डुबेरे गावचा बर्वे वाडा – बाजीरावाचे जन्‍मस्‍थान

Carasole

थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे प्रथम संतान. बाळाजी विश्वनाथ भट हे स्वकर्तृत्वाने अनेक वर्षांच्या सेवेनंतर पेशवे पदावर पोचले.

मल्हार बर्वे यांना छत्रपती राजारामांकडून, गंगथडी प्रांतात चौदा महालांची चौथाई व जहागिरी मिळाली होती. पेशव्यांच्या पागेला चारा व खिल्लारे पुरवण्याचे काम बर्वे करत असत. पुढील काळात, त्यांनी निफाडजवळ कोहुरे व डुबेरे ही गावे वसवली. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आयुष्यभर यशस्वीपणे लढत राहिले. अवघे चाळीस वर्ष जीवन लाभलेल्या व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या त्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी पेशव्याचा अंत, २८ एप्रील १७४० रोजी, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील, रावेरखेडी येथे उष्माघाताने झाला. त्यांचा अंत्यसंस्कार रावेरखेडी येथे करून त्यांची समाधी नर्मदेच्या काठावर बांधण्यात आली.

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले म्हणून गावाचे ‘डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे. तो १६९५ च्या आसपास बांधला गेला असावा. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते  चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. चहुबाजूनी तटबंदी आहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. वाड्याच्या संरक्षणार्थ, गच्चीवरील अर्धगोलाकार मुंढा-यांच्या तळ भागातील जंग्याचा उपयोग शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी असे. मध्यंतरीच्या काळात पडझड झालेल्या भागाची डागडुजी चुकीच्या कार्यपद्धतीने झाल्याचे दाखले इमारतीवर ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे वाड्याच्या सौंदर्यास बाधा पोचली आहे. अशी दृष्ये संवेदनशील मनाला पटत नाहीत.

मुख्य रस्त्यावरुन पश्चिम दरवाज्याकडे जाताना सर्वप्रथम नजरेत भरतात त्या उत्तराभिमुख चिरेबंद भिंतीच्या खोबणीत चफकलतेने बसवलेल्या सलग रेषेतील सात खिडक्या. त्या विशिष्ट आकृतिबंधातील लाकडी खिडक्या ही बर्वे वाड्याची शान आहे! त्या जागेतून, युद्धावर निघालेल्या किंवा पराक्रम गाजवून परतणा-या स्वकुळातील पुरुषांवर किंवा अती महत्‍त्‍वाच्या पाहुण्यावर स्वागतपर पुष्पवृष्टी करण्याचा रिवाज असे. तसेच, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्यात वाद्यघोष वाजवून, लढाई जिंकून परतलेल्या शूर वीरांचे व पाहुण्याचे स्वागत करत असत.

वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. भारतीय वास्तुशास्त्रात खुल्या चौक रचनेला महत्त्व आहे. भौगोलिक दिशेचा उपयोग व तिन्ही ॠतूंत फायदेशीर ठरणा-या आणि निसर्गनियमांशी मिळत्याजुळत्या सुरक्षित जीवनशैलीला ‘भारतीय वास्तुशास्त्र’ म्हणतात. महिला व मुले यांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांची गरज असते हे ओळखून चौकांची मांडणी व आकार ठरवत असत. त्या रचनेमुळे सूर्यास्तापर्यंत घरात परिवर्तित मंद प्रकाश पडे व हवा खेळती राही. पूर्वेकडील प्रवेशद्वारातील आयताकृती चौकाला लागून तीन फूट उंच चिरेबंदी जोत्यावर, कर्मचा-यांसाठी कचेरी व बैठकीची व्यवस्था आहे. त्या जोत्यावर सम अंतरातील लाकडी खांबांचा सांगाडा व चौफुली आकाराच्या लाकडी तुळयांवर आधारित कौलारू छताची रचना साधली आहे. रखरखीत सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी जाळ्यांचा उपयोग केला आहे. मोठ्या चौकानंतर दोन लहान सम आकारातील चौकांपैकी एका चौकात तुळशी वृंदावन व दुस-यात पिण्याच्या पाण्याचे आड (छोट्या गोल आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर) आहे. चौकांवर माजघर, देवघर, स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांचा प्रकाश निर्भरित आहे. वाड्याचा आराखडा फक्त सुरक्षिततेला महत्त्व देऊन बनवला आहे. देवघराचा दरवाजा, लाकडी तुळयांचे टोक व खांबावरील जुजबी नक्षीकाम सोडले तर कलासौंदर्याला फारसा वाव दिलेला दिसत नाही. तसेच, खोल्यांची उंची कमी का ठेवत याचाही खुलासा होत नाही.

युद्धकाळ किंवा अडीअडचणीच्या वेळी, धान्यसाठा मुबलक असावा यासाठी वाड्यात बळंद (दोन भिंतीतील पोकळी) व इतर खोल्यांची रचना केली आहे. बळंदात उतरण्यासाठी लाकडी ओंडक्यांची व्यवस्था आहे. तेथे परिवर्तित सूर्यप्रकाश व शुद्ध खेळती हवा राहील असे नियोजन आहे. तळमजल्यावरील भिंतीत केलेल्या पोकळीची लाकडी झडप वर ओढून हवे तेवढेच धान्य काढता येई. पडवी ते माजघर मार्गावरील भिंतीच्या रुंद गाभ्यातील अरुंद जिन्याची रचना अपरिचित माणसास चटकन दिसू नये अशी आहे. चार ते पाच फूट रुंद भिंतीच्या गाभ्यात सामानासाठी फडताळे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गुप्त कोनाडे आहेत. रात्रप्रकाशदिव्यांसाठी ठिकठिकाणी छोटे कोनाडे व वस्तू अडकवण्यासाठी लाकडी खुट्यांचा वापर आढळतो.

बाळंत स्त्रीस आवश्यक असणा-या, थंड व उबदार खोलीची रचना वास्तुशास्त्रास धरुन आहे. त्या खोलीतील खिडक्यांची रचना जरुरीपुरता सूर्यप्रकाश, शुद्ध हवा व गरम हवेचे संतुलन राहील अशी आहे. अवघडलेल्या बाळांत स्त्रीस, अंघोळ घालण्यासाठी केलेल्या रचनेतील वेगळेपण समजावल्याशिवाय कळत नाही! परस्थ स्त्रियांना, बाह्य दरवाजातून आत घेण्यासाठीची सूचकता व वरील रचनेतील सर्व खुबी पाहून नवल वाटते! त्यावरुन, वर्तमान आधुनिक जीवनपद्धतीतील कृत्रिमपणा भारतीय जीवनशैलीशी किती फारकत घेणारा आहे हे दिसून येते! त्यामुळेच, शहरात तोकड्या सदनिकेत ‘न मिळणारे वास्तुसुख शोधणा-यांची संख्याच अधिक आहे;

साधारण दोन एकर जमिनीवरील तटबंदीचा जोत्यापर्यंतच्या भाग दगडात व त्यावरचा भाग मातीचा आहे. विशिष्ट पद्धतीने कमावलेल्या त्या मातीचे कुतूहल सर्वांनाच असते. मातीची संलग्नता व क्षमता वाढवण्यासाठी खापरी तुकडे, घोड्याची लीद, शंख-शिंपल्याचा चुरा, छोटे गोटे व विशिष्ट वनस्पतींच्या रसाचे म़िश्रण एकजीव होईपर्यंत बैलांकडून तुडवून, अनेक दिवस थंड वातावरणात भिजत ठेवत. ओल्या मातीचे घट्ट ढेकळ एकमेकांवर रचून भिंत बांधली जात असे. वाड्याच्या दक्षिण भागात घोड्यांच्या पागा व जनावरांचे गोठे आहेत.

पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जपलेल्या मोजक्या शस्त्रसंग्रहात ढाल, तलवार, भाला, चिलखत इत्यादी वस्तू आहेत. त्या संग्रहातील घोड्यावर बसून भालाफेक करणारे बाजीराव पेशव्यांचे फॅब्रिक पेंटिग खूपच बोलके आहे. जीवनात अनेक प्रसंगात साथ देणारा माजघरातील मजबूत झोपाळा खूप काही सांगून जातो! इतिहासकार कै. सेतुमाधव पगडी, म.श्री दिक्षीत, ना स. इनामदार, रणजीत देसाई आदी मान्यवरांनी वाड्यास भेट दिली आहे.

चंद्रशेखर बर्वे – 9421912214 (सरदार मल्‍हार दादोजी बर्वे यांचे वंशज)

– चंद्रशेखर बुरांडे

Last Updated On – 19th May 2016

About Post Author

16 COMMENTS

 1. Atishay sundar lekh.fakta
  Atishay sundar lekh. Fakta shrimanta balaji vishwanath tithe kase yeun rahile te sudha sangitla astat tar ajun mahiti milali asti.

 2. खूप सुंदर माहिती आहे .
  खूप सुंदर माहिती आहे .

 3. बुरांडेसाहेब बर्वेवाड्यावरचा
  बुरांडेसाहेब बर्वेवाड्यावरचा लेख खुप छान जमला आहे.खुप आवडला. आपण पुरातन वास्तुशाञदृष्या केलेले वाड्याचे वर्णन खुप भावले.पेशव्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या जन्मगावाचे महत्व तमाम ईतिहासप्रेमी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणल्याबद्दल आपले व सर्व टीमचे विशेष आभार.

 4. बुरांडेसाहेब बर्वेवाड्यावरचा
  बुरांडेसाहेब बर्वेवाड्यावरचा लेख खुप छान जमला आहे.खुप आवडला. आपण पुरातन वास्तुशाञदृष्या केलेले वाड्याचे वर्णन खुप भावले.पेशव्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या जन्मगावाचे महत्व तमाम ईतिहासप्रेमी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणल्याबद्दल आपले व सर्व टीमचे विशेष आभार.

 5. Burande saheb apala barve
  Burande saheb apala barve wadyavarcha article khup chhan zala ahe. khup awadala. apan puratan vastushastranusar kelele wadyache varnan khupach bhavale. Peshavanchya smrutidini tyanchya janmastanache mahatva tamam etihaspremi maharashtratil janatesamor analyabaddal apale v sarve team che vishes abhar. Hi Place Thorle Bajirao chi Birth place ahe tyamule Balaji Vishwanath tethe jaun rahanyacha kahich sambandh nahi. Etihaspremi v Bajirao premini ya thikanala nakki bhet dyavi.

 6. सुंदर ।। हा वारसा
  सुंदर ।। हा वारसा सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी उपलब्ध आहे का?

 7. वाडा पाहता येतो. चंद्रशेखर
  वाडा पाहता येतो. चंद्रशेखर बर्वे यांना संपर्क करावा.

 8. Atishay sundar mahiti aahe hi
  Atishay sundar mahiti aahe hi. Sinnarchya itihasat asha mahitine ek veglya prakarchi bhar padte aahe. Utkrusht aani shurvir mhanun bajirawanchi olkh aahe . Dubere gawacha ha wada ITER jantesathi pahnyas mhanun khula aahe ka.

 9. Amchay Maharashtraacha itihas
  Amchay Maharashtraacha itihas asach jaga theva, pan yala English Ani Hindi bhashet pan pratilikhit kara. Khunach chaan तुम्हाला मानाचा मुजरा…………

 10. खूप अप्रतिम…आपले सगळे लेख…
  खूप अप्रतिम…आपले सगळे लेख मी वाचलेत….मला आजपरेंत हि माहिती कुठेच भेटली नाही….जी तुमच्या मुळे मला भेटली…..तुमचे मनापासून आभार

 11. शिवाजी महाराज, संभाजी…
  शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर जर स्वराज्य ते साम्राज्य या प्रवासाचा पाया बाजीराव महाराजांनी रचला. उत्तर भारताच्या रचनेनुसार मराठी लष्करात बदल करून दिल्ली ला धडक देणारा योद्धा म्हणजे बाजीराव,,,,

 12. छान लेख, वस्तुस्थितीला…
  छान लेख, वस्तुस्थितीला अनुसरून माहीती आहे

Comments are closed.