डॉ. कृष्णा इंगोले – माणदेशाच्‍या साहित्यिक जडणघडणीचे शिल्‍पकार

5
71

सोलापूर जिल्ह्याचे सांगोला तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सांगोला शहरातील ‘सांगोला महाविद्यालय’ हे नावाजलेले महाविद्यालय. तेथून अनेक विद्यार्थी शिकून गेले आणि नावारूपास आले. त्यांच्या त्या यशात सिंहाचा वाटा आहे. डॉ. कृष्णा इंगोले यांचा. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक व प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते सांगोला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत.

डॉ. कृष्णा इंगोले यांचे ऋजू व विनम्र व्यक्तिमत्त्व पहिल्या भेटीतच प्रत्ययास येते. त्यांची वृत्ती सहकार्य करण्याची आहे; एवढेच नव्हे, तर समोरच्या व्यक्तीचे काम पूर्णत्वास नेण्याची त्यांना असलेली आस समोरच्याला आश्वस्त करते. ते त्यांच्या खांद्यावर दुस-याचे काम लीलया घेतात. त्यातून त्यांना साहित्य व संस्कृतीविषयी असलेली आस्था व माणूस म्हणून असलेले त्यांचे मोठेपण सतत जाणवत राहते.

इंगोलेसर जरी प्राचार्यपदी असले तरी ते वर्गात व्याख्यान देण्याचे काम अजूनही करतात. ते त्यात मनापासून रमतात. तो त्यांचा पिंड आहे.

ते ज्या ग्रामीण परिसरात वाढले, घडले, संस्कारित झाले, त्या परिसराशी ते कृतज्ञ राहिले आहेत. त्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांनी तळमळीने ज्ञानदान केलेले आहे. शिक्षण हा त्यांचा पेशा नसून ते त्यांचे जिवितकार्य आहे असे म्हणणे यथोचित होईल. त्यांनी सांगोला तालुक्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.

त्यांचा जन्म सांगोला तालुक्यातील नरहाळे या दुर्गम गावी हलाखीच्या परिस्थितीत जगणा-या शेतकरी कुटुंबात झाला(17 ऑगस्ट 1953). वडील चौथी पास व आई निरक्षर. या कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्यांचे शिक्षण मुंबईत गिरणीकामगार असलेल्या मामाच्या प्रोत्साहनामुळे पार पडले. प्रा. इंगोले यांचे पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यावेळी त्यांना सेल्स टॅक्स ऑफिसरची नोकरी आणि शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. ची फेलोशिप अशा दोन संधी एकाच वेळी चालून आल्या. त्यांनी सेल्स टॅक्स ऑफिसरच्या नोकरीऐवजी पीएच.डी.ची फेलोशिप स्वीकारली. त्यातून त्यांची संशोधन व साहित्य याविषयीची आस्था जाणवते.

त्यांनी ‘मराठी साहित्यातील विधवा जीवनाचे चित्रण’ या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट संपादन केली. ते सांगोला तालुक्यात डॉक्टरेट पदवीचे पहिले मानकरी ठरले. ते सांगोला महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून १९८० पासून कार्यरत आहेत.

त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी तर लावलीच, पण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यांनी ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांना महाविद्यालयीन उपक्रमात सहभागी होता यावे या दृष्टीने महाविद्यालयीन कामकाजाचे नियोजन केले. अशी उपक्रमशीलता इंगोलेसरांच्या विचारांतून व कार्यपद्धतीतून दिसून येते. त्यामुळे दुसरा कोणी काही चागंले काम करत असेल तर ते वेळेची, नियमांची मोडतोड करून त्यास मदत करतात.

त्यांनी महाविद्यालयात अनेक चर्चासत्रे आयोजित केली. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले. आंतर विद्यापीठ तायकांदो स्पर्धेसाठी विद्यार्थी प्रशिक्षणाची व्यवस्था केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील व्यसनाचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न केले. महाविद्यालयात दोनशे संगणक असलेली सुसज्ज लॅब आहे. इ-बुक लायब्ररी आहे. वीज गेली तर जनरेटर असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नाही. अनेक विषयांवरील पुस्तकांचा खजिना उपलब्ध आहे.

महत्त्वाची व विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे विनाअनुदान विभागातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना असलेली अर्थसहाय्याची निकड लक्षात घेऊन इंगोलेसरांनी प्राध्यापकांना दरवर्षी  प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यास उद्युक्त केले आहे. जो निधी जमा करण्यात येतो त्यात संस्था तेवढीच भर घालते असे एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे सहाय्य दरवर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्यातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य तर मिळतेच पण सामाजिक भानही वाढीस लागते. 

त्यांनी अशा सर्व प्रकारे विद्यार्थ्यांना दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे ते विद्यार्थ्याना आपलेसे वाटतात. एक आदर्श शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेतच. पण नव्या पिढीतील प्राध्यापक, शिक्षक, नवोदित लेखक हेदेखील त्यांना आदर्श मानतात. शिकवणे हे त्यांनी त्यांच्या आयुष्याचे व्रत मानले आहे. राज्यातील नामवंत विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी डॉ. कृष्णा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्याची संधी मिळावी यासाठी धडपडत असतात.

‘माणदेश’ ही त्यांची जन्मभूमी अन् कर्मभूमी. ज्या भूमीत, ते लहानाचे मोठे झाले त्या मातृभूमीची ओढ त्यांना होतीच. मराठीचे अध्यापन करत असल्यामुळे साहित्याचे वाचन होते. विशेषत: माडगुळकर बंधू आणि शंकरराव खरात यांचे माणदेशी साहित्य वाचले होते. त्यांनी माणदेश, तेथील दुष्काळ, दारिद्र्याने गांजलेली माणसे अनुभवली होती. ‘माणदेश’ म्हणजे निश्चित कोणता प्रदेश? या त्यांना स्वत:ला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार वर्षे प्रयत्न करून, माण नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून, स्वत: दोनशे गावांत फिरून त्यांनी ‘माणदेश: स्वरूप आणि समस्या’ हा पहिला ग्रंथ महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी (28 नोव्हेबर 1988) प्रकाशित केला. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या वैचारिक जडणघडणीत आहे. त्यांच्याबद्दलचा आदर त्यांनी असा व्यक्त केला.

त्यांनी त्या ग्रंथात राज्यातील उपेक्षित राहिलेल्या माणदेशाच्या भूभागाचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा सखोल व सर्वस्पर्शी आढावा घेऊन माणदेशाच्या वर्मावर, मर्मावर आणि वैगुण्यावर प्रकाश टाकला आहे. त्यात माणदेशाचा भूगोल, इतिहास, संस्कृती यांबाबत माहिती देऊन त्या प्रदेशाचे वेगळेपण दाखवून दिले आहे. त्या परिसराची ‘औद्योगिक पार्श्वभूमी – प्रश्न व दिशा’ या विषयी त्या पुस्तकात ऊहापोह केलेला आहे. त्यांनी माणदेशाचा दुष्काळ हटवण्यासाठी माणदेश हा स्वतंत्र जिल्हा व्हावा अशी अपेक्षा त्या ग्रंथात व्यक्त केली आहे. त्यांचा तो संशोधन ग्रंथ म्हणजे ‘त्यांची माती अन् त्या मातीतील माणसांविषयी’चे ऋण म्हणावे लागेल.

त्यांनी लिखाणाला 1980 सालापासून आरंभ केला. त्यांनी लिहिलेली ‘शेणातील गाणे’ ही त्यांची पहिली कथा. त्यांचा ‘गावरंग’ हा पहिला कथासंग्रह 1996 साली प्रसिद्ध झाला. त्या कथासंग्रहाच्या तीन आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या त्यांच्या लेखक म्हणून लोकप्रियतेच्या निदर्शक आहेत. ते लोकसाहित्य जमा करण्यासाठी २००० साली स्वत: फिरले. त्यांनी स्त्रीगीते संकलित केली. त्यांचा उपयोग करून ‘संचार’ दैनिकामध्ये वर्षभर लेखमाला चालवली. ‘लोक संस्कृतीतील स्त्रीरूपे’ ह्या त्या संदर्भातील पुस्तकाला ‘महाराष्ट साहित्य संस्कृती मंडळा’चे अनुदान मिळाले आहे. लेकीच्या जन्मापासून ते तिच्या अहेव मरणापर्यंतचा प्रवास त्या ग्रंथात आविष्कृत झालेला आहे. ते पुस्तक शिवाजी विद्यापीठामध्ये एम. ए.च्या लोकसाहित्याच्या अभ्यासाला नेमले गेले आहे.

डॉ. कृष्णा इंगोले यांनी तुकाराम गाथा दहा-बारा वेळा वाचून त्यातील सुभाषितवजा अवतरणे शोधून त्यांची विषयवार वर्गवारी केली. त्यांना एकशेचौतीस विषयांवर एकूण तेराशे अवतरणे उपलब्ध झाली. त्यांनी त्या अवतरणांची सूत्र रूपाने मांडणी केली. त्या संदर्भातील पुस्तकाला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा उत्कृष्ट संदर्भग्रंथ व कोशवाङ्मय निर्मितीचा ‘हणमंते संशोधन कोष’ पुरस्कार मिळाला. त्यांचे ग्रामीण भागावर लिहिलेल्या लेखांचे ‘गावजागर’ (2005) हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकातील वैचारिक लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण जीवनाचा सूक्ष्म अभ्यास, चिंतनातून त्यांना लाभलेले बदलत्या काळाचे भान, प्रश्नांची उकल करण्याची त्यांची क्षमता आणि तटस्थपणा हे होय! 

सोलापूर जिल्ह्यात विविध भाषा,  संस्कृती, परंपरा, लोकमानस एकत्र नांदतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र यांचे एकमेकांशी सांस्कृतिक आदानप्रदान तेथे मनोरम रीत्या पाहण्यास मिळते. त्यामुळे अनेक स्तरांवर विधायक सामाजिक व सांस्कृतिक काम उभे राहते. डॉ. इंगोले यांनी त्या संदर्भातील सातशे वर्षांचा इतिहास लिहिलेला आहे. त्यांनी सीमाभागात वसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा वाङ्मय व्यवहार तपासून मराठी साहित्याच्या अभ्यासात नवा पायंडा पाडला आहे. तो ग्रंथ अनेक अभ्यासकांना उपयुक्त ठरत आहे. त्या विषयीच्या ‘सोलापूर जिल्ह्याची साहित्य परंपरा’ या ग्रंथाचे प्रकाशन ‘सुविद्या प्रकाशना’ने केले आहे.

डॉ. इंगोले यांनी ‘परिघावरच्या पाऊलखुणा’ हे ललित गद्याचे पुस्तक सिद्ध केले आहे. शहर आणि खेडे असे समाजाचे धृवीकरण झालेले आहे. काळाच्या ओघात शहरांचा विकास होऊ लागला. विकासाचा केंद्रबिंदू शहरात पण खेडी मात्र विकासापासून शेकडो मैल दूर… अशा परिघावरचा माणूस केंद्राकडे वाटचाल करत स्वत:ची ओळख निर्माण करतो. त्याच्या जडणघडणीचा प्रवास त्या पुस्तकात अनुभवास येतो.

डॉ. कृष्णा इंगोले यांनी त्यांच्या स्वंतत्र लेखनाबरोबर काही ग्रंथांचे संपादनही केले. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक’ व ‘उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने प्रकाशित केलेल्या मराठी वाचन पाठ (मराठी द्वितीय भाषा) इयत्ता दहावी, इयत्ता नववी, बालभारती या पुस्तकांच्या सहसंपादकाची भूमिका बजावली. शिवाजी विद्यापीठाच्या बी.कॉम. ‘भाग एक’चे ‘मायबोली’ हे क्रमिक पुस्तक; तसेच, बी.ए. ‘एक’चे ‘साहित्य संवाद’ आदी पुस्तकांचे सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले. काळाची गरज ओळखून मराठी पदवीच्या अभ्यासात साहित्याच्या अभ्यासाबरोबर भाषेच्या अभ्यासालाही इंगोलेसरांनी प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठात नऊ विद्यार्थ्यांना प्रबंध लेखनासाठी (पीएच.डी साठी) व बारा विद्यार्थ्यांना एम.फील.साठी मार्गदर्शन केले आहे.

त्यांनी संपादित केलेले ‘सृजनरंग’ हे पुस्तक सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. त्यांनी ग्रामीण साहित्य आणि वास्तव, डॉ. द.ता. भोसले गौरव ग्रंथ, प्राचार्य दा.सु. पवार गौरवग्रंथ या ग्रंथांचे संपादन केले, तसेच नोव्हेंबर 1991 साली सांगोले येथे झालेल्या राज्यव्यापी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले. त्या संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांनी ‘हसू आणि आसू’ आदी पुस्तकांचे संपादन केलेले आहे. त्यातून त्यांचा व्यासंग दिसून येतो. त्यांनी ‘माणगंगा प्रकाशन’ संस्था काढून त्या भागातील नवोदित लेखकांच्या साहित्यकृतींचे लवकर प्रकाशन करता यावे, प्रकाशनाचा अवास्तव खर्च थांबावा यासाठी अनेक पुस्तके प्रकाशित केली.  

त्यांचे विविध विषयांवरील साडेतीनशे लेख प्रसिद्ध झालेले असून त्यांनी निरनिराळ्या विषयांवर चारशे व्याख्याने दिली आहेत.

त्यांनी सांगोला येथील ‘मराठी अभ्यास व संशोधन केंद्रा’ची स्थापना केली आहे. त्या केंद्राच्या वतीने राज्यातील मराठी विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांच्यासाठी विविध विषयांवर चर्चासत्रे व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येते. कवी नारायण सुमंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘शेतकरी साहित्य इर्जिक’चे ते मार्गदर्शक आहेत. त्यातून त्यांनी अनेक कवी व लेखक घडवले.

ते ‘नगर वाचन मंदिर, सांगोला’चे उपाध्यक्ष म्हणून काम करतात.

त्यांनी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन भरवून त्याचे कार्याध्यक्षपद भूषवले आहे. ते गदिमा पारावरील साहित्य संमेलन दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी गेली सतरा वर्षे नियमितपणे आयोजित करत आहेत. ते ‘प्रेरणा’ नावाचे भित्तीपत्रक गेली तीस वर्षे चालवत असून, माणदेश नावाचे वार्षिक नियतकालिक प्रसिद्ध करत असतात. त्यांनी नवलेखक, कथालेखक शिबिर दोन वेळा आयोजित केले आहे. कथाकथनाचेही प्रयोग केले आहेत. त्यातून वाटंबरे गावातील शिपाई कथालेखक झाला आहे. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनात गाजलेले ज्योतीराम फडतारे हे लेखक तेथूनच उदयास आले आहेत. त्यांनी ‘माणदेश ज्ञानपीठ’, ‘मराठी साहित्य मंडळ’, ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’ आदी संस्थांच्या पदावर काम करत असताना अनेक सामाजिक कामे केली आहेत.   

महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांच्याकडे आल्यापासून महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. ते विद्यार्थ्यांच्याबरोबरच, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या क्रियाशीलतेला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. गावात ‘किसना’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. कृष्णा इंगोले यांच्याकडे नेहमीच माणसांची वर्दळ असते. पुस्तकात रमणा-या या माणसाला माणसे वाचण्याचाही छंद आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. अनेक विद्यार्थी त्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची वैचारिक मैत्री आहे. ‘साधेपण जपणारा मोठा माणूस’ अशी त्यांची समाजात ओळख आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला आहे. ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य आणि संत साहित्य यांचे अभ्यासक म्हणून साहित्याच्या प्रांतांत स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या डॉ. कृष्णा इंगोले यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करून माणदेश परिसरात नवोदित साहित्यिकांची फळी तयार केली आहे. त्यामुळेच ते त्या भागाच्या साहित्यिक जडण-घडणीचे शिल्पकार ठरतात.

इंगोलेसर विद्यापीठात व समाजात मानाच्या अनेक पदांवर विराजमान झालेले आहेत. अधिव्याख्याता, विभागप्रमुख, प्रपाठक, संशोधक मार्गदर्शक, प्राचार्य, सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. लेखक, संशोधक, सामाजिक व सांस्कृतिक जाण असलेले, विद्यादानाचे कार्य तळमळीने करणारे ते एक अजोड व्यक्तिमत्त्व आहे. प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले हे सांगोला तालुक्याचे खचितच भूषण आहेत.

कृष्‍णा इंगोले – 9423236144

-अनुराधा काळे

(लेखनात प्रा. संतोष लोंढे यांचे सहकार्य लाभले आहे)

About Post Author

5 COMMENTS

  1. Sir u r teaching not only
    Sir u r teaching not only students but u r helping to our nation to promote n progress

Comments are closed.