तळेगाव-दाभाडे ‘ब्रेन स्टार्मिंग’ सेशन

carasole
(‘सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ या डिसेंबर 2014 मध्‍ये राबवण्‍यात आलेल्‍या मोहिमेच्‍या पार्श्‍वभूमीवर तळेगाव-दाभाडे येथे फेब्रुवारी 2015 मध्‍ये ‘ब्रेनस्‍टॉर्मिंग सेशन’ आयोजण्‍यात आले. त्‍या चर्चेचा हा वृत्‍तांतवजा लेख.) 

संस्कृती हा शब्द गोंधळात टाकणारा आहे, परंतु तद्विषयक दोन दिवसांची तळेगावच्या मैत्रबनातील चर्चा त्या संकल्पनेबाबत बरीचशी स्पष्टता आणणारी ठरली. चर्चेसाठी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतील बेचाळीस प्रतिनिधी जमले होते. चर्चा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलने ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेचा आढावा घेण्यासाठी योजली होती. स्वाभाविकच, प्रतिनिधींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आणि मुंबई-पुण्याकडील मंडळींचा भरणा अधिक होता. मार्गदर्शन करण्यासाठी अरुणा ढेरे, दिलीप करंबेळकर, वैजयंती बेलसरे, अरुण खोरे असे विषयतज्ज्ञ होते.

चर्चेला पार्श्वभूमी म्हणून अतुल तुळशीबागवाले, यश वेलणकर, दिलीप करंबेळकर व दिनकर गांगल यांची टिपणे सर्व सहभागींना पाठवली होती. त्यामध्ये युरोपमधील ‘रिनेसान्स’च्या धर्तीची ज्ञानप्रकाश चळवळ व विवेकी विचारपद्धत या दोन गोष्टींवर ढोबळपणे भर होता. ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेमधील माहिती संकलन, जनजागरण व संस्कृतिविषयक विचारविनिमय यांबाबतची माहितीही सहभागींमध्ये आधी प्रसृत केली होती. चर्चेचा रोख अभिजन संस्कृती व बहुजन संस्कृती यांचा मेळ शक्य आहे का यावर होता.

अरुणा ढेरे व वैजयंती बेलसरे यांनी संस्कृतिविषयक विचारपरंपरेची सुरेख मांडणी केली. ढेरे म्हणाल्या, की संस्कृती ही लक्षणांवरून कळत जाते. लक्षणे वेष, चिन्हे यांमधून स्पष्ट होतात जसे, की विवेकानंद, गांधी, फुले यांची पोषाख पद्धत त्यांची जीवनसरणी व विचार दर्शवते किंवा जानवे या प्रतीकामधून व्यक्त होणारे ब्राम्हण्य. बेलसरे यांनी संस्कृती या शब्दाची अधिक नेमकी व अर्थपूर्ण व्याख्या प्रतिपादन केली. त्या म्हणाल्या, की विश्व कसे चालते याचा माणसाने लावलेला अर्थ म्हणजे संस्कृती. त्यांनी वेदकालापासून आलेली संस्कृती, सोळाव्या-सतराव्या शतकात आलेली सिव्हिलायझेशनची संकल्पना, स्वातंत्र्योत्तर भारतात बहुजन समाज जागा झाला व बुद्ध, चार्वाक यांच्यापासूनचे विद्रोही संस्कृतीचे अन्य पर्याय दिसू लागले. त्याच ओघात ‘रूट्स’चा शोध वगैरे शब्दही आले असा संस्कृतिसंकल्पनेचा विकासही सांगितला. अरुण खोरे यांनी धर्म आणि संस्कृती यांची भारतातील सरमिसळ त्यांचा स्वत:चा जीवनानुभव व आकलन या आधारे मांडली; पण त्याचबरोबर नमुद केले, की क्षमाशीलता हा भारतीय संस्कृतीचा आधार ठरला आहे.

ढेरे यांचे भाषण रा.चिं.व त्या स्वत:, त्यांच्या विशाल व सखोल अभ्यासाची झलक दाखवून गेले. त्या म्हणाल्या, की समन्वय हाच महाराष्ट्र संस्कृतीचा महत्त्वाचा धागा सतत राहिला आहे. त्यापासून समाज दूर झाला तेव्हा बुद्धापासून रमाबाई-फुले यांच्यापर्यंत विद्रोहाची परंपरा प्रभावी झालेली दिसेल व तोही मुख्य संस्कृतिप्रवाहाचा भाग बनून गेला आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी प्रबोधन काळात संस्कृतीबद्दलचा समग्र विचार केला होता असे सांगून आज मात्र संस्कृतीच्या नावाने वेगवेगळ्या गटांच्या अस्मिता तयार होत आहेत व त्यासाठी ‘फॉसिल्स’चा आधार घेऊन मुद्दे तयार केले जात आहेत असे त्या खेदाने म्हणाल्या. त्याच ओघात, त्यांनी महत्त्वाच्या दोन सूचना केल्या, की संस्कृतीचा कालबाह्य भाग समजावून सांगण्याची यंत्रणा हवी. ज्ञानाचा प्रवाह तळापर्यंत झिरपला पाहिजे. रानडे यांनीही अनेक अंगांनी संस्कृतीचा अभ्यास, मांडणी व तद्विषयक कृती कशी केली याचा उल्लेख त्यांनी केला. संस्कृती व धर्म यांची गल्लत करू नये असे त्यांनी बजावून सांगितले.

दिलीप करंबेळकर यांनी संस्कृती व्यक्तीच्या मनात आंतरिक सुसंवाद तयार करते असे सांगितले. ते म्हणाले, की माणूस कृषी संस्कृतीतून औद्योगिक संस्कृतीत आला तेव्हा त्याचा ‘व्हॅल्यू शिफ्ट’ झाला. त्याचा मना-भावनेपेक्षा मेंदू-बुद्धीवर जास्त विश्वास तयार झाला. विसावे शतक ‘आयडियॉलॉजीज’चे म्हणता येईल, त्यानंतर माणूस आयडियॉलॉजीपेक्षा जास्त वेगाने विकसित होत गेला आहे. माणूस आधारहीन वाटतो, याचे कारण ग्लोबलायझेशनच्या युगात सर्वसामान्य माणसावर त्याचे जे अनिष्ट परिणाम होतात त्याविरुद्ध दाद मागण्यास प्लॅटफॉर्म नाही असे सांगून ते म्हणाले, की संघर्षशीलतेला संस्कृतीमध्ये स्थान हवे. संस्कृती व सत्ता यांमध्ये कमीत कमी अंतर हवे.

बार्शीचे पां.ना.निपाणीकर यांनी विज्ञाननिष्ठा व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा कडाडून आग्रह धरत असताना ठासून सांगितले, की इष्टानिष्ट, योग्यायोग्य, चूकबरोबर असा नीतिसंबंधातील प्रश्न मनात उभा राहतो तेव्हा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा निर्णयासाठी आधार घेतला गेला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन तसे द्वंद्वात्मक प्रश्न सोडवू शकतो, कारण विज्ञान प्रत्येक गोष्टीचा पुरावा देते. पण भारतीय संस्कृतीत प्रश्न निर्माण होण्याची प्रक्रियाच थांबवली गेली. भारतात संस्कृती-संस्कार यांचे ‘सॅच्युरेशन’ झाले आहे व रुढीपरंपरांचे येथे गाठोडे बनले आहे. सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी निपाणीकरांच्या प्रतिपादनावर सुचवले, की शिक्षणाने व प्रबोधनाने वैज्ञानिक दृष्टिकोन पसरू शकेल. मुलांचे जन्म तंत्रवैज्ञानिक प्रगतीमुळे येत्या पंधरा वर्षांत मातेच्या गर्भाबाहेर सर्रास होऊ लागतील. ती फक्त एका बाबतीत झलक म्हणायची. अशा क्रांतिसदृश काळामध्ये संस्कृतीचे संकेत पार उलटेपालटे होतील हेही त्यांनी निर्देशित केले.

वैजयंती बेलसरे या पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापक. त्यांनी संस्कृतीमध्ये विज्ञानाइतक्याच महत्त्वाचे कला, नीती असे, जीवन आणखी संपन्न करणारे घटक येत असतात; तत्त्वज्ञानाचा उपयोग तर जीवनार्थाची संगती लावण्यासाठी होतो असे सांगितले.

बेलसरे म्हणाल्या, की संस्कृतीचा संबंध आनंद वाटण्याशी आहे. तो निसर्गाशी निगडित राहून अधिक समर्पक रीत्या समजू शकतो हे माणसाला कळून चुकले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अतिरेक घडतो तेव्हा त्याची चिकित्सा होऊ लागते. चांगले जगायचे म्हणजे काय याचे निकष वेदकाळापासून ब्रिटिश येईपर्यंत नक्की होते. त्यामुळे जीवनाचे प्रयोजन व त्यातील प्राप्तव्य माहीत होते. त्याबाबतचा गोंधळ गेल्या शंभर-दीडशे वर्षांत आपल्याकडे सुरू झाला. त्यामधून विचारी माणसाला ‘माझी संस्कृती कोणती’ हा प्रश्नही पडू लागला.

माणूस स्वतंत्र आहे, बुद्धिमान आहे, संस्कारशील आहे, प्रतिभावान आहे असे सारे घटक संस्कृतीमध्ये येतात आणि संस्कृतीचे स्वत:चे असे स्वायत्त क्षेत्र तयार होते. द्वंद्वात्मकता हे त्यातील आवश्यक गमक असते. त्यामुळे संस्कृती व्यापक, संमिश्र, व्यामिश्र, प्रवाही अशी बनते. त्यामध्ये विवेक हे प्रखर शस्त्रसाधन ठरते. संस्कृती माणसाला सुचवते, की त्याची बुद्धी व प्रतिभा विवेक रूपात व्यक्त झाली पाहिजे.

करमाळ्याचे प्रा. प्रदीप मोहिते हे अभ्यासू, विचारशील व्यक्तिमत्त्व आहे; त्याचबरोबर ते कलाकार असल्याने त्यांची संवेदना तीव्र जाणिवेची आहे. त्यांनी अभिजन हा सतत लहान गट राहिला आहे व त्याच्याकडेच समाजाचे नेतृत्व असते असे सांगून ‘बहुजनां’ची व्याख्या सतत बदलत कशी गेली आहे हे दाखवून दिले. पुण्याचे प्राध्यापक सध्या ओबीसी गटाला बहुजन समजतात. दलित बहुजन, दलितेतर बहुजन अशीही मांडणी विभागश: करता येऊ शकते असे सांगत त्यांनी त्यांच्या स्वत:पुरती व्याख्या रचली. ते म्हणाले, अभिजन ‘जेवलो’ असे सांगतात व ‘चित्राहूती’ देतात तर बहुजन ‘भाकर खाल्ली’ असे म्हणतात व उष्टे अन्नही कोठे पदरी पडते का याचा विचार करतात. ते म्हणाले, की संस्कृतिसमन्वयात जात, धर्म आणि स्त्रीपुरुष या तीन बाबींसंबधात असलेली विषमता हा मोठा अडथळा आहे. तो पार करायचा तर अभिजनांनी ‘डिकास्ट’ होणे गरजेचे आहे तर बहुजनांनी त्यांना वाटणाऱ्या दडपणांच्या ओझ्याखालून बाहेर येणे गरजेचे आहे.

त्यांनी नवीन सांस्कृतिक घटना म्हणून दसरा धम्मपरिवर्तन व 6 डिसेंबर महापरिनिर्वाण या दिवशींचे मेळावे आणि 19 फेब्रुवारी ते 14 एप्रिल हा आंबेडकर जयंतीचा काळ यांची नोंद घेणे जरुरीचे आहे असे सांगता सांगता लोकनाट्य प्रकाराचा समाचार घेतला. ते म्हणाले, की ते संस्कृतिरक्षण नव्हे तर तो अभिजनांनी घेतलेला संस्कृतीचा भोग आहे. वासुदेव, कडकलक्ष्मी, पोतराज, नंदीबैलवाले, जोगताजोगीण, वाघ्यामुरळी वगैरेंना लोकसंस्कृतीचे उपासक म्हणणे गैर आहे असेही त्यांनी बजावले. ते शोषक अभिजनांकडून अजूनही शोषले जात आहेत!
प्रदीप मोहिते यांच्या प्रतिपादनात आक्रोश, आक्रस्ताळेपणा नव्हता, ते संस्कृतिसमन्वयाचा विधायक विचार मांडत होते. त्यामुळे त्यांनीदेखील कलेच्या माध्यमातून संस्कृतीचे, अभिरूचीचे दर्शन व संवर्धन होऊ शकते असे दाखवून दिले व पुढे सुचवले, की रसिकता जपणारी नवी प्रतीके निर्माण होण्याची गरज आहे. त्यांनी त्या संदर्भात लता मंगेशकरच्या आवाजाचा उल्लेख केला. महाराष्ट्राने जगाला दिलेली ती महान देणगी ठरेल. अभिजन व बहुजन यांना परस्परांच्या संस्कृतींबद्दल आदर वाटेल असे सांस्कृतिक महत्तम साधारण विभाजक सूत्र तयार झाले पाहिजे. ज्याच्या आधारे जगणे आनंदी होते ती संस्कृती होय असे बेलसरे यांच्याप्रमाणेच मोहिते यांनीही सुचवले.

निपाणीकर यांनी विज्ञानाने सर्व गोष्टी साधू शकतील असे सांगताच विदुर महाजन म्हणाले, की विज्ञानाने जीवनमान सुधारले, ते गरजेचेच आहे. परंतु या विज्ञानयुगात जीवनदर्जा (क्वालिटी ऑफ लाइफ) सुधारला गेला नाही. कला हे त्यासाठी उत्तम साधन आहे. महाजन सतारवादक आहेत. तळेगावचे मैत्रबन हे त्यांचे गुरुकुल. ते गेली दोन वर्षे सतार घेऊन खेडोपाडी जातात व खेडुतांना, विद्यार्थ्यांना सतारीची ओळख करून देतात. त्यांच्या त्या प्रकल्पाचे नाव आहे – ‘टेकिंग रागाज टू व्हिलेजेस’.

प्रदीप मोहिते यांच्या भाषणातून एक वेगळा मुद्दा निर्माण झाला, तो आदिवासींचा विकास व त्यामुळे त्यांचे मुख्य प्रवाहात येणे. पुणे विद्यापीठातील ‘कल्चरल अँथ्रॉपॉलॉजी’ विषयाचे पीएच.डी. अभ्यासक देवेंद्र मोहिते यांनी गडचिरोलीतील माडिया जमात व त्यापासून अभिजन संस्कृतीस मिळू शकणारे धडे अशी मांडणी आधी केलेली होतीच. स्वाभाविकच, त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. त्यांनीही कुशलतेने सर्व प्रश्न-शंकांचे निवारण केले. ते म्हणाले, की माणूस व संस्कृती अभिन्न असते. त्यामुळे वेगवेगळ्या गटांची सरमिसळ ही सामाजिक प्रक्रिया महत्त्वाची परंतु अभिजन संस्कृती दुसऱ्याकडून काही घेत नाही. नाशिकचे प्रा. शंकर बोऱ्हाडे यांना कॉलेजमध्ये शिकवण्याचा आणि समाजकार्याचा दोन-तीन दशकांचा अनुभव. ते त्यांची निरीक्षणे खुमासदार, मिश्किल पद्धतीने मांडत. त्यामुळे चर्चेत प्रखर मतभिन्नता दिसून आली तर ते झकास, उपहासगर्भ शेरे मारत. लोककला हे नुसते शोषण आहे या प्रदीप मोहिते यांच्या मताला त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, की ते विधान अर्धे खरे आहे. लोककला जीवनाचे साधन बनल्यामुळे त्या टिकल्या तरी!

शिक्षण आणि संस्कृती यांमुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते, तो सुसंस्कृत होतो हे सांगताना सुधीर थत्ते यांनी प्रगत देशांतील आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, की 1960 साली तेथे विशेषत: खुनांचे गुन्हे घडत त्यापेक्षा 2000 साली त्या गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी झाले. त्याचे उघड कारण शिक्षण व संस्कृती यांच्या प्रभावाने माणसे शहाणी व समजूतदार होतात हेच होय. ते म्हणाले, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे सांस्कृतिक गुगलच बनू शकेल.

प्रा. गुंडुराव कांबळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे. त्यांनी तेथील बोली व संस्कृती यांचे वेगळेपण त्यामधील नमुन्यांसहित दाखवून दिले. त्यांची लोकगीते आणि प्रदीप मोहिते व शंकर बोऱ्हाडे यांचे पथनाट्याचे नमुने यांमुळे शनिवार संध्याकाळ मजेत गेली. त्यातील खुमारी सुषमा बर्वे, अंजली कुळकर्णी, अनुराधा काळे यांच्या भोंडल्याच्या वगैरे गाण्यांनी वाढवली.

विषयतज्ज्ञांच्या प्रतिपादनात व तेवढ्याच प्रमाणात त्यानंतरच्या सहभागींच्या चर्चेमध्ये अनेक चांगली निरीक्षणे व मुद्दे येत. छोट्या छोट्या गोष्टी, किस्से सांगितले जात व त्यामुळे वातावरण हसरे-खेळकर व चैतन्यमयदेखील राही. उदाहरणार्थ वैज्ञानिक वृत्ती, तर्कबुद्धी, निधार्मिकता याबाबत आग्रही असलेले निपाणीकर, आठल्ये, कुंभोजकर यांना तेवढीच प्रखर वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे सुधीर थत्ते वेगवेगळे दाखले, उदाहरणे देत व चर्चेचा तोल राखत.

काही मार्मिक निरीक्षणे :

* लावणी बहुजनांची होती, ती उत्पातांनी ताब्यात घेतली व कौतुक त्यांचेच होऊ लागले. *महाराष्ट्रातील संतपरंपरेने मधुरा भक्ती रोखली व म्हणून आपल्याकडे विठोबा ‘माउली’ झाली. *आधुनिक जमान्यात भाषेचा नाद हरवला आहे. तो नव्या तंत्रसाधनांनी जपला व संवर्धित केला गेला पाहिजे. श्रृती परंपरा सुदृढ बनली पाहिजे. * प्राकृत वाङ्मयात महाराष्ट्राच्या रांगडेपणाची व कलहशीलतेचीच वर्णने आहेत. तेव्हा महाराष्ट्र संस्कृती कशा प्रकारची ते ध्यानी घ्यायला हवे. * वज्रसूचिकोपनिषदाचे भाषांतर बहिणाबाईंनी केले होते. * न्या. रानडे यांनी आर्यांग्ल वैद्यकीय पद्धतीचे शिक्षण कसे देता येईल याचा विचार केला होता. * पसायदान पद्धतीचे विश्वात्मक मागणे भारताच्या अनेक भाषासंस्कृतींत आढळते, ते एकत्र केले गेले पाहिजे. (अरुणा ढेरे)

* संस्कृतीचा विचार गांधी नावाच्या माणसाने खूप विशाल व विस्तृत केला. (अरुण खोरे)

* ब्रिटिशांच्या आगमनानंतर समुहाकडून व्यक्तीकडे जाण्याची प्रक्रिया समाजात सुरू झाली, परंतु ती अर्धवटच सुटली. * प्रत्येक गोष्टीचे धर्मात रूपांतर हे भारताचे वैशिष्ट्य वाटते. (डॉ. सुभाष आठल्ये)

* वर्तमानाच्या आकलनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यामधून संवेदना हरवली गेली आहे. (अंजली कुळकर्णी)

* डब्ल्युटीओच्या विचार-निर्णयांचा जगातील व्यक्तींवर परिणाम होऊ शकतो, परंतु त्याबद्दल दाद मागण्याची सोय जागतिक व्यक्तीला नाही.

* लोक जेवढे स्वयंशासित होतील तेवढा गव्हर्नन्स कमी होईल. (दिलीप करंबेळकर)

* भारतात प्रश्न विचारण्यास मुभा नव्हती. त्यामुळे त्याचा मुलांवर परिणाम कसा होई याची एक गोष्ट निपाणीकरांनी सांगितली. ते म्हणाले, की जयंत नारळीकरांची मुलगी ब्रिटनमध्ये शिकत होती. तिच्या क्लास टीचरने नारळीकरांकडे एकदा तक्रार केली, की तुमची मुलगी हुशार आहे – स्मार्ट आहे – वर्गात मिळूनमिसळून असते, पण ती कधी शंका विचारत नाही, प्रश्न विचारत नाही. नारळीकर हसून उत्तरले, की ते अगदी स्वाभाविक आहे, तशी तिला सवय नाही, कारण प्रश्न विचारण्याची पद्धत भारतात नाही! प्रश्न विचारले तरच नव्या गोष्टी कळतील. कुतूहल जागते राहील.

* विज्ञान स्पष्टीकरण देते, पण जगण्याचे प्रश्न सोडवत नाही, त्यामुळे आकलन एकेरी होते. (प्रा. वैजयंती बेलसरे)

* आदिवासींच्या गोटुल परंपरेतून सांस्कृतिक केंद्रासाठी काही तत्त्वे स्वीकारता येतील. (देवेंद्र मोहिते)

* राजकारण्यांना परिपक्वता नसते. त्यामुळे खेड्यात जातीशिवाय निवडणूक लढवली जात नाही. * बलुतं, उपरा, उचल्या अशी आरंभीची चार-पाच आत्मकथने वगळली तर दलित साहित्यात यांत्रिकता आली. (प्रदीप मोहिते)

* अरणा ढेरे यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांचा किस्सा सांगितला तेव्हा त्यावर कडाडून टाळ्या पडल्या. गोखले भाषणासाठी कोलकात्यास गेले होते. त्या भाषणावेळी रसायनशास्त्रज्ञ पी.के. राय व त्यांच्या समाजकार्यकर्त्या पत्नी सरला, दोघे उपस्थित होते. गोखले यांनी भाषणात जातीयतेवर प्रहार केले व ती दूर होणार नाही तोपर्यंत समाजसुधारणा शक्य नाहीत असे सांगितले. सरला राय नंतर त्यांना म्हणाल्या, की तुम्ही तुमच्या जातीचे चिन्ह असे जानवे गळ्यात मिरवत असताना जातीयता नष्ट करण्याच्या बाता कसल्या मारत आहात? गोखले खजील झाले, पण बोलले काहीच नाहीत. त्यांनी कोलकाता सोडण्यापूर्वी राय यांना एक डबी भेट म्हणून पाठवली. त्या डबीत त्यांचे जानवे होते!

* सध्या धनसत्ता व राजसत्ता प्रभावी आहेत. तळेगावच्या चर्चेतील संस्कृतिसमन्वयाचे लोण पसरले तर महाराष्ट्रात विचारसत्ताही तयार होऊ शकेल. (अपर्णा महाजन)

अशा खुल्या चर्चेच्या बाबतीत घडते तसे या ठिकाणीदेखील घडले. धर्म-विज्ञानासंबंधात काही वेळा आग्रही भूमिका मांडली गेली; तत्त्वज्ञानपर काही विधानांना ऐतिहासिक सत्याचा आधार होताच असे नाही; विचारशील व्यक्ती व कार्यकर्त्या व्यक्ती एकत्र बसतात तेव्हा विचार आणि कृती यांचा बोलण्यातील ताळमेळ जुळतोच असेही नाही. अशा सर्व मर्यादा तळेगाव चर्चासत्रात जाणवल्या, पण तरीदेखील ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ व ही पाठपुरावा बैठक यांची फलनिष्पत्ती चांगली झाली असे म्हणता येईल. अभिजन व बहुजन संस्कृती यांमधील पाच दशकांची फाळणी दूर करण्याच्या दृष्टीने समाजाच्या सर्व थरांतून विचार होऊ लागल्याचे तेथे ध्यानी आले. कलासाहित्य जे आधुनिकतेच्या नावाखाली पंथीय रूप घेऊ पाहत आहे त्या बाबतचा विचार सर्वसमावेशक होत असल्याची चाहूल लागली. ते प्राध्यापक-समीक्षकांच्या तावडीतून सोडवण्याची व सर्वसामान्य रसिकांपर्यंत नेण्याची गरज प्रतिपादिली गेली. मुख्य म्हणजे ज्ञाननिर्मिती व ज्ञानप्रसार यासाठी ज्ञानमंडळांचा कृती कार्यक्रम तयार झाला. त्यामध्ये वेगवेगळ्या अनेक व्यवसायांतील तज्ज्ञांना एकत्र गुंफून व त्यांना कॉलेजा कॉलेजांतील उत्सुक व इच्छुक तरुणांना जोडून देण्याची योजना प्रस्तावित स्वरूपात डॉ. यश वेलणकर यांनी मांडली. तिला मूर्ताकार देण्यास महेश खरे सज्ज झाले. हे सारे सर्वसमावेशकता व समन्वय या महाराष्ट्र संस्कृतीच्या सूत्रांना धरूनच घडले!

– आशुतोष गोडबोले

About Post Author