डुबेरे गावची प्राक्तनरेषा – सटवाई!

8
90
_DubereGavachi_Pratankanresha_satvai_1_1.jpg

डुबेरे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर आहे. गाव छोटे पण टुमदार आहे. एका बाजूला औंढपट्टा डोंगराची रांग आहे व दुसऱ्या बाजूला एकच डोंगर ध्यानस्थ ऋषीसारखा बसलेला आहे. त्यावर गावकर्यां नी देवीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. डुबेरे गावाला निसर्गाने सौंदर्य मुक्त हस्ताने दिले आहे. गाव दाट झाडीत वसलेले आहे; आंबराया, चिंचेची बने, बोरी-बाभळी यांनी गाव व्यापून टाकलेले आहे. गावाला काटेरी झाडांचे भक्कम कुंपण आहे. डुबेरे गावाची ओळख थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव म्हणून आहे.

गावाचे नाव डुबेरे का पडले? लोक मजेदार आख्यायिका सांगतात. गाव गर्द झाडीत डुबलेले असल्यामुळेच डुबेलऽ ऽ  डुबेलचे ‘डुबेर’ झाले. गावाला पूर्वी भक्कम तटबंदी होती. गावाला दोन वेशी आहेत. गावातील घरांची रचना सुडौल आहे. रस्ते व गल्ल्या एकमेकांना काटकोनात छेदतात. ते गाव अंताजी बर्वे यांनी तीनशे वर्षांपूर्वी वसवले असे मानले जाते. गाव डोंगरात असल्याने गवताची राने आहेत.

गावात वाजे, ढोली, वारुंगसे, माळी हे आडनाव धारण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोण कोठून येऊन कधी स्थायिक झाले त्याचा पुरावा उपलब्ध नाही. वाजे हे कुटुंब बर्वे यांच्याबरोबरच डुबेरे येथे आल्याचे समजले जाते. वाजे हे पूर्वीचे शिर्के होते. संभाजी महाराजांनी शिर्के यांचे शिरकाण केले. त्या भयापोटी पुण्यातील शिर्के मंडळी डोंगराचा आश्रय घेत सिन्नर तालुक्यातील डुबेरे, पांढुर्ली येथे स्थायिक झाल्याचे दिसून येते.

गावात ऐतिहासिक सप्तश्रृंगीगड, भैरवनाथ मंदिर, सटवाई (सटुआई) माता यांची मंदिरे आहेत. गावाची लोकसंख्या जेमतेम सात हजार इतकी आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती व्यवसायाशी निगडित राहून गुण्यागोविंदाने नांदणारी कुळवाडी, बारा बलुतेदार समाज तेथे स्थिरावला आहे. विडी व्यवसाय हा शेतीपूरक व जगण्याचा एकमेव आधार म्हणून ओळखला जाऊ लागला. डुबेरे गावात धनगर समाजाचे लोक घोंगड्या विणण्याचा व्यवसाय करत असत. गावाची लोकसंख्या वाढत गेली. शिवार मात्र तेवढाच राहिला. शेतीचा हिशोब एकरावरून बिघा व आता पांड (गुंठा) या भाषेत होऊ लागला. गावाला बगल देऊन खळखळ वाहणारी ढोकी नदी आहे. गावची रचना नगररचना केल्यासारखी आहे. इतिहासकालीन पेशवेवाडा, दक्षिणोत्तर राजेशाही, प्रवेशद्वार टेहळणीसाठी बुरुज, बसण्यासाठी चौकांची रचना आहे. भाजी मंडई व जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ आरोग्य सुविधांनी युक्त आहे. गावकुसावर दलित समाजाची वस्ती आहे.

महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी सटवाईची मंदिरे दिसून येतात. डुबेरे हे त्यांपैकी एक. सटवाई ही मूल जन्माला आल्यानंतर त्याचे भविष्य लिहिते असा (अंध) समज आहे. सटवाई ही ब्रह्मदेवाची मुलगी मानली जाते. तिच्या मांडीवर बाळ आहे. बर्वे यांनी सटवाई मंदिर बांधले व ताम्रपट करून भट यांना मंदिराचे पुजारी म्हणून परंपरेने नेमले आहे. देवीच्या मंदिरात शेंदूर लावलेल्या दोन पाषाणमूर्ती आहेत. बाळाचे नशीब त्याचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी लिहिणारी देवता म्हणजे सटवाई व बाळाच्या आरोग्याची काळजी घेणारी देवता म्हणजे जीवती. मात्र सटवाई व जीवती या दोन बहिणींचे आपापसात कधीच पटत नसल्यामुळे त्यांचे भाविकसुद्धा परस्परविरोधी देवतांना जात नाहीत.

सटवाई मंदिराची यात्रा भरवली जात नाही. कारण गावाला दोन रस्ते असतील तरच म्हणे यात्रा भरवली जाते! जहागीरदार बर्वे विश्वस्त म्हणून मंदिराचे काम बघत असत. परंतु ‘सटवाई मंदिर ट्रस्ट’ची स्थापना१९८७ साली झाली. पूर्वीचे जुनाट मंदिर पाडून नवे बांधले गेले. त्यात अद्ययावत मंदिर, गर्भगृह, सभामंडप, पाणपोई इत्यादी सुविधा आहेत. भक्तनिवासाची सोय आहे. हरीभक्त परायण त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. देवी मंदिराच्या सभागृहात पंचधातूच्या काल्पनिक श्री सटवाई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एप्रिल २००१ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी झाली. महामंडलेश्वर आचार्य महंत रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे मार्गदर्शन त्याकरता लाभले.

मानववंश शास्त्रात संशोधन करणारी फ्रान्सची जेसिका हेकीट ही अभ्यासक सटवाईची परंपरा जाणून घेण्यासाठी डुबेरे येथे येऊन गेली. तिने गावात तीन आठवडे राहून सटवाईचा अभ्यास केला.

_DubereGavachi_Pratankanresha_satvai_2.jpgडुबेरे गावातील भोपळा वृक्ष हे झाड प्रसिद्ध आहे. ते झाड सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर डुबेरे येथील बुद्धमंदिराजवळ ढोकी नदीच्या काठी आहे. ते हरी काळू रुपवते यांच्या मालकीच्या जागेत आहे. वृक्षाला जुलै-ऑगस्ट महिन्यांत बुंधा, खोड, फांद्या व सर्वत्र फुले येतात आणि  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोल भोपळे लागतात. झाड कसे आले? कोणी लावले? त्यांचे वय किती? यांविषयी माहिती उपलब्ध नाही. गोपाळा कबीर नावाच्या साधूने ते झाड लावले असे मानले जाते. ग्रामपंचायतीने झाडाच्या रक्षणासाठी बुंध्याजवळ संरक्षक ओटा बांधला आहे. झाडाची फळे खाण्यासाठी वापरत नाहीत. त्यापासून विणा, एकतारी बनवतात. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्र.के. घाणेकर यांनी डुबेरे येथे भेट दिली. त्यांनी सांगितले, की त्या झाडाचे शास्त्रीय नाव ‘क्रिसेन्शीया कुजेटा’ असे आहे. त्याला इंग्रजीत ‘बेगर्स बाऊल’ किंवा ‘कॅलॅबश ट्री’ व हिंदीमध्ये विलायती बेल असे म्हणतात. तो छोटा वृक्ष मूळचा विषुववृत्तीय दक्षिण अमेरिकेमधील आहे. त्याच्या बियांपासून तेल काढतात. ते झाड ब्रिगेनिएसी या कुळातील आहे. ती झाडे मुंबईतील राणीचा बाग; तसेच, पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज, गोखले अर्कशाळा परिसर या ठिकाणी आहेत. भोपळ्याचे वेल असतात. तसेच त्याचे फूल एकलिंगी असते. त्यामुळे भोपळीवेल व भोपळीसदृश्य असलेल्या डुबेरे येथील या झाडाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. एक वेगळे, दुर्मीळ झाड बघण्यासाठी पर्यटक मात्र तेथे येत असतात.

भैरवनाथ मंदिर हे डुबेरे येथील ग्रामदैवत आहे. ते गावाच्या पश्चिम दिशेला आहे. भैरवनाथ मंदिराची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरवली जाते. भैरवनाथाची काठी माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दांडी पौर्णिमेला गावभर मिरवली जाते. त्या काठीची पूजा चैत्र पौर्णिमेपर्यंत करतात. भैरवनाथ यात्रेच्या दिवशी रात्रभर जागरण-गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. एखाद्या मनुष्यास, प्राण्यास सर्पदंश झाला तर त्याला त्या मंदिरात तीन-चार दिवस ठेवतात व त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करून किंवा साधा गुळ-खोबऱ्याचा प्रसाद तेथे तयार करून तो देतात. त्या मनुष्याला नवे कपडे परिधान करून त्यानंतर वाजत-गाजत गावातील सर्व देवतांचे दर्शन करतात. मंदिर पूर्वी छोट्या स्वरूपाचे होते. गावातील सर्व लोकांनी मिळून त्याचे भक्कम स्वरूपाचे मंदिर बांधले आहे. मंदिरात भैरवनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते डुबेरेगड म्हणून ओळखले जाते. डुबेरेगडावर सप्तश्रृंगी देवीचे मंदिर बांधले आहे. त्या ठिकाणी नवरात्र उत्सवात यात्रा भरवली जाते. गडाच्या पायथ्याशी अमरगिरी महाराजांचा शांतिगिरी आश्रम आहे व नागेश्वराचे मंदिर आहे. नागेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरवली जाते.

कोळी गुरुजींनी प्रेरणा दिल्याने गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. गावात राममंदिर, विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर असून तेथे हरिनाम सप्ताह चालतो. वारकरी संप्रदायातून दिंडीचाही कार्यक्रम केला जातो. गावात स्वाध्याय केंद्रही आहे. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने चालणारे स्वामी समर्थ केंद्रही गावात आहे.

–  मोहिनी माळी

About Post Author

8 COMMENTS

 1. खुप छान माहीती आहे…
  खुप छान माहीती आहे….
  its very good information about my gon….

 2. खुप छान प्रकारे गावाची…
  खुप छान प्रकारे गावाची माहिती संगण्याचा प्रयत्न केला यात गावाची ऐतिहासिक व् राजकीय माहिती हवी होती ऎसे मला वाटते .
  Very nice information in Dubere village

 3. मला माझ्या गावाचा अभिमान…
  मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो.फारच छान माहिती सांगीतली

 4. मला माझ्या गावाचा अभिमान…
  मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो.फारच छान माहिती सांगीतली

Comments are closed.