली. तानुबार्इंचा 27 जुलै 1912 चा त्या विषयावरील अग्रलेख म्हणजे त्यांच्या वैचारिकतेची, दूरदृष्टीची आणि प्रतिभेची झेप होय. त्या म्हणतात, “कायदेमंडळात बहुजन समाजाविषयी अनास्था दिसते, कारण या देशात नाना जाती, धर्म, पंथ यांचे प्राबल्य आहे. त्यांत भेद केला जातो. त्यामुळे बहुजन समाजाचे राजकीय अस्तित्व कोठेच दिसत नाही. कायदे मंडळात किंवा सरकारी दरबारात जे लोक सामील आहेत त्यांना बहुजन समाजाच्या चालीरीती, आचारविचार यांची जाणीवही नाही. त्यामुळे या मुक्या समाजाची ओरड सरकारपर्यंत कशी पोचणार? सरकारपाशी या मुक्या समाजाचे पोट दुखते म्हणून ओवा कसा मागणार? याचे कारण एकच आहे, ते म्हणजे तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नाही, न ये नेत्रांजवळ,नाही अंतरी कळवळा.यावरून त्यांच्या सामाजिक जाणिवेची, बहुजनांच्या उद्धारभावनेची तळमळ दिसून येते. त्यांनी विषमतेवर प्रहार करताना त्यांची मते धारदार व तीक्ष्ण लेखणीने, म्हणींचा वापर करून स्पष्ट व धडाडीने, न घाबरता मांडली. त्यांची काही उद्धृते –

1. सत्ता कायम, चिरंतन राहवी म्हणून चार वर्णांचा पुरस्कार करून, मनुस्मृतीला राजघराण्यांनी आश्रय दिला.

2. समाजात विषमता त्यामुळेच निर्माण झाली.

3. गौतम बुद्धांच्या काळात समता प्रस्थापित झाली होती, पण पुन्हा शंकराचार्य व वेदांताचे प्रस्थ वाढले व ब्राह्मणांना देवत्व मिळाले.

4. इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

5. राजापूरकर नाटक मंडळींनी सादर केलेल्या संत तुकारामया नाटकाची माहिती 3 ऑगस्ट 1912 च्या अंकात दिली आहे. त्या नाटकातून तत्कालीन ब्राह्मणेतरांची परिस्थिती व तुकारामांचे चरित्र यांची माहिती मिळते असा उल्लेख तानुबार्इंनी केला आहे. त्या नाटकाचे लेखन बाजीराव दौलतराव राणे यांनी केले होते व तुकारामांचे विद्रोही स्वरूप रंगवले होते. म्हणून त्याची दीनबंधूमध्ये दखल घेतली गेली.

तानुबाई या कर्तबगार संपादक स्त्रीचा मृत्यू 1913 मध्ये झाला. त्या शेवटपर्यंत दीनबंधूचे संपादन करत होत्या.

श्रुती भातखंडे यांचा हा लेख जया नातू यांच्या लोकसत्ता लोकरंग’(6 मार्च 2016) मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर मुख्यत: आधारित आहे. नातू या व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे वास्तव्य बेळगावला असते. त्या अधुनमधून अशा स्वरूपाचे वैचारिक लेखन करत असतात. त्यांनी तानुबाई बिर्जे यांचे जीवन सूत्रबद्ध रीत्या मांडून पाठवले आहे. ते असे :

श्रुती भातखंडे यांचा लेख वाचला. माझा तानुबार्इंवरचा लेख लोकरंग’ (6 मार्च 2016) मध्ये प्रसिद्ध झाला. त्या लेखाचा मुख्य संदर्भ सत्यशोधकी साहित्याचा इतिहास खंड 1 (श्रीराम`गुंदेकर) सत्यशोधकी`साहित्य प्रकाशन (लातूर), 1 मे 2010 हा होता. त्या नंतर`नेट`वर`प्रसिद्ध`झालेले तानुबार्इंवरचे बरेच लेख माझ्या वाचनात आले. पण त्यात वेगळे व अधिक असे मला आढळले नाही.

श्रुती भातखंडे 9273386230  shruti.bhatkhande@gmail.com

श्रुती भातखंडे या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे (गणेशखिंड, पुणे) इतिहास विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी विविध चर्चासत्रांत ठिकठिकाणी भाग घेतला आहे व शोधनिबंधांचे सादरीकरणही केले आहे. त्यांनी लोकमतमध्ये ओळख इतिहासकारांची हे सदर लिहिले होते.

———————————————————————————————-————————————–

About Post Author

3 COMMENTS

  1. नमस्कार, तुमचा लेख वाचला, असे लेखन तुम्ही मराठी संशोधन पत्रिका या साठी करावे ही विनंती, मी त्या पत्रिकेसाठी काम करतो, असो,

  2. लेख inspiring आहे. काळाच्या पुढे राहुन स्त्री असूनही केलेली कामगिरी मोलाची आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here