तांबूल संस्कृती : पानविडा आणि सौंदर्य (Tambul Culture Panvida and Beauty)

0
97
_tambul

तांबूल अर्पण करण्याचा विधी भारतामध्ये देवांपासून पितरांपर्यंत, पूजेपासून श्राद्धापर्यंत आहे. ‘पान’ हे पृथ्वीवर सांडलेल्या अमृतातून निर्माण झालेल्या नागवेलीचे आहे असे मानले जाते. आयुर्वेदाच्या चरक, सुश्रुत, वराहमिहीर, वात्स्यायन अशा अनेकांच्या ग्रंथांमध्ये तांबूलसेवनाबद्दल लिहिले गेले आहे. विड्यात नागवेलीची पाने, चुना, सुपारी, कात, वेलची, लवंग, जायफळ, कपूर, कस्तुरी, कंकोळ, केशर, चांदीचा किंवा सोन्याचा वर्ख इत्यादी गोष्टी वापरल्या जात असत. या तेरा पदार्थांच्या एकत्रिकरणामुळे विड्याला ‘त्रयोदशगुणी’ असे म्हणतात. त्यातील काही पदार्थ हे कामेच्छा वाढवतात. त्यामुळे  ब्रह्मचारी, संन्यासी, विधवा स्त्री, व्रतस्थ यांनी तांबूल ग्रहण करणे निषिद्ध मानले जात असे. विड्यामध्ये तंबाखू शिरल्यावर मात्र एक विचित्र सांस्कृतिक भेसळ निर्माण झाली. ती गोष्ट नक्की कधी घडली याबद्दल स्पष्टता नाही. तंबाखू आणि आधुनिक नशाबाज पानमसाले यांनी मूळ ‘त्रयोदशगुणी’ विड्याला बदनाम केले आहे. त्यामुळे विडा खाणे हे रंगेलपणाचे लक्षण ठरले.

तांबूल हा मूळ शब्द ऑस्ट्रएशियाटिक भाषावर्गातील आहे एवढेच स्पष्टीकरण विश्वकोषामध्ये आहे. तो शब्द काही संस्कृत भाषाकोशातही आढळतो. धार्मिक आणि प्रचलित प्रकारांमध्ये गोविंदविडा, त्रयोदशगुणी विडा, कुलपी विडा, मोद विडा, मोदक विडा, कापरा विडा अशा नावांचे विड्यांचे प्रकार आहेत. तसेच, मघई-बनारसी-मसाला-कलकत्ता अशा नावांनीही पानपट्टीच्या दुकानातील विडे प्रसिद्ध आहेत. अनेक शृंगारिक लावण्या, कवने यांमध्ये विड्याचे वेगवेगळे उल्लेख आढळतात. तसेच, देवी-देवतांना आणि काही स्वामींना (स्वामी समर्थ, गजानन महाराज इत्यादी) विडा अर्पण करताना म्हणण्याच्या आरत्याही आहेत. ते विडे एका पितळी खलबत्त्यात कुटून अर्पण केले जातात. तो पदार्थ नंतर प्रसाद म्हणून भक्तांना वाटला जातो. विडा कुटून खाण्यासाठी घरातही एक छोटा पितळी खलबत्ता राखून ठेवलेला असे. दगडी खलबत्त्याचाही वापर होत असे, पण त्यात सुपारी बारीक होईल इतक्या जोरात कुटता येत नसे- तो फुटण्याची भीती असायची.

भारताची पानविडा (तांबूल) संस्कृती फार जुनी. ते व्यसन न मानता खानदानी शौक म्हणून मानला जाई. धार्मिक विधींमध्येदेखील पानसुपारीला मान पहिला असे. विडा उचलण्यावर शौर्याचे मोजमाप होई. मित्रमंडळीची बैठक पानसुपारीच्या भोवती फिरे. लावणीची बैठक, नृत्यांगनेची अदाकारी, संगीताची मैफिल, कवालीचा मुकाबला, शायरांचा मुशायरा, गायनाची जुगलबंदी या गोष्टी विड्याशिवाय रंगणेच अशक्य! तांबूल संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या पानडब्यांमध्ये, विड्यात घालण्याच्या सर्व वस्तू वेगवेगळ्या आणि नीट ठेवता येतील अशी अंतर्गत रचना असायची. परंतु ते डबे आकर्षक आकारांमध्ये, नक्षीदार, कलात्मकपणे घडवलेले असत. डब्यात ठेवलेली पाने सडू नयेत म्हणून काही डबे हे जाळीदार असायचे.

_ambyacha_dabaमाझ्याकडे आंब्याच्या आकाराचा पितळी पानडबा आहे. त्याला पितळ्याचे पान आहे. त्यावर दोन घुंगरू आहेत. पितळी पानाच्या टोकाने विड्याच्या पानाला चुना लावायचा. त्याला बसवलेल्या घुंगरामुळे नाजूक आवाज येई. त्या डब्याच्या झाकणाला स्त्रीसुलभ विचार लक्षात ठेवून छोटासा आरसाही आहे! त्यामुळे पान खाल्ल्यावर खाणाऱ्याचे ओठ किती रंगले ते लगेच पाहता येई. तसेच, माझ्याकडे पुस्तकाच्या आकाराचा पानडबाही आहे. त्या डब्यावर कधी जय हिंद, महात्मा गांधी, भारतमातेचे चित्रही कोरलेले पाहण्यास मिळते. ट्रेण्डीपण मनुष्यसंस्कृतीत असे मुरलेले आहे!

पानविड्याबरोबरचे प्रमुख हत्यार म्हणजे अडकित्ता. त्याने सुपारी कातरली जाते. अडकित्ता हा मूळ शब्द कानडी. आडकी म्हणजे सुपारी, ओत्तु म्हणजे दाबणे आणि कत्ती म्हणजे सुरी या तीन शब्दांपासून ‘अडकित्ता’ शब्द तयार झाला असावा. अडकित्ते साधारणतः पितळ आणि पोलाद यांपासून बनवले जात असत. चांदी आणि जर्मन सिल्वरचे अडकित्तेही फारसे दुर्मीळ नाहीत. तांबूल संस्कृती ही शृंगार, रसिकता, कलात्मकता, शौर्य यांच्याशी निगडित असल्याने त्यातील अनेक वस्तू बनवताना पोपट, मैना, मोर, घोडा, राजहंस यांच्या प्रतिमांचा वापर केला जात असे. एकाच अडकित्त्यात दोन अडकित्ते, पानाच्या शिरा काढण्यासाठी मुठीला चाकू बसवलेले, स्प्रिंग बसवलेले, छोटी कडी अडकावून पाते बंद करता येणारे, घुंगुर आणि छोटे गोल आरसे यांची सजावट असलेले असे असंख्य प्रकारचे अडकित्ते पाहण्यास मिळतात. मिथुन अडकित्ते तर खूप वैविध्यपूर्ण आणि फारच रसिकतेने बनवलेले असतात. मराठी इतिहासात जाहीरपणे आणि बेधडक आंतरधर्मीय प्रेमप्रकरण असलेला आणि तितकाच शूर असलेला योद्धा म्हणजे बाजीराव पेशवा. त्यामुळे बाजीराव-मस्तानीच्या जोडीला शृंगार आणि शौर्य यांचे अजरामर प्रतीक मानले गेले. म्हणूनच, त्या जोडीवर बनवले गेलेले ‘मिथुन’ अडकित्ते सर्वात जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतात. त्यांच्या जोडीला अडकित्त्यावर राधाकृष्ण, रमाविष्णू, राजाराणी यांच्याही जोड्या पाहण्यास मिळतात. कसलेला पानखवैय्या हा आख्खी सुपारी अडकित्त्यानेच फोडतो. तरीही खास सुपारी फोडण्यासाठी असलेले कलात्मक ‘नटकटर्स’सुद्धा पाहण्यास मिळतात.  

_Adkitteपूर्वी तंबाखू खाणे आणि तांबूल सेवन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे स्त्रियांचे तांबूलसेवन हे निषिद्ध मानले जात नसे. स्त्रियाही विडा खाण्याच्या शौकिन होत्या. अगदी मुस्लिम पुरुषाला त्याच्या पत्नीला ‘खर्ची पानदान’ म्हणून काही रक्कम देणे बंधनकारक असते. पान खाणाऱ्या शौकिन स्त्रिया नाजूक हाताने सुपारीही छान कातरतात. काही अडकित्त्यांवर नाजूक कोरीवकाम असून त्यांचा वेगळा घाट लक्षवेधक आहे. छोटासा अडकित्ता क्षणार्धात एक जीवघेणे शस्त्र बनू शकतो. त्याच्या दोन्ही मुठी उलट्या वळवल्या, की स्वसंरक्षणाची कट्यार होत असे. स्त्रीच्या मुठीत उत्तमपणे बसणारी ती कट्यार तिचे संरक्षण करण्यास नक्कीच पुरेशी वाटे. त्यांना ‘कट्यार अडकित्ता’ म्हणतात. ते पोलाद आणि जर्मन सिल्व्हरपासून बनवलेले आहेत. ते ‘संरक्षक अडकित्ते’ दुर्मीळ झाले आहेत.

भारतात प्राचीन काळापासून चालत असलेली तांबूल संस्कृती आणि मुगल राजवटीतील पान-हुक्का पद्धत यांमुळे, दोहोंच्या संयोगातून समाजात एक वेगळाच सार्वजनिक शिष्टाचार रुजला. छोट्याछोट्या बैठकीत पानविडा बनवण्याच्या सर्व पदार्थांनी सज्ज असे तबक फिरवले जाई. प्रत्येकजण स्वतःचा विडा स्वतःच्या आवडीप्रमाणे बनवून घेई. बैठकीला जास्त मंडळी असतील, तर तबक सहजपणे फिरवणे अडचणीचे होई. त्यामुळे विमान, मोटारी, गाडीचे इंजिन अशा आकारांचे आणि चाके असलेले पानाचे नाविन्यपूर्ण डबे अस्तित्वात आले. त्यांना असलेल्या चाकांमुळे ते डबे एकमेकांकडे सरकावणे सोपे होई. काही पानडब्यांना तर सिगारेट व काड्यापेटी ठेवण्याची सोय असे व  ash tray ही बसवलेला असे. अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या, तस्त (थुंकदाणी) यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले.

बैठकीत ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण काही असेल, तर त्यामुळे त्याची शान वाढत असे. अशा वस्तूची चर्चा होत असे. त्या घडवणाऱ्या कलाकाराला उत्तेजन मिळत असे. म्हणून मग तांबूल संस्कृतीत अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या, तस्त (थुंकदाणी किंवा ओगलदानी) यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले. त्यांपैकी एक दुर्मीळ असा प्रकार म्हणजे ‘तांबोळा’.
एका कडीत अडकावलेल्या नारळासारख्या निमुळत्या कलशाला सर्व बाजूंनी साखळ्या सोडलेल्या असत. त्या प्रत्येक साखळीच्या टोकाला एकेक काटा आणि त्या प्रत्येक काट्यात तीन-चार विडे अडकावलेले असत. आणखी काही तयार विडे वरच्या कलशात सज्ज ठेवले जात असत. एका वेळी पूर्ण तांबोळ्यात साठ – सत्तर विडे ठेवण्याची सोय असे. नृत्य किंवा गाण्याच्या मैफिलीत गाद्यागिरद्यांवर बसलेल्या शौकिनांना तबकाऐवजी तयार विडे अत्यंत रसिकतेने घेता येतील अशी सोय असलेल्या वस्तूला तांबोळा म्हणतात. तांबूल धारण करणारा म्हणून ‘तांबोळा’. तो तांबोळा बसलेल्या शौकिनांसमोरून फिरवला जाई. ते त्यातून सहजपणे विडा काढून घेत असत. साखळीच्या टोकाला बसवलेल्या घुंगरांमुळे विडा काढून घेऊन साखळी सोडून दिल्यावर नाजूकसा, हलका आवाज येत असे. वरच्या कलशावर आणि त्याच्या झाकणावर सुंदर नक्षी पाहण्यास मिळते. तांबूल संस्कृतीतील अत्यंत वेगळा आणि दुर्मीळ अलंकारच तो म्हणायला हवा! 

पानाला चुना सगळीकडे नीट लागावा व चुन्यामुळे बोटाला त्रास होऊ नये म्हणून पितळी किंवा लाकडी चुनपट्ट्या वापरल्या जात. त्या चुनपट्ट्या एखाद्या पानवाल्याकडे क्वचित पाहण्यास मिळतात. पातळ केलेला कात पानाला लावायला लाकडी छोटे गोल रुळ वापरले जात.

विदर्भात तांबूल म्हणून पान-कात-चुना-सुपारी यांचे कूट जेवणानंतर दिले जाते. विड्याचे कूट देणे हा प्रकार, प्रसादाचा विडा वाटला जातो त्यातून आला असावा. कुटलेला पूर्ण विडा नीट वाळवून ठेवला तर बराच काळ चव न बदलता राहू शकतो. त्यामुळे विदर्भासारख्या कोरड्या आणि अधिकतर उष्ण असणाऱ्या प्रदेशात ही प्रथा सोयीस्कर वाटत असावी.

_tapal_ticketकष्टाची कामे करणाऱ्या आणि कमी आर्थिक स्तरातील स्त्रियाही त्यांची पानविड्याची कापडी चंची ही गोंडे, आरसे, घुंगुर, रंगीत काठ यांनी सजवत असत. ती चंची चार-पाच खणांची असे. चंचीमध्ये कात, चुन्याची डबी, सुपारी आणि तंबाखूसुद्धा असे. विड्याची पाने ताजी राहवी म्हणून ती मेणकापडाच्या छोट्या तुकड्यात गुंडाळून चंचीत ठेवत. चंचीच्या टोकाला लांब दोरी, घुंगुर व गोंडा असायचा. त्या दोरीने चंची गुंडाळून बांधली जाई. दोरीला क्वचित अडकित्ताही अडकावला जात असे.

तांबूल संस्कृती काही आशियाई देशात पसरली होती. लाओस या देशाच्या टपाल खात्याने विडा, पानडबा, विड्यात घालण्याचे जिन्नस या विषयांवर 2004 साली तीन टपाल तिकिटे आणि विशेष आवरण प्रसिद्ध केले होते. भारतीय टपालखात्याने एका मिनिएचर शीटवर एक अडकित्ता दाखवलेला आहे.

– मकरंद करंदीकर 9969497742
makarandsk@gmail.com

About Post Author